महर्षी पतञ्जली

विवेक मराठी    17-Oct-2020   
Total Views |

 'पतत्-अंजली' म्हणजे ओंजळीत पडलेला मुलगा, अर्थात अनाथ! असा मुलगा योगसाधना करतो आणि योगसूत्ररचना करतो, व्याकरण महाभाष्य लिहितो हे अद्भुत आहे. सत्यकाम जाबाली, वाल्मिकी, व्यास, कृपाचार्य, विदुर यांच्याच मालिकेतील एक रत्न म्हणजे पतञ्जली! Eसर्व योगांमध्ये पातञ्जल योगाचे (राजयोगाचे) महत्त्व अनन्यसाधारण आहे. सर्व शास्त्रे व सर्व प्रकारच्या यौगिक साधना या योग दर्शनाला 'सर्वतंत्रसिद्धान्त' म्हणून मान्य करतात. असा हा सूत्रग्रंथ!! आपल्याला आपल्याच मनाची, वृत्तींची ओळख करून देणारा! म्हणूनच योगसाधक नित्याच्या प्रार्थनेत म्हणतात, "पतञ्जलींप्रांजलीरानतोस्मि।।"


patanjali _1  H

महर्षी पतञ्जलींच्या कालखंडाबाबत संशोधकांमध्ये मतभेद आहेत. इसवीसनाच्या दुसऱ्या शतकापासून ते इसवीसनपूर्व पाच हजार वर्षे असे अनेक कालखंड सांगितले जातात. आपल्या देशातील प्राचीन ग्रंथपावित्र्य राखण्यासाठी अनेकदा लेखबद्ध न करता कंठस्थ केले जात असत. गुरुशिष्य परंपरेने ते हस्तांतरित होत. त्यामुळे ग्रंथरचना आणि लिखाण यात कैक शतकांचे अंतर असण्याची शक्यता असते. . बुद्धांचे तत्त्वज्ञानही त्यांच्या निर्वाणानंतर पाचशे वर्षांनी लेखबद्ध झाले. पातञ्जल योगसूत्राचेही असेच असू शकते.

. पतञ्जलींच्या मातेचे नाव गोणिका होते, असे म्हटले जाते. पिता अज्ञात आहे. 'पतत्-अंजली' म्हणजे ओंजळीत पडलेला मुलगा, अर्थात अनाथ! असा मुलगा योगसाधना करतो आणि योगसूत्ररचना करतो, व्याकरण महाभाष्य लिहितो हे अद्भुत आहे. सत्यकाम जाबाली, वाल्मिकी, व्यास, कृपाचार्य, विदुर यांच्याच मालिकेतील एक रत्न म्हणजे पतञ्जली!

महर्षी पतञ्जलींनी योगसूत्ररचना केली त्यामागचा दृष्टीकोन, ज्यांच्यासाठी रचना केली ते शिष्य अथवा साधक याविषयी इतिहासात काहीही माहिती मिळत नाही. महाभाष्य लिहिणारे, चरक संहितेचे प्रतिसंस्करण करणारे आणि योगसूत्र रचणारे पतञ्जली एक की तीन, हेही कोडेच आहे. ते पाच हजार वर्षांपूर्वीचे की दोन हजार वर्षांपूर्वीचे, यात विद्वानांमध्ये मतभेद आहेत. मात्र कालखंड कोणताही असला, तरी योगसूत्रांचे नित्यनूतनत्व तसेच आहे. कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक पद्धतीत किंवा कोणत्याही कालखंडात हा ग्रंथ प्रत्येकाला आपला वाटतो. त्या त्या काळातील मानवी प्रश्नांची उकल करण्यास साहाय्य करतो. आस्तिक, नास्तिक, विज्ञाननिष्ठ, वेदान्ती, द्वैतवादी या साऱ्यांना योगदर्शन आपला ग्रंथ वाटतो.

. पतञ्जलींनी योग दर्शन सूत्रांमध्ये रचले. त्यांनी स्वीकारलेला हा शास्त्रशुद्ध लेखनप्रकार आहे. त्यात प्रत्येक शब्द संकल्पनात्मक असतो. त्यामुळे योगसाधनेला शास्त्रकाट्याची कसोटी प्राप्त झाली!! प्रत्येक अभिजात शास्त्राला साधक, अभ्यासक, श्रद्धाळू व विरोधक प्राप्त होत असतात. पातञ्जल योगसूत्रही त्याला अपवाद नाही. मात्र कोणीही योग्य प्रकारे प्रयोग करून हे इंद्रियगम्य व प्रत्यक्षान्तवादी दर्शन अनुभवू शकतो. आत्मज्ञान बौद्धिक नसते. ते विशुद्ध आणि परिष्कृत चित्तात प्रकट होते. त्यासाठी योगसाधना करावी लागते. या अंतर्यात्रेच्या पायवाटेला पतञ्जलींनी योगसूत्रे रचून राजमार्ग तयार करून दिला, म्हणूनच हा राजयोग! विश्वनिर्मितीचे गूढ आणि मानवी जीवनाचे स्वरूप जाणू इच्छिणाऱ्याला प्रत्येक युगात हा ग्रंथराज साथ देतो.

पातञ्जल योग दर्शनाला भारतीय परंपरेत स्वतंत्र दर्शन म्हणून मान्यता आहे. या दर्शनासह 'सांख्य दर्शन' हे जोडशास्त्र (sister philosophy) म्हणून मानले जाते. त्याचबरोबर योग दर्शन हे 'सर्वतंत्रसिद्धान्त' म्हणूनही प्रसिद्ध आहे. सर्वतंत्र म्हणजे अनेक दर्शनांना ज्या दर्शनातील अधिकाधिक बाबी स्वीकार्य आहेत असे दर्शन होय!

पातञ्जल योग दर्शन हे प्रयोगगम्य दर्शन आहे. 'भारतीय तत्त्वज्ञान' या ग्रंथात श्रीनिवास दीक्षित लिहितात - 'तत्त्विक ज्ञान बौद्धिक पातळीवर न राहता त्याचे साक्षात दर्शन घडून यावे, यासाठी योग दर्शन आपल्या शरीराला व मनाला विशिष्ट अशी शिस्त लावते.' 'भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास' या ग्रंथात डॉ. .ना. जोशी लिहितात - 'पतञ्जलींनी योगाला सुसूत्र पद्धतीने रचण्याच्या आधीपासूनच तो अस्तित्वात होता. बौद्ध व जैन दर्शनात योगाला फार उच्च स्थान होते. किंबहुना बौद्ध भिक्खू, अर्हत, जैन मुनी हे सर्व उच्च प्रतीचे योगीच होते. जेथे जेथे अध्यात्मसाधना केली जाते, वैराग्यशील जीवन जगले जाते, जेथे जेथे जाणिवेच्या उच्च पातळ्यांवर चढण्यासाठी इंद्रियनिग्रह केला जातो, तेथे तेथे योगाचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा आचार केला जातो.'

योगसूत्र रचनेचा काळ इसवीसनपूर्व दुसरे शतक असे मानले जाते. मात्र उपनिषदे, रामायण, महाभारत, योग याज्ञवल्क्य, योग वाशिष्ठ यांत योगशास्त्राचा ऊहापोह आढळून येतो. केवळ शाब्दिक ज्ञानाने, चिंतनाने व कर्मकांड करूनही काही मूलभूत प्रश्न तसेच राहतात, त्यावर संशोधन करीत करीत योगशास्त्राचा उगम झाला असावा.

भारतीय चिंतनात सात प्रश्नांचे महत्त्व आहे -
कीं ज्ञेयम्?
कीदृशो ज्ञान:?
अज्ञानस्य स्वरूपं कीम्?
दुःखस्य स्वरूपं कीम्?
ज्ञानस्य स्वरूपं कीम्?
मोक्षस्य स्वरूपं किम्?
एतेषु प्रमाणम् अस्ति वा?

या प्रश्नांची उत्तरे प्रत्यक्षानुभूतीने मिळवण्यासाठी योग दर्शनाचा अवलंब केला जातो. या सात प्रश्नांमध्ये भारतीय चिंतक विविध पद्धतींनी अभिव्यक्त होत गेले. त्या त्या प्रकारचे योग त्यामुळे अस्तित्वात आले. आजघडीला ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, कुंडलिनी योग, राजयोग, हठयोग, मंत्रयोग, जपयोग, सहजयोग, लययोग, तंत्रयोग असे योगाचे कितीतरी प्रकार आहेत. या व यासारख्या अनेक प्रकारांवर विश्वास ठेवून साधना करणारे साधक जगभर पसरलेले आहेत.

या सर्व योगांमध्ये पातञ्जल योगाचे (राजयोगाचे) महत्त्व अनन्यसाधारण आहे. सर्व शास्त्रे व सर्व प्रकारच्या यौगिक साधना या योग दर्शनाला 'सर्वतंत्रसिद्धान्त' म्हणून मान्य करतात.

योगसूत्रे

योगसूत्रे चार भागांत विभागली आहेत. त्या भागास पाद असे म्हणतात.

) समाधिपाद
) साधनपाद
) विभूतिपाद
) कैवल्यपाद

योगसूत्रांतील पहिली दोन सूत्रे योगाची व्याख्या सांगतात.

) अथ योगानुशासम्। -
Now, the teaching of yoga। हे पहिले सूत्र फार महत्त्वाचे आहे. येथे . पतञ्जली तीन बाबी स्पष्ट करतात.

 * 'अथ' हे मंगलाचरणाची सुरुवात करणारे पद वापरून, परंतु संस्कृत ग्रंथात असतात तशी देवतांची स्तुती टाळून ते सांख्य परंपरेचे अनुसरण करतात.

 * हे योग अनुशासन आहे, हे सांगून ते आपण या शास्त्राचे जनक, प्रवर्तक नसून साधक, संकलक आहोत हे स्पष्ट करतात.

 * हा ग्रंथ योगशिक्षणाचा आहे, हे पतंजली पहिल्या सूत्रातच सांगतात.

) ..योगश्चित्तवृत्ती निरोध: - Yoga is to still the patterning of consciousness.
या सूत्रात तीन महत्त्वाचे शब्द आहेत - चित्त, वृत्ती आणि निरोध. चित्त म्हणजे मूलप्रकृती, अर्थात आपल्याला मिळालेली नैसर्गिक यंत्रणा, जी आपण आकलनासाठी, ग्रहणासाठी आणि संवेदनांसाठी वापरतो. ही यंत्रणा पूर्वज्ञानाने भरलेली असते. कोणताही विषय समोर आला की तो आधीच्या अनुभव, स्मृती, ज्ञान, संस्कार यांवर ताडून पाहिला जातो. हे अनुभव आदी सारे उसळून येणे म्हणजे चित्ताच्या वृत्ती होय. आणि निरोध म्हणजे कौशल्याने थांबवणे होय.

'ध्यानापलीकडची योगयात्रा' या ग्रंथात विमला ठकार म्हणतात - 'चित्त म्हणजे भूतकालीन समज, ज्ञान, अनुभव, प्रारब्ध, संचित, जीवशास्त्रीय जनुके यांचा साठा आहे. तो आमरण सोबत असणार आणि सहज वृत्तीने वागणार. त्याचे कौशल्यपूर्वक नियोजन करणे आणि त्यांतील बहिर्मुखता कमी करणे, ते अधिकाधिक अंतर्मुख बनवणे म्हणजे निरोध होय.'

पातञ्जल योगसूत्रातील महत्त्वपूर्ण संकल्पना

) चित्त - चित्त म्हणजे मूलप्रकृती होय. चित्त म्हणजे ज्ञान, अनुभव यांचा साठा. चित्त म्हणजे प्रारब्ध व संचित, ज्याला विमला ठकार जीवशास्त्रीय जनुके असे म्हणतात. परंपरेत मन बुद्धी आणि अहंकार यांनी जे अंतःकरण तयार होते, त्याला चित्त म्हणतात. आतील साधन. या चित्ताच्या विविध वृत्ती असतात.


) वृत्ती - वृत्ती हा शब्द दोन अर्थ प्रकट करतो. एक म्हणजे वर्तुळाकार फिरणारे तरंग आणि दुसरा म्हणजे निवड करणे. सतत फिरणाऱ्या चित्तसंचितातून विचारांची, भावनांची निवड होत राहणे म्हणजे चित्तवृत्ती होय.


) निरोध - योगाच्या व्याख्येत पतञ्जली म्हणतात - 'योग म्हणजे 'चित्तवृत्तीचा निरोध.' रुध् हा धातू थांबवणे अशा अर्थी वापरला जातो. येथे 'नि' हा उपसर्ग आहे, म्हणजे 'निःशेष रोध' अर्थात 'पूर्ण थांबवणे' असा निरोध शब्दाचा अर्थ होतो.


चित्तवृत्ती संपवता येत नाहीत, कारण चित्त आमरण अस्तित्वात असणार, त्याच्या वृत्तीही असणार. त्यांची बहिर्मुखता कमी करून त्यांना अंतर्मुख करणे म्हणजे चित्तवृत्तीनिरोध होय।


) वृत्तींचे प्रकार - एकूण पाच वृत्ती आहेत - प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती.


) प्रमाण - प्रत्यक्षानुमाना आगमा:प्रमाणानि।
प्रमाण हे रोजच्या जगण्यातील महत्त्वाचे साधन आहे. त्याने जगणे सुलभ होते. मात्र जेव्हा हे प्रमाण चित्ताची वृत्ती म्हणून तरंगरूपात उठते, तेव्हा त्या वृत्तीचा निरोध करावा लागतो.
प्रमाणाचे तीन प्रकार आहेत -

* प्रत्यक्ष - म्हणजे पाच ज्ञानेंद्रिये मनाशी संयोग पावून मिळणारे ज्ञान.
* अनुमान - म्हणजे तर्क आणि कार्यकारणसंबंध यावर आधारित ज्ञान.
* आगम - म्हणजे आप्तवचन, मान्यताप्राप्त ग्रंथ यातून मिळालेले ज्ञान.


) विपर्यय - विपर्ययो मिथ्या ज्ञानम् न तद् रूप प्रतिष्ठम्।
वस्तूच्या मूळ रूपाशी मेळ नसणारे ज्ञान म्हणजे विपर्यय होय. स्मृतिकोषाचा सततचा हस्तक्षेप, पूर्वग्रह यामुळे ही वृत्ती तयार होते. परंपरेत यासाठी सर्परज्जूचे उदाहरण दिले जाते. मराठीतील एका प्रसिद्ध अभंगात 'दोरीच्या सापा भिऊनी भवा। भेट नाही जिवा शिवा।' असा विपर्ययाचा उल्लेख आढळतो.

) विकल्प - शब्द ज्ञानानुपाती वस्तू शुन्यो विकल्प:
प्रत्यक्षात वस्तूच नसताना काल्पनिक जगाची निर्मिती म्हणजे विकल्प होय. विपर्ययात निदान दिसणारी वस्तू चूक कल्पली जाते. तिचा बोध लवकर होतो. मात्र चित्ताला एकदा विकल्पवृत्तीने झपाटले की विपरीत ज्ञानाने मनुष्य जग बघत राहतो. खरे तर शब्दांनी कल्पिलेले ज्ञान ही मनाची फार मोठी शक्ती आहे. काव्य, साहित्य, संकल्पन यांची निर्मिती या ज्ञानाने होते. मात्र जेव्हा या शब्दांकडे अस्तित्वात आहे असे बघितले जाते, तेव्हा त्यास विकल्पवृत्ती म्हणतात. परंपरेने 'शशशृंग' म्हणजे सशाची शिंगे हे उदाहरण दिले जाते. मात्र समाज, पूर्वजन्म, स्वर्ग, देश, सरहद्द या बाबीही वैकल्पिक आहेत.


) निद्रा - अभावप्रत्ययालम्बना वृत्ति:निद्रा।
अर्थात काहीही नाही हा प्रत्यय जिचा आधार, अशी वृत्ती म्हणजे निद्रा होय. झोप ही तमोगुणप्रधान असते. या निद्रेचाही निरोध करणे योगसाधकाला गरजेचे आहे. गीतेत एके ठिकाणी म्हटले आहे - 'सर्व झोपले असता जो जागृत असतो, तो योगी'. चित्ताची मूढ आणि क्षिप्त अवस्था म्हणजे निद्रा होय.

) स्मृती - अनुभूत विषया असम्प्रमोष:स्मृती:
स्मृती ही पाचवी वृत्ती आहे. व्यवहारात ही वृत्ती महत्वाची आहे. मात्र चित्ताला अती चाळवून सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात राहण्यास ही वृत्ती बाध्य करते. गौतम बुद्ध यांनी अनुग्रह दिलेला डाकू अंगुलीमाल भिक्खू झाला. पण तो पिंडपातास गेला असता गावकरी चळाचळा कापत असत.

$ विपर्यय वगळता उर्वरित चार वृत्ती व्यवहारात उपयुक्त आहेत. मात्र चित्त जेव्हा सततचा चाळा म्हणून या पाच वृत्तींचा खेळ खेळत राहते, तेव्हा त्यातून क्लेश निर्माण होतात. ते आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ताबा घेतात. आपण जे आहोत ते आणि जे असावे वाटतो, ते यांतील अंतर वाढत जाते. म्हणूनच मूळ स्वरूपाचा शोध घेण्यासाठी या चित्तवृत्तींचा निरोध केला पाहिजे.

त्यासाठी पतञ्जली उपाय सांगतात - 'अभ्यास वैराग्याभ्याम् तं निरोध:' अभ्यासाने आणि वैराग्याने त्यांचा निरोध करता येतो.

असा हा सूत्रग्रंथ!! आपल्याला आपल्याच मनाची, वृत्तींची ओळख करून देणारा! म्हणूनच योगसाधक नित्याच्या प्रार्थनेत म्हणतात, "पतञ्जलींप्रांजलीरानतोस्मि।।"