कोरोनाच्या अंधारातील 'दीपस्तंभ'!

विवेक मराठी    22-Oct-2020
Total Views |

@संजय देवधर

आरोग्य यंत्रणेवरील येणारा ताण कमी करण्याच्या उद्देशाने नाशिकमध्ये 'दीपस्तंभ एकात्मिक कोविड हेल्पलाइन केंद्र' हा उपक्रम दि. २ ऑक्टोबर रोजी सुरू करण्यात आला. कोरोनाच्या अंधारात दीपस्तंभचा प्रकाश, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकरिता आशेचा किरण ठरतोय!" कोरोनाच्या अंधारात चाचपडणाऱ्यांना आश्वासक प्रकाश दाखविण्याचे सेवा कार्य नाशिकमध्ये सुरू आहे.


sanjay_1  H x W

कोरोनाच्या भीषण संकटाला आता सात महिने होऊन गेले. त्याची तीव्रता सातत्याने कमी-जास्त होत आहे. लॉकडाउनच्या अनेक टप्प्यांमधून अनलॉककडे जाताना राज्य सरकारने व प्रशासनाने काही व्यवस्था निर्माण केल्या आहेत. अशा वेळी कोरोनाच्या अंधारात चाचपडणाऱ्यांना आश्वासक प्रकाश दाखविण्याचे सेवा कार्य नाशिकमध्ये सुरू झाले आहे. नागरिकांसाठी 'दीपस्तंभ हेल्पलाइन' तयार करण्यात आली आहे. आठ दिवसातच रुग्णांचा व नातेवाइकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता हा दीपस्तंभ समाजासाठी योग्य मार्गदर्शक ठरेल.


कोरोनाच्या संकटकाळात बाधित किंवा लक्षणे असणाऱ्यांंसाठी सरकारी व प्रशासकीय पातळीवर व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. त्याद्वारे वैद्यकीय कर्मचारी, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य कर्मचारी सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्व माहिती पोहोचवत आहेत. सरकारी कर्मचारी घरोघरी फिरून कोविडसंदर्भात माहिती संकलित करीत आहेत. ती संबंधितांपर्यंत पोहोचवून त्यावर अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र या महामारीचे स्वरूपच इतके अकराळविकराळ आहे की कोणतीही यंत्रणा अपुरी पडते. यंत्रणेवर येणारा ताण कमी करण्याच्या उद्देशाने नाशिकमध्ये 'दीपस्तंभ एकात्मिक कोविड हेल्पलाइन केंद्र' हा उपक्रम सुरू करण्यात आला. त्यासाठी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधण्यात आले. दि. २ ऑक्टोबर रोजी नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत 'दीपस्तंभ'चा प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचालित श्रीगुरुजी रुग्णालय, रा.स्व. संघ जनकल्याण समिती, भोसला मिलिटरी कॉलेज व सहेली सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम डिसेंबर अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. गरज भासल्यास नंतरदेखील ही सेवा पुरविण्यात येईल. दीपस्तंभ केंद्राच्या माध्यमातून हेल्पलाइनद्वारे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करून शंकासमाधान करण्यात येत आहे.


प्लाझ्मादात्यांची सूची आणि कोविड रुग्णांवर उपचार
सरकारी व्यवस्थेला पूरक अशा मेडिकल वेस्ट मॅनेजमेंट व प्लाझ्मादात्यांची सूची करण्यात आली आहे. रक्तगटांनुसार १७५ प्लाझ्मादात्यांची यादी तयार आहे. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर दाते पुढे येतात, आता शहरी भागातही आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान श्रीगुरुजी रुग्णालयाला १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. रुग्णालयाचा तिसरा मजला कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तेथे ३० बेड्सची व्यवस्था असून ४ सेवाभावी डॉक्टर्स, ८ परिचारिका व १२ वॉर्डबॉइज कार्यरत आहेत. या सेवा कार्यासाठी व दीपस्तंभ उपक्रमाकरिता अध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर, जनकल्याण समितीचे कार्यवाह मदन भंदुरे, विजय कदम, संजय कदम, संजय चंद्रात्रे, अमोल जोशी यांचे सहकार्य लाभले आहे.
या संदर्भात दीपस्तंभ उपक्रमाचे समन्वयक डॉ. राजेंद्र खैरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडून तपशीलवार माहिती जाणून घेतली. ते म्हणाले, "नाशिक शहर व परिसरातील नागरिकांच्या मनात कोविडविषयी भीतीची भावना मोठ्या प्रमाणावर आहे. ती दूर करून त्यांना सोप्या शब्दांत योग्य माहिती देणे व वेळेवर दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कोविड आजारासंबंधी, त्यासाठी उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांंबाबत अधिकृत, खात्रीलायक व नेमकी माहिती मिळणे आवश्यक ठरते. त्याबरोबरच घरातील प्रमुख व्यक्ती कोविडचे उपचार घेत असताना त्यांच्या घरच्या अन्य व्यक्तींना मानसिक आधार देणेही महत्त्वाचे आहे. आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, कोविड तपासणी केंद्रांची व उपचारासाठी रुग्णांना त्यांच्या जवळपासच्या रुग्णालयाची माहिती देण्याचे काम दीपस्तंभ करीत आहे. याशिवाय रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाइकांना अल्प दरात भोजन, कोविड रुग्णांना व वयोवृद्ध व्यक्तींना घरपोच औषधे व आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात. गरजेनुसार ऑक्सिजन पुरवठा केला जातो. कोविडमुळे घाबरलेल्या तसेच मानसिकरित्या कमकुवत असणाऱ्या रुग्णांचे व त्यांच्या नातेवाइकांचे समुपदेशन केले जाते."


डॉ. खैरे पुढे म्हणाले, "कोविड रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांना विविध स्तरावर आधार दिला जातो. त्यात कोविडची लक्षणे, विविध चाचण्या, विलगीकरण, उपचार, रुग्णालयाची निवड, योग्य आहार तसेच कोरोनावर मात करून बरे झालेल्यांनी कोणती दक्षता घ्यावी याविषयी वैद्यकीय तज्ज्ञ मार्गदर्शन करतात. पहिल्या ८ दिवसांतच ४ हजारांपेक्षा जास्त जणांचा मिळालेला प्रतिसाद कोरोनाची तीव्रता व सेवेची गरज अधोरेखित करतो. दररोज सकाळी ९ ते रात्री ९पर्यंत हेल्पलाईन सुरू आहे. नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. कोविडची लक्षणे असल्यास कोणत्या तपासण्या करुन घ्याव्यात? पॉझिटिव्ह निदान झाल्यावर नेमके काय करावे? लक्षणे नसली, तरीही पॉझिटिव्ह निदान आले किंवा किरकोळ लक्षणे आढळली तर काय करावे? श्वास घ्यायला त्रास असेल व ऑक्सिजन पातळी कमी असेल, तर काय केले पाहिजे? या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे दीपस्तंभ च्या माध्यमातून नागरिकांना मिळत आहेत. घरीच क्वारंटाइन केलेल्यांनी कोणती औषधे घ्यावी, दिनचर्या व आहार कसा असावा याविषयीदेखील मार्गदर्शन करण्यात येते. गरजेनुसार अल्प दरात जेवणाचे डबे घरपोच दिले जातात."


संपर्क साधा, मदत तयार आहे!

दीपस्तंभ एकात्मिक कोविड हेल्पलाइनशी नाशिक महापालिका हद्दीतील, तसेच जिल्ह्यातील गरजू नागरिकांना संपर्क साधता येईल. ९४२२७४९९८९ आणि ९४२२७५९६७३ या क्रमांकांवर मदतीची माहिती विनामूल्य देण्यात येत आहे. आवश्यकता असणाऱ्यांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा, असे संयोजकांनी व समन्वयकांनी आवाहन केले आहे. आतापर्यंत अनेकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.

'दीपस्तंभ' उपक्रमासाठी मोठी मानवी यंत्रणा राबत आहे. एका वेळी ७ जण कॉल घेतात. २ फोन इन्कमिंग कॉलसाठी, तर ५ आउटगोइंगसाठी व्यग्र आहेत. एकूण ४० जणांचा चमू त्यासाठी कार्यरत आहे. २५० स्वयंसेवकांनी सेवेच्या संधीसाठी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे या यंत्रणेत सुमारे ३० टक्के महिला-युवतींचा सहभाग आहे. प्रत्येक शनिवारी नव्या चमूला प्रशिक्षण देण्यात येते. रविवारी जुना व नवा चमू एकत्र काम करतो. नवीन चमू रविवार ते शनिवार असे सात दिवस सेवा देतो. अशी दीपस्तंभ कार्याची रचना करण्यात आली आहे. नव्या चमूला डॉ. श्रीराम वाणी, समीर देशपांडे व डॉ. जयंत ढाके स्वयंस्फूर्तीने प्रशिक्षण देतात. त्यात रुग्णांशी, त्यांच्या नातेवाइकांशी कसा संवाद साधावा, वैद्यकीय माहिती कोणती व कशी घ्यावी, रुग्णांचा वैद्यकीय इतिहास कसा जाणून घ्यावा व समुपदेशन कसे करावे याविषयी सांगितले जाते" असे स्पष्ट करून डॉ. खैरे पुढे म्हणाले, "नाशिक शहर, परिसराचे एकूण ६ भाग करण्यात आले आहेत. तेथे ९० कार्यकर्त्यांचा चमू भोजन, औषधे पोहोचवणे व अन्य सेवा कार्यात व्यग्र आहे. कोरोनाच्या अंधारात दीपस्तंभचा प्रकाश रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकरिता आशेचा किरण ठरतोय!"
९४२२२७२७५५