फरक दोन स्वभावांचा!

विवेक मराठी    22-Oct-2020
Total Views |
@देविदास देशपांडे

नेता हा जमिनीवर चालणारा असावा लागतो. आपल्या मतदारांच्या, अनुयायांच्या किंवा सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात ज्याला सहभागी व्हावेसे वाटत नाही, तो नेता नसतोच. ही जी तळमळ असते, ती अशी सांगून-सवरून किंवा पीआर एजन्सी नेमून तयार होत नसते. ती स्वभावाचा भाग असते. तीस वर्षांपासून नगरसेवकपदापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत प्रवास करणारा नेता हा असा जमिनीतून वर आलेला असतो. याउलट कलानगराच्या आपल्या गढीत बसून निव्वळ वल्गना करण्यात ज्यांचा जन्म गेला, त्यांना सगळे जग आपल्यापुरतेच वाटत असते. माझे घर, माझी जबाबदारी ही त्यांची योजना नसते, हे त्यांच्या आयुष्याचे सूत्र असते. आपल्या आणि आपल्या बगलबच्च्यांच्या पलीकडे जग असते आणि त्याची काही सुखदुःखे असतात, हे त्यांच्या गावी कशाला असायला हवे?



cm_1  H x W: 0


संस्कृतमध्ये एक श्लोक आहे -
शूरश्च कृतविद्यश्च दर्शनीयोऽसि पुत्रक।
यस्मिन् कुले त्वमुत्पन्नो गजस्तत्र न हन्यते॥

यामागे एक कथा आहे. कोल्ह्याचे एक पिल्लू काही कारणाने सिंहाच्या छाव्यांमध्ये वाढले. ते सिंहाच्या कुटुंबाचाच भाग झाले होते. कालांतराने हे सगळे जण मोठे झाले. एके दिवशी एक मोठा हत्ती त्यांच्या दिशेने चालत आला. त्या वेळी ती सिंहाची पिल्ले हत्तीवर चालून गेली. पण कोल्ह्याच्या पिल्लाला काही ती ऊर्मीच आली नाही. हत्तीवर कशासाठी हल्ला करायचा, हेच त्याला कळले नाही. त्याने सिंहिणीला विचारले, "ही माझी भावंडं हत्तीवर का गर्जतायत?" तेव्हा सिंहीण त्याला म्हणाली, "बाळ, तू शूर आहेस, शिकलेला आहेस (शिकारीच्या सगळ्या क्लृप्त्या जाणणारा आहेस), दिसायलाही चांगला आहेस, पण ज्या कुळात तुझा जन्म झालाय, त्यात हत्तीची शिकार केली जात नाही."

जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले आणि शेतकरी हवालदिल झाला, त्या वेळी सत्ताधारी आणि विरोधका यांचे जे वर्तन दिसले, ते पाहून हे सुभाषित हटकून आठवते. वास्तविक सत्ताधाऱ्यांनी जे करायला पाहिजे, ते विरोधक करत होते आणि विरोधकांनी जे करायला पाहिजे, ते सत्ताधारी करत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपला मातोश्री बंगला सोडायला तयार नव्हते, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पायाला भिंगरी लावल्यासारखे जागोजागी जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करत होते.




cm_3  H x W: 0

मागील वर्षी जवळपास याच सुमारास अतिवृष्टी झाली होती, त्या वेळी याच उद्धव ठाकरे आणि त्यांचे बोलवते धनी शरद पवार यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची वक्तव्य पाहावीत. त्या पार्श्वभूमीवर तर सत्ताधाऱ्यांचे हे वर्तन जास्तच खुपू लागते. तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांनी त्या वेळी दहा हजार कोटींची मदत जाहीर केली होती आणि केंद्र सरकारकडूनही मदत आणली होती. इतकेच नव्हे, तर पावसाच्या परिस्थितीमुळे आपली जनादेश यात्राही स्थगित केली होती. तेव्हा टीका करण्यात काँग्रेस-एनसीपी या जाहीर विरोधकांसोबत 'सत्तारोधी' शिवसेनासुद्धा आघाडीवर होती. याच मंडळींचे आजचे वर्तन पाहिले, तर शेतकर्‍यांचा खरा दु:खहर्ता आणि तारणहार कोण, याचा अंदाज येईल.

वास्तविक परतीच्या आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या पावसामुळे राज्याचे प्रचंड नुकसान झाले. राज्याचा असा एकही भाग राहिला नाही जिथे या पावसाने हाहाकार माजवला नाही. अतिवृष्टीने झोडपून काढल्याने पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पूल, बंधारे आणि रस्ते वाहून गेले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटल्याने दळणवळण ठप्प झाले. शेतीबरोबरच डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. मका, सोयाबीन, भुईमूग, भात ही पिके वाहून गेली. ऐन सुगीच्या दिवसात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हंगामावर पाणी फिरवले. मराठवाड्यात परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत पावसाने प्रलयाचीच झलक दाखवली. विदर्भात तर त्यापूर्वीच पूर आला होता, मात्र मातोश्रीवरच्या सरंजामदारांना याची खबरबातही नव्हती.

खरे तर अशा संकटाच्या वेळेसच जनतेला सरकारचा आधार हवा असतो. अस्मानी संकटापासून मायबाप सरकार वाचवेल, ही त्यांना आशा असते. मात्र अस्मानीसोबतच सुलतानी संकट काय असते, याचा वस्तुपाठ या सरकारने लोकांना घालून दिला. कोरोना आल्यापासून मातोश्रीच्या दरवाजाबाहेर पाय न ठेवलेल्या उद्धव ठाकरे यांनी या सर्व काळात परिस्थितीकडे सपशेल डोळेझाक करण्याचे धोरण स्वीकारले. नको त्या कोट्या आणि शब्दांचे खेळ करत वेळ काढण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्यात तर पालकमंत्रीसुद्धा वसमत तालुक्यात फिरकले नाहीत.



cm_2  H x W: 0

अतिवृष्टीने शेतीचे व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असताना सरकारकडून कोणतीही मदत नाही, पंचनामे होत नाहीत. त्याऐवजी सरकारचे धोरण काय होते? तर आपल्या मिंध्या असलेल्या माध्यमांसमोर टिंगलटवाळी करणे! कारण सरकारला शेतकऱ्यांच्या नुकसानीचे गांभीर्यच नाही. बोलणारेच जास्त, निर्णय घेणारे कोणीच नाही. सगळेच नेते, कार्यकर्ते कुठायत!

विदर्भात तर वेगळाच मामला. तिथे खासदार नवनीत राणा सतत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका करीत असल्याच्या कारणावरून शिवसैनिकांनी खासदार राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या पोस्टरला चपलांनी बदडले आणि निषेध व्यक्त केला. त्यावर उत्तर म्हणून युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनीही मुख्यमंत्र्यांचे पोस्टर जाळले. 'मुख्यमंत्री दाखवा आणि ११ हजारांचे बक्षीस मिळावा' असे चक्क आव्हानच 'स्वाभिमान'च्या कार्यकर्त्यांनी दिले.

विदर्भाबरोबर दुजाभाव न करता मुख्यमंत्र्यांनी या भागाचाही दौरा करावा, इथल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांना भरीव मदत करावी. या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. पिकांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळायला हवी. असे असताना मुख्यमंत्री मात्र मातोश्री सोडायला तयार नसल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली.

याच उद्धव ठाकरे यांनी सरकार येण्यापूर्वी परभणी दौऱ्यावर आलेले असताना बागायती शेतीसाठी हेक्टरी ५० हजार रुपयांची, तर कोरडवाहू शेतकर्‍यांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याचे वचन दिले होते. तेही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन. बांधावर तर सोडा, गावातील पारापर्यंतसुद्धा यांची पायपीट झाली नाही. जेव्हा चोहोबाजूंनी टीकेचा भडिमार झाला, घरकोंबडा म्हणून शेरेबाजी होऊ लागली, तेव्हा कसेबसे मारून-मुटकून सोलापूरला गेले. तेही गावातील एका पुलापर्यंत आणि कसे? तर त्या पुलावर ग्रीन कार्पेट अंथरून! आणि नुकसानभरपाई कशी पाहिली? तर गावाचा नकाशा लावून! ही यांची शेतकऱ्यांसाठीची कळवळ आणि शेतकऱ्यांसाठीचा उमाळा! जणू काही मुख्यमंत्री घराबाहेर पडले, हेच शेतकर्‍यांवर उपकार केले. बरे, एवढे करून शेतकर्‍यांच्या पदरात काय टाकणार, हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवले. कदाचित आणखी एका फेसबुक लाइव्हमध्ये शब्दांच्या करामती करत त्यांना ते सांगायचे असावे!


cm_1  H x W: 0
 
शिवसेनेच्या नेतृत्वाखालील या सरकारचा आणखी एक हुकमी एक्का म्हणजे केंद्राकडे बोट दाखवणे. अतिवृष्टीने अनेकांचे स्वप्न धुळीस मिळाले असून आता त्यांना आधार देण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी केंद्राकडून निधी मिळण्याची मागणी केली. मागील वर्षी अतिवृष्टी झाली, त्याही वेळी केंद्र सरकारने मदत केली होती. यंदाही ते करेलच. पण एवढ्या हिकमतीने तुम्ही राज्य सरकार बळकावले, मग तुम्ही तुमची जबाबदारी कधी उचलणार? का सत्ता फक्त फेसबुक लाइव्हवरून 'संयमी, शांत व गोड-गोड बोलण्यासाठी' मिळवलीय, तेही सांगा.

याच्या उलट नेतृत्व कसे असावे, हे फडणवीसांनी दाखवून दिले. पाऊस चालू असतानाच फडणवीस यांनी राज्याच्या विविध भागांचा दौरा केला. शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर व्यथा मांडल्या. सिंधी काळेगाव येथे फडणवीस हे शेतकऱ्यांशी संवाद साधताना एका शेतकऱ्याने हातात मूग आणि सोयाबीन आणले. त्या पिकांची स्थिती पाहून फडणवीससुद्धा भावनिक झाले. परंतु लगेच सावरत त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. तातडीने मदत देण्यास राज्य सरकारला भाग पाडू असे आश्वासन त्यांनी दिले. या वेळेस चिखलातून चालत जाणारे, बांधाबांधावर शेतकऱ्यांशी संवाद साधणारे फडणवीस यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. व्हिडियो प्रसारित झाले आहेत.
  

नेता हा जमिनीवर चालणारा असावा लागतो. आपल्या मतदारांच्या, अनुयायांच्या किंवा सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात ज्याला सहभागी व्हावेसे वाटत नाही, तो नेता नसतोच. ही जी तळमळ असते, ती अशी सांगून-सवरून किंवा पीआर एजन्सी नेमून तयार होत नसते. ती स्वभावाचा भाग असते. तीस वर्षांपासून नगरसेवकपदापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत प्रवास करणारा नेता हा असा जमिनीतून वर आलेला असतो. याउलट कलानगराच्या आपल्या गढीत बसून निव्वळ वल्गना करण्यात ज्यांचा जन्म गेला, त्यांना सगळे जग आपल्यापुरतेच वाटत असते. माझे घर, माझी जबाबदारी ही त्यांची योजना नसते, हे त्यांच्या आयुष्याचे सूत्र असते. आपल्या आणि आपल्या बगलबच्च्यांच्या पलीकडे जग असते
आणि त्याची काही सुखदुःखे असतात, हे त्यांच्या गावी कशाला असायला हवे?

लेखाच्या सुरुवातीला जी कथा सांगितली, त्यातल्या कोल्ह्याच्या पिल्लासारखी त्यांची अवस्था असते. हे पिल्लू भलेही सिंहासह वाढले असेल, पण सिंहाचा जो मूळ धर्म तोच त्याच्यात नसतो. कोल्ह्याचे पिल्लू सुंदर, शूर आणि प्रशिक्षित असते, पण हत्तीसमोर शेपूट घालते. तसेच काही लोक भलेही पदावर असतील, बोलभांडही असतील आणि चलाखही असतील, पण संकटाला भिडण्याची ताकद त्यांच्यात कुठून येणार? इतरांबाबतची संवेदना त्यांच्यात कुठून येणार?