आत्मभान जगविणारा उद्योजक

विवेक मराठी    23-Oct-2020
Total Views |

 @शीतल खोत


लॉकडाउनमुळे अनेक जण बेरोजगार झाले, निराश झाले. पण हार न मानता ज्यांनी आत्मपरीक्षण करून स्वत:ची ताकद ओळखली ते आज अभिमानाने आपल्या व्यवसायात उभे आहेत. कुठलाही दिवस हा शेवटचा नसतो. आपण फक्त लढायचे असते आणि काम करणार्‍याला यश १०० टक्के मिळतेच. शिवाय संकटप्रसंगी नेहमी चालणार्‍या पायवाटेवरच चालत न राहता ट्रॅक बदलण्याची गरज असते. फक्त थोडे धडपडायला लागते, स्ट्रगल करावे लागते.. आणि स्ट्रगल करणाऱ्याला यश नक्कीच मिळते. मंडणगडचे सचिन शेठ हे याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. लॉकडाउनच्या काळात आत्मपरीक्षण करून, आपला नेहमीचा ट्रक बदलून त्याचा कसा सदुपयोग केला, त्याचा थोडक्यात घेतलेला आढावा...

atmnirbhar _1  

सचिन शेठ हे नाव मंडणगड आणि आजूबाजूच्या परिसरात चांगलेच परिचित झाले आहे. गेली अनेक वर्षे रिअल इस्टेटमध्ये ते कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या ग्राहकांना उत्तम दर्जाचे प्लॉट मिळवून दिले आहेत.
 
लॉकडाउनमध्ये या व्यवसायाला फटका बसला का? तर नाही. खरे तर लॉकडाउन यायच्या आधीपासूनच या व्यवसायाला मंदी आली होती. पण तरीही त्यांचे प्रयत्न चालूच होते, त्यासाठी ते स्वतः मार्केटिंगही करीत होते. रिअल इस्टेटचे काम करीत असतानाच सुमारे पाच-सहा वर्षांपासून त्यांच्या मनात ऑरगॅनिक फार्मिंगचा विषयही घोळत होताच. ‘गोमय प्रॉडक्ट’विषयी त्यांच्या मनात कळकळ होती. त्यामुळे गाय, तिच्याविषयीचा अभ्यास, संघाने केलेली जागृती, वाचन चालूच होते. गोमूत्र, शेण, दूध यांपासून उत्तम दर्जाची उत्पादने घेता येऊ शकता, याचा अभ्यास चालूच होता. समाजात मोठ्या प्रमाणात वाढणारा कर्करोगही ऑरगॅनिक प्रॉडक्टच्या वापराने कमी होऊ शकतो, हा विश्वास पक्का झाल्यावर सचिन शेठ यांनी या क्षेत्रात उतरायचे ठरविले.
त्यासाठी स्वतःची गोशाळा सुरू केली. हळूहळू ती वाढवत नेली. आज त्यांच्या गोेशाळेत २५ गोधन आहेत. या क्षेत्रात जम बसवायचा म्हणून फेब्रुवारी २०१९ला डेवलापरला या विषयीचा एक अभ्यासवर्ग त्यांनी पूर्ण केला. लॉकडाउन आले नसते, तर कदाचित परवानगी घेऊन मी यात आणखी ग्रिप घेतली असती, असे सचिन शेठ म्हणतात. पण तरीही त्यांनी हार मानली नाही. संबंधित विषयाचे संंशोधन करण्यासाठी, त्या विषयीची पुस्तके वाचण्यासाठी, यूट्यूब व्हिडिओ बघून नवीन नवीन कल्पना मिळविण्यासाठी त्यांनी लॉकडाउनचा सदुपयोग केला. इतकेच नव्हे, तर लॉकडाउनच्या आधी ७ ते ८ तास काम केले जात होते, पण कोविड आल्यामुळे १२ तास काम सुरू झाले.
 
या लॉकडाउनचा फायदा असा झाला की, या विषयात अधिक लक्ष घालण्यास त्यांना वेळ मिळाला. हे का झाले? तर ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये, गोमय प्रॉडक्टमध्ये त्यांना काहीतरी करून दाखवायचे होते, रोगराईमुक्त करण्यासाठी आपणच नंबर १ प्रॉडक्ट का काढू नये? हा ध्यास त्यांनी घेतला होता. आणि त्या दिशेने ते चालू लागले होते. त्यासाठी अनेक तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शनही घेतले. यात आणखी एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे रिअल इस्टेटमधील त्यांचे प्लॉट जागच्या जागी विकले जाऊ लागले. ते म्हणतात, "आतापर्यंत मी लोकांकडे जात होतो, पण आता ग्राहक माझ्याकडे चालून येऊ लागला. आणि हा चमत्कार कशामुळे झाला, तर या लॉकडाउनच्या काळात सेकंड होमचे महत्त्व लोकांच्या लक्षात आले. याचा मला नक्कीच फायदा झाला."
 
सध्याचे युग हे डिजिटलचे युग आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक अ‍ॅक्टिव्हिटी चालविल्या. एप्रिल-मेमध्ये त्यांनी स्वत: दोन तास वेळ काढून शिवचरित्राचे पारायण केले. त्याला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. याचा फायदा त्यांना व्यवसायात झाला. ते म्हणतात, "माझी प्रॉपर्टी विकत घेणार्‍याच्या मनात माझ्याविषयी चांगले मत निर्माण झाले. आपण जे काही चांगले काम करतो त्याचा आपल्या व्यवसायावर कळत-नकळत नक्कीच परिणाम होत असतो."
लॉकडाउनमध्ये हतबल न होता सचिन शेठ यांनी स्वत:च्या अंगभुत गुणांना विकसित करण्यासाठी त्याचा उपयोग केला. त्यांचे इंग्लिश खूप चांगले नव्हते, ते सुधारण्यासाठी त्यांनी अभ्यास केला. अकाउंटविषयी माहिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. ऑरगॅनिक फार्मिंगविषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात, "आपल्यात काय कमी आहे, हे प्रत्येकाला माहीत असते, फक्त आपण ते सांगायला लाजतो, लोकांपासून लपवून ठेवतो, पण लोकांपासून लपवताना आपण हे विसरतो की, आपण स्वत:लाच फसवीत आहोत." लॉकडाउनने त्यांना आत्मपरीक्षण करण्याची संधी दिली आणि त्या संधीचे त्यांनी सोन्यात रूपांतर केले, असे म्हटल्यास अतिशोयोक्ती ठरू नये.
डिजिटल मीडियाचा योग्य वापर केल्याने आज आजूबाजूच्या गावातील, परिसरातील लोकं ऑरगॅनिक प्रॉडक्ट, गोशाळा बघायला तिथे येऊ लागली आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे अजून लोक बाहेर पडायला घाबरत आहेत, पण भविष्यात इथे येणाऱ्या लोकांचे प्रमाण नक्कीच वाढेल, याचा त्यांना विश्वास आहे.
 
 
गोमय प्रॉडक्टमध्ये अंगाचा साबण, फ्लोअर क्लीनर, शॅम्पू, गोमूत्र अर्क, गोमूत्र घनवटी, शिकेकाई तेल, तुळस तेल, आवळा तेल, इतकेच काय लवंग तेलही त्यांनी तयार केले आहे. एक उदाहरण सांगताना ते म्हणतात, "जेव्हा मी साबण बनवायला घेतला, तेव्हा मला शिकेकाई आणि तुळस तेल हवे होते. मी ते मागवले, पण जो पहिला स्लॉट माझ्याकडे आला तोच मुळात भेसळयुक्त निघाला. मी तो न वापरता स्वत: तेल कसे तयार करायचे हे शिकलो आणि ही सर्व तेले तयार केली." त्यांना यातून हेच सांगायचे होते की, काम आहे, पण आपण ते प्रामाणिकपणे केले पाहिजे. आपण जर भेसळयुक्त काम केले, तर त्याचा चांगला परिणाम आपल्याला कधीच दिसणार नाही. दापोलीतील एका उद्योजकाने त्यांचा साबण वापरून 'अद्वितीय अनुभव' असा संदेश त्यांना दिला, पुण्यातील एकाने फ्लोअर क्लीनर वापरून आणखी ३० लीटर फ्लोअर क्लीनर मागवून घेतले. लोकांना चांगले काय आणि भेसळयुक्त काय? हे कळते. त्यामुळे आपण आपल्या कामात जर प्रामाणिकपणा दाखवला, तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळणार, असे ते कळकळीने बोलत होते. आज त्यांच्याकडे केवळ सहा जणांचाच स्टाफ आहे, पण पुढील पाच वर्षांत मला माझी कंपनी उभी करायची आहे, हा सचिन शेठ यांचा पण आहे. त्यासाठी ते कोणतीही रिस्क घ्यायला तयार आहेत, कारण रिस्क घेतल्याशिवाय कामही उभे राहणार नाही, हे ते जाणून आहेत.


atmnirbhar _1  
भेसळमुक्त प्रॉडक्ट करणारे उद्योजक पुढे आले पाहिजे. त्यांची सध्या खूप गरज आहे. लोकांनाही ते हवं आहे. ते म्हणतात, "आपले प्रामाणिक प्रयत्न आणि काम बघून लोक स्वत: आपल्याला मदतीचा हात देतात. मलाही अनेक देणगीदारांचे फोन येतात, पण मी त्या देणग्या स्वीकारीत नाही. तुम्ही माझे प्रॉडक्ट विकत घ्या, हीच माझ्यासाठी मोठी देणगी आहे, असे मी सांगतो."

 
लॉकडाउनमुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, अनेक जण बेरोजगार झाले, निराश झाले, त्यांनीही हार न मानता आत्मपरीक्षण करून स्वत:ची ताकद ओळखून उभे राहिले पाहिजे. आणि त्यांनी हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, कुठलाही दिवस हा शेवटचा नसतो. तुम्ही फक्त लढायचे असते आणि काम करणार्‍याला यश १०० टक्के मिळतेच. आपण नेहमी चालणार्‍या पायवाटेवरच चालत असतो, तर तो ट्रॅक आपण बदलला पाहिजे. त्यासाठी थोडे धडपडायला लागेल, स्ट्रगल करावे लागेल.. स्ट्रगल संपेल आणि यश मिळेल. सचिन शेठ म्हणतात, "माझे स्ट्रगल अजूनही संपलेले नाही, पण ते कधीतरी संपेल आणि यश माझ्याकडे येईल, याचा मला विश्वास आहे, हा विश्वास प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला पाहिजे. कोविडमुळे सगळे संपले, आता पुढे काय? असा निराशाजनक विचार करत बसू नका. सचिन शेठ तर म्हणतात, "कोविडमुळे काही संपणार नाही, तर वेगळ्या मार्गाने ते पुन्हा उभे राहणार आहे. जेव्हा १० व्यवसाय बंद होतात, तेव्हा २० नवीन व्यवसाय उभे राहातात. आणि मी स्वत: हे अनुभवाने बोलत आहे. कोविड-१९ भरपूर व्यवसायांना जन्म देणार आहे."
कोविडचा एक परिणाम समाजात दिसून येतो, तो म्हणजे अनेक जण आता खेड्याकडे वळू लागले आहेत, सेंद्रिय पदार्थांना जास्त मागणी येऊ लागली आहे, देशी गायीच्या दुधाला मागणी येऊ लागली आहे. गावी आपले एक घर असावे असे आता प्रत्येकाला वाटू लागले आहे. कोविड-१९चा एका अर्थाने हा फायदाच म्हणावा लागेल. महात्मा गांधीजींचा 'खेड्याकडे चला' हा नारा एकार्थाने पूर्ण होताना दिसत आहे. कोविडचे लाड करत बसायला आता कोणाकडेच वेळ नाही, आता खर्‍या अर्थाने सुगीचा काळ आला आहे, असे प्रत्येकाने मानून पुन्हा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेतली पाहिजे.

 

सचिन शेठ - ९४२११३५५५२