लोककल्याणकारी नेता

विवेक मराठी    29-Oct-2020
Total Views |

 

महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांचे स्थान मोठे आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक लोककल्याणकारी कामे केली. आज विरोधी पक्षनेता म्हणून करत असलेले कार्य महाराष्ट्राला पुढे नेणारे आहे. विचारांची स्पष्टता आणि अभ्यास करण्याची वृत्ती या गुणांमुळे ते आणखी पुढे जातील.

devendra fadnvis_1 &
स्वच्छ प्रतिमा आणि कुशल राजकारणी, अभ्यासू वृत्ती, आर्थिक विषयासह अनेक विषयांचा व्यासंग असे व्यक्तिमत्त्व असलेले महाराष्ट्रातील एक नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस.
नगरसेवक, महापौर, प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री या पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळलेली आहे आणि आता विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची जबाबदारी लक्षवेधी आहे. एक यशस्वी नेता म्हणून त्यांच्याविषयी सांगण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत. १९९९पासून ते आजपर्यंत ते विधानसेभेचे सदस्य आहेत. देवेंद्रजीं पहिल्यांदा आमदार झाले, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. विधानसभेत ते अतिशय अभ्यासपूर्ण भाषणे करत, मुद्देसूद चर्चा करत, आजही करतात. अशा भाषणाबद्दल त्यांना पुरस्कारही मिळाला.


साप्ताहिक विवेकच्या फेसबुक पेजला like करा.... 
 

ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी महत्त्वाची विविध कामे केली. त्यातील ठळक कामे म्हणजे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार योजना आणि शेतकरी हिताची कामे होत. आज जलयुक्त शिवार योजनेच्या कामाबद्दल अनेक जण आक्षेप घेत असतात. या कामाचे यश काय आहे, हे त्यांनी अगोदर शेतकऱ्यांना विचारावे. असंख्य शेतकऱ्यांना जलयुक्त शिवार योजनेचा चांगला फायदा झालेला आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना देवेंद्रजींच्या एकूणच कार्यकाळात मदत मिळायची, पीकविमा असो की कर्जमाफी, अशा योजनांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळायचा, दूधउत्पादक शेतकऱ्यांना २५ रुपये लीटर असा दर मिळाला, अशी असंख्य विधायक कामे सांगता येतील. देवेंद्रजींचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ अनेक दृष्टींनी वैशिष्टयपूर्ण होता. त्यावर स्वतंत्र लेख लिहिता येईल, चिंतन करता येईल.
विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचे कार्य लक्षणीय आहे. कोरोना काळात त्यांनी केलेले दौरे, दिलेल्या भेटी यावरून त्यांच्या कामाची चुणूक लक्षात येते. कोरोनाच्या संकटकाळात स्वतःची जिवाची पर्वा न करता ते महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले. त्यांचे दुःख समजून घेतले. या संकटांमुळे सामान्य नागरिक कसा हतबल झाला आहे, याची त्यांना जाणीव झाली. यासंबंधी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती किती भयावह होती, हे लक्षात आले.
सप्टेंबर २०२०च्या विधानसभा पावसाळी अधिवेशनात त्यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणाची दखल घेण्यासारखी आहे. या भाषणात महाराष्ट्रातील स्थितीचे वर्तमान होते. कोरोनासंदर्भात केलेल्या भाषणात खरी माहिती होती, त्याचबरोबर अनेक मुद्द्यांना केलेला स्पर्शही महाराष्ट्रातील विद्यमान सरकारने लक्षात घेतला पाहिजे.
देवेंद्रजींच्या भाषणाचे वैशिष्ट्य असे की ते कुठेही द्वेष करत नाहीत, कुणाचा अवमान होईल अशी टीका करत नाहीत, व्यक्तिगत टीका करण्यापेक्षा सकारात्मक टीकाटिप्पणी करत असतात. त्यांच्यावर कोणी टीका केली तर ते विचलित होत नाहीत. हे त्यांचे गुण सर्वांनी आत्मसात करण्यासारखे आहेत. अशा या व्यक्तिमत्त्वास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
हरिभाऊ बागडे
माजी विधानसभा अध्यक्ष