@अतुल तारे
बिहारच्या निवडणुका संपूर्ण देशाच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या असतात. बिहारच्या निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीने स्पष्ट संकेत दिले आहेत की महाआघाडीच्या गाठी दोन्ही बाजूने ढिल्या होत आहेत. याचे पडसाद महाराष्ट्रात एक नवे राजकीय समीकरण होताना दसत आहे. बिहार देशाच्या राजकारणाचा थर्मामीटर ठरणार आहे. तापमान काय असेल हे लवकरच बघायला मिळेल.
बिहार विधानसभा निवडणुका केवळ एका राज्याच्या प्रादेशिक निवडणुका नसतात, तर बिहारच्या निवडणुका संपूर्ण देशाच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या असतात. पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबर रोजी आहे आणि मी जेव्हा त्या विषयीचा हा लेख लिहिण्यासाठी घेतला, तेव्हा केवळ २९ दिवस शिल्लक राहिले आहेत. पण चार आठवडे आधीपासूनच बिहारमधील सर्वच आघाड्यांच्या गाठी ढिल्या पडताना दिसत आहेत. महाआघाडीची घट होतेय आणि नवीन आघाड्या समोर येत आहेत. सत्ताधारी पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या राजगतही (राष्ट्रीय जनतांत्रिक आघाडीतही) आता फूट दिसू लागली आहे.
या निवडणुका बिहारच्या राजकारणातील नितीश कुमार यांचे भविष्य निश्चित करणाऱ्या ठरणार आहेत. खरे तर लोजपाचे (लोक जनशक्ती पार्टीचे) चिराग पासवान यांनी त्यांच्याविरोधात आघाडी उघडली असतानाही अलीकडे ते कमी बोलत आहेत. बिहारच्या राजकारणाला, त्यातही नितीश कुमारांच्या राजकारणाला जवळून ओळखणाऱ्या डॉ. अनंत यांच्या मते जेव्हा नितीश कुमार कमी बोलत असतात किंवा कमी सक्रिय दिसतात, तेव्हा ते राजकीय खेळी खेळण्यात गुंतलेले असतात. शेवटच्या क्षणाला एखादा मास्टरस्ट्रोक लगावणे ही नितीशकुमारांची राजकीय शैली आहे. राजकीय विश्लेषक महेंद्र कुमार यांच्या मते मात्र नितीश कुमार यांची प्रतिमा प्रथम राष्ट्रीय स्तरावर बनली, मग प्रादेशिक राजकारणात. या निवडणुका ती प्रतिमा कायम ठेवतील का, याबाबतही शंकाच आहे. राजगचे केंद्रात नेतृत्व करणाऱ्या भाजपालाही बिहारमध्ये मोठा भाऊ बनण्याची महत्त्वाकांक्षा आहे, ज्यासाठी नितीश कुमार कधीच तयार होणार नाहीत. भाजपाच्या या राजकीय भूमिकेला पडद्यामागून लोजपाचा दबाव गती देत आहे.
दुसरीकडे विरोधी पक्षाचे दिग्गज नेते लालूप्रसाद यादव रुग्णालयात आहेत. त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी काॅंग्रेसला आपल्या अटी सांगितल्या आहेत. पक्षाचे प्रादेशिक नेते केंद्रीय नेतृत्वाच्या उदासीन भूमिकेबाबत अतिशय नाराज आहेत, पण त्यांना जाणीव आहे की यात एकट्याने तरून जाणे शक्य नाही. या दरम्यान छोट्या छोट्या पक्षांच्या रूपाने मोठमोठ्या महत्त्वाकांक्षा बाळगणारे दिग्गज नेते नवनवीन आघाड्यांच्या सोबतीने दंड थोपटून तयार आहेत आणि किमान मागण्यांसह आपली दुकाने उघडून बसले आहेत. भाजपाची भूमिका निश्चितच विधानसभा निवडणुकांमध्ये नितीश कुमारांचा चेहरा ठेवण्याची आहे, मात्र अनेक आव्हाने असताना पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच चेहरा वापरण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. विरोधकांकडे तर कोणता चेहराच नाही आणि राजगसाठी हेच बलस्थान आहे.
मोठा भाऊ कोण?
महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही राज्यातील राजकारणात मोठा भाऊ कोण हा वाद आहे. भाजपाला वाटते की तिला राज्यातही मोठ्या भावाचे स्थान मिळाले पाहिजे आणि तीच सध्याच्या राजकारणाची गरजही आहे. २०१०मधील विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीदेखील त्याच्या या दाव्याला भक्कम बनवत आहे. २०१०मध्ये भाजपाने १०२ जागांवर निवडणूक लढवली होती आणि त्यापैकी ९१ जागांवर विजय मिळवला. जदयुने १४१ जागांवर निवडणूक लढवून ११५ जागा जिंकल्या. २०१५मधील निवडणूका जदयुने राजदसह लढल्या होत्या. त्या वेळी जदयुने १०१ जागांवर उमेदवार उभे केले होते. जदयुला १००-१०२ जागा मिळाव्यात म्हणजे राज्यात भाजपा मोठा पक्ष ठरू शाकेल असे भाजपाला वाटतेय. भाजपाच्या या महत्त्वाकांक्षेला लोजपाचा दबाव मदत करेल की भाजपासाठी संकट उभे करेल, यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल.
सत्ताधारी पक्षांना धडा शिकवण्याचा दावा करणारी महाआघाडी विखुरली आहे. राज्यात सध्या ५ आघाड्या बनल्या आहेत. त्यांपैकी ४ निवडणुका लढतील, तर पाचवी 'जिधर दम उधर हम' अशी भूमिका घेईल. मात्र कोणत्या आघाडीत कोणता पक्ष किती काळ टिकेल याचा अंदाज लावणे आतातरी कठीण आहे. कारण जागावाटपात सहमती न झाल्यास प्रादेशिक पक्ष कोणत्याही क्षणी मित्रपक्षासमोर शत्रू बनून उभा ठाकताना दिसेल. उदा., सध्या उपेंद्र कुशवाहा, जीतन राम मांझी दिसत आहेत. राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो ही म्हण खोटी नाही. आता बिहारमध्येच पाहा - सहा महिन्यांपूर्वीपर्यंत दहा पक्षांसह महाआघाडी सत्ताधारी राजगला ललकारत होती. निवडणुका जवळ येऊ लागल्या तशी महाआघाडीतील पक्षांची संख्या कमी कमी होऊ लागली. महाआघाडीत आता फक्त पाच पक्ष राहिले आहेत. त्यांच्यामध्येही जागावाटपावरून वाद आहेत. महाआघाडीतील जागावाटपाचा पेच अजून सुटलेला नाही. काँग्रेसला ८०पेक्षा जास्त जागांवर निवडणुका लढवायच्या आहेत. राजद इतक्या जागा देण्यास तयार नाही. राजदने काँग्रेसवर उलटा दबाव आणला आहे. राजदचे राज्यसभेतील खासदार मनोज झा यांनी नुकतेच काँग्रेसला आपला हट्ट सोडण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, यामुळे काँग्रेसचेच नुकसान होऊ शकते. काँग्रेसचा नाइलाज असल्याने ती महाआघाडी सोडू शकत नाही. राज्यातील नेत्यांच्या दबावामुळे आणि राज्यातील नेते पक्ष सोडून जातील या भीतीमुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी बिहार काँग्रेसमधील नेत्यांना दिल्लीला बोलावले आहे. तिथे त्यांना काय सांगितले जाईल याची कल्पना सर्वांना आहे, पण बिहारमध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठीला संदेश द्यायचा आहे की काँग्रेसवर कोणताही दबाव नाही.
राष्ट्रीय जनतांत्रिक आघाडीमध्ये (राजगमध्ये)मध्ये फूट तर नाही, पण विस्ताराच्या आकांक्षेने लोजपा अशा प्रकारे शक्तिप्रदर्शन करत आहे, की त्यामुळे भाजपावर दबाव निर्माण होत आहे. लोजपा नेते चिराग पासवान यांच्याकडून वारंवार संकेत दिले जात आहेत की जर भाजपाने त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जागा वाटप केले नाही, तर ते आघाडी तोडायला मुळीच मागेपुढे बघणार नाहीत. असे काही होणार नाही, मात्र त्यामुळे तिकिटासाठी इच्छुक असलेल्या पक्षातील नेत्यांना संदेश देण्याचा लोजपाचा प्रयत्न आहे. पक्षांतर्गत विरोध कमी करण्यासाठी ते हे करत आहेत. राजगने यापूर्वीच लोजपाला स्पष्ट केले आहे की ठरलेल्या जागांपेक्षा त्यांना जास्त जागा मिळणार नाहीत, हवे असल्यास त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारावा. मात्र ही गोष्टदेखील खरी आहे की लोजपाची दलित मतदारांवर चांगली पकड आहे. वाईटातल्या वाईट परिस्थितीतही विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांत लोजपाला ११% मते मिळतात. सध्या केंद्रीय मंत्री रामविलास पासवान अत्यवस्थ असल्याने त्याविषयीची सहानुभूतीही पक्षाला मिळू शकते. भाजपा लोजपासाठी जदयुच्या जागा कमी करण्याचा विचार करू शकेल पण आपल्या जागा देण्यास भाजपा तयार नाही. वस्तुस्थिती लक्षात घेऊन चिराग अधिकाधिक विस्तारासाठी ही अनुकूल वेळ मानत आहे.
सगळ्यात मजेशीर आघाडी माजी अर्थमंत्री यशवंत सिंह यांची आहे. या आघाडीत ते सर्व नेते आहेत, ज्यांना त्यांच्या पक्षाने दुर्लक्षित केले आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र यादव, राज्यातील माजी मंत्री नरेंद्र सिंह आणि रेणू कुशवाहा, माजी खासदार अरुण कुमार आणि नागमणी यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे. आता ही आघाडी निवडणूक लढणार की निवडणुकीचा तमाशा बघणार की स्वतःच तमाशा बनणार, हे या आघाडीने अजूनपर्यंत स्पष्ट केलेले नाही. भूमिका स्पष्ट नसल्यामुळे या आघाडीला 'बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना' असे म्हटले जात आहे.
बिहारमध्ये आणखी दोन आघाड्या तयार झाल्या आहेत. महाआघाडीतून बाहेर पडलेल्या उपेंद्र कुशवाहा यांनी बसपा, सपा, जनवादी पार्टी, सोशालिस्ट पार्टी या सगळ्यांना एकत्र आणून नवी आघाडी उघडली आहे. तर दुसरीकडे पप्पू यादव यांनी प्रगतिशील लोकतांत्रिक गठबंधन नावाने नवी मोर्चेबांधणी केली आहे. यामध्ये पप्पू यादव यांची जन अधिकार पार्टी, चंद्रशेखर आझाद रावण यांची आझाद समाज पार्टी, एम.के. फैजी यांची एसडीपीएल, वी.एल. मतंग यांची बहुजन मुक्ती पार्टी यांचा समावेश आहे. आता यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. खासदार असादुद्दीन ओवैसी हेदेखील देवेंद्र यादव यांच्या समाजवादी जनता दलशी हातमिळवणी करत संयुक्त जनतांत्रिक धर्मनिरपेक्ष आघाडी तयार करून मैदानात उतरली आहे. बिहारच्या सीमावर्ती भागात ही आघाडी मोठ्या दिमाखात निवडणूक लढवणार आहे.
काॅंग्रेसशी जागावाटपाचा तिढा
राजदने काॅंग्रेससमोर ५८ जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. त्याशिवाय वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीची जागाही काॅंग्रेसने राजदला देऊ केली आहे. राजद कोणत्याही परिस्थितीत काॅंग्रसला महाआघाडीतून बाहेर पडू देणार नाही. जागावाटपाबाबत काॅंग्रेसची समजूत घालण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे. काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते सदानंद सिंह यांनी मात्र बिहारमध्ये किमान ८० जागांवर काॅंग्रेसला उमेदवारी मिळायला हवी अशी मागणी काॅंग्रेस हायकमांडकडे केली आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा सुटत नाही. तेजस्वी यादवने आपल्याला महाआघाडी हवी असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र आपल्या अटींवर या निवडणुकीत १५०पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याचा राजदचा प्रयत्न आहे. तरीही महाआघाडीतील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून त्यांना सर्वांना सोबत घेऊन चालायचे आहे. दुसरीकडे काॅंग्रेस आणि सीपीआर-एम हेदेखील या आघाडीत आहेत. याच कारणांमुळे अजूनपर्यंत जागवाटपाचा फाॅर्म्युला निश्चित झालेला नाही. सध्यातरी राजदचे सूत्र जागावाटपाबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे सांगत आहेत.
ही तर सुरुवात आहे. पुढच्या काही दिवसांत हे चित्र अधिक स्पष्ट होईल. बिहारच्या निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीने स्पष्ट संकेत दिले आहेत की महाआघाडीच्या गाठी दोन्ही बाजूने ढिल्या होत आहेत. हे चित्र आता बिहारपुरतेच असणार नाही. महाराष्ट्रात एक नवे समीकरण तयार झाले होते, जे आता पुन्हा बिघडताना दिसत आहे. पंजाबमध्येही नवीन समीकरणे तयार होत आहेत. मध्य प्रदेशमधील पोटनिवडणूक एका नव्या प्रयोगाच्या यशाचे किंवा अपयशाचे चित्र स्पष्ट करेल. या सगळ्या बाबतीत एक गोष्ट समान आहे की, भाजपा केंद्रात आहे. भाजपाच्या यशाने मित्रांना शत्रू बनवले, तर काही ठिकाणी अनेक शत्रू एकत्र होत आहेत. बिहार देशाच्या राजकारणाचा थर्मामीटर ठरणार आहे. तापमान काय असेल हे लवकरच बघायला मिळेल.
(लेखक स्वदेश प्रकाशन समूह, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशचे समूह संपादक आहेत. )
मूळ हिंदी लेखाचा अनुवाद : सपना कदम-आचरेकर