'हिंदू'ची सावली नसलेली 'पंगतीतलं पान'

विवेक मराठी    03-Oct-2020
Total Views |

@शीतल खोत

जुलै २०१८मध्ये मॅजेस्टिकने एक अनोखा उपक्रम राबविला, तो म्हणजे 'हिंदू कादंबरी लेखन स्पर्धा' या स्पर्धेची पहिली अट होती, कादंबरीतून कादंबरी लेखन. मॅजेस्टिकने या स्पर्धेसाठी निवडलेली कादंबरी म्हणजे भालचंद्र नेमाडे यांची 'हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ' ही कादंबरी. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त 'हिंदू' कादंबरीला दहा वर्षे पूर्ण झाली, त्या निमित्ताने ही कादंबरी स्पर्धेसाठी निवडण्यात आली. अनेक लेखकांनी हे त्यावर लिहण्याचे शिवधनुष्य आनंदाने पेलले. त्यात प्रा. अविनाश कोल्हे यांच्या 'पंगतीतलं पान' या कादंबरीला पहिले आणि एकमेव पारितोषिक मिळाले.


'Pangatitalam Paan'_1&nbs

'
कादंबरीतून कादंबरी लेखन' - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसची अभिनव कल्पना. गेली अनेक वर्षे मॅजेस्टिक प्रकाशन कादंबरी स्पर्धा आयोजित करीत आले आहे. नवीन लेखकांचा शोध आणि चांगले साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविणे हाच यामागील मूळ हेतू. त्यातूनच जयवंत दळवी यांची 'चक्र', भानू काळेंची 'तिसरी चांदणी', मनोहर तल्हारांची 'माणूस' या कादंबऱ्यांचा जन्म झाला. जुलै २०१८मध्ये मॅजेस्टिकने एक अनोखा उपक्रम राबविला, तो म्हणजे 'हिंदू कादंबरी लेखन स्पर्धा' या स्पर्धेची पहिली अट होती, कादंबरीतून कादंबरी लेखन. मॅजेस्टिकने या स्पर्धेसाठी निवडलेली कादंबरी म्हणजे भालचंद्र नेमाडे यांची 'हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ' ही कादंबरी. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त 'हिंदू' कादंबरीला दहा वर्षे पूर्ण झाली, त्या निमित्ताने ही कादंबरी स्पर्धेसाठी निवडण्यात आली. नेमाडेंची ही कादंबरी म्हणजे एक महाकाव्यच आहे. अनेक कथाबीजे या कादंबरीत विखुरलेली आहेत. 'हिंदू'मधील बीजाचा आधार घेऊन लेखकाने स्वतःच्या सर्जनशक्तीच्या, कल्पनाशक्तीच्या आधारे संपूर्ण नव्या कादंबरीला जन्म द्यावा, हिंदू कादंबरीचा तो पुढील भाग नसावा किंवा मागील भागही नसावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कादंबरीचे लिखाण केवळ सहा महिन्यांत पूर्ण करावे, असे या स्पर्धेचे नियम होते.

'
हिंदू'ची समाजात जी प्रतिमा आहे, ती वाचून त्यातील पात्र घेऊन नवीन कादंबरी लिहायची आणि तीही सहा महिन्यांत हे खरोखरच शिवधनुष्य पेलण्यासारखे होते. पण अनेक लेखकांनी हे शिवधनुष्य आनंदाने पेलले. त्यात प्रा. अविनाश कोल्हे यांच्या 'पंगतीतलं पान' या कादंबरीला पहिले आणि एकमेव पारितोषिक मिळाले. एकमेव अशासाठी की ही कादंबरी इतकी उत्तम झाली होती की दुसरे आणि तिसरे पारितोषिक देऊ नये, असा निवड समितीने निर्णय घेतला.

कादंबरी लेखनाविषयी सांगताना लेखक म्हणतात, "ललित मासिकात जेव्हा ही स्पर्धा पहिली, तेव्हा काहीच मनात नव्हतं, फक्त आपण हे करायचं एवढंच डोक्यात होतं." त्याआधी त्यांनी 'हिंदू' वाचली होती, पण ती वाचकाच्या नजरेतून. आता यातील कुठले उपकथानक आपल्याला फुलविता येईल हा विचार डोक्यात ठेवून वाचन चालू होते. नेमाडेंची भाषा, वाचकांना खिळवून ठेवण्याची त्यांची शैली, त्यांची कथानके दुसऱ्यांदा कादंबरी वाचतानाही नव्याने ओळख होत होती. या महाकाव्यातील कुठले कथानक निवडायचे हे ठरविण्यातच बरेच दिवस जात होते. जसजसे दिवस संपत होते, तसतशी लेखकाची अस्वस्थता वाढत होती. अखेरीस कथानक ठरले आणि लिखाणाला सुरुवात झाली. दिवस आणि वेळ यांचे गणित मांडले गेले आणि रोज ७०० ते ८०० शब्द लिहिल्याशिवाय लॅपटॉप बंद करायचा नाही, हे ठरले. प्राध्यापक होण्याआधी कोल्हेसरांनी मुंबईत अनेक जाहिरात कंपन्यांत नोकरी केल्याने वेळेचे नियोजन कसे केले पाहिजे याची उत्तम जाण होती. त्यानुसार त्यांनी नियोजन केले आणि २९ डिसेंबरला संध्याकाळी मॅजेस्टिकच्या कार्यालयात आपली कादंबरी नेऊन दिली.

कादंबरीविषयी सांगताना सर म्हणतात, "कादंबरीची कथा २००१ सालातील असून बुलढाणा जिल्ह्यातली आहे. त्यामुळे त्या वेळची परिस्थिती, त्या वेळचे प्रश्न हा कादंबरीचा विषय आहे. बुलढाण्यातील एक छोटेसे खेडे फुलगाव, धांडे-पाटलाचा वाडा, तिथले लोक, त्यांचा परस्परांशी असलेला संबंध, हेवेदावे असे सर्व चित्र या कथेत रंगविले आहे."

'
पंगतीतलं पान' या कादंबरीतून लेखकाने गावकुसातल्या परिस्थितीचे बदलत जाणारे चित्रण रेखाटले आहे. एक तरुण मुलगा गुलाब धांडे-पाटील हे या कथानकाचे मध्यवर्ती पात्र आहे. लेखक आपल्या पत्राचा नायक असा उल्लेख करत नाही. कारण त्यांच्या मते नायक हा सर्वगुणसंपन्न असावा लागतो. आणि माझी पात्रे ही माणसे आहेत, त्यांच्यात गुण आहेत, अवगुण आहेत. परिस्थितीनुसार त्यांच्या स्वभावात बदल होतो, आणि तो अपेक्षितही असतो. त्यामुळे ते आपल्या पत्राचा नायक असा उल्लेख करीत नाहीत.

तर हा गुलाब उच्च शिक्षणासाठी पाच-सहा वर्षे पुणे-मुंबईत आणि नंतर दिल्लीत असतो. जातिव्यवस्था नाकारणारी पुरोगामी, आधुनिक मूल्ये त्याला मान्य आहेत. तो आंतरजातीय-आंतरधर्मीय लग्न करायलासुद्धा तयार आहे. असे असूनही त्याला जातीतच लग्न करावे लागते. त्याच्या या प्रवासाचे प्रभावी आणि परिणामकारक वर्णन कादंबरीतून करण्यात आले आहे. .

कादंबरीच्या केंद्रस्थानी असणारे गावकी, भावकी यांचे स्वरूप, लेखकाने जाणलेली मानवी नातेसंबंधांतील सूक्ष्मता, कौटुंबिक नात्यातील सत्तासंघर्षाची लढाई आणि तिला मिळालेली वेगवेगळी वळणे, गुलाब धांडे -पाटील याने अनुभवलेले जग आणि व्यावहारिक जग यातील प्रचंड दरी, जीवनाला सामोरे जाताना आलेले अनुभव यांचे रोमहर्षक वर्णन कादंबरीतून अनुभवाला मिळते.

ग्रामीण जीवनातील कौटुंबिक ताण, जातीपातींचे सामाजिक वास्तव, विवाहसंस्थेकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टीकोन, स्त्री-पुरुष नात्यातील गुंतागुंत इत्यादींची उत्कंठावर्धक मांडणी कादंबरीची आवाहकता वाढविते.

कादंबरीच्या शीर्षकाविषयी सांगताना लेखक म्हणतो - गुलाब धांडे-पाटलासमोर असलेली परिस्थिती, त्या परिस्थितीचा त्याच्यावर आलेला दबाव आणि शेवटी त्याने सारासार विचार करून घेतलेला निर्णय बघता, तो सोडून गेलेल्या पंगतीत परत येतो, त्यातूनच 'पंगतीतलं पान' हे या शीर्षकाचा जन्म झाला.

आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक म्हणून कोल्हेसरांचा उल्लेख केला जातो. मग आंतरराष्ट्रीय राजकारणातून थेट गावकुसाचा विषय त्यांनी कसा निवडला? 'ग्लोबल ते लोकल' या त्यांच्या प्रवासाविषयी ते म्हणतात, "माझे मूळ गावातच आहे. वयाची पहिली १६ वर्षे मी गावातच लहानाचा मोठा झालो, त्यामुळे तिथल्या वातवरणाशी माझी नाळ जुळली आहे. या कादंबरीत जो ग्रामीण भाग आला आहे, तो एका अर्थी माझ्या भावविश्वाचाच भाग आहे."

ज्येष्ठ कथाकार मधू मंगेश कर्णिक, प्रा. डॉ. विलास खोले आणि प्रा. रंगनाथ पाठारे या तीन दिग्गजांच्या निवड समितीने एकमुखाने या कादंबरीची निवड केली.

'
हिंदू' डोळ्यासमोर ठेवून, पण 'हिंदूं'ची सावली नसलेली ही कादंबरी वाचकांना नक्कीच आवडेल.