ईश्वरीय प्रेरणेचा ‘जनसेवक’

विवेक मराठी    31-Oct-2020   
Total Views |

devendra fadnvis_1 &


जनसेवक देवेंद्र फडणवीस यांचा हा विशेषांक वाचकांच्या हाती देताना आम्हाला आमच्या कर्तव्यपूर्तीचा आनंद होत आहे. वृत्तपत्रीय धर्माप्रमाणे जे सत्य असेल, लोकहिताचे असेल आणि सर्वांच्या कल्याणाचे असेल तेच मांडले पाहिजे. त्यामध्ये पक्षीय राजकारण, जातीय राजकारण, प्रादेशिक राजकारण, व्यक्तीद्वेषाचे राजकारण आणता कामा नये. सर्वच वृत्तपत्रांनी या धर्माचे पालन करणे आवश्यक असते. लोकशाहीचा हा चौथा स्तंभ ‘सत्य तेच सांगीन, सत्य तेच पाहीन आणि सत्य तेच बोलीन’ या मुद्यावरच उभा राहिला पाहिजे. महाराष्ट्रात ही परंपरा लोकमान्य टिळक, आगरकर, बाळशास्त्री जांभेकर, महात्मा जोतिराव फुले, डॉ. आंबेडकर यांनी वारसा हक्काने आम्हाला दिलेली आहे. तिचेच पालन करीत ‘जनसेवक देवेंद्र फडणवीस’ हा अंक करण्याचा आम्ही निर्णय घेतला.
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो

या साने गुरुजींच्या ओळी. तसे साने गुरुजींचे शिष्य नसलेले देवेंद्र फडणवीस जगत आहेत. कोरोनाचे संकट आणि ते प्राणघातक असल्यामुळे तसेच त्यावर प्रभावी औषध नसल्यामुळे शासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून टाळेबंदी जाहीर केली, ती आवश्यकच होती. टाळेबंदीबद्दल कोणत्याही सरकारला दोष देता येणार नाही. त्यांनी त्यांचे कर्तव्य केले. त्यांच्या अंमलबजावणीत ज्या त्रुटी राहिल्या त्यादेखील व्यवस्थेचे आणि माणसाचे दोष समजले पाहिजेत. ते दाखवून देण्याचे काम माध्यमाने आपआपल्या परीने केलेले आहे. यात कोणाचाही कसलाही राजकीय हेतू नाही, असे मानायला हरकत नाही.
कोरोना संकटाने माणसाला माणसापासून दूर केले. जवळ जायचे नाही, कोणाला स्पर्श करायचा नाही, तोंडाला मुखपट्टी लावायची, फार बोलायचे नाही, कामावर जायचे नाही, प्रवास करायचा नाही, शक्यतो घराच्या बाहेर पडायचे नाही. डोळ्यांनाही न दिसणार्‍या एका विषाणूने सर्व समाजाला कैद करून टाकले.
दीर्घकाळ कैदेत राहिले की मानसिक संतुलन बिघडते. एकाकी असल्याची भावना तीव्र होते. माझे, माझ्या कुटुंबाचे काय होणार याची चोवीस तास चिंता लागून राहते. चिता एकदा जाळते, चिंता रोज जाळत राहते. नोकरीचे काय होणार, व्यवसायाचे काय होणार, मुलांच्या शिक्षणाचे काय होणार, आरोग्याचे काय होणार असे अनेक चिंतेचे प्रश्न उभे राहतात.
 
अशा वेळी समाजाला धीर देणारा, त्यांच्यात उत्साह निर्माण करणारा, त्यांच्यातील चेतना जागविणारा, त्यांच्या सुखदु:खात सहभागी होणारा नेता उभा राहावा लागतो. त्याला रणांगणात उतरावे लागते. कोरोनाचे संकट त्यांच्या डोक्यावरदेखील घिरट्या घालत असते. त्या संकटाकडे दुर्लक्ष करून हा माझा देश आहे, ही माझी आत्मीय जनता आहे, ती संकटात आहे, अशा वेळी मला रणांगणातच असले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांचे हे अतुलनीय काम आहे. जनसेवेसाठी हा जनसेवक चांदा ते बांदा फिरतो आहे. लोकांचे अश्रू पुसतो आहे, त्यांना धीर देत आहे. “घाबरू नका. हे दिवसही जातील आणि पुन्हा चांगले दिवस येतील. सर्व प्रकारची काळजी घेत आपण आपल्या कामाला लागले पाहिजे.”

हा कोरडा उपदेश नाही, जनतेच्या दाराशी जाऊन त्यांच्याशी केलेला संवाद आहे. उपदेश आणि संवाद यांच्यात फरक असतो. उपदेश करणारा आसनावर बसलेला असतो आणि संवाद करणारा सामान्य माणसांशी बोलत असतो. माणसाने माणसांशी बोलणे म्हणजे माणुसकीचा भाव निर्माण करणे आहे. आम्ही सर्व एक आहोत, जननी जन्मभूमी आमची आहे, आम्ही सर्व तिची संतान आहोत, सर्व सुखदु:खे आमच्या सर्वांची आहेत. ही भावना या संवादातून निर्माण होते. ज्या क्षणी हा संवाद थांबतो त्या क्षणी समाजापुढे भांबावलेपण येते. एकाकीपण येते. आपल्यामागे कोणीच नाही अशी भावना निर्माण होते.
 
 
जनसेवक देवेंद्र फडणवीस यांचे या काळातील प्रशंसनीय कार्य कोणते असेल, तर त्यांनी हा संवाद जिवंत ठेवला. या काळात एकापाठोपाठ एक निसर्गाची संकटे आली. निसर्ग वादळ आले, अतिवृष्टी झाली, हातातोंडाशी आलेली पिके गेली, भाजीपाला, कांदा, बटाटा यांचे भाव वाढत चालले. डॉ. हेडगेवार म्हणत असत - “संकटे उगाच येत नाहीत. ती ईश्वरी योजनेतूनच येतात. संकटे आपल्या धैर्याची, चिकाटीची आणि सामर्थ्याची कसोटी पाहतात.” संकटांना घाबरून हातपाय गाळून जो बसतो तो पुन्हा उठत नाही आणि संकटाचा जो सामना करतो, धैर्याने लढतो त्याला ईश्वरी प्रसाद लाभल्याशिवाय राहात नाही. देवाने प्रत्येक माणसात निष्क्रियतेच्या शक्ती भरल्या आहेत, तशा दैवी शक्तीदेखील भरल्या आहेत. आपल्यातील या दैवी शक्तीची ओळख ज्याची त्याने करून घ्यायची असते. संघसाधनेतून गेलेल्या कोणालाही ती अवघड नसते. देवेंद्रांना ती अवघड नव्हती.

आपल्यातील या दैवी शक्तींना देवेंद्र यांनी ओळखले, जागे केले आणि या शक्तीच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू केले. मलाही कोरोना होईल, मला रुग्णालयात भरती व्हावे लागेल, जिवाचे बरेवाईट होईल याचा कसलाही विचार त्यांनी केला नाही. रणांगणात लढणारा शूर योद्धा, मला जखमा होतील, मर्मांतक घाव होईल वगैरे गोष्टींचा विचार करत नाही. शत्रूचा नि:पात हेच त्याचे लक्ष्य असते. ईश्वरी गुणाचा हा कोरोना योद्धा या निर्धाराने लढत आहे. सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर असतो आणि जेथे सत्य असते तेथे विजय असतो. म्हणून आजचे जनसेवक देवेंद्र हे उद्याचे विजयी जनसेवक ठरणार आहेत. ईश्वरीय काम करणार्‍यांचे तेच अंतिम गंतव्यस्थान असते.

- रमेश पतंगे