आता सवय झाली आहे

विवेक मराठी    05-Oct-2020   
Total Views |

. माणूस सवयीचा गुलाम असतो, हे जरी खरे असले तरी, समाजाची आणखी एक सवय आहे, ती म्हणजे तो शांतपणे सर्व काही सहन करीत जातो. आपला राग, संताप तो दाबून ठेवतो. हिंसक मार्गाने त्याची अभिव्यक्ती करीत नाही. सध्या महाराष्ट्रात जे काही चालेले आहे, त्याची सवय जरी महाराष्ट्रातील नागिरकांना सवय झाली असली, तरी त्याची सदसद्विवेकबुद्धी सवयीने जागृत आहे. तिला खरे काय, खोटे काय, अस्सल काय, नक्कल काय, बनावट काय, भेसळ काय हे सगळे उत्तम समजते. जनता शांत असते म्हणजे अडाणी नसते. जनतेला अडाणी समजून वक्तव्य करतात, त्यांना जनता मनातून हसते आणि संधी येताच या शहाण्या लोकांना सरळ करते.


cm_1  H x W: 0


कोरोना विषाणूची आता लोकांना सवय झालेली आहे. कोरोना विषाणूबरोबर आपल्याला राहायचे आहे, योग्य ती काळजी घ्यायची आहे, मास्क लावून बाहेर पडायचे आहे, हात स्वच्छ धुवायचे आहेत, सोशल डिस्टन्सिंग पाळायचे आहे, या सर्वांची सवय आता झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जे प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले, त्यातून लोक आता बाहेर पडले आहेत. भीती संपली असा याचा अर्थ नाही. पण भिऊन जगता येत नाही, हे लोकांना उमगले आहे. आता लोकांना कोरोना विषाणूच्या वातावरणाची सवय झाली आहे.

याचबरोबर आता लोकांना कोरोना राजकीय वातावरणाचीदेखील सवय झाली आहे. केंद्र शासनाने काहीही केले तर त्याला विरोध करायचा, मोदींविरुद्ध भन्नाट आरोप करायचे, तोंडाला येईल ते बडबडायचे याचीदेखील लोकांना सवय झालेली आहे. मार्च महिन्यात मोदी म्हणाले की, "दिवे लावा." पुरोगामी म्हणाले की, "कसले दिवे लावता?" मोदी म्हणाले की, "घंटानाद करा." सेक्युलॅरिस्ट म्हणाले, "कसल्या 'घंटा?'" मोदींनी एक आर्थिक पॅकेज जाहीर केले. राजकीय राजपुत्र म्हणू लागले, "हे कसले आर्थिक पॅकेज? लोकांच्या खात्यात दरमहा हजारो रुपये जमा करा." मोदींनी कृषी सुधारणेची तीन विधेयके आणली. विरोधी राजकीय पक्ष म्हणू लागले की, "ही शेतकऱ्यांच्या नाशाची बिले आहेत." मोदींनी काहीही म्हणावे, काहीही करावे, त्याच्या विरोधासाठीच आपला जन्म झाला आहे असे मानून ही विरोधी जमात बांग द्यायला सुरुवात करते. या 'बांगी' जमातीची आपल्याला सवय झालेली आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आपल्याला सवय झाली आहे. मातोश्रीत बसून दिलेले आदेश ऐकण्याची आपल्याला सवय झालेली आहे. तिन्ही पक्षांचे आपापसात फारसे जमत नाही, हे बघण्याची सवय झालेली आहे. शासनाने रोज नवीन नवीन आदेश काढायचे.. पहिला आदेश मोडीत काढणारा दुसरा आदेश.. अशा सर्व आदेशांची सवय सर्वांना होत चाललेली आहे. अधूनमधून शरदराव पवार यांची खोचक, खवचट, वक्तव्ये येत असतात. ते ऐकण्याची आणि त्यावरील वाहिन्यांवरील तारेतोडू चर्चा श्रवण करण्याचीदेखील सवय आपल्याला झाली आहे.

महाराष्ट्र चालू आहे. तो कसा चालू आहे आणि कोणामुळे चालू आहे, हे आपण सर्व जण जाणतो. सरकार नावाची एक काही व्यवस्था आहे. ती कार्यक्षम आहे, लोकाभिमुख आहे, जनतेच्या सुख-दुःखात सहभागी आहे याचा कोणताही प्रत्यय सामान्य जनतेला येत नाही. मुंबईत लोकल बंद आहेत, बसेसची संख्या कमी आहे, कामावर जाताना लोकांचे जे हाल होतात, ते लोकच जाणतात. मातोश्रीला आणि सिल्व्हर ओकला त्याचे काही पडलेले नाही. 'लोकांना ब्रेड मिळत नाही, तर त्यांनी केक खावा' असे फ्रान्सची राणी मेरी ऍन्शोनिटी म्हणाली होती. सिल्व्हर ओक आणि मातोश्री आपल्याला सांगत नाहीत की बसेस नाहीत तर हॅलिकॉप्टरने जा, हे आपले नशीब!


cm_1  H x W: 0

भाजपा सत्तेवर नाही. भाजपातील काही नेत्यांना त्यामुळे कसेतरीच व्हायला लागते. तेही अधूनमधून शिवसेनेने आमच्याबरोबर सरकार स्थापन करावे, अशा घंटा वाजवितात. शिवसेना आणि भाजपा यांच्या वरिष्ठ नेत्यांची भेट झाली की चर्चेला उधाण यायला लागते. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले म्हणू लागतात, "आता हे सरकार जाणार आणि शिवसेना-भाजपाचे सरकार येणार" हे ऐकण्याचीदेखील आता लोकांना सवय झालेली आहे.

या सवयीमुळे, जेव्हा रामदास आठवले म्हणू लागले की "शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडावी आणि भाजपाबरोबर सरकार स्थापन करावे", तेव्हा लोकांना काही वाटले नाही. अशी वक्तव्ये ऐकण्याची सवय लोकांनी करून घेतलेली असल्यामुळे या वक्तव्यांचे कुणाला काहीही वाटत नाही. सवय ही अशी गोष्ट आहे, जिची एकदा सवय झाली की ज्ञानेंद्रियेही जवळजवळ बधिर होतात. उन्हाची सवय झाली की उन्हाचे चटके जाणवू लागत नाहीत. थंडीची सवय झाली की थंडी फारशी बाधत नाही. खोकल्याची सवय झाली की खोकल्याशिवाय राहवत नाही. माणूस सवयीचा गुलाम असतो, हेच खरे.

अशा सवयी जरी लागल्या असल्या, तरी समाजाची आणखी एक सवय आहे, ती म्हणजे तो शांतपणे सर्व काही सहन करीत जातो. आपला राग, संताप तो दाबून ठेवतो. हिंसक मार्गाने त्याची अभिव्यक्ती करीत नाही. वर दिलेल्या सगळ्या सवयींची त्याला सवय झाली असली, तरी त्याची सदसद्विवेकबुद्धी सवयीने जागृत असते. तिला खरे काय, खोटे काय, अस्सल काय, नक्कल काय, बनावट काय, भेसळ काय हे सगळे उत्तम समजते. जनता शांत असते म्हणजे अडाणी नसते. जनतेला अडाणी समजून वक्तव्य करतात, त्यांना जनता मनातून हसते आणि संधी येताच या शहाण्या लोकांना सरळ करते.

लोकांना पंचवीस वर्षे शिवसेना-भाजपा युतीची सवय होती, आता ती सवय संपली. आता असंगाशी संग करणाऱ्याशी घरोबा करता कामा नये, ही लोकभावना आहे. हे सरकार चालू दिले पाहिजे. मध्यावधी निवडणुका कुणालाही नको आहेत. हे बरोबर आहे. जर सरकार पाडले तर मध्यावधी निवडणुका होतील, सरकार पाडण्याच्या भानगडीत पडू नये. उरलेली चार वर्षे बघता बघता निघून जातील. शिवसेनेशी संगत भाजपाला कोणत्याही प्रकारे बळ देणारी नाही. शिवसेनेचा पक्ष घेणारे असा युक्तिवाद करतात की, शिवसेनेमुळे महाराष्ट्रात भाजपा घडली. या तर्काला फार मोठा आधार नाही.

रामजन्मभूमी आंदोलन १९८६सालापासून जनआंदोलन होऊ लागले होते. तेव्हा भाजपाने आजच्यासारखी हिंदुत्वाची भूमिका घेतली असती, तर शिवसेना महाराष्ट्रात वाढली नसती. भाजपाने आपली स्पेस आपणहोऊन शिवसेनेला दिली, हा इतिहास झाला. त्याचे चर्वितचर्वण करून आता काही मिळणार नाही. महाराष्ट्रात जी हिंदुत्वाची स्पेस आहे, ती वारसा हक्काने भाजपाचीच आहे. ही स्पेस वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी निर्माण केलेली आहे. ती निर्माण करण्यास संघस्वयंसेवकांचा वाटा प्रचंड आहे. भाजपाने ही स्पेस सोडता कामा नये.

ही आपली स्पेस येणाऱ्या काळात मजबूत करणे, हा भाजपाचा एकमेव कार्यक्रम असला पाहिजे. देवेंद्र फडणवीस ज्या तडफेने, उत्साहाने गावोगाव जाऊन लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत आहेत, ही मोठी आश्वासक गोष्ट आहे. अन्य भाजपा नेत्यांनी त्यांचे अनुकरण करायला पाहिजे. वर्तमानपत्रात पत्रके किंवा मुलाखती देऊन जननेतृत्व उभे राहत नाही. आजचा कालखंड जनतेत जाऊन मिसळण्याचा आहे. अयोध्या आपण जिंकली आहे. मंदिर तर उभे राहणार आहे. आता आपल्याला राष्ट्र मंदिर उभे करायचे आहे, ते काय आहे? ते कसे उभे करायचे? त्यासाठी लोकचळवळ आणि लोकसहभाग कोणत्या क्षेत्रात आणि कशा प्रकारे अभिप्रेत आहे, हे जनतेला सांगावे लागेल.

महाराष्ट्र सुशासित असला पाहिजे आणि सुशासित महाराष्ट्रच समृद्ध महाराष्ट्र होऊ शकेल. विश्वगुरू भारत हे भारताचे स्वप्न आहे, महाराष्ट्राचे स्वप्न भारताचे नेतृत्त्व करण्याचे असले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे, डॉ. हेडगेवार आणि श्रीगुरुजी ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ही नावे येथे शोभेसाठी घेतलेली नाहीत. प्रत्येक नाव म्हणजे एक प्रचंड बौद्धिक ऊर्जाकेंद्र आहे. सर्वक्षेत्रीय परिवर्तन घडवून आणण्याची ताकद या ऊर्जाकेंद्रांत आहे. असा महाराष्ट्र उभा करायचा आहे हा राजकीय ध्येयवाद ठेवून जनप्रबोधन करायला पाहिजे. हे शासन राहील, जाईल, पुढे त्याचे काय होईल याची चिंता करण्याच्या भानगडीत पडता कामा नये. जे आपल्या कर्मानेच मरणार आहेत आणि जे अटळ विधिलिखित आहे, त्याची चिंता आपण कशाला करायची? आपली चिंता स्वशक्ती वाढविण्याचीच असली पाहिजे.

vivekedit@gmail.com