या शेताने लळा लाविला

विवेक मराठी    06-Oct-2020   
Total Views |

अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला आणि शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा श्रीनिवास मोहन कचरे हा तरुण कोरोनाच्या महासंकटामुळे आरळी खुर्द (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) ह्या आपल्या मूळ गावी परतला आहे. नवी वाट चोखाळत तो गेल्या सात महिन्यांपासून शेतात राबतोय. नवे स्वप्न उराशी बाळगून शेतात उतरलेल्या तरुणाची ही गोष्ट.krushi_1  H x W

कोरोनाच्या महासंकटामुळे जीवनपद्धतीवर मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसताहेत. परिस्थितीच्या रेट्यात अनेकांची शहराकडे धाव असायची, आता ही धाव मंदावत असताना दिसत आहे. पूर्वी शहरात राहून ग्रामीण भागाशी त्यांचा संबंध केवळ त्या ठिकाणचा जमीनजुमला आणि घरदार एवढ्यापुरताच मर्यादित होता, ते आता सख्य जोडण्याचा प्रयत्न करताहेत. शहरातील जगण्याची कमतरता आणि एकंदर क्रयशक्ती या दृष्टीने 'गाव' हेच आता केंद्र म्हणून ओळख बनेल, अशी आशा धरून आहेत. त्यामुळेच शहरातील काही 'कॉर्पोरेट' मंडळी गावखेड्यात कायमस्वरूपी विसावू पाहताहेत. गावात राहून उपजीविकेच्या साधनाला शेती उद्यमशीलतेची जोड दिली जात आहे. ते शेतीला प्रतिष्ठा प्राप्त करून देऊ पाहत आहेत.

कोरोनाच्या दोलायमान परिस्थितीत खेड्यातल्या माणसाची जीवनविषयक दृष्टी अशी बदलत आहे. आज दळणवळण, भौतिक सुविधा, प्रसारमाध्यमे यांचा खेड्याकडेही प्रसार झाला आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थकारण बदलत चालले आहे. ग्रामीणांच्या जगण्याचे संदर्भ बदलत चालले आहेत. म्हणूनच की काय, पूर्वी शहरात स्थलांतर झालेली मंडळी आता ग्रामसंस्कृतीशी जुळवून घेत आहेत, शेती करण्याची अनेकांची ऊर्मी उफाळून आली आहे. शहरातून गावखेड्यात आलेल्या आणि शेतीकाम करणार्‍या श्रीनिवास कचरे या उच्चशिक्षित तरुणाची अशीच एक कथा मनाला भिडते.

आस शेतीची

तुळजापूर तालुक्याच्या ठिकाणावरून २२ किलोमीटर अंतरावर आरळी खुर्द हे छोटेसे गाव आहे. या आरळी गावातच मोहनराव कचरे यांची ३० एकर शेती आहे. मोहनराव यांनी लातूरच्या नामांकित शाहू महाविद्यालयात ३०-३२ वर्षे हिंदी विषयाच्या अध्यापनाचे काम केले आहे. ही सेवा करत असताना गावकर्‍यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत गावाची सेवा करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले. १९९५ ते २०१० अशी सतत पंधरा वर्षे ते गावचे सरपंच राहिले आहेत. नोकरीतून निवृत्त होईपर्यंत त्यांचे कुटुंब लातूरमध्ये राहत होते. शेतीकडे फक्त पेरणी आणि काढणीपुरतेच लक्ष असायचे. श्रीनिवास हा त्यांचा २८ वर्षीय एकुलता एक मुलगा.

शिक्षणाच्या आणि करिअरच्या दृष्टीने श्रीनिवासही शहरी जीवनशैलीत रमला होता. त्यातच स्पर्धा परीक्षेच्या तयारी करत होता, त्यामुळे तो वर्षांतून कधीतरी गावाकडे यायचा. शेतीकडेही त्याचे तितके लक्ष नसायचे. कोरोनाच्या काळात श्रीनिवास गावाकडे परतला. त्याच्या मनात शेती करण्याची ऊर्मी उफाळून आली आणि बघता बघता या सात महिन्यांत त्याने शेतीची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.


श्रीनिवास म्हणाला, "आमची शेती अगोदरपासून असली, तरी वडिलांच्या पूर्णवेळ नोकरीमुळे लातूर हे राहण्याचे ठिकाण होते, तर शेतीचे ठिकाण आरळी. लातूर ते आरळी यामध्ये ९० ते ९५ किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे वडिलांना शेतीमध्ये पूर्णपणे लक्ष देता येत नसे. लहानपणापासून मी शहरात शिकलो, वाढलो, त्यामुळे मला स्वतःला ही शेती पाहणे कधी जमले नाही. वडील २०११ साली सेवानिवृत्त झाले, त्यानंतर आईवडील शेतीकडे हळूहळू लक्ष देऊ लागले. शेतातच चार खोल्यांचे फार्म हाउस बांधले गेले, तरीही माझा मुक्काम लातूरमध्येच होता.

पुण्यातल्या बिबवेवाडी इथल्या व्हीआयटी महाविद्यालयातून मी B.Tech. (Production Engineering) हे पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षणानंतर अनेक ठिकाणी नोकरीची संधी होती. पण मला गुलामीचे जगणे पसंत नव्हते. स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करायचे होते. त्यासाठी माझे प्रयत्नही सुरू होते. मोठ्या जिद्दीने स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. तीन मित्रांना सोबतीला घेऊन वर्षभर दिल्लीत स्पर्धा परीक्षांचे क्लासेस केले. त्यातील एक मित्र जयदीप २०१७ साली यूपीएससी परीक्षेत देशात ४८२वा येऊन आज तो आयआरटीएस सर्व्हिसेसमध्ये असून तो नागपूरला सेंट्रल रेल्वेमध्ये क्लास वन अधिकारी आहे. दुसरे दोन मित्र मयूर आणि नचिकेत या वर्षी सलग दोन वेळा यूपीएससी मुलाखतीला जाऊन आले आहेत. सध्या मी आणि नचिकेत घरच्यांबरोबर शेती पाहतोय.krushi_2  H x W

इकडे आईवडील शेतात रमले, बहिणीचे लग्न होऊन ती सासरी गेली. मी लातुरात एकटाच स्थिरावलो. स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू होतीच. त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षेच्या क्लासेससाठी कुठे सशुल्क तर कुठे नि:शुल्क शिकवणी घेणे असा माझा जीवनक्रम सुरू होता.


२०२० वर्ष उजाडले, तेव्हा या वर्षात काय वाढून ठेवले आहे हे ठाऊक नव्हते. कोरोनाच्या महासंकटामुळे माझ्या जीवनशैलीत बदल झाला. मी गावाकडे स्थिर होईन असे कदापि वाटले नाही, याचे मुख्य कारण म्हणजे मी कधी शेती केली नव्हती आणि पुढे कधी करू शकेन असे कधी मनातही वाटले नाही. मार्च महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिला लॉकडाउन जाहीर झाला, तेव्हा अहमदनगरहून माझी बहीण व दीड वर्षांचा माझा भाचा डोनाल्ड पाटील आरळीला आला होता. त्यांच्यासमवेत चार दिवस आनंदाने घालवावेत, म्हणून मी लातूरहून गावी शेतातल्या घरी आलो, तेव्हापासून ते आजपर्यंत - म्हणजे गेले सात महिने शेतातच आहे. पहिले काही दिवस रूक्ष गेले, नंतर हळूहळू शेतात रमत गेलो. गाव आणि गावातील व्यवहार, शेती, शेतकरी समस्या, पीक, निसर्ग, माणसांची नाती यासभोवती जीव रमत चालला आहे."

विविध प्रयोग

श्रीनिवासच्या वडिलांनी फळबाग, शेततळे, मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेतून आपल्या शेतीला आकार आणला आहे, पण यात श्रीनिवासचा सहभाग कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष होता.

श्रीनिवास सांगतो, "आमची २८-३० एकर शेती आहे. एवढी शेती एकट्याने करणे वडिलांना अशक्यच. त्यात मनुष्यबळाची कमतरता. मलाही शेतीत काम करणे अशक्य होते. त्यामुळे ही शेती टप्प्याटप्प्याने विकसित करण्याचा निर्णय घेतला. यातील अर्धी जमीन वडिलोपार्जित, तर अर्धी स्वकमाईतून खरेदी केलेली. वडिलोपार्जित असलेली जमीन कायम कोरडवाहू, तर बाकीची अर्धी जमीन बागायतीमध्ये मोडणारी होती. राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतून शेततळे मंजूर करून घेतले. एक एकर रानावर पसरलेले मोठे व २४ फूट खोल असे हे शेततळे असून १ कोटी लीटर पाण्याची त्याची क्षमता आहे. विहिरीच्या व बोअरवेलच्या मदतीमुळे शेततळ्यात मुबलक पाणी असते. पारंपरिक पीकरचनेत बदल करून २०१८ साली फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. दीड एकरात पपईची नियोजनबद्ध यशस्वी शेती केली. दिल्ली, देहरादून, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड अशा ठिकाणी ही पपई विकली गेली. तब्बल पाच-साडेपाच लाखाची पपई झाली. त्यातून दीड लाखाचा खर्च वजा जाता साडेतीन-चार लाखांचा निव्वळ नफा झाला. पपईमध्ये सुरुवातीच्या काळात आंतरपीक म्हणून कलिंगड लागवड केली होती. सुरुवातीच्या २ महिन्यांत कलिंगड येऊन त्यातून २ लाखांचे उत्पादन मिळाले. त्यातून ५०-६० हजारांचा खर्च वजा जाता सव्वा ते दीड लाखांचा निव्वळ नफा झाला होता.


नियोजनबद्ध शेती केल्यास ती कशी फायदेशीर ठरते, हे मी जवळून अनुभवत होतो, यात आईवडिलांचे मोठे कष्ट आहेत. आता मी स्वत:होऊन शेतात उतरलोय, शेती जवळून अनुभवतोय. शेतीचे अर्थशास्त्र समजून घेऊ लागलो आहे."

टाळेबंदीतील शेती

टाळेबंदीच्या काळात शेतातल्या कामात श्रीनिवासचा प्रत्यक्ष सहभाग वाढला. शेती कशी करावी याचा तो अभ्यास करू लागला. श्रीनिवास म्हणाला, "सध्या मी गावाकडे आणि तेही शेतात राहत असल्याने मला शेतीचा नीट अभ्यास करता येत आहे. त्यामुळेच मी शेतीत नवे बदल घडू आणू पाहतोय. लॉकडाउनच्या काळात मी खरबुजाचे यशस्वी उत्पादन घेतले. कोरोना नसता, तर खरबुजाला आरामात २५ ते ३० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला असता. या काळात ८ ते १२ रुपये प्रतिकिलोने खरबूज विकावे लागले.krushi_1  H x W

पपईच्या भरघोस उत्पादनानंतर आम्ही ती बाग मोडून टाळेबंदीच्या काळात तिथे दीड एकरात द्राक्षाची लागवड केली आहे. द्राक्ष लावणीबरोबर त्यात आंतरपीक म्हणून हिरव्या मिरचीचे उत्पादन घेत आहोत. सध्या सोलापूर व नळदुर्ग या बाजारात ह्या मिरचीची रोज निर्यात होत आहे. मी स्वत: मोटरसायकलवरून शेतमाल बाजारात घेऊन जातो. मागील एक महिन्यापासून प्रतिकिलो ३० ते ३५ रुपये दराने मिरचीची विक्री होत आहे. खरबुजाचे दीड एकर रान रिकामे झाल्यामुळे त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यात केळीची लागवड हाती घेतली आहे. जळगाव येथून मागवलेली G-9 (Grand Naine) प्रजातीची ही टिश्यूकल्चर पद्धतीची केळी आहेत. पाचव्या महिन्यात हिचे नवीन पिल्लू पकडून पुढच्या वर्षीही केळीचे त्याच ठिकाणी नियोजन करता येते. ही बाग २ वर्षे घेता येते. सध्याचा दर पाहता केळीपासून प्रतिवर्षी खर्च वजा जाता साडेचार लाखांचा निव्वळ नफा अपेक्षित आहे, म्हणजेच दोन वर्षांत केळीपासून आपल्याला नऊ ते दहा लाखांच्या निव्वळ नफ्याची अपेक्षा आहे.

शेततळ्यातील पाण्याचा उपयोग करता यावा, यासाठी मी मत्स्यपालन सुरू केले असून शेततळ्यात रोहू व कटला या प्रजातींचे मासे सोडलेले आहेत. त्याचेही चांगले उत्पन्न मिळेल. त्याचबरीबर लिंबाची बागदेखील तयार केली आहे. फार्म हाउसच्या आवारात रोजच्या जेवणाला लागणारी भाजी असते, तसेच आंबा, नारळ, चिंच, बदाम, आवळा, जांभूळ, फणस, पेरू, चिकू, सीताफळ, रामफळ आदी फळझाडेही लावली आहेत. शिवाय शेतात कांदा, कोथिंबीर, ऊस, तसेच कोरडवाहू जमिनीवर तूर, सोयाबीन, उडीद यांचेही उत्पादन कायमस्वरूपी चालू असते. सेंद्रिय व रासायनिक खतांचा योग्य वापर करूनच ही शेती करत आहे."

सुयोग्य व्यवस्थापन


श्रीनिवासने आपल्या शेतीत विविध बदल घडवून आणले आहेत, शिवाय आधुनिकता हा त्यातील एक मुख्य भाग आहे. या संदर्भात बोलताना तो म्हणाला, "मी कृषी क्षेत्रात होणाऱ्या बदलांची व आधुनिक तंत्रज्ञानाची इत्यंभूत माहिती इंटरनेटच्या माध्यमातून नेहमी ठेवत असतो. तसेच इंजीनियरिंगमधील माझ्या प्रात्यक्षिक ज्ञानाचा वापर शेतीमध्ये आवश्यक त्या ठिकाणी करत असतो.

शेतीच्या व्यवस्थापनासंदर्भात बोलायचे झाले, तर आम्ही सर्व जण शेतीची कामे विभागून घेतली आहेत, त्यामुळे कोणा एकावर संपूर्ण शेतीचा भार पडत नाही. उदाहरणार्थ, शेतीतील पिकांवर खत-औषधे फवारणी, पिकांवरचे रोग, त्याचे निदान, पिकांचा दर्जा उत्तम ठेवण्याचे कार्य पूर्णपणे माझ्या वडिलांकडे आहे, तर पीक लावल्यापासून ते मशागतीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी माझी आई संजीवनी सांभाळते. मी सोलापूर, नळदुर्ग, तुळजापूर, लातूर, हैदराबाद या ठिकाणच्या भावासंबंधित माहिती ठेवून कोणत्या ठिकाणी आपला माल गेला पाहिजे, याचे नियोजन करतो, त्यासंबंधी त्या त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना व्हाट्सअ‍ॅप, टेलिग्राम, फेसबुक मेसेंजरद्वारे फोटो, व्हिडियो कॉलच्या माध्यमातून फळांची, पिकांची परिस्थिती दाखवून किंमत ठरवणे हे संपूर्ण जाहिरातीचे व विक्रीचे व्यवस्थापन माझ्याकडे आहे.

व्यावसायिक भाषेत बोलायचे झाले, तर प्रॉडक्शन-मॅन्युफॅक्चरिंगची जबाबदारी वडिलांकडे असते, कल्टिव्हेशनची जबाबदारी आईकडे, तर सेल्स-मार्केटिंगची जबाबदारी माझ्याकडे असते. जो-तो आपापल्या परीने चोख काम करत असतो." आजच्या काळात शेतीला उत्पन्नाचे साधन म्हणून न पाहता तिच्याकडे व्यवसायिक दृष्टीकोनातून पाहणे गरजेचे आहे, असेही श्रीनिवास यांनी सांगितले.


शेतीतील बेभरवशाच्या उत्पन्नाची जोखीम नको, म्हणून अनेक जण नोकरीला प्राधान्य देतात. पण श्रीनिवास कचरे इंजीनिअर असूनही नोकरीकडे न वळता मातीत पाय घट्ट धरून उभा आहे. श्रीनिवाससारखे असंख्य तरुण शेतीत उतरले, तर भारतीय शेतीचे चित्र निश्चितच बदलेल हे मात्र नक्की.संपर्क

श्रीनिवास कचरे

९६२३१३३५६५, ७९७२३०५३३९