हाथरसमधील 'पीपली लाइव्ह'

विवेक मराठी    09-Oct-2020
Total Views |

 @डॉ. दिलीप अग्निहोत्री


हाथरसच्या घटनेला माध्यमांनी अपेक्षित रंग दिल्यावर विरोधी पक्षांचे नेते त्याचा लाभ घेण्यासाठी धावत आले. योगी आदित्यनाथ सरकारला बदनाम करणे हा त्यांचा उद्देश होता. पण सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी केवळ शब्दाने नव्हे, तर कृतीतून उत्तर दिले आहे.


hatras_1  H x W


हिंसेची, छळाची किंवा अत्याचाराची प्रत्येक घटना निषेधार्हच असते. मात्र यावर होणारे राजकारणसुद्धा चुकीचे आहे. अशाने अनेकदा विचित्र परिस्थितीसुद्धा निर्माण होते. उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेचा माध्यमांनी मोठा गाजावाजा केला. वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी ताळतंत्र सोडून या घटनेच्या वेगवेगळ्या कथा रचत होते. अशा घटना घडतात, तेव्हा हे लोक केवळ माध्यमांचे प्रतिनिधी राहत नाहीत, तर आपणच तपास यंत्रणा आहोत, आपणच साक्षीदार आहोत, आपणच न्यायव्यवस्था आहोत अशा भूमिकेतून वृत्तांकन करायला लागतात. सुशांतसिंग मृत्यू प्रकरणाबाबत मुंबईत नुकताच हा अनुभव आला होता, येत आहे आणि नंतर उत्तर प्रदेशात हाथरसबाबतही तेच चित्र दिसत होते. माध्यमांमधील हा वर्ग योगी आदित्यनाथ सरकारला या प्रकरणावरून घेरत होता, तर दुसरीकडे या तापलेल्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी सपा-बसपा-काॅंग्रेस हे विरोधक पुढे सरसावले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी मात्र या सर्वांना सडेतोड उत्तर देत परिस्थिती सावरली. हाथरसमधील हे एकंदर चित्र १० वर्षांपूर्वीच्या 'पीपली लाइव्ह' या चित्रपटाची आठवण करून देणारे आहे. माध्यमांचा आततायीपणा आणि त्यांनी तापवलेल्या तव्यावर स्वत:ची पोळी भाजणारे राजकीय नेते यांच्यावर उपहासात्मक भाष्य करणाराहा चित्रपट होता.


हाथरसच्या घटनेला माध्यमांनी अपेक्षित रंग दिल्यावर विरोधी पक्षांचे नेते त्याचा लाभ घेण्यासाठी धावत आले. योगी आदित्यनाथ सरकारला बदनाम करणे हा त्यांचा उद्देश होता. राजकीय लाभासाठी विरोधक हाथरसला पोहोचले. राहुल गांधी, प्रियंका वाड्रा तिथे पोहोचण्यासाठी उतावीळ झाले होते. मात्र राजस्थानात झालेल्या घटनेबद्दल ते गप्प होते. त्यांनी तिथे पोहोचण्याचे कष्ट घेतले नाहीत. हे वागणे दुटप्पी होते. मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी स्वतःहोऊन सीबीआय तपासाची शिफारस केली आहे. त्यामुळे विरोधकांच्या हातातून राजकारणाची संधी गेली.
 


hatras_2  H x W 

गोष्ट इथेच संपत नाही. यानंतर ज्या गोष्टी समोर येत आहेत, त्यासुद्धा चक्रावून टाकणाऱ्या आहेत. सरकारला विरोध करण्याचा अधिकार विरोधी पक्षांना आहे. परंतु हे सगळे घटनात्मक चौकटीत व्हायला पाहिजे. काँग्रेस नेते केवळ सरकारला लक्ष्य करायला आले होते. ते म्हणाले की "कोणतीही शक्ती आमचा आवाज दाबून टाकू शकत नाही. राज्य सरकार पीडित कुटुंबाला सुरक्षा देण्यात कमी पडले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपली जबाबदारी समजून घ्यायला हवी. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत ही लढाई चालू ठेवू. कुटुंबाला न्यायिक तपास हवा आहे." आम्ही अन्यायाविरुद्ध लढत राहू, असेही ते म्हणाले. यानंतर काँग्रेस नेते पुन्हा दिल्लीला रवाना झाले. राहुल गांधी ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होण्यासाठी पंजाबला निघून गेले. मात्र राज्य सरकारने एसआयटीला आधीच तपासाचा आदेश दिला होता. एसआयटीच्या आधीच्या अहवालानंतर आता पुढच्या अहवालावरही कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. एसआयटीलासुद्धा पीडित कुटुंबाची प्रत्येक गोष्ट गांभीर्याने ऐकून घेण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तर प्रदेशचे मंत्री आणि दलित नेते रमापती शास्त्री यांनी विरोधी पक्षांवर बेजबाबदार भूमिका घेण्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की "राज्यात दंगली घडवण्याचे कारस्थान आहे, हाथरस हा तर केवळ बहाणा आहे. विरोधकांना दलित मुलीच्या अब्रूचा सन्मान प्रिय नाही. खरे तर विरोधी पक्षांना उत्तर प्रदेशात जातीय दंगली घडवायच्या आहेत. सत्य बाहेर यावे ही मुळी विरोधकांची इच्छाच नाही. विरोधकांचे ट्वीट, ऑडिओ टेप्स आणि जुन्या घटना दंगलीच्या कारस्थानाकडे संकेत करतात." ते म्हणाले की "बसपाच्या प्रमुख मायावती वक्तव्य करून दलित मुलीचा अपमान करत आहेत. त्यासुद्धा मुख्यमंत्री होत्या, विषयाचे गांभीर्य त्यांनी समजून घ्यायला हवे."
 

hatras_3  H x W

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी घटनेनंतर पीडित कुटुंबाला २५ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीबरोबरच एसआयटीची स्थापना केली. दुसरीकडे प्राथमिक अहवालाच्या आधारे कारवाईसुद्धा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांसहित पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करून नार्को, पॉलीग्राफ टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या पुढाकाराने विषयाचे सत्य नक्कीच समोर येईल. हाथरसच्या प्रकरणात नवीन बाबी उघडकीस येत आहेत. पोलिसांनी जिल्ह्यातील चंदपा ठाण्यात जातीय संघर्षाचे कट-कारस्थान, सरकारची प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न आणि वातावरण बिघडवणे या आरोपांखाली अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पन्नास लाखांचे प्रलोभन दाखवून पीडित कुटुंबाकडून खोटे बोलवून घेण्याचा गुन्हासुद्धा दाखल झाला आहे. दंगली भडकावण्याचा एक ऑडिओसुद्धा व्हायरल झाला आहे. अनेक जणांवर देशद्रोह, वेगवेगळ्या समूहांमध्ये शत्रूत्व वाढवणे असे अनेक गंभीर आरोप आहेत.


योगी आदित्यनाथ यांनी हाथरसच्या राजकारणाला राज्य सरकारच्या विरोधातील कारस्थान म्हटले आहे. ते म्हणाले की "काही जणांना जातीय आणि धार्मिक हिंसा भडकावण्याची इच्छा आहे. दंगलीच्या आडून आपली पोळी भाजून घेण्याची संधी त्यांना मिळेल, म्हणून नवनवीन कारस्थान करत आहेत." योगी आदित्यनाथ यांनी गुप्तहेर व्यवस्था सक्रिय केली होती. त्यातून चक्रावून टाकणाऱ्या गोष्टी समोर आल्या. दंगलीच्या कारस्थानाबद्दल पीएफआयच्या एजंटसहित चार जणांना अटक करण्यात आली आहे. पीएफआयचा अत्यंत सक्रिय एजंट अतीक उर रहमान हा बूलगढी गावात पत्रकार म्हणून आपला कार्यभाग साधण्याच्या बेतात होता. अतीक उर रहमान याने मोठ्या हिंसेचे कारस्थान रचले होते. हाथरसच्या निमित्ताने उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात हिंसा घडवण्याची या सगळ्यांची योजना होती. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि तिची सह-संघटना कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (सीएफआय) यांच्याशी त्यांचे संबंध आहेत. केरळचा अतीक उर रहमान धनसंग्रह करत होता. दिल्लीच्या शाहीन बागबरोबरच लखनऊ व अलीगढमधील सीएएच्या विरोधातील हिंसेमध्येसुद्धा त्याचे नाव आले आहे. त्याने कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियाचीसुद्धा स्थापना केली होती. तो स्वतः त्याचा कोषाध्यक्ष आहे. त्याने जस्टिस फॉर हाथरस या नावाने एक बनावट संकेतस्थळ बनवल्याचे सांगितले जाते. त्याच्या माध्यमातून जातीय दंगली घडवण्याचा कट होता. पीएफआय आणि एसडीपीआय यांसारख्या संघटना नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील हिंसेत सामील होत्या. याच संघटनांनी उत्तर प्रदेशातसुद्धा हिंसा पसरवण्यासाठी संकेतस्थळ बनविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
 

hatras_5  H x W

योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना आणि कारस्थान्यांना लक्ष्य केले आहे. कोणत्याही परिस्थितीत कारस्थान सफल होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले. विरोधक हाथरसच्या विषयावरून राजकारण करत आहेत. एक मोठे कारस्थान रचले जात होते. या कारस्थानासाठी परदेशातून निधीपुरवठा करण्यात आला. जनतेच्या विश्वासाशी खेळ करण्याची कोणालाही परवानगी दिली जाणार नाही. सरकार विकासाच्या कामात गुंतले आहे, म्हणून ही मंडळी कारस्थान रचण्यात गुंतली आहेत. कोरोनाशी लढाईमध्ये यातील एकही चेहरा जनतेत नव्हता. काही जण समाजात द्वेष निर्माण करून विकासाला खीळ घालू पाहत आहेत. . प्रदेश विकासाच्या क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे. ते म्हणाले की स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशात केवळ दोन एक्स्प्रेस वे बनू शकले. त्यांचे सरकार आल्यानंतर तीन वर्षांत तीन नवीन एक्स्प्रेस वे बनत आहेत. उत्तर प्रदेशात २०१४पर्यंत केवळ दोन विमानतळ कार्यरत होते, आता सात विमानतळ आहेत. बारा नवीन विमानतळांचे काम सुरू झालेय. या मंडळींना कल्याणाच्या योजना आवडत नाहीत. विकासावरून सरकारवर प्रश्नचिन्ह उभे नाही करू शकत, म्हणून अशा प्रकारची कारस्थाने रचत आहेत. यांचे पितळ उघडे पडत आहे. यांची कारस्थाने समोर येत आहेत. जातीय हिंसा पसरवण्यासाठी मॉरिशसमधून आलेल्या ५० कोटी रुपयांचा निधीपुरवठा करण्यात आला होता. हाथरस प्रकरणाच्या आडून राज्यात दंगल भडकावण्याचा प्रयत्न चालू होता, त्यासाठी संकेतस्थळ तयार करून आणि अन्य प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून निधी एकत्र करण्यात येत आहे, असा आरोप योगी सरकारने केला आहे.


या प्रकरणात आता सक्तवसुली संचालनालयाचा (ईडीचा) प्रवेश झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हाथरस प्रकरणाच्या आडून जातीय हिंसा भडकावण्यासाठी एकट्या मॉरिशसमधून ५० कोटी रुपयांचा निधीपुरवठा करण्यात आला, असे ईडीच्या प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. याशिवाय आणखी अन्य निधीपुरवठा करण्यात आला, तो १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त होता. सध्या तरी या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ईडीच्या एका अधिकाऱ्यानुसार, हाथरस पोलिसांनी एका संकेतस्थळाबाबत गुन्हा नोंदवला आहे. यानंतर ईडी यात तपासाची दिशा निश्चित करेल. या संकेतस्थळाच्या माध्यमातून जस्टिस फॉर हाथरसच्या माध्यमातून मोहीम राबवण्यात आली. ईडी लवकरच गुन्हा नोंदवून निधीपुरवठ्याचा तपास सुरू करू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. माध्यमातील एका गटाची भूमिकासुद्धा प्रश्नार्थक बनली आहे. सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी केवळ शब्दाने नव्हे, तर कृतीतून उत्तर दिले आहे.




अनुवाद : देविदास देशपांडे

 

9450126141