मनोरंजन विश्वाच्या स्थित्यंतराचा काळ

विवेक मराठी    13-Nov-2020
Total Views |
@किरण क्षीरसागर
रिकामे फिल्म स्टुडिओ.. छतावर लटकत असलेले उदासवाणे विझलेले लाइट्स.. ओस पडलेल्या मेकअप रूम्स.. सिनेमॅटोग्राफरच्या ‘कॅमेरा रोलिंग’ अशा आवाजाची वाट पाहणारे बंद पेटीतले कॅमेरे.. कोपरा पकडून बसलेल्या चहावाल्या दादांच्या थंड शेगड्या.. टीव्ही चॅनल्सची निर्जन ऑफिसेस.. कॉन्फरन्स-एडिटिंग रूममध्ये एकट्या बसलेल्या खुर्च्या आणि रेकॉर्डिंग रूममध्ये आवाजांची वाट पाहत तिष्ठत उभे असलेले माइक्स.. माणसांनी, अनेकविध आवाजांनी अहोरात्र गजबजलेल्या ‘एन्टरटेनमेंट इंडस्ट्री’चं लॉकडाउनमधलं हे चित्र. आता बंधनं शिथिल होऊ लागली आहेत. कोविडची चाहूल घेत बिचकत बिचकत हळूहळू कामं पुन्हा सुरू होऊ लागलीयत. पण आता पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही, कदाचित राहणारही नाही!
 

film_1  H x W:
 
मनोरंजन विश्व! चित्रपट, टीव्ही मालिका, रिअ‍ॅलिटी शो आणि वेब सीरिज यांची निर्मिती करणारं. चित्रपटगृह, टीव्ही, मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट्स यांच्या माध्यमातून दररोज प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारं. त्यांची मनं रिझवणारं. वर्षाला कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारं. लाखो हातांना रोजगार पुरवणारं. पण कोविडच्या तडाख्याने जगातल्या अनेक क्षेत्रांप्रमाणे ही इंडस्ट्रीदेखील कोलमडली.
एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीचा तामझाम तसा मोठा. त्यातही चित्रपट हा घटक लाडाकोडाचा! त्याची तयारी, चित्रीकरण, संकलन, संगीत, व्हीएफएक्स, त्यानंतर प्रसिद्धी, वितरण व्यवस्था, प्रदर्शन अशा सगळ्याच गोष्टींचा पसारा जरा मोठा असतो, म्हणूनच त्यात काम करणारी माणसंही जास्त आणि गुंतलेला पैसासुद्धा! एवढी माणसं आणि पैसा सांभाळण्यासाठी तेवढीच मोठी मॅनेजमेंट व्यवस्था उभारावी लागते. काटेकोर वेळापत्रक आखावं लागतं. ती सगळी रचना कोविडने विस्कटून टाकली.
 
जानेवारी-फेब्रुवारीच्या काळात जगभरात कोविडचा प्रसार सुरू झाला होता. आम्ही त्या वेळेस मुंबईत ‘दशमी स्टुडिओज’च्या ‘भाऊबळी’ या चित्रपटाचं चित्रीकरण करत होतो. त्या वेळी जागतिक पातळीवरची चित्रपटांची निर्मिती हळूहळू बंद पडत चालली होती. आमच्या चित्रपटाचं चित्रीकरण संपलं आणि त्याच सुमारास कोविडने भारतात जोमाने हातपाय पसरायला सुरुवात केली. ज्यांना शक्य होतं त्यांनी मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत आपापलं चित्रीकरण पूर्ण केलं. पण लॉकडाउन जाहीर होताच सगळी प्रणाली थंडावली. अनेक चित्रपटांचं, मालिकांचं, वेब सीरिजचं चित्रीकरण अपूर्ण राहिलं. ज्यांचं चित्रीकरण पूर्ण झालं ते आणि ज्यांचं सुरू झालं नाही ते, अशी दोन्हीकडच्या मंडळींचे जीव भांड्यात पडले. पण ज्यांचं चित्रीकरण अर्धवट राहिलं, त्यांची ‘ना तळ्यात ना मळ्यात’ अशी अवस्था झाली.
 
film_2  H x W:
चित्रपट-मालिकांमध्ये चित्रीकरण हा खर्चिक मामला. दोनेक कोटींचं बजेट असलेल्या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला दररोज अंदाजे पाच लाखांपर्यंत खर्च येतो. मालिकेसाठी हा खर्च एक-दीड लाख असू शकतो. हिंदीत हा खर्च काही पटींनी वाढतो. कोविडमुळे चित्रीकरणाची पूर्ण प्रक्रिया थांबली. चित्रपटांसाठी ही अवस्था फार वाईट. विशेषतः मराठी चित्रपटांसाठी. कारण चित्रपटाचं काम पुन्हा सुरू होईपर्यंत निर्माता तेवढे पैसे घेऊन थांबेलच असं नाही. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात सुरू होऊ पाहणारे काही चित्रपट, त्यांच्या निर्मात्यांनी पैसे काढून घेतल्याने रद्द झाले. मात्र ज्यांचं चित्रीकरण सुरू होऊन थांबलं, त्या निर्मात्यांना मागेही वळता येईना. त्यांचे पैसे अडकून पडले. कोविडने अनेक चित्रपट अडकवले, लांबणीवर ढकलले, ते चित्रपट पुन्हा सुरू होतील का? होतील तर कधी? अशा कित्येक चित्रपटांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे.
 
मालिका-वेब सीरिज यांना कमी-अधिक फरकाने याच अडचणी जाणवत होत्या. मालिकांसाठी चॅनलसारखी भक्कम संस्था पाठीशी उभी असल्याने पैशांची तेवढी अडचण नव्हती. (निदान लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात तरी.) मात्र चित्रीकरण बंद झालं, तर रोज टीव्हीवर प्रसारित काय करायचं? अशी अडचण निर्माण झाली होती. वेब सीरिजची निर्मिती करताना दहाएक एपिसोड एकत्र तयार होतात. मात्र टीव्ही मालिकांमध्ये एका वेळी एक एपिसोड तयार होतो. मालिकांचं पाच ते पंधरा ‘एपिसोडचं बँकिंग’ करून ठेवण्याची पद्धत असते, जेणेकरून कामात काही अडचण आली तर चॅनलचं प्रसारण थांबू नये. मात्र लॉकडाउनच्या काळात पहिल्या आठवड्यातच बहुतांश मालिकांची ‘एपिसोड बँक’ आटून गेली. मग सगळ्या चॅनल्सवर मालिकांचं पुन:प्रसारण सुरू झालं. त्यातही सोनी मराठी वाहिनीने ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ ही कोविडच्या काळात कलाकारांनी स्वतःच्या घरात राहून स्वतःच चित्रित केलेली मालिका सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती मालिका ना प्रेक्षकांच्या मनाची पकड घेऊ शकली, ना त्या तर्‍हेचा नवा ट्रेण्ड निर्माण करू शकली.
 
एकपडदा चित्रपटगृह (ीळपसश्रश ींहशरींशीी), मॉल आणि मॉलमधील मल्टिप्लेक्स बंद झाल्याने बॉक्स ऑफिसची पुरती दैना झाली. ‘अंग्रेजी मीडियम’ हा इरफान खानचा शेवटचा चित्रपट 13 मार्च रोजी प्रदर्शित झाला. कोविडच्या भीतीने लोकांनी चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली. चित्रपटाचं मोठं आर्थिक नुकसान झालं. चित्रपटगृहामधून हा चित्रपट काढून घेण्यात आला आणि काही दिवसांतच तो हॉटस्टार अ‍ॅपवर झळकला. त्यानंतर सगळ्याच चित्रपटांच्या प्रदर्शन तारखा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या गेल्या. हे केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात घडलं. उन्हाळा हा शाळा-कॉलेजच्या सुट्ट्यांचा आणि मोठे चित्रपट प्रदर्शित होण्याचा काळ. कोविडने त्या सुगीच्या दिवसांना ग्रासून टाकलं. या काळात ब्लॅक विडो-वंडर वूमन असे सुपरहिरो, जेम्स बॉण्ड, मुलान आणि अशा अनेक मोठ्या चित्रपटांचं मोठ्या पडद्यावरचं आगमन रखडलं. बीजिंग, प्राग, कान्स यांसारखे अनेक मोठे चित्रपट महोत्सवदेखील पुढे ढकलले गेले.
 
 

film_4  H x W:
मोठ्या चित्रपटांचं काय होणार याची काळजी लागलेली असताना जागतिक पातळीवर मोठे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर (वेबसाइट, मोबाइल अ‍ॅप इत्यादी) रिलीज होण्यास सुरुवात झाली होती. भारतात अमिताभ बच्चन-आयुष्मान खुराना अभिनित ‘गुलाबो-सिताबो’ हा सुजीत सरकार दिग्दर्शित मोठा चित्रपट ‘अ‍ॅमेझॉन’वर झळकण्याची घोषणा झाली आणि चित्रपटांच्या व्यवहाराला नवं वळण मिळालं. मोठी स्टारकास्ट असलेले मोठे चित्रपट रखडवून ठेवण्यापेक्षा ते ओटीटीवर रिलीज करण्याचा पायंडा तयार व्हायला सुरुवात झाली. डिस्नीचा ‘आर्टेमिस फोअल’ (तसा रद्दड, पण) बिगबजेट चित्रपट ‘डिस्नी प्लस’वर प्रदर्शित झाला. इकडे अनू मेमन दिग्दर्शित आणि विद्या बालनची मुख्य भूमिका असलेला ‘शकुंतलादेवी’ चित्रपटदेखील अ‍ॅमेझॉनवर आला. नेटफ्लिक्सवर ‘धर्मा प्रॉडक्शन’चा जान्हवी कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘गुंजल सक्सेना’ हा चित्रपट आणला गेला. ‘डिस्नी प्लस’ने तर मल्टिप्लेक्स नावाचा नवीन विभाग सुरू करून त्यात सुशांत सिंग राजपूतचा अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा’, लूटकेस, खुदा हाफिज आणि आलिया भटचा ‘सडक टू’ रिलिज केला. ‘झी 5’ ने ‘झिप्लेक्स’ नावाच्या सेक्शनमध्ये नवेकोरे चित्रपट पाहण्याची सोय करून दिली. त्यामध्ये इशान खट्टर आणि अनन्या पांडे यांचा ‘कालीपिली’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे पूर्वी कोणता चित्रपट कोणत्या चॅनेलवर येणार अशी दिसणारी चढाओढ ओटीटी प्लॅटफॉर्म्समध्ये घडताना दिसून येऊ लागली. चित्रपटगृह बंद, टीव्ही चॅनलवर सुरू असलेलं पुन:प्रसारण (आणि चित्रपट असलेच तर तेही मर्यादित संख्येने) या स्थितीत लॉकडाउनमुळे घरात निवांत बसलेल्या-कंटाळलेल्या लोकांनी मनोरंजनाचे असंख्य पर्याय पुरवणार्‍या ओटीटी प्लॅटफॉर्मला पसंती दिली. जगभरात जानेवारी 2020पासून दिवाळीपर्यंतच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मला नव्याने जोडल्या गेलेल्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. म्हणूनच लॉकडाउनमध्ये शेअर मार्केटमधील किमती खाली झुकत असताना नेटफ्लिक्सच्या शेअरचे भाव वधारल्याचं दिसून आलं.
 
 
पण अशा स्थितीतही चित्रपट महोत्सव घडलेच! ‘ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हल’ आणि यूट्यूब यांनी विविध पार्टनर्सबरोबर एकत्रितपणे ‘वी आर वन - ए ग्लोबल फिल्म फेस्टिव्हल’ ऑनलाइन चित्रपट महोत्सव आयोजित केला. तो यूट्यूबवर 29 मे ते 7 जून या कालावधीत चालला. लक्षावधी प्रेक्षकांनी त्याला प्रतिसाद दिला. अनेक चित्रपट महोत्सवांकडून चित्रपट ठरावीक काळासाठी ऑनलाइन दाखवण्याच्या कल्पनादेखील राबवण्यात आल्या. ‘बॅटमॅन ट्रिलॉजी’, ‘इंटरस्टेलर’ अशा कल्पक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला ख्रिस्तोफर नोलन हा हॉलीवूडचा आघाडीचा दिग्दर्शक. त्याचा ‘टेनेट’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीपासूनच मोठ्या चर्चेत होता. मात्र चित्रपटाच्या निर्मात्याकडून कोविडच्या काळातदेखील चित्रपट प्रदर्शित करण्याचं धाडस दाखवण्यात आलं आणि हा चित्रपट 23 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. अगदी मोठ्या प्रमाणात नसला, तरी जगभरातील पन्नास सर्कल्समध्ये तो दाखवण्यात आला.
 
या सगळ्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मला चित्रपटाप्रमाणे मोठा आधार मिळाला तो वेब सीरिजचा. प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, झी फाइव्ह, डिस्नी प्लस, एमएक्स प्लेअर अशा विविध ठिकाणी ‘आर्या’, ‘मिर्झापूर - सिझन टू’, ‘स्पेशल ऑप्स’, ‘पाताल लोक’, ‘पंचायत’, ‘फोर मोअर शॉट्स - सिझन टू’, ‘द हंटिंग ऑफ ब्लाय मॅनोर’, ‘द गिफ्ट - सिझन टू’, ‘मसाबा मसाबा’ अशा अनेक सीरिज रिलीज झाल्या. गेल्या काही वर्षांपासून अ‍ॅमेझॉन-नेटफ्लिक्स आणि त्यांचं अनुकरण करत चाललेले इतर ओटीटी प्लॅटफॉर्म यांनी स्वतःचा ‘ओरिजिनल’ कन्टेंट तयार करण्याकडे लक्ष पुरवलं आहे. त्यात अ‍ॅमेझॉन-नेटफ्लिक्सचा पसारा मोठा असल्याने त्यांच्या प्रॉडक्शन लाइनमध्ये एकाच वेळी मोठ्या संख्येने वेब सीरिज आणि चित्रपट आहेत. त्यामुळेच लॉकडाउनमध्ये सर्वत्र निर्मितीचं काम थांबलेलं असतानाही या प्लॅटफॉर्मवर सातत्याने नवनवीन कन्टेंट प्रदर्शित होत गेलेला दिसतो.
 
 

film_5  H x W:
लॉकडाउनच्या काळात सगळे हातावर हात ठेवून स्वस्थ बसले होते असं चित्र नव्हतं. टीव्ही चॅनल्सनी पुढील एपिसोडच्या लिखाणासाठी आणि पुढील काळात कमीत कमी माणसांमध्ये चित्रीकरण कसं करता येईल याच्या तयारीसाठी त्या काळाचा वापर केला. दुसरीकडे चित्रपट आणि वेब सीरिजच्या पातळीवर ज्यांचं चित्रीकरण पूर्ण झालं होतं त्यांनी संकलन, ध्वनिसंयोजन अशा गोष्टींवर घरबसल्या कामं करण्याचे नवनवीन मार्ग शोधून काढायला सुरुवात केली. मी ‘दशमी स्टुडिओज’च्या ‘भाऊबळी’ चित्रपटाचं संकलन करण्याची जबाबदारी स्वीकारली होती. मी चित्रीकरण संपताच त्याचं संकलन सुरू केलं.
 
 
लॉकडाउन सुरू होईपर्यंत आमचं बेसिक काम झालं. मात्र पुढची प्रोसेस अडकली. पंधरा-वीस दिवसांनंतरदेखील गोष्टी पूर्ववत होण्याची चिन्हं दिसत नव्हती. मग निर्माते निनाद वैद्य, दिग्दर्शक समीर पाटील यांच्याशी चर्चा झाली आणि आम्ही माझ्या घरीच संकलनाचा सेटअप टाकण्याचा निर्णय घेतला. निर्मात्यानेदेखील मोठ्या विश्वासाने चित्रपटाचं सारं फूटेज माझ्याकडे सोपवलं. आम्ही संकलन सुरू करून सिक्युअर ऑनलाइन पद्धतीने झालेलं काम एकमेकांना पाठवायला सुरुवात केली. निर्माता आणि दिग्दर्शक त्यांच्या घरून झालेलं काम पाहत. मग आम्ही चित्रपटाची दृश्यं, त्याची ट्रीटमेंट यासंबंधी बोलून कामं फायनल करत जाऊ लागलो. त्या वेळी मी या क्षेत्रातल्या माझ्या मित्रांशी बोलत असताना मला कळत गेलं की प्रत्येक जण या ना त्या प्रकारे काम पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे.
 
 
film_6  H x W:
माझ्या ‘विकून टाक’ या चित्रपटाचा पोस्टहेड संतोष नायक हा गुणी तंत्रज्ञ त्या वेळी ‘शकुंतलादेवी’ चित्रपटावर काम करत होता. त्या चित्रपटाचं पोस्ट प्रॉडक्शनचं (संकलन, डबिंग, साउंड डिझाइन अशा चित्रीकरणानंतरच्या सार्‍या गोष्टी) सगळं काम लॉकडाउनच्या काळात घडलं. अ‍ॅमेझॉन-नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मची स्वत:ची फार गुंतागुंतीची आणि अचूकपणे आखलेली सिस्टिम असते आणि त्यामध्ये नियमांनुसारं कामं होणं ही अत्यावश्यक गोष्ट असते. त्यामुळे कोविड संदर्भातील सगळे नवे नियम-संकेत पाळून काम पुढे नेण्याचं आव्हान चित्रपटकर्त्यांसमोर आणि टीमसमोर होतं. डबिंगसारखी अनेक माणसांची आवश्यकता असलेली प्रक्रिया घरबसल्या करणं हे कर्मकठीण काम होतं. एकतर आवाज ध्वनिमुद्रित करण्यासाठी स्टुडिओसारख्या विशेष जागांचीच गरज असते. त्यात ‘शकुंतलादेवी’सारख्या चित्रपटात विविध देशांतील-प्रांतांतील कलाकार सहभागी असल्याने, ते आहेत त्या देशातून उपलब्ध साधनांच्या साहाय्याने त्यांचं डबिंग पूर्ण करून घेणं हे आव्हान होतं. पण ते सारं पार पाडून ‘शकुंतलादेवी’ अ‍ॅमेझॉन प्राइमवर दाखल झाला. संतोष म्हणतो की, अ‍ॅमेझॉनसारख्या प्लॅटफॉर्मसाठी असा चित्रपट, तोही प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण करणं हे खूप शिकवून गेलं. संकलन, डबिंग, संगीत, व्हीएफएक्स अशा प्रत्येक गोष्टीसाठी सर्वांची ऑनलाइन भेट घडवण्यापासून चित्रपट पूर्ण करेपर्यंतचा प्रत्येक टप्पा दररोज वेगळं आव्हान घेऊन यायचा आणि आम्ही त्यावर मात करून पुढे जाण्याचे नवनवीन मार्ग शोधायचो.
 
 
लॉकडाउननंतर चित्रीकरण आणि इतर कामांसाठी लागू करण्यात आलेले नियम हळूहळू शिथिल करण्यात आले. चित्रीकरण सुरू झालं, मात्र तेदेखील ढीगभर प्रश्न घेऊन! कित्येक कलाकार, तंत्रज्ञ आपापल्या गावी निघून गेले होते. त्यामुळे त्यांना माघारी आणण्यापासून तयारीला सुरुवात झाली. तसंच, चित्रीकरणासाठी पूर्वीसारखी शेकड्यांनी माणसं आणता येत नव्हती. सरकारने मोजक्याच माणसांमध्ये चित्रीकरण करण्याची परवानगी दिली. त्यामुळे कलाकारांपासून अगदी स्पॉट बॉयपर्यंत प्रत्येक माणूस तोलून-मापून आणला जाऊ लागला. सेटवर असणार्‍या प्रत्येकाची टेस्ट करणं, रोजच्या रोज सर्वांची तपासणी करणं, प्रत्येकाचा कोविडसाठी विमा उतरवणं, सर्वांना मास्क-फेसशील्ड पुरवणं, सेटवर सोशल डिस्टन्सिंग पाळणं, ते पाळलं जातंय का हे पाहण्यासाठी सेटवर इन्स्पेक्टर ठेवणं, जागोजागी हात स्वच्छ करण्याच्या व्यवस्था उपलब्ध करून देणं अशी पूर्वीच्या तुलनेत तारेवरची कसरत सुरू झाली. एवढं करूनदेखील कुणालातरी कोविडची लागण होई आणि मग पुन्हा तीन दिवसांची सुटी जाहीर करावी लागे. आशालता वाबगावकर या ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीला सातार्‍यात मालिकेचं चित्रीकरण करत असताना कोविडची लागण झाली. त्यातच त्यांचा मृत्यू ओढवला. अभिनेता सुबोध भावे असो किंवा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेत आंबेडकरांची भूमिका करणारा सागर देशमुख हा अभिनेता, कोविडने अनेकांना गाठलं. त्यामुळे कितीही काळजी घेतली तरी कलाकार-तंत्रज्ञ अशा सर्वांच्याच मनात भीतीची-शंकेची पाल सतत चुकचुकत राहतेच. चित्रीकरणावर सगळ्यांची व्यवस्था बघणार्‍या प्रॉडक्शनच्या मंडळींची जबाबदारी वाढल्याने त्यांना अधिकच सावध राहावं लागतं. चित्रीकरणावर असताना मास्क-फेसशील्ड वापरणं अनिवार्य आहे. मात्र कॅमेर्‍याच्या व्ह्यू फाइंडरला डोळा लावणं, लाइटचं रीडिंग घेणं अशा गोष्टी करताना फेसशील्ड अडचणीचे ठरतात. अशी लहानमोठ्या अडचणींवर मात करत कामं पुढं जाऊ लागली आहेत.
कामं सुरू झाली, मात्र एन्टरटेनमेंट इंडस्ट्री आर्थिक संकटातून अद्याप पुरती सावरली नाही. स्पॉट बॉय, कला विभागामध्ये सेटिंगची कामं करणारी माणसं, चहावाले अशी माणसं रोजंदारीवर काम करतात. लॉकडाउनच्या काळात काम बंद पडल्यानंतर त्यांच्या हातातला उरलासुरला पैसा संपून गेला. अशांचे लॉकडाउनच्या काळात अतोनात हाल झाले. चित्रपट-मालिकांमध्ये आजूबाजूला उभं राहून गर्दीचा भाग होणारे, मिळालाच तर एखादा संवाद म्हणणारे कलाकार (म्हणजे ज्युनिअर कलाकार) यांची संख्या मोठी आहे. मात्र आता कमीत कमी माणसं घ्यावीत असा नियम असल्यामुळे गर्दीची दृश्य चित्रीकरणामधून वगळण्यात आली आहेत. तशा दृश्यांना एकतर चित्रीकरणाच्या आधीच कात्री लागली किंवा गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने नव्याने लिहिण्यात आलं. त्यामुळे काम सुरू झाल्यानंतरही या कलाकारांवर कोसळलेलं बेकारीचं संकट अद्याप दूर झालेलं नाही. लॉकडाउनच्या काळात हिंदी-मराठीतील अनेक कलाकारांनी अशा ज्युनिअर कलाकारांना सातत्याने मदत केली. मात्र ते सहकार्य आयुष्यभर पुरणारं नाही. त्या ज्युनिअर कलाकारांच्या भवितव्यासमोर अजूनही भलंमोठं प्रश्नचिन्हं उभं आहे.
जे इतर लहानमोठे कलाकार-तंत्रज्ञ चित्रीकरणासाठी माघारी आले, त्यांची तीन-चार महिने आर्थिक परवड झाली. आता ते आल्या आल्या पैशांची मागणी करू लागले. चित्रपट-वेब सीरिजपुरतं ठीक, मात्र टीव्ही मालिकांमध्ये पैसे देण्याची वेगळी व्यवस्था असते. केलेल्या कामाचे पैसे तीन महिन्यांनी मिळतात, असा तिथला पूर्वीचा रिवाज. त्यामुळे आता रोजच्या रोज किंवा ठरावीक काळाने पैसे हातात यावेत अशी होत असलेली मागणी मालिकेचे निर्माते, टीव्ही चॅनल या सार्‍यांसाठी अडचणीची ठरू लागली. त्यातच लॉकडाउनच्या काळात झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी आणि पुढच्या कामांना पैसा पुरवण्याच्या उद्देशाने टीव्ही चॅनल्सनी त्यांच्याकडून दिल्या जाणार्‍या बजेटमध्ये तीस ते चाळीस टक्क्यांची घट केली. त्यामुळे साहजिकच निर्मात्याकडून कलाकार-तंत्रज्ञ यांच्या मानधनात कपात करण्यात आली. मात्र सगळे जण परस्परांना सांभाळून घेत पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
 
 
चित्रपटांसाठी येणारा काळ संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. चित्रपटगृह नजीकच्या काळात तरी उघडण्याची चिन्हं नाहीत. त्यामुळे तयार होऊन बसलेल्या चित्रपटांचं काय करायचं? असा मोठा प्रश्न आहे. दोन-पाच कोटींचे लहान चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणायचे असा पर्याय आहे, मात्र मोठ्या चित्रपटांची - ज्यांची गुंतवणूकच शंभर कोटींच्या पलीकडची आहे, त्यांनी काय करायचं? असा पेच आहे. ते चित्रपट दोनेकशे कोटींचा धंदा करतील या अपेक्षेने तयार केले गेले. मात्र किमान खर्च वसूल होऊ शकेल एवढ्या किमतीला तरी ओटीटी प्लॅटफॉर्म ते चित्रपट विकत घेतील का? त्यांना ते परवडतील का? आणि त्यांनी विकत घेतले तर ते त्यातून पैसा कसा मिळवतील? याची उत्तरं येणारा काळच ठरवेल. एकीकडे ‘ब्रह्मास्त्र’-‘सूर्यवंशी’सारखे मोठे चित्रपट हे चित्रपटगृह उघडण्याची वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे अक्षयकुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’, अजय देवगणचा ‘भूज’, अभिषेक बच्चनचा ‘बिगबुल’ हे चित्रपट डिस्नी प्लस’वर प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. कोविड किती काळ टिकून राहतो आणि चित्रपट इंडस्ट्रीमध्ये पैसे वसूल करण्याचे कोणते नवे पर्याय येतात, यावर त्या क्षेत्राची पुढची वाटचाल ठरवली जाणार आहे. लॉकडाउनमध्ये प्राइम व्हिडीओ-नेटफ्लिक्सला सरावलेल्या प्रेक्षकांना घरबसल्या मोबाइलवर चित्रपट पाहण्याची सवय लागली आहे. दोन माणसांचा चित्रपटगृहापर्यंतचा प्रवास, गाडीचं पार्किंग, चित्रपटाची पाचेकशे रुपयांची तिकिटं आणि मध्यंतरामधलं खान-पान यात मोडले जाणारे हजार रुपये प्राइम-नेटफ्लिक्सचं वर्षभराचं सदस्यत्व (सबस्क्रिप्शन) मिळवून देतात. प्रेक्षकांकडेदेखील खर्च करायला पैसे कमी असल्याने निदान काही काळ तरी त्यांची पसंती चित्रपटगृहांपेक्षा अ‍ॅप्सना अधिक असेल.
 
 
लोक म्हणतात - चित्रपटाचा खरा प्रेक्षक चित्रपटगृह सुरू होतील तेव्हा पुन्हा तिकडे जरूर वळेल. पण तोपर्यंत त्या प्रेक्षकांची संख्या किती उरेल? तेवढ्या संख्येचा प्रेक्षक मोठ्या चित्रपटांना आधार देऊ शकेल का? अशा प्रश्नांची जंत्री चित्रपटकर्त्यांसमोर उभी आहे. कदाचित येणार्‍या काळात चित्रपटगृह नव्याने उभारी घेतील. चित्रपट तिकीट खिडकीवर जोरदार गल्ला जमवतील. कदाचित चित्रपट केवळ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत जातील आणि ‘बाहुबली-अ‍ॅव्हेंजर्स’ सारखे भव्यदिव्य, डोळ्यांचं पारणं फेडणारे चित्रपट खास मोठ्या पडद्यासाठी तयार होऊ लागतील. कदाचित चित्रपटांसाठी लिहिलेल्या कथा अधिक विस्तारित स्वरूपात वेब सीरिजच्या माध्यमांतूनच भेटू लागतील आणि ट्वेन्टी ट्वेन्टीच्या जमान्यातल्या टेस्ट मॅचसारखं चित्रपटाचं माध्यमदेखील टिकवून ठेवावं लागेल किंवा कदाचित मोबाइल अ‍ॅपप्रमाणे आणखी एखादा नवा मार्ग चित्रपटांचा आधार होईल.
 
कदाचित!
हा एक शब्द या इंडस्ट्रीच्या भवितव्याच्या कित्येक शक्यता स्वतःच्या उदरात घेऊन उभा आहे. एका उंबर्‍यावर, जिथे ही अब्जावधी डॉलर्सची एन्टरटेनमेंट इंडस्ट्री एका मोठ्या स्थित्यंतराची वाट पाहतेय.