बिहारच्या विजयाचे शिल्पकार

विवेक मराठी    13-Nov-2020   
Total Views |
 बिहारमध्ये 74 जागी विजय मिळवण्याचा पराक्रम भाजपाने केला. यामागे जसे राज्यातील पक्ष कार्यकर्त्यांचे श्रम आहेत, केंद्र सरकारची विकासकामे आहेत, मोदीजींचा करिश्मा आहे, तसेच प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी २१ दिवसांच्या कालावधीत केलेले शिस्तबद्ध कामही आहे. या कामामुळे भविष्यात पक्षाकडून त्यांच्यावर केंद्र स्तरावर नवी जबाबदारी सोपविण्यात आली, तर आश्चर्य वाटायला नको. ते त्यांच्या कर्तृत्वाचे योग्य मूल्यमापन असेल.
  
bjp_1  H x W: 0
 
आजच्या घडीला भाजपाच्या केंद्रीय स्तरावरील दुसर्‍या फळीतील सर्वात भरवशाचे नाव आहे ते देवेंद्र फडणवीस यांचे. वाटेत आलेले सर्व प्रकारचे अडथळे, विरोधकांनी मार्गावर उभी केलेली आव्हाने यांच्याशी शांतपणे मुकाबला करत आणि त्याच वेळी कामावरची पकड जराही सैल पडू न देता, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा ५ वर्षे यशस्वीपणे सांभाळणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांची राज्याच्या इतिहासात नोंद झालेली आहे. त्याच चोख कामगिरीच्या बळावर ‘मी पुन्हा येईन’ असा विश्वास जागवत त्यांनी नंतरच्या विधानसभा निवडणुकीचे नेतृत्व केले. सर्वाधिक जागा मिळवूनही सहकारी पक्षाच्या टोकाच्या आडमुठेपणाने राज्यातील सत्तेपासून फडणवीसांना आणि पर्यायाने भाजपाला दूर राहावे लागले. हा आघात सहज पचवता येणे अवघड होते. देवेंद्र यांच्यामधल्या नेत्याच्या, राजकारण्याच्या प्रगल्भतेची परीक्षा पाहणारा हा कालखंड होता. त्या वेळी आपल्या उपजत शांत, संयमी स्वभावाचे आणि नेतृत्वगुणांचे दर्शन घडवत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि त्या भूमिकेतूनही नवे आदर्श उभे केले.

कोविड-१९च्या अभूतपूर्व संकटात स्वत:ला घरातच कोंडून घेणारे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आणि याच संकटकाळात कसलीही तमा न बाळगता, दिवस-रात्र एक करून जनतेच्या दाराशी जाऊन आस्थेने विचारपूस करणारा विरोधी पक्षनेताही याच जनतेने पाहिला. नियतीने लादलेली भूमिका करतानाही राजधर्म न विसरलेला विरोधी पक्षनेता. विरोधासाठी विरोध न करता, विद्यमान सरकारला त्याच्या कर्तव्याची जाणीव आपल्या कामातून करून देणारा विरोधी पक्षनेता. या कामगिरीने देवेंद्रजींचे नेतृत्वगुण अधिकच झळाळून उठले.

bjp_2  H x W: 0 

केंद्रातील वरिष्ठांचे त्यांच्या कामाकडे, त्यामागे असलेल्या काटेकोर नियोजनाकडे आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते घेत असलेल्या अथक परिश्रमाकडे लक्ष होतेच. संकटाकडे संधी म्हणून पाहू शकणार्‍या या नेत्यावर केंद्राने पुढची जबाबदारी सोपवली ती बिहारमधील विधानसभा निवडणुकीची. कोविड-१९ने त्या राज्यापुढे उभे केलेले प्रश्न खूप गुंतागुंतीचे होते. परराज्यातून परतणार्‍या बिहारी बांधवांच्या प्रश्नांची त्यात भर पडली होती. त्यातच आलेल्या पुराने राज्य सरकारसमोरील समस्यांची जटिलता वाढली होती. गेली १५ वर्षे सत्तास्थानी असलेले नितीश कुमार यांचे सरकार पुन्हा सत्ताग्रहण करू शकेल का, याबद्दल सगळेच साशंक होते. भाजपा त्यांचा सहकारी पक्ष. त्यामुळे त्यांच्यासमोरही निवडणूक जिंकण्याचे कडवे आव्हान होते. हे आव्हान पेलण्यासाठी निवडणूक प्रभारी म्हणून केंद्राने देवेंद्र फडणवीस यांची निवड केली, तेव्हाच एका नव्या सत्त्वपरीक्षेसाठी ते सिद्ध झाले. ३० सप्टेंबर रोजी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर फडणवीस यांनी बिहारचा दौरा करून तेथील प्रश्न, समस्या, पक्षाच्या दृष्टीने जमेच्या बाजू, भाजपाचे प्रभावक्षेत्र, झालेली विकासकामे यांची माहिती करून घेतली. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संघटनात्मक बैठकांवर लक्ष केंद्रित केले. त्यामध्ये अगदी बूथवर काम करत असलेल्या कार्यकर्त्यांनाही सामावून घेतले. त्यामुळे बिहारी कार्यकर्त्यांशी संवाद साधता आला. तेथील संघटनात्मक बांधणीत असलेल्या समस्या समजून घेऊन त्यात आवश्यक त्या सुधारणा करता आल्या. या पार्श्वभूमीवर प्रचारनीती आखली. देवेंद्रजी युवा असल्याचाही फायदा झाला. त्यांच्या रूपात तेजस्वी यादव या झंझावाताला रोखून धरणारा समर्थ पर्याय भाजपाला मिळाला. फडणवीस यांच्याविषयी बिहारी तरुणांमध्ये क्रेझ निर्माण झाली. जागावाटप करण्यापासून ते स्टार प्रचारकांच्या सभा ठरवण्यापर्यंत फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

हाताशी असलेला २१ दिवसांचा तुटपुंजा वेळ आणि कामांचे अग्रक्रम यांची योग्य सांगड घालत देवेंद्र यांनी या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत पक्षाला दणदणीत विजय प्राप्त करून दिला. यामागे होते त्यांच्या व्यूहरचनेचे कसब आणि नेतृत्वक्षमता.

असे असले, तरी या विजयाचे संपूर्ण श्रेय देवेंद्रजी स्वत:कडे घेत नाहीत. ते त्यांच्या सुसंस्कृत स्वभावाला साजेसे आहे. बिहारमधील विपरीत स्थितीतही बिहारी जनतेचा देशाच्या पंतप्रधानांवरील विश्वास अढळ होता आणि आहे, हे ते आवर्जून नमूद करतात. किंबहुना या विश्वासाच्या मजबूत पायावरच आपण प्रचारनीती आखली आणि म्हणूनच ती यशस्वी झाली, असे त्यांचे मत आहे. कोरोनाच्या खडतर कालखंडात आणि पूरसंकटात मोदी सरकारने गरिबांना केलेली आर्थिक मदत, बिहारमधील त्या वंचितांपर्यंत पोहोचलेली असल्याने बिहारी जनतेच्या मनात केंद्र सरकारविषयी आस्था, आपुलकी असल्याचे त्यांना आढळून आले. त्याचबरोबर पक्ष म्हणूनही भाजपाने राज्यात जे केंद्राला समांतर मदतकार्य केले होते, त्यातूनही बिहारी जनतेच्या मनात या पक्षाविषयी सद्भावना होती, असे देवेंद्र यांचे निरीक्षण आहे. त्याचा योग्य उपयोग करत त्यांनी निवडणूक प्रचाराची आखणी केली. पंतप्रधान मोदी यांच्या प्रचार सभांमुळेही भाजपाविषयी अधिकाधिक अनुकूलता तयार व्हायला मदत झाली. मोदी सरकारने यशस्वीरित्या राबवलेला गरीब कल्याणाचा कार्यक्रम, मुख्यमंत्री नितीश कुमार यांची निष्कलंक प्रतिमा याचाही आघाडीच्या विजयात वाटा आहे, असे देवेंद्र यांचे मत आहे.


bjp_3  H x W: 0

या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन बिहारमध्ये 74 जागी विजय मिळवण्याचा पराक्रम भाजपाने केला. यामागे जसे राज्यातील पक्ष कार्यकर्त्यांचे श्रम आहेत, केंद्र सरकारची विकासकामे आहेत, मोदीजींचा करिश्मा आहे, तसेच प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी २१ दिवसांच्या कालावधीत केलेले शिस्तबद्ध कामही आहे. या कामामुळे भविष्यात पक्षाकडून त्यांच्यावर केंद्र स्तरावर नवी जबाबदारी सोपविण्यात आली, तर आश्चर्य वाटायला नको. ते त्यांच्या कर्तृत्वाचे योग्य मूल्यमापन असेल.

आव्हानांचे संधीत रूपांतर करणार्‍या, उत्तम कार्यक्षमता आणि निर्णयक्षमता असलेल्या या महाराष्ट्राच्या सुपुत्राची पावले आता दिल्लीच्या दिशेने पडू लागली आहेत, त्याची बिहार निवडणूक साक्ष आहे.