डीएनएसबी बँकेची नफ्याची परंपरा यंदाही कायम

विवेक मराठी    20-Nov-2020
Total Views |
***38.82 कोटी इतका निव्वळ नफा***

डोंबिवली : डोंबिवली नागरी सहकारी बँकेने गेली 50 वर्षे सातत्याने प्रतिवर्षी आपला नफा वृद्धिंगत करण्याची परंपरा या वर्षीही कायम ठेवली आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये सर्व तरतुदी वजा करून 38.82 कोटी इतका निव्वळ नफा मिळविला आहे. हा वार्षिक अहवाल बँकेने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे.dns_1  H x W: 0
 
यंदाची बँकेची वार्षिक सभा ही सुवर्ण महोत्सवी वर्षातील सभा असल्याने आवश्यक त्या परवानग्या व योग्य ती काळजी घेऊन सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सदर सभेचे नियोजन लवकरात लवकर करण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे. बँकेचे आर्थिक वर्ष 2019-20 चे वैधानिक लेखापरीक्षण पूर्ण झाले असून 31 मार्च रोजी बँकेच्या ठेवी 4 हजार, 287 कोटी, कर्ज व्यवहार 2 हजार, 658 कोटी, तर गुंतवणूक 1 हजार, 227 कोटी आहेत. बँकेचा मिश्र व्यवसाय 6 हजार, 945 कोटी आहे. या आर्थिक वर्षात निर्लेखित कर्जामधून 39 कोटी इतकी धडाकेबाज वसुली केली आहे.
 
 
कोरोनामुळे झालेली टाळेबंदी, त्यामुळे ओढावलेले आर्थिक संकट यावर मात करण्यासाठी बँकेने विविध उपाययोजना तातडीने अंमलात आणल्या. छोट्या-मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच वैयक्तिक अडी-अडचणी सोडविण्यासाठी विविध कमी व्याजदराच्या कर्ज योजना सुरू केल्या. त्याचप्रमाणे गृह, वाहन, सुवर्णतारण कर्ज योजनांच्या व्याजदरात कपात केली आहे. ग्राहकांचा या कर्ज योजनांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. कमी व्याजदराच्या कर्ज योजनांबरोबर नफा क्षमता टिकवून ठेवण्यासाठी काटकसरीचे अनेक मार्ग बँकेने अवलंबिले आहेत.
 
कोरोनामुळे सामाजिक अंतर राखण्याची आवश्यकता लक्षात घेऊन शाखांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी मोबाईल बँकिंगला प्रोत्साहन देण्याचे धोरणही बँकेने अवलंबिले आहे. त्याचबरोबर ‘कोविड-19’ चा प्रतिकार करण्यासाठी ‘कोरोना कवच’ ही विमा पॉलिसी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
डोंबिवली शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या व कोरोनामुळे रूग्णाला भेडसावणारी ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन समाजातील गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन मशीन्स अनीता रूग्ण साहाय्य केंद्र, डोंबिवली यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ‘पीएम केअर फंड’, मुख्यमंत्री साहाय्यता निधी व रा. स्व. संघ जनकल्याण समिती या संस्थांना डोंबिवली बँक परिवाराच्यावतीने 32 लाखांचा निधी सुपूर्द केला आहे. तसेच सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांसाठी कोरोना उपचारांसाठी एक लाखांच्या विमा पॉलिसीचा प्रीमियम बँकेने अदा केल्याने कर्मचार्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

(- महा mtb)