बहुजनवादी हिंदुत्वाचे अभिजन व्यवस्थेला आव्हान

विवेक मराठी    21-Nov-2020   
Total Views |


बहुजन वर्ग हा अभिजन वर्ग बनण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू असते आणि ती होत असताना अभिजन वर्गाची मूल्ये बहुजन वर्ग आत्मसात करत असतो. प्रारंभीच्या काळात या दोन्ही मूल्यांची सरभेसळ असते. आज ज्यावर हिंदुत्ववादी चळवळीवर दोष म्हणून टीका होेते, त्यातील बहुसंख्य दोष हे अभिजन वर्गातून हिंदुत्ववादी चळवळीत उतरले आहेत. काळाच्या ओघात हे दूर होऊन एका विशुद्ध स्वरूपातील हिंदुत्ववादी चळवळ आपल्या देशाचे व समाजाचे चित्र आमूलाग्र बदलून टाकेल, अशी अपेक्षा ठेवण्याइतकी गुणवत्ता या चळवळीत नक्कीच आहे, हे पूर्वग्रह न ठेवता पाहणारे अभ्यासक आहेत हे त्यांच्या लक्षात येईल.

hindu_1  H x W:

समाजामध्ये अभिजन आणि बहुजन असे दोन वर्ग फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आले आहेत. या दोघांची वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये आहेत. समाजातील अभिजन वर्ग हा समाज नियंत्रणासाठी सामाजिक व्यवस्था निर्माण करतो. त्यांचे नीतिनियम बनवतो. त्यांच्या अंमलबजावणीची यंत्रणा उभी करतो आणि समाज नियंत्रणाबाहेर जाणार नाही याबाबत तो दक्ष असतो. हे करण्याकरिता विशिष्ट तत्त्वज्ञानाच्या आधारे बौद्धिक, भावनिक चौकटी निर्माण करतो आणि त्या चौकटीत समाजाला बंदिस्त ठेवण्याची त्यांची धडपड चालू असते. अभिजन वर्ग भावनेपेक्षा बुद्धीला अधिक महत्त्व देतो.

 
 

याउलट बहुजन वर्ग अधिक भावनाशील असतो. तात्काळ प्रतिक्रिया देणारा असतो. खुल्या मनाने आणि खुल्या दिलाने विचार करणारा असतो. त्यामुळे बहुजन वर्गाच्या जीवनात अभिजन वर्गासारखा यांत्रिकपणा नसतो. त्यात अधिक सहजता असते. कोणत्याही विशिष्ट चौकटीत बांधून घेण्याची त्यांची मानसिकता नसते, म्हणून तो अधिक सर्जनशील, नव्या कल्पना निर्माण करणारा, त्या कल्पनांच्या मागे स्वतःला झोकून देणारा असा असतो. अभिजन वर्गाला बहुजन वर्गाच्या या भावनोत्कट स्वातंत्र्याची आणि नवसर्जनशीलतेची भीती वाटत असते. यामुळे समाज अस्थिर बनेल, अराजक माजेल असे त्याला वाटत असते. जेव्हा जेव्हा अभिजनांचा वर्ग बहुजनांना आपल्या नियंत्रणात ठेवू शकला नाही, तेव्हा तेव्हा जगाच्या इतिहासातच क्रांती झाली आहे. त्यामुळे इतिहासातील हे अभिजन आणि बहुजन संबंध तपासणे, त्याचा अर्थ लावणे हे समाजातील सांस्कृतिक वीण कशी आहे हे समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

प्लेटो

अभिजन आणि बहुजन संबंधातील राज्यशास्त्रीय विचार प्लेटोने मांडला आहे. बहुजन वर्ग हा हिंस्र श्वापदासारखा असतो आणि त्याला नियंत्रित करण्यासाठी अभिजन वर्गाला वेगवेगळ्या संकल्पना, कायदे आदींची निर्मिती करावी लागते, असे त्याचे प्रतिपादन आहे. प्लेटोची तत्त्वज्ञ राजाची कल्पना याला धरून आहे. बहुजन वर्गाला जेवढे तत्त्वज्ञानाच्या आधारे नियंत्रित करता येईल, तेवढी दंडशक्तीची गरज कमी भासेल, असे प्लेटोचे सांगणे आहे. हिंदू परंपरेची मात्र अशी भूमिका नाही. अभिजन वर्ग व बहुजन वर्ग यांच्यात जैविक संबंध असतात व त्यांच्या आंतरप्रक्रियेतून समाजधारणेची तत्त्वे तयार होतात, असे ही परंपरा मानते. यामुळेच हिंदू समाजामध्ये एकात्म भाव तयार झाला आहे.

hindu_2  H x W:

एक प्रकारचा अभिजन वर्ग बदलून दुसर्‍या प्रकारचा अभिजन वर्ग सत्तेवर येतो, तेव्हा तो त्या वर्गाला पोषक असे नियम, कायदे, तत्त्वज्ञान यांची मिथके तयार करतो आणि प्रत्येक सत्तापरिवर्तनाबरोबर हे घडत आलेले आहे. परिवर्तनाची प्रक्रिया ही बहुजन वर्गातून निर्माण होते व ती जशी अधिकाधिक शक्तिशाली होत जाते, तेव्हा एक तर अभिजनाचा वर्ग त्यांचा स्वीकार करतो किंवा तो वर्ग बदलून बहुजनातून नवा अभिजन वर्ग तयार होतो. या संदर्भात ख्रिश्चन धर्माचे उदाहरण बोलके आहे.

 

 

ख्रिश्चन धर्म
 

ख्रिश्चन धर्म हा ज्यू धर्मातून उत्पन्न झालेला आहे. येशू ख्रिस्त हा ज्यू होता. एकेकाळच्या इजिप्तमधील गुलामांंना मुक्ती देणारा ज्यू धर्म नंतर प्रस्थापितांचा धर्म झाला. पॅलेस्टाइनवर रोमन लोकांचे राज्य असताना त्यांच्याशी हातमिळवणी करून ज्यू धार्मिक नेते सर्वसामान्य ज्यू लोकांचे शोषण करीत होते. या पार्श्वभूमीवर येशू ख्रिस्ताने सर्वसामान्य लोकांना धर्मोपदेश करायला सुरुवात केली. बायबलमधील अनेक कथा या गरीबांच्या हृदयात खरा परमेश्वर आहे, असे सांगणार्‍या आहेत. येशू ख्रिस्ताच्या बहुजनांमधील लोकप्रियतेने ज्यू धर्मप्रमुख अस्वस्थ झाले आणि त्यांनी रोमन राज्यकर्त्याशी हातमिळवणी करून येशूला क्रूसावर चढवले. वास्तविक पाहता येशू ख्रिस्ताला धर्मसुधारक म्हणून ज्यू धार्मिक नेत्यांनी स्वीकारले असते, तर स्वतंत्र ख्रिश्चन धर्म स्थापन होण्याऐवजी येशू ख्रिस्ताचा पंथ हा ज्यूंचा एक सुधारणावादी पंंथ बनला असता. नंतरच्या काळात ज्यू विरुद्ध ख्रिश्चन हा रक्तपात झाला, तो झाला नसता. येशू ख्रिस्ताच्या बलिदानामुळे बहुजन वर्गात ख्रिस्ती धर्म वेगाने वाढू लागला. इ.स. 300च्या सुमारास रोमन सम्राट कॉन्स्टंटाइन याला आपले राजपद धोक्यात येईल असे वाटू लागले, तेव्हा त्याने अधिकृत राजधर्म म्हणून बहुजनांमध्ये लोकप्रिय बनलेल्या ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आणि ख्रिस्ती धर्म हा रोमन साम्राज्याचा अधिकृत धर्म झाला. त्यानंतर पोप आणि ख्रिस्ती धर्मगुरू यांची गणना अभिजन वर्गात होऊ लागली. बहुजनांमधून सुरू झालेली एखादी चळवळ अभिजनवादी कशी बनते, याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

hindu_4  H x W:

 

अभिजन-बहुजन संबंध कसे असतात, त्यांची आंतरप्रक्रिया कशी निर्माण होते, यावर समाजातील सांस्कृतिक प्रवाह अवलंबून राहतात. मार्क्सच्या मते अभिजनवादी समाज हा बहुजनांचे शोषण करून त्याआधारे आपले वर्चस्व टिकवून ठेवतो. त्यामुळे हे वर्चस्व झुगारून द्यायचे असेल, तर बहुजन वर्गाला त्यांच्यावर होणार्‍या शोषणाची वर्गीय जाणीव निर्माण करून द्यायला हवी. मार्क्सवाद्यांच्या मते जगाचा सर्व इतिहास हा अभिजनांनी बहुजनांच्या केलेल्या शोषणाचा व बहुजनांनी त्याविरुद्ध केलेल्या क्रांतीचा इतिहास आहे. याच तात्त्विक चौकटीत ते इतिहासाकडे पाहतात. यालाच मार्क्सवादी दृष्टीकोन म्हणतात. भारताच्या इतिहासात अशा प्रकारचे मार्क्सवादी विश्लेषण अनेक विचारवंतांनी केले आहे. त्या तपशिलात जाण्याचा या छोट्या लेखाचा उद्देश नाही.

 
 
hindu_3  H x W:

हिंदू संस्कृतीचे वेगळेपण

भारतीय किंवा हिंदू सांस्कृतिक परंपरा आणि समाजव्यवस्था ठोकळेबाज मार्क्सवादी विश्लेषणापेक्षा अधिक गुंतागुंतीची आणि अनेकपदरी आहे. काही दिवसांपूर्वी हिंदू धर्म हा ब्राह्मणी वर्चस्वाचा धर्म म्हणून मानला जात असे. याचे कारण त्या वेळी हिंदू समाजात ब्राह्मण वर्ग अभिजन वर्ग होता; परंतु हिंदू समाजातील अभिजन व बहुजन वर्गाची आंतरप्रक्रिया गुंतागुंतीची व बहुपदरी आहे. उदाहरण सांगायचे, तर रामायण आणि महाभारत ही दोन्ही महाकाव्ये ब्राह्मणांनी लिहिलेली नाहीत आणि भारतभर आदर्श मानले गेलेले राम आणि कृष्ण हे दोघेही ब्राह्मण नाहीत. हिंदू समाज राजकीयदृष्ट्या पराभूत झाला, त्या वेळी त्याचे अस्तित्त्व फक्त धार्मिक कर्मकांडावर अवलंबून राहिले. ही धार्मिक कर्मकांडे चालवण्याचा अधिकार ब्राह्मणवर्गाला होता. त्यामुळे हिंदू संस्कृती त्या कालखंडापुुरती ब्राह्मण वर्चस्ववादी बनली. याला परिस्थिती कारणीभूत होती. परंतु ब्रिटिश आल्यानंतर सामाजिक, राजकीय व आर्थिक स्थिती जशी बदलू लागली, तसा हिंदू समाजवर्गात, जातिव्यवस्थेत बदल होऊ लागला. हा बदल हिंदू संस्कृतीच्या टीकाकारांच्या लक्षात आला नाही. त्यामुळे हिंदू समाज हा ब्राह्मण वर्चस्ववादी आहे असे, गृहीत धरून ज्यांनी ज्यांनी टीका केली, ती टीका काळाच्या ओघात टिकू शकली नाही. जसा जसा हिंदू इहवादी बनत गेला, वेगवेगळ्या जातींना आधुनिक शिक्षणाचा लाभ मिळू लागला, त्यातून हिंदू धर्मात सुधारणेची मोठी चळवळ सुरू झाली व त्यात सर्व जातींचा सहभाग होता. स्वातंत्र्यानंतर समतेची हमी देणारी राज्यघटना हिंदू समाजातील अभिजन वर्गाने स्वीकारून या समतेच्या मूल्याचा स्वीकार केला. तो करत असताना आरक्षणाचे तत्त्व स्वीकारून इतिहासात घडलेल्या चुकांचे परिमार्जन करण्याची जबाबदारीही स्वीकारली. इथल्या सांस्कृतिक परंपरेचे वेगळेपण डॉ. रा.चिं. ढेरे यांनी आपल्या संशोधनात अधोरेखित केले आहे. विठ्ठलासकट अनेक देवता प्रारंभी बहुजनाच्या होत्या, नंतर अभिजनांनी त्यांचा स्वीकार केला. अशा प्रकारची अनेकविध उदाहरणे आपल्या परंपरेतून, मिथकांतून पाहायला मिळतात. यामुळे अनेक पाश्चात्त्य विचार परंपरेतील विद्वानांनी हिंदू समाजाबद्दल जी विश्लेषणात्मक भाष्ये केली, ती काळाच्या कसोटीवर टिकू शकली नाहीत.

 
 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आधुनिक काळातील दोन उदाहरणे ही प्रक्रिया समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील. पहिले उदाहरण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहे. 1980पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आज मिळणारा राष्ट्रपुरुषाचा मान मिळालेला नव्हता. आणीबाणीपर्यंत भारताच्या राजकारणावर काँग्रेसचे वर्चस्व होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर काँग्रेसचा विरोध केल्यामुळे काँग्रेसला त्यांच्याबद्दल प्रेम नव्हते. डाव्या लोकांना जातिगत शोषणापेक्षा वर्गीय शोषण महत्त्वाचे वाटे. त्यांच्या विश्लेषणातही डॉ. आंबेडकरांना फारसे स्थान नव्हते; परंतु 1980नंतर वेगवेगळ्या राज्यांत प्रादेशिक पक्ष अधिक प्रभावी होऊ लागले. त्यातच काशीराम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा ठेवून बहुजन वर्गाची चळवळ सुरू केली. त्यामुळे विविध दलित समाजांत जागृती सुरू झाली आणि दलित वर्ग हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील झाला. राजकीय यश मिळवायचे असेल तर या वर्गाला आकर्षित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सन्मानपूर्वक स्थान देणे आवश्यक व अपरिहार्य झाले. त्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दैवत्व अभिजन वर्गात प्रस्थापित झाले. यामागे सामाजिक दृष्टी कोनापेक्षा राजकीय हिशेब अधिक होता.

hindu_1  H x W:

 

मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका यापेक्षा वेगळी होती. आणीबाणीमध्ये संघामध्ये जे विचारमंथन झाले, त्यामध्ये हिंदू समाजात व्यापक संपर्क करायचा असेल व सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जायचे असेल, तर ज्या ज्या व्यक्तींनी हिंदू समाज एकरस करण्यासाठी प्रयत्न केले, त्या सर्वांनी दखल घेऊन ते महापुरुष आणि त्यांचे विचार याआधारे हिंदुत्वाची चळवळ समृद्ध आणि व्यापक करण्याची आवश्यकता आहे, अशा निष्कर्षाला संघ आला. या दृष्टीकोनातून समरसतेचा विचार मांडला गेला. त्यामागे ज्यांना एकेकाळी सनातनी लोकांकडून धर्मविरोधक मानले गेले, त्यांनाच धर्मसुधारक मानून त्यांचा सहभाग हिंदुत्वाच्या व्यापक विचारधारेत केला गेला. यामुळे हिंदुत्ववादी चळवळ अभिजनवादी न राहता ती बहुजनवादी बनत गेली. याचा परिणाम म्हणजे हिंदुत्ववादी चळवळीकडे ज्यांनी चातुर्वर्ण्याच्या आधाराने किंवा मनुस्मृतीच्या आधाराने टीका केली, ते सर्व टीकाकार संदर्भहीन बनत गेले. संघपरिवाराने समरसतेची जी चळवळ हाती घेतली, ती राजकीय हेतूने प्रेरित नसून त्यामागे मूलभूत विचाराचे अधिष्ठान असल्यामुळे झालेला हा गुणात्मक बदल आहे. त्यामुळे आज हिंदुत्वाची चळवळ दलितविरोधात आहे असा कितीही प्रचार झाला, तरी त्याचा परिणाम होत नाही.

 
 

बहुजनवादी हिंदुत्व

त्यामुळे आज आपल्या समाजातील बहुजन आणि अभिजनवादी संघर्षाचे नवे स्वरूप आपल्यासमोर येत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जी प्रबोधनाची चळवळ झाली, त्यामध्ये भारताच्या सनातन प्रेरणा आणि आधुनिक प्रेरणा यांचा समन्वय करण्याचे अनेक वैचारिक प्रवाह उत्पन्न झाले; परंतु ही प्रक्रिया स्वातंत्र्योतर काळात समाप्त झाली. विद्यापीठीय बौद्धिक क्षेत्रात स्वतःला डावे, सेक्युलर, पुरोगामी म्हणवणार्‍या मंडळींचा वरचश्मा वाढला. त्यांनी हिंदू समाज, परंपरा, चालीरिती यांच्याकडे चिकित्सकपणे न पाहता दोषयुक्त नजरेने पाहिल्यामुळे हिंदू संस्कृतीबद्दलचे नकारात्मक व न्यूनगंड बाळगणारे चित्र तयार झाले. हिंदू संस्कृतीबद्दल काहीही चांगले बोलणे म्हणजे प्रतिगामीपणा आणि अल्पसंख्याकांबद्दल चांगले बोलणे म्हणजे पुरोगामीपणा ही विचारप्रक्रिया विकसित झाली. भारतातील अनेक लेखकांना रामायणाने आणि महाभारताने वैचारिक सांस्कृतिक ऊर्जा पुरवली आहे. पण या महाभारताचे, रामायणाचे प्रसारण करणे हा हिंदू जातीयवाद मानला गेला. शासकीय दृष्टीकोन, न्यायालये, प्रसारमाध्यमे या सर्वांवर या विचाराचा प्रभाव पडला आणि त्यातून या संकल्पनेच्या आधारावर समाज नियंत्रित करू पाहणारा नवा अभिजन वर्ग तयार झाला.


 
hindu_1  H x W:

श्रीरामजन्मभूमीच्या लढ्यात प्रथम या अभिजन वर्गाच्या सत्तेला सर्वंकष आव्हान उभे केले गेले. या आव्हानाचा आवाका आणि त्यांचा होणारा परिणाम या वर्गाच्या लक्षात आलेला नाही. रोम जळत असताना निरोे ज्याप्रमाणे फिडल वाजवण्यात मग्न होता, त्याप्रमाणे हा अभिजन वर्ग आत्मकल्पनेत रममाण झाला होता. हळूहळू या लढ्याने सर्वंकष स्वरूप धारण केले आणि ती बहुजन समाजवादी हिंदुत्वाची चळवळ बनली. हिंदुत्वाच्या या बदललेल्या सामाजिक आशयाचे स्वरूपही अभिजन वर्गाच्या लक्षात आले नाही. मनुस्मृती, चातुर्वर्ण्य आधी जुन्या आरोपाची ते उजळणी करत राहिले. वास्तविक पाहता नव-तंत्रज्ञानाधिष्ठित युवकांपासून सर्व जाती-जमातीतील, सर्व वर्गांतील शहरी आणि ग्रामीण लोकांचा या चळवळीत सहभाग होता. या चळवळीचे मर्म समजलेले मोदी आणि शहा यांचे राजकीय नेतृत्व या चळवळीला मिळाल्यानंतर भारताच्या राजकारणात आणि समाजकारणात आश्चर्यकारक वाटणारे बदल घडू लागले. या बदलांना या दोघांचे नेतृत्व कारणीभूत झाले असले, तरी त्यांच्यामुळे हे बदल घडत नसून त्यामागे आधुनिक हिंदुत्व विचाराची गेल्या दोनशे वर्षांची परंपरा आहे, हेही या विरोधकांना उमजत नाही. भारतामध्ये ब्रिटिश येण्याआधी मुस्लीम सत्ता सात-आठशे वर्षे राहिली असली, तरी सेमीटिक धर्म आणि हिंदू धर्म यांच्यातील मूलभूत विसंवादामुळे हिंदू अभिजन वर्गाने मुस्लीम अभिजन वर्गाची नक्कल करण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. त्यांनी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व कायम राखले. परंतु ब्रिटिश राजवटीबरोबर जी मूल्ये आली, त्यात युरोपमधील प्रबोधन पर्वातील मानवतावादी व बुद्धिप्रामाण्यवादी मूल्यांचा समावेश होता. त्या वेळी हिंदू समाजातील अभिजन वर्ग धार्मिक कर्मकांडात मग्न होता. परंतु त्यातील अनेकांना पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील मानवतावादी व बुद्धिप्रामाण्यवादी मूल्यांनी आकर्षित केले आणि पाश्चात्त्य व हिंदू मूल्यांच्या अभिसरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि त्यातून हिंदू समाजात नवा अभिजन वर्ग निर्माण झाला. स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत या अभिजन वर्गावर हिंदू आणि पाश्चात्त्य या दोन्ही संस्कृतींचा समन्वयात्मक प्रभाव होता; परंतु स्वातंत्र्यानंतर जो नवा अभिजन वर्ग सुरू झाला, त्याने पुरोगामी सेक्युलॅरिझमच्या नावाखाली हिंदू संस्कृतीशी असलेले आपले जैविक नाते तोडून टाकले. त्यातून भारताच्या सांस्कृतिक पर्यावरणात कोणतीही पाळेमुळे नसलेला असा नवा अभिजन वर्ग झाला. हिंदुत्वाच्या बहुजनवादी चळवळीने या अभिजन वर्गाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या चळवळीवर वेगवेगळे आरोप करून तिची बदनामी करून तिला रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु ते मागेही यशस्वी झाले नाहीत आणि पुढेही होणार नाहीत.

 

संघर्ष की समन्वय?

या अभिजन वर्गाला जर हिंदू संस्कृतीची पार्श्वभूमी असती, तर ही चळवळ या वर्गाने वेगळ्या प्रकारे हाताळली असती. जेव्हा प्रथम ज्ञानेश्वरांनी गीतेचे सार ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीत सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या वेळच्या पंडिती अभिजन वर्गाने त्याला विरोध केला. धर्माचे पवित्र ज्ञान केवळ संस्कृतमध्येच असू शकते, अशी त्यांची भूमिका होती; परंतु ज्ञानेश्वरांनी नवी परंपरा निर्माण केली आणि अनेक जातीत संत निर्माण होण्यात त्याची परिणती झाली. हळूहळू हिंदू अभिजन वर्गाने या संतपरंपरेचा स्वीकार केला आणि ही परंपरा हिंदू समाजाचा एक भाग बनली. मराठी संतांना वेगळा धर्म स्थापन करावा लागला नाही. आजचा जो नव-अभिजनवादी वर्ग निर्माण झाला आहे, त्यांना केवळ संघर्ष माहीत आहे, समन्वय माहीत नाही आणि त्यामुळे हिंदुत्ववादी चळवळीतील अधिुनक मूल्यांचा स्वीकार करून स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे हा संघर्ष अटीतटीला येऊन आपल्या अस्तित्त्वाची लढाई लढत आहे.

 

बहुजन वर्ग अभिजन वर्ग बनण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू असते आणि ती होत असताना अभिजन वर्गाची मूल्ये बहुजन वर्ग आत्मसात करत असतो. प्रारंभीच्या काळात या दोन्ही मूल्यांची सरभेसळ असते. काँग्रेसीकरणापासून इतर धर्मांचा विद्वेष करणार्‍या सेमीटिक धर्माच्या प्रभावापर्यंत हिंदुत्ववादी चळवळीच्या एका गटावर याचा प्रभाव पडलेला स्पष्टपणे दिसतो; परंतु प्रथम विष येणे व नंतर अमृत येणे ही समुद्रमंथनाच्या प्रक्रियेमध्ये घडणारी स्वाभाविक गोष्ट आहे. या कथेप्रमाणे अशा मंथनातून प्रथम बाहेर आलेले विष शंकर बनून कोणाला तरी पचवावे लागते, त्यानंतर अमृताचा कुंभ बाहेर येतो. आज ज्यावर हिंदुत्ववादी चळवळीवर दोष म्हणून टीका होेते, त्यातील बहुसंख्य दोष हे अभिजन वर्गातून हिंदुत्ववादी चळवळीत उतरले आहेत. काळाच्या ओघात हे दूर होऊन एका विशुद्ध स्वरूपातील हिंदुत्ववादी चळवळ आपल्या देशाचे व समाजाचे चित्र आमूलाग्र बदलून टाकेल, अशी अपेक्षा ठेवण्याइतकी गुणवत्ता या चळवळीत नक्कीच आहे, हे पूर्वग्रह न ठेवता पाहणारे अभ्यासक आहेत हे त्यांच्या लक्षात येईल.