मराठी चित्रपटसृष्टीसाठी ‘न्यू नॉर्मल’ आव्हानात्मक

विवेक मराठी    21-Nov-2020
Total Views |

@विनोद सातव

कोरोनोत्तर काळात मराठी चित्रपटसृष्टीसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. काळ हा सर्वात मोठा गुरू असतो असे म्हणतात, त्याप्रमाणे आपल्याला काही गोष्टी काळाच्या ओघाने स्वीकाराव्या लागणार आहेत असे दिसते. चित्रपटसृष्टी पूर्णपणे कधी सुरू होणार याविषयी आता फक्त अंदाजच वर्तविले जाऊ शकतात, कुणीही सांगू शकणार नाही. कारण मुंबई, पुणे मराठी मनोरंजन क्षेत्राचे प्रमुख केंद्र असल्याने ही शहरे पूर्वपदावर येत नाहीत, तोपर्यंत मनोरंजन क्षेत्राची घडी विस्कटलेली राहणार हे स्पष्ट आहे.


movie_3  H x W:

 मागील आठ ते दहा महिन्यांपासून कोरोना विषाणूने जगभर धुमाकूळ घातलेला आहे. भारतामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाउन लागू झाले. त्यानंतर मे महिन्यापासून अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली, तरी अद्याप या न्यू नॉर्मलमध्ये सर्व व्यवहार संपूर्णपणे पूर्वपदावर आलेले नाहीत. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रात मराठी मनोरंजनविश्वाचा वरचा क्रमांक लागतो. भारतात चित्रपट, मालिका, वेब सीरिज अशी मनोरंजन क्षेत्राची 50 हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होते. हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा भार हे क्षेत्र वाहत आहे. या व्यवसायातून केंद्र आणि राज्य सरकारलाही कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. मार्च महिन्यापासून आजपर्यंतचा विचार केला, तर देशातील प्रादेशिक चित्रपट, बॉलीवूड, नाटक, मालिका यांना आणि यावर अवलंबून असलेल्या सर्व घटकांना अंदाजे पाच ते सात हजार कोटी रुपयांचा फटका बसला असून मराठी चित्रपटांचे सुमारे 500 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. भविष्याचा विचार करता येणार्‍या काळात मराठी चित्रपटसृष्टीची विभागणी कोरोनापूर्व आणि कोरोनोत्तरकिंवा न्यू नॉर्मलअशा प्रकारात झालेली दिसेल. हा न्यू नॉर्मलकाळ मराठी चित्रपटांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.


कोरोनापूर्व काळाचा - म्हणजेच मार्च 2020पर्यंतचा विचार केला, तर असे लक्षात येते की दर शुक्रवारी किमान दोन-तीन ते पाच-सहा मराठी चित्रपट प्रदर्शित होत असत. एकेकाळी मराठीत वर्षाकाठी 25 ते 40 चित्रपट निर्मित आणि प्रदर्शित व्हायचे, ती संख्या अलीकडे 120च्या आसपास पोहोचली होती. यामुळे अनेक चित्रपटांना एकाच वेळी आलेल्या सिनेमांच्या गर्दीचा फटका बसायचा. चांगले चित्रपटही या गर्दीला बळी पडले आहेत. चांगले चित्रपटगृह आणि चांगले शो मिळविण्यासाठी निर्माते धडपडत असत. येणार्‍या काळात हे चित्र बदललेले असेल, कारण मार्च महिन्यापर्यंत ज्या चित्रपटांची कामे सुरू होती, एप्रिल-मे महिन्यात प्रदर्शनाच्या तारखा निश्चित होत्या, तेच चित्रपट, चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये महेश मांजरेकर आणि झी स्टुडिओजचा ‘पांघरूण’, वायकॉम 18चा ‘वसंतराव देशपांडे’, अभिनेत्री सायली संजीवचा ‘बस्ता’, सागर वंजारी दिग्दर्शित ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटालॉजी’, ‘झॉलिवूड’ आदी चित्रपटांचा समावेश आहे; तर लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘जंगजौहर’, अभिनेता अंकुश चौधरीचा ‘दगडी चाळ 2’, सिद्धार्थ जाधवचा ‘दे धक्का 2’, ललित प्रभाकर, सई ताम्हणकर, पर्ण पेठे यांचा ‘मीडियम स्पाईसी’ आदी चित्रपटांचे चित्रीकरण आणि पोस्ट प्रॉडक्शनची कामे थोडीफार राहिली आहेत. असे मोजके चित्रपट पुढील सहा महिने ते वर्षभरात प्रदर्शित होणार आहेत. परिणामी, या चित्रपटांना उत्तम व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे.


movie_1  H x W:
हिंदी चित्रपटांचा विचार केला, तर अमिताभ बच्चन, आयुष्मान खुराना यांचा ‘गुलाबो-सिताबो’, अक्षयकुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’, विद्या बालनचा ‘शकुंतलादेवी’, संजय दत्त-आलिया भट्ट-आदित्य रॉय कपूर यांचा ‘सडक 2’, जान्हवी कपूरचा ‘द कारगिल गर्ल - गुंजन सक्सेना’, अजय देवगणचा ‘भुज’ आदी बड्या चित्रपटांनी ओटीटीचा पर्याय स्वीकारला आहे. दुसरीकडे वरुण धवनचा ‘कुली नं. 1’, अक्षयकुमारचा रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’, अजय देवगणचा ‘मैदान’, रणवीर सिंहचा बहुचर्चित ‘83’ असे बडे चित्रपट हे चित्रपटगृह सुरू होण्याची वाट बघत आहेत. हिंदीतील मोठे चित्रपट प्रदर्शित होणे हे मराठी चित्रपटांसाठी आव्हान असले, तरी मराठी चित्रपटांची संख्या कमी असेल, ही बाब जमेची बाजू ठरणार आहे.
  
सर्वच उद्योगांवर, व्यवसायांवर कोरोनाचा नकारात्मक परिणाम झालेला आहे. चित्रपटांची संख्या आणि बजेट दोन्हीवर इंडस्ट्री म्हणून कोरोनाचा शॉर्ट टर्म परिणाम होईल. मराठी मनोरंजन क्षेत्रात - काही नियम व अटींसह - टीव्ही मालिकांना, चित्रपटांना चित्रीकरणाची परवानगी मिळाली आहे, ही बाब कलाकार, तंत्रज्ञ यांना काही प्रमाणात दिलासा देणारी असली, तरी चित्रपटांचे आउटडोअर शूटिंग अद्याप अपेक्षित प्रमाणात सुरू झालेले नाही. कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर याचा आर्थिक परिणाम होत आहे. आज प्रदर्शनासाठी सज्ज असलेले चित्रपट वगळता मराठीत नवीन चित्रपट नजीकच्या काळात येण्याची शक्यता कमी आहे, यामुळे 2021मध्ये प्रदर्शित होणार्‍या मराठी चित्रपटांची संख्या 2019च्या तुलनेत घटणार आहे.
 
  कोरोनामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता प्रेक्षक पैसे खर्च करताना अनेक बाबी तपासून पाहणार आहेत. सामान्य प्रेक्षकांच्या खर्चाच्या यादीमध्ये मनोरंजन हा घटक पूर्वीपेक्षा खालच्या - कदाचित शेवटच्या क्रमांकावर जाणार आहे. तसेच त्याच्याकडे टीव्ही, ओटीटी असे मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध आहेत, अशा वेळी मराठी चित्रपटांचा प्रेक्षक टिकवायचा आणि वाढवायचा असेल, तर निर्मात्यासह सर्वच घटकांची जबाबदारी अधिक वाढणार आहे. आजघडीला निर्मात्यांना चित्रपटनिर्मितीचा खर्च कमी करून प्रेक्षकांना आपल्या चित्रपटाकडे खेचायचे असेल, तर चित्रपटाच्या कथानकासह इतर बाबींवर अधिक लक्ष द्यावे लागेल. चित्रपटाच्या यशामध्ये कथेचा आशय, पात्रांची संख्या, संगीत, तांत्रिक बाजू अशा विविध घटकांचा सहभाग असतो. यामुळे निर्मिती खर्च कमी करण्यापेक्षा कमी खर्चात निर्माण होतील असे विषय निवडणे गरजेचे ठरणार आहे. तसेच चित्रपटांची योग्य पूर्वप्रसिद्धी करणे ही पूर्वीपेक्षाही जास्त महत्त्वाची बाब ठरणार आहे. एकीकडे बजेट कपात आणि दुसरीकडे साशंक प्रेक्षक ह्यामुळे, ब्रँड किंवा बॅनर-व्हॅल्यू महत्त्वाची ठरेल. त्यामुळे चित्रपटाचा विषय आणि दर्जा यांवर आणखी जास्त जाणीवपूर्वक काम केले जाईल, ज्याचा प्रेक्षकांना फायदा होईल.

movie_2  H x W:
मराठी चित्रपट, मनोरंजन क्षेत्रात आरोग्य आणि सुरक्षाविषयक फारशी जागरूकता नव्हती, ती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढली आहे, हे सध्या सुरू असलेल्या टीव्ही मालिकांच्या शूटिंगदरम्यानची व्यवस्था बघता लक्षात येते. आता चित्रपटांच्या सेटवरसुद्धा आरोग्य सुविधा, स्वच्छता या गोष्टी अधिक कटाक्षाने पाळाव्या लागणार आहेत. चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेटवर मोठा लवाजमा असतो. यामुळे त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी कदाचित विविध विभागाच्या लोकांना वेगवेगळ्या वेळेला सेटवर बोलवावे लागेल, जेवणाच्या वेळा वेगवेगळ्या ठरवाव्या लागतील. संपूर्ण सेट वेळोवेळी स्वच्छ करणे आवश्यक आहे; यामुळे कदाचित शूटिंगचे काही दिवस वाढू शकतात, कारण पूर्वी जर 10 तास शूटिंग होत असेल, तर आता ते 8 तासांवर आलेले असेल. सेटवर नियमांचे पालन करणे अत्यावश्यक ठरणार आहे. या सर्व गोष्टींचा एकंदरीत विचार केला, तर कमी बजेटच्या चित्रपटांचे शूटिंग करणे कमालीचे जिकिरीचे ठरणार आहे. परिणामी, सर्वच विभागांतील प्रमुख कलाकार, तंत्रज्ञ यांना आपल्या मानधनात 20 ते 30 टक्के कपात करावी लागू शकते, असे मत चित्रपट उद्योगातील जाणकार व्यक्त करत आहेत.
 
 
चित्रपट आणि प्रेक्षक यांना जोडण्याचे काम ‘पीआर’ आणि मार्केटिंग टीम करत असते. जानेवारी ते मार्च 2020 या तीन महिन्यांत 27 मराठी चित्रपट प्रदर्शित झाले होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ‘समर ब्लॉकबस्टर’मध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे प्रसिद्धी, प्रमोशन, जाहिरात क्षेत्रातली साधारण 100 कोटी रुपयांची उलाढाल थांबली आहे. याचा ‘पीआर’, मार्केटिंग, जाहिरात कंपन्यांवर परिणाम झाला आहे.
  
मराठी चित्रपटनिर्मिती आणि निर्माते यांचा विचार केला, तर 80 टक्क्यांहून अधिक निर्माते एकदा चित्रपटनिर्मिती केल्यानंतर पुन्हा निर्मितीकडे वळत नाहीत. यामुळे जे निर्माते सातत्याने निर्मिती करीत आहेत, त्यांना जपायला हवे, तसेच येणार्‍या काळात कॉर्पोरेट निर्मात्यांवरील जबाबदारी अधिक वाढली आहे. तर दुसरीकडे लॉकडाउनमुळे टीव्हीचे अर्थकारण मोठ्या प्रमाणावर बदलले आहे. याचा परिणाम चित्रपटनिर्मितीवर आणि खरेदीवर - म्हणजेच निर्मात्यांना सॅटेलाइट हक्कापोटी मिळणार्‍या किमतीवर होण्याची शक्यता आहे.
  
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील सात महिन्यांपासून चित्रपटगृहे बंद आहेत. मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर चित्रपटाला अधिकाधिक शोज आणि प्राइम टाइम मिळणे अतिशय महत्त्वाचे आहे. आजपर्यंत अनेक चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये प्राइम टाइम किंवा शोज मिळाले नाहीत म्हणून निर्मात्यांना आंदोलन करावे लागले. अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. यामध्ये आता आणखी मोठ्या संकटाची भर पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत, ते संकट म्हणजे राज्यातील 10 ते 15 टक्के एकपडदा चित्रपटगृहांच्या अस्तित्त्वाचा निर्माण झालेला प्रश्न. मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांच्या आगमनापासून एकपडदा चित्रपटगृहे संकटांचा सामना करत आहेत, त्यामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे भर पडली होती. आता कोरोना त्यांच्या अस्तित्त्वाची कसोटी पाहणारा ठरला आहे. केंद्र सरकारने चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी राज्याने अद्याप दिलेली नाही. यामुळे आगामी काळात एकपडदा चित्रटगृहांची संख्या घटली, तर मराठी चित्रपटसृष्टीला एका नव्या संकटाचा सामना करावा लागणार हे निश्चित. परिणामी चित्रपट निर्मात्यांनी ओटीटी माध्यमाकडे वळण्यापूर्वी दीर्घकाळाचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. चित्रपटगृह चालक, त्यांचे कामगार जगले पाहिजेत आणि प्रेक्षकांनी चित्रपटगृहामध्ये आले पाहिजे, याचे भान निर्मात्यांना ठेवावे लागणार आहे.
  
कोरोनोत्तर काळात मराठी चित्रपटसृष्टीसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. काळ हा सर्वात मोठा गुरू असतो असे म्हणतात, त्याप्रमाणे आपल्याला काही गोष्टी काळाच्या ओघाने स्वीकाराव्या लागणार आहेत असे दिसते. चित्रपटसृष्टी पूर्णपणे कधी सुरू होणार याविषयी आता फक्त अंदाजच वर्तविले जाऊ शकतात, कुणीही ठामपणे सांगू शकणार नाही. कारण मुंबई, पुणे मराठी मनोरंजन क्षेत्राचे प्रमुख केंद्र असल्याने ही शहरे पूर्वपदावर येत नाहीत, तोपर्यंत मनोरंजन क्षेत्राची घडी विस्कटलेली राहणार हे स्पष्ट आहे. कोरोनोत्तर काळात अनेक बदल झालेले दिसतील. त्यातील महत्त्वाच्या गोष्टी - सध्या वाढलेली मराठी चित्रपटांची संख्या कमी होईल, वन टाइम प्रोड्यूसर कमी होतील, चित्रपटाकडे व्यवसाय या नजरेने बघणारेच निर्माते टिकतील. मर्यादित प्रॉडक्शन कॉस्ट, सेटवरील शिस्त, स्वच्छता याबरोबरच संख्येने कमी पण उत्तम कलाकृती मराठीत निर्माण होतील... इत्यादी सकारात्मक बाबी घडतील.
  
ऐन दिवाळीत बॉक्स ऑफिसवर अंधार बघायला मिळणार आहे. दिवाळी आणि बिग बजेट हिंदी चित्रपट असे समीकरण मागील अनेक वर्षांपासून ठरलेले आहे. मात्र, नोव्हेंबर 2018 हा दिवाळीचा महिना बॉलीवूडला टक्कर देणारा मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सुवर्णपान ठरला. या महिन्यात सुबोध भावेंचा ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, नागराज मंजुळे यांचा ‘नाळ’ आणि प्रवीण विठ्ठल तरडे लिखित-दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटांनी मराठी चित्रपटाच्या यशाची हॅट्ट्रिक साजरी केली. 2019मध्ये ऑक्टोबर महिन्यात दिवाळी होती, मात्र नेमक्या त्याच काळात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने त्याचा परिणाम मराठी चित्रपटांच्या यशावर झाला. प्रसाद ओक दिग्दर्शित ऐतिहासिक ‘हिरकणी’ सुपरहिट ठरला, तर अंकुश चौधरीच्या ‘ट्रिपल सीट’ला सरासरी यश मिळाले. यंदाच्या दिवाळीत मराठी चित्रपट बॉलीवूडला मागे टाकत सलग तीन वर्षे यशाचा दीपोत्सव साजरा करेल, असे अपेक्षित होते, परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऐन दिवाळीत बॉक्स ऑफिसवर अंधार असणार आहे.
 
(लेखक मराठी चित्रपट पीआऱ, मार्केटिंग सल्लागार आणि प्रेझेंटर आहेत.)