नरसिंहाय नमो नम:

विवेक मराठी    21-Nov-2020
Total Views |
@सारंग दर्शने
 
 
‘परंपरा आणि नवता’ यांचा संगम असणारा, कुशाग्र बुद्धिमत्तेला कोणताही अविषय नसणारा, आपल्या केवळ राजकीय चातुर्याने भल्याभल्या राजकीय पैलवानांना चारी मुंड्या चीत करणारा, भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान व भारताचे भाषावैभव यांच्यावर निस्सीम प्रेम करणारा, ऐहिक ऐश्वर्याचा मोह नसणारा, कोणत्याही समस्येचे समग्र चित्र काही मिनिटांत आकलन करून घेणारा.. असा हा नेता होता. त्यांची जन्मशताब्दी खरे तर देशभर विविध उपक्रमांनी, शास्त्रचर्चांनी, भविष्यवेधी व्याख्यानमालांनी, साहित्य संमेलनांनी साजरी व्हायला हवी आहे. केंद्र सरकारनेही तेलंगणप्रमाणे पी.व्ही. नरसिंहराव जन्मशताब्दी समिती स्थापन करून साऱ्या देशभरात वैचारिक व बौद्धिक उपक्रम करायला हवेत. 

 
पी.व्ही. नरसिंहराव हे भारताचे अपघाती पंतप्रधान होते. ते जसे अपघाताने पंतप्रधान झाले, तसेच त्यांच्या पाच वर्षांच्या काळात अनेक अपघात, घातपात आणि उत्पातही झाले. इतिहासाला वळण देणाऱ्या अनेक घटना घडल्या. मात्र इतिहासात नरसिंहराव यांच्या नावाची नोंद सुवर्णाक्षरांनी करावी लागेल ती त्यांनी भारताच्या आर्थिक समस्यांवर वाट काढताना जे अलौकिक धैर्य, नेतृत्वगुण आणि द्रष्टेपण दाखविले, त्याबद्दल. आज नरसिंहराव यांचा सारा वारसा काँग्रेस पक्षाने विसरून, मिटवून आणि इतिहासाच्या अंधाऱ्या कालकुपीत गाडून टाकायचे ठरविलेले दिसते. त्यामुळेच सध्या पी.व्ही. नरसिंहराव यांचे जन्मशताब्दी वर्ष चालू असले, तरी काँग्रेसने त्याची कोणतीही गंभीर दखल घेतलेली नाही. नरसिंहराव हे खऱ्या अर्थाने ‘भारतरत्न’ होते. पण दहा वर्षे कारभार केलेल्या डॉ. मनमोहनसिंग सरकारने या किताबाने त्यांची दखल घेतली नाही. आता निदान सध्याच्या सरकारने तरी ‘तेलुगू बिड्डा’ म्हणजे तेलंगणभूमीचा सुपुत्र असणाऱ्या नरसिंहराव यांना हा किताब मरणोत्तर द्यायला हवा. जन्मशताब्दी वर्षांत त्यांचा तोच खरा गौरव होईल.
pm_1  H x W: 0  
नरसिंहराव हे काही देशाच्या अनेक पंतप्रधानांपैकी एक असे ‘ऑल्सो रॅन’ पंतप्रधान नव्हते. खरे तर राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली १९९१मध्ये काँग्रेसने जी लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक लढविली, तीत नरसिंहराव हे लोकसभेचे उमेदवारही नव्हते. एका अर्थाने ती त्यांची सक्रिय राजकारणातली निवृत्तीच होती. त्यांनी राजधानीतल्या घराची आवराआवरही केली होती. आता पुढचा काळ मुंबईत किंवा हैदराबादमध्ये राहून वाचनव्यासंगात घालवावा, काही लिहावे, शिकायचे राहिलेय ते शिकावे, असे त्यांच्या मनात घोळत होते. तब्येतही आताशा तितकी साथ देत नव्हती. पत्नीचे फार आधीच निधन झाले होते. जवळच्या मित्रमैत्रिणींपैकी कुणी जोडीदार आता उरले नव्हते. मुले मोठी झाली होती. स्थिरावली होती. या मुलांपैकीही काहींशी रावांचे बिलकुलच पटत नव्हते. अशा वेळी एकाकीपणाचे रूपांतर निरामय एकान्तात व्हायचे असेल, तर जन्मभर जोपासलेल्या वाचनाच्या छंदाला दुसरा पर्याय नाही, हे रावांना चांगलेच माहीत होते. त्यामुळेच, दिल्लीतल्या घरातल्या असंख्य पुस्तकांची खोकी ते स्वत:च्या निगराणीखाली भरून घेत होते. त्याही वेळेला, भरता भरता अनेक ग्रंथ बाजूला काढून ठेवत होते - मुक्काम हलविण्याआधी किंवा त्याच रात्री नजरेखालून घालण्यासाठी. बाहेर प्रचाराची रणधुमाळी चालू होती. रावांना प्रचारसभांसाठी फारशी निमंत्रणेही नव्हती, तरीही ते आग्रहाने काही मतदारसंघांमध्ये गेले. सभा घेतल्या. तसे म्हटले तर काँग्रेसच्या जाहीरनाम्याची रचना, लेखन रावांच्या मार्गदर्शनाखाली झाले होते. विश्वनाथ प्रतापसिंह आणि चंद्रशेखर यांच्या अस्थिर सरकारांनंतर काँग्रेसचे पुनरागमन होण्याची दाट शक्यता होती. अशा वेळी प्रत्यक्षात आणता येतील अशीच आणि तरीही मतदारांना आकर्षून घेतील अशी जबाबदार आश्वासने देण्याची गरज होती. ते काम रावांनी अतिशय सुबकपणे केले होते. या जाहीरनाम्यात तरीही क्रांतिकारक असे काहीच नव्हते. ती क्रांती रावांनी नंतर प्रत्यक्षच करून दाखविली.

दि. २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूत श्रीपेरुम्बुदूर येथील जाहीर सभेत तामिळी वाघांनी धानू या महिलेला मानवी बाँब बनवून राजीव गांधी यांची भीषण हत्या केली, त्याच क्षणी निवृत्तीची वाट चालणाऱ्या पी.व्ही. नरसिंहराव यांचा राजकीय पुनर्जन्म झाला. नरसिंहराव हे त्या वेळी निवडणुकीच्या प्रचारासाठी नागुपरात आले होते. नेहमीप्रमाणे त्यांचे जुने मित्र आणि ज्येष्ठ नेते एन.के.पी. साळवे यांच्या घरी ते उतरले होते. रात्री उशिरा ही हल्ल्याची बातमी आली आणि राव सुन्न झाले. त्यांना जबर मानसिक धक्का बसला. रक्तदाब कमालीचा वाढला. हृदयाची धडधड आटोक्याच्या बाहेर जाऊ लागली. नेहमीची, त्यांच्याजवळ असणारी औषधे घेऊनही बरे वाटेना. शेवटी नागपुरातील डॉक्टरांना पाचारण करावे लागले. त्यांनी रावांना झोप लागावी, यासाठी औषधे दिली. ऐन उमेदीतील नेत्याची हत्या व्हावी आणि आपला अख्खा जन्म गेलेला पक्ष असा अचानक पोरका व्हावा, हा धक्का रावांना सहन होणारा नव्हताच. औषध घेऊन राव निजले. मात्र, सकाळी ते झोपेतून उठले, तेव्हाचे नरसिंहराव अगदी वेगळे होते. त्यांनी तो शोकाचा अनिवार लोंढा मनातल्या मनात जिरवून टाकला होता. ते पक्षाच्या आणि देशाच्या भविष्याचा विचार करू लागले होते. सकाळी उठताक्षणी त्यांनी तातडीने राजधानीत परतण्याचा निर्णय घेतला. राव दिल्लीत पोहोचले. कदाचित राजधानीत पोहोचताना प्रवासातच पक्षात निर्माण होणाऱ्या नेतृत्वाच्या पोकळीचा आणि ती भरून काढण्याची जबाबदारी आपली असल्याचा विचार त्यांच्या मनात घोळू लागला असावा. अलौकिक नेत्यांना वर्तमान घडत असतानाच एक डोळा भविष्यावर रोखावा लागतो. ‘उद्या वरून आभाळ जरी कोसळले, तरी मी त्याच्यावर पाय रोवून उभा राहीन’ असे लोकमान्य टिळक म्हणाले होते. कमी-अधिक प्रमाणात सगळ्या मोठ्या नेत्यांची मानसिकता अशीच असावी लागते. नरसिंहराव यांनी राजधानीत पोहोचताक्षणी परिस्थितीचा ताळा मांडला. अजून निवडणूक पुरी व्हायची होती. निकाल कसे येणार ते माहीत नव्हते. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात सहानुभूतीची प्रचंड लाट निर्माण झाली होती. त्यानंतर सातच वर्षांमध्ये भारतीय समूहमनाला हा दुसरा धक्का पचवावा लागत होता. तो उरलेल्या टप्प्यांमध्ये मतपेटीत कसा उतरेल, हे सांगता येत नव्हते. निवडणूक बाकी असणाऱ्या जागांमध्ये दक्षिणेतील बऱ्याच जागा होत्या. तामिळनाडू तर पूर्णच बाकी होते. पुढच्या राजकीय डावपेचांच्या दृष्टीने ही परिस्थिती महत्त्वाची होती.
 
pm_2  H x W: 0
 
निकाल लागल्यानंतर नरसिंहराव हे या नेतृत्वाच्या शर्यतीत कसे जिंकले आणि त्यांनी ‘मराठा स्ट्राँगमन’ शरद पवार यांना कसे मागे टाकले, यापेक्षाही पंतप्रधान होताक्षणी ते देशापुढच्या आर्थिक आव्हानांना कसे भिडले, हा अधिक रोमांचकारक आणि सुवर्णाक्षरांमध्ये लिहून ठेवावा असा अध्याय आहे. नरसिंहराव यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, तेव्हा तिजोरीत खडखडाट होता. आधीच्या अल्पमतातील चंद्रशेखर सरकारने आधीच सोने गहाण टाकण्याचा अतिशय अवघड पण आवश्यक निर्णय घेतला होता. रावांनी २१ जून १९९१ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, तेव्हा राजीव यांच्या हत्येला बरोबर महिना झाला होता. केवळ काँग्रेस पक्षच नाही, तर अल्पमतातील सरकार आणि देशाची आर्थिक स्थिती यांचे भवितव्य काय आहे, याची काहीही कल्पना नव्हती. रावांनी पहिला आणि सगळ्यांत महत्त्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे राजकीय नेत्याला अर्थमंत्री न करण्याचा. मग त्यांनी पहिला फोन केला रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. आय.जी. पटेल यांना. रावांनी त्यांना सरळच ‘अर्थमंत्रिपदाची जबाबदारी घेता का?’ अशी विचारणा केली. पण पटेल यांना निवृत्तीचा काळ शांतपणे घालवायचा होता. त्यांनी डॉ. मनमोहनसिंग यांचे नाव सुचविले. डॉ. सिंग तेव्हा विद्यापीठ अनुदान आयोगाचे नेतृत्व करीत होते. त्यांना निरोप पाठविण्याच्या आधी रावांनी अर्थव्यवस्थेवरील सविस्तर टिप्पणी मागविली. हे सगळे निरोपाचे, समन्वयाचे काम डॉ. पी.सी. अलेक्झांडर करीत होते. ही टिपणी वाचून नरसिंहराव थिजून गेले. देश नादारीच्या उंबरठ्यावर उभा होता. अर्थकारण हा काही रावांचा विषय नव्हता. त्यात त्यांना फारशी गती किंवा रुचीही नव्हती. पण ही सविस्तर आणि अत्यंत गोपनीय टिप्पणी रावांनी दुसऱ्यांदा वाचली. त्यातला काही भाग तिसऱ्यांदा वाचला. त्यांच्या लक्षात आले की, हा ऐतिहासिक संकटाचा क्षण आहे आणि त्यावरची उत्तरेही तितकीच कठोर असावी लागतील. मंत्रीमंडळाची रचना करताना दिग्गजांना नाराज करता येत नव्हते, तसेच प्रादेशिक सत्तासमतोलही सांभाळावा लागणार होता. मात्र रावांनी अर्थखात्याबाबत या सगळ्या राजकारणाचा विचार बाजूला ठेवला.

या साऱ्या प्रक्रियेत रावांचा एक गुण दिसतो, तो म्हणजे तत्त्वज्ञानाचे ओझे फेकून देण्याची असामान्य क्षमता. खरे तर नरसिंहराव हे इतर नेत्यांप्रमाणेच नेहरूयुगाचे अपत्य होते. लोककल्याणकारक राज्याची भूमिका मांडणारा आणि डावीकडे झुकलेला अर्थविचार हेच काँग्रेसचे बलस्थान होते. काँग्रेसचे सगळे जाहीरनामे हीच डावी अर्थभूमिका मांडत होते. जगामध्ये भांडवलशाही नसणाऱ्या राष्ट्रांमध्ये नवा अर्थविचार मांडण्याची व स्वीकारण्याची सुरुवात १९७७-७८मध्येच झाली होती, याची इंदिरा गांधी व राजीव गांधी यांना कल्पना होती. पण दोघांनाही आर्थिक सुधारणा करण्याची हिंमत झाली नाही. ती हिंमत रावांनी कदाचित इलाज नसल्यानेही असू शकेल, पण दाखविली. नुसती दाखविली इतकेच नाही, तर पुढची पाच वर्षे ते डॉ. सिंग यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. या पाच वर्षांत एका नव्या आर्थिक विकासोन्मुख भारताची पायाभरणी झाली. ती इतकी पक्की होती की पुढे अटलजी, डॉ. सिंग आणि नरेंद्र मोदी यांना कमी-अधिक प्रमाणात त्याच वाटेवरून पुढे मार्गक्रमणा करावी लागली आहे. ही नरसिंहराव यांच्या द्रष्टेपणाची खूण आहे. पुढे राष्ट्रपती झालेले प्रणव मुखर्जी किंवा अर्जुनसिंग हे स्वपक्षीय नेते, समाजवादी अर्थरचनेची पोपटपंची करणारे डावे किंवा इतर पक्ष तसेच नोकरशाहीमधील मोठ्या प्रमाणात जुन्या समाजवादी काँग्रेस रचनेशी निष्ठा असणारे अधिकारी या व इतरही अनेकांचा खुला किंवा छुपा विरोध पत्करून रावांनी आर्थिक उदारीकरणाची वाटचाल नेटाने चालू ठेवली.


pm_3  H x W: 0
त्यांच्या आर्थिक धोरणांविषयी आणखीही सांगता येईल, मात्र रावांच्या इतरही निर्णयांकडे लक्ष द्यायला हवे. काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर १९९६मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी सरकार स्थापन केले होते आणि ते सरकार केवळ १४ दिवसच चालले. भाजपाला इतर मित्रपक्षांचा पाठिंबा मिळवता आला नाही. मात्र हे सरकार स्थापन होताना अटलजींनी जेव्हा शपथ घेतली, तेव्हा शपथविधी समारंभातच नरसिंहराव यांनी अटलजींना क्षणभर बाजूला घेऊन "तयारी पुरी झालेली आहे. आता ते काम करून टाका." असे सांगितले होते. याचा अर्थ काय, ते इतर कुणालाही कळणे शक्यच नव्हते. पण या दोन्ही दिग्गज नेत्यांना या संवादाचे नेमके मोल माहीत होते. राव अटलजींना ‘अणुचाचणी’विषयी सांगत होते. पुढे अटलजींचे सरकार गेले. त्यानंतर एच.डी. देवेगौडा व इंदरकुमार गुजराल यांचीही सरकारे बनली व गेली. त्यानंतर १९९८मध्ये अटलजींनी दुसऱ्यांदा शपथ घेतली आणि या वेळी मात्र रावांचा सांगावा अगदी वेगाने खरा करून दाखविला. अटलजींचे मोठेपण असे की, या अणुचाचणीची तयारी रावांच्याच काळात पुरी झाल्याचे त्यांनी अनेकदा मोकळेपणाने सांगितले होते. नरसिंहराव यांनी एका बाजूला आर्थिक उदारीकरणाची अवघड वाट चालत असताना अमेरिकेचा किंवा इतर पाश्चात्त्य देशांचा रोष होऊ शकतो, याची तमा न बाळगता वैज्ञानिकांना अणुचाचणीची तयारी करण्यासाठी अनुमती दिली होती. दुर्दैवाने, राव पंतप्रधान असताना, भारत अणुचाचणी करण्याच्या उंबरठ्यावर असल्याची दोन वेळा खबर सीआयएला लागली आणि दोन्ही वेळा अमेरिकेने प्रचंड दबाव आणून ही अणुचाचणी रद्द करायला लावली होती. मात्र राव यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढत असताना अण्वस्त्रसज्ज होण्याची तयारीही चालविली होती, हे विसरून चालणार नाही.
 
राव हे सच्चे इंदिरावादी किंवा इंदिरानिष्ठ होते. त्यांची राजकीय कारकिर्द खऱ्या अर्थाने इंदिरा गांधी यांच्याच काळात बहरली. मात्र राव यांच्या मनात कुठेतरी काँग्रेस पक्ष हा घराणेशाहीने चालावा का, असा प्रश्न असणार. इंदिरा गांधी यांच्यानंतर राजीव यांनाही त्यांनी कधी विरोध केला नाही. उलट राजीव यांनी आपल्या टेक्नोसॅव्ही मित्रांचे कोंडाळे जमवून आमच्या जुन्या काँग्रेस नेत्यांना यातले काही कळणार नाही, असा अपमानास्पद शेरा मारला, तेव्हा रावांनी मनोमन ते आव्हान स्वीकारले. आपल्या अमेरिकेतील मुलाकडून अद्ययावत संगणक मागविला आणि संगणकविद्येत इतकी प्रचंड भरारी मारली की, राजीव गांधी यांच्या कोंडाळ्यातील एखाददुसरा अपवाद वगळता रावांइतके कॉम्प्युटरचे ज्ञान इतर कुणालाही नव्हते. रावांनी पुढे आपली सगळी पुस्तके संगणकावर लिहिली, ही तर त्यांच्यासाठी छोटीच गोष्ट होती. मात्र एखादा संगणकतज्ज्ञ किंवा अभियंता ज्याप्रमाणे संगणकाच्या विविध भाषा आत्मसात करतो, तशा संगणकीय भाषा शिकून त्यात प्रभुत्व मिळवेपर्यंत रावांची प्रगती झाली होती. राजीव यांच्यानंतर जेव्हा सोनिया गांधी यांचे नेतृत्व मान्य करण्याची वेळ येते की काय असे १९९१मध्ये वाटू लागले, तेव्हा मात्र रावांनी या घराणेशाहीला कट्टर विरोध केला. राजीव यांच्या हत्येनंतर सोनिया यांनाच पक्षाध्यक्ष करावे अशी सूचना जेव्हा ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत मांडली गेली, तेव्हा राव अचानक संतापले आणि त्यांनी एकाच वाक्याचा पण तिखट शेरा मारला. राव म्हणाले, "काँग्रेस पक्ष म्हणजे काय नेहरू-गांधी घराण्याच्या इंजीनाला जोडलेली मालगाडी आहे का?" एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने आपल्या आत्मचरित्रात हा प्रसंग नमूद केला आहे. राव यांनी आपल्या पाच वर्षांच्या काळात जरी पंतप्रधानपद व काँग्रेसचे अध्यक्षपद स्वत:कडेच ठेवले असले, तरी पक्षाच्या संघटनेत किंवा सरकारच्या कारभारात सोनिया गांधी यांचा हस्तक्षेप चालवून घेतला नाही. इतकेच नाही, तर त्यांनी काही काळाने, दर काही दिवसांनी सोनियांच्या घरी जाऊन इतिवृत्त देण्याची प्रथाही बंद करून टाकली. काँग्रेस पक्षाला घराणेशाहीच्या शापातून मुक्ती देण्याचा आटोकाट प्रयत्न रावांनी केला. यात त्यांना १९९६पर्यंत यशही आले. दुर्दैवाने, १९९६च्या निवडणुकीत पराभव झाला आणि काँग्रेस नेत्यांनी एकदम कच खाल्ला. सगळा काँग्रेस पक्ष एकसाथ सोनिया गांधी यांना शरण गेला. रावांचे हे स्वप्न अखेर भंग पावले. रावांना मृत्यूनंतरही या स्वप्नाची जबरदस्त किंमत मोजावी लागली. २३ डिसेंबर २००४ रोजी रावांचे निधन झाले, तेव्हा त्यांचे चेले डॉ. मनमोहनसिंग हे पंतप्रधान होते. मात्र गांधी घराण्याची नाराजी ओढवू नये, यासाठी केंद्र सरकारने राजधानी दिल्लीत रावांचा अंत्यविधी होऊ दिला नाही. त्यांचा मृतदेह हैदराबादला पाठविण्यात आला. इतकेच नाही, तर राजधानीतील काँग्रेस मुख्यालयात नरसिंहराव यांचा मृतदेह काही तास अंत्यदर्शनासाठी ठेवण्याची कल्पनाही धुडकावून लावण्यात आली. राजधानी दिल्लीत आपण गेलो तर यमुनेच्या काठावर महात्मा गांधी, पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, संजय गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, बाबू जगजीवनराम, चरणसिंह अशा आठ नेत्यांची स्मृतिस्थळे होती. यातील चार तर एकाच घरातील आहेत. यातील संजय गांधी यांनी देशाला नेतृत्व देणारे कोणतेही पद सांभाळले नव्हते. असे असूनही तेथे त्यांची समाधी आहे. याउलट राव हे विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील पहिले पंतप्रधान होते. काँग्रेसचे नेहरू-गांधी घराण्यातले नसलेले व पाच वर्षांचा कार्यकाळ पुरा केलेले पहिले पंतप्रधान होते आणि त्यांनी पाच वर्षांतच भारताचा चेहरामोहरा पुरता बदलून टाकला होता. अशा नेत्याचा मरणोत्तर अपमान केवळ एका कुटुंबाच्या अहंकारातून व्हावा, हे भारतीय संस्कृतीला अनुसरून झाले नाही. हा अपमान तब्बल दहा वर्षांनी काहीसा दूर करण्यात आला.

pm_4  H x W: 0  
नवी दिल्लीत २०१४मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवे एनडीए सरकार आल्यानंतर २०१५मध्ये राजधानीत राष्ट्रीय नेत्यांच्या स्मरण घाटांच्या परिसरात नरसिंहराव यांच्या स्मरणार्थ एक स्मृतिफलक कोरण्यात आला. हे स्मृतिस्थळ बनवून त्यांच्यावरील अन्याय काहीसा दूर करण्यात आला. या स्मृतिफलकावर कोरलेल्या ओळी नरसिंहराव यांची ओळख सांगण्यात पुरेशा आहेत. त्यात म्हटले आहे - 'वारंगळ जिल्ह्यातील लोकनपल्ली गावात २८ जून १९२१ रोजी जन्मलेले भारताचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव हे स्वातंत्र्यसैनिक होते. निझामाच्या राजवटीच्या विरोधात लढलेले लढवय्ये होते. शिक्षणतज्ज्ञ, सुधारक, पंडित आणि १५ भाषांवर प्रभुत्व असणारे नरसिंहराव हे ‘बृहस्पती’ म्हणून ओळखले जात. २३ डिसेंबर, २००४ रोजी मोठा वारसा ठेवून नरसिंहराव यांचे निधन झाले. त्यांना ‘ऊर्जावान, तेजस्वी भारताचे निर्माते' म्हणून ओळखले जाते.’ ही रावांची अगदी उचित ओळख आहे. पण राव याहूनही खूप अधिक व व्यापक होते.

नरसिंहराव यांना आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्रिपद मिळाले, तेव्हा त्यांनी अत्यंत कठोरपणे जमीनदारी पद्धत कायद्याने रद्द केली होती. या कायद्यामुळे त्यांची स्वत:ची शेकडो एकर जमीन सरकारदरबारी जमा झाली होती. त्यांच्या मूळ तसेच दत्तक घरातील या कायद्यामुळे जाणारी इंचभरही जमीन वाचविण्याचा प्रयत्न नरसिंहराव यांनी केला नव्हता. त्यांना त्यांच्या या साहसी निर्णयाची फार मोठी राजकीय किंमत मोजावी लागली. पण त्यांनी त्याची फिकीर केली नाही. पुढे केंद्रामध्ये शिक्षण खाते जाऊन त्याजागी ‘मनुष्यबळ विकास खाते’ असे नवे खाते २६ सप्टेंबर, १९८५ रोजी जन्माला आले. या वेळी राजीव गांधी पंतप्रधान होते. राव या खात्याचे पहिले मंत्री होते. त्यांनी या खात्याच्या रचनेत आणि देशाच्या शिक्षण प्रणालीत खूप रस घेतला. भारताचे शिक्षण क्षेत्र झपाट्याने विस्तारत गेले. राजीव गांधी यांच्या मनात काहीशी धूसर असणारी ‘नवोदय विद्यालयां’ची संकल्पना कागदावर सविस्तर उतरवून ती प्रत्यक्षात आणण्याचे श्रेय नरसिंहराव यांचे आहे. रावांची मनुष्यबळ विकास खात्याची संकल्पनाही खूप व्यापक होती. त्यांच्या मते महिला व बालकल्याण, संस्कृती, युवक विकास, क्रीडा आणि शिक्षण ही सारी खाती परस्परांशी निगडित आहेत आणि मनुष्यबळ विकास या खात्यातच त्यांचा समन्वित विचार होऊ शकतो. राव यांच्या संकल्पनेप्रमाणे आधी हे असे मोठे खाते करायचे योजले गेले. पण नंतर हळूहळू या खात्यातून क्रीडा, युवककल्याण असे एकेक विभाग अलग करण्यात आले. काही काळापूर्वी मनुष्यबळ खात्याचे नाव पुन्हा शिक्षण असे करण्यात आले, तेव्हा रावांच्या संकल्पनेतील इतर सर्व विभाग जाऊन या खात्यात केवळ ‘शिक्षण’ हा एकच विभाग उरला होता. रावांच्या संकल्पनेतील मनुष्यबळ विकास खाते आधीच लयाला गेले होते. मात्र रावांना केंद्रात शिक्षण खाते सांभाळण्याआधी आंध्रमध्ये शिक्षण खाते सांभाळण्याचा अनुभव होता. केंद्रात काम करताना त्यांनी ती पुंजी वापरली.


अलौकिक भाषावैभव 
नरसिंहराव यांचे भाषाप्रेम आणि भाषावैभव कुणालाही थक्क करून टाकेल असे विलक्षण होते. रावांची मातृभाषा तेलुगू. ते बराच काळ नागपुरात आणि पुण्यात होते. मराठी त्यांना मातृभाषेइतकीच सुरेख येई. ह.ना. आपटे यांच्या ‘पण लक्षात कोण घेतो?’ या कादंबरीचा रावांनी केलेला ‘अबला-जीवितम्’ हा तेलुगू अनुवाद गाजला होता. पुढे त्यांच्या ‘इनसायडर’ या पुस्तकाच्या ‘अंत:स्थ’ या मराठी अनुवादाचे प्रकाशन झाले, तेव्हा रावांनी इतके ओघवते आणि विलक्षण सुंदर मराठी भाषण केले की, श्रोते त्यांच्या भाषाप्रभुत्वाने चकित झाले. २००३च्या कराड साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणूनही रावांनी असेच सुरेख मराठी भाषण केले. संस्कृत, ऊर्दू, उडिया, बंगाली, गुजराती, हिंदी, तामिळ, कन्नड या भाषांवरही त्यांचे मराठीइतकेच प्रभुत्व होते. इंग्लिशमध्ये याला ‘पॉलिग्लॉट’ म्हणतात. त्याला मराठीत ‘बहुभाषाकोविद’ म्हणता येईल, असे राव होते. हे झाले भारतीय भाषांचे. त्याचबरोबर रावांना इंग्लिश, फ्रेंच, अरेबिक, स्पॅनिश, जर्मन, ग्रीक, लॅटिन, पर्शियन या आठ परदेशी भाषाही उत्तम येत. मुख्य म्हणजे, या सर्व भारतीय व परकीय भाषांमधील उत्तम वाङ्मयाची त्यांना माहिती व जाण होती. त्यामुळेच, त्यांनी अनुवादही विविध प्रकारचे केले. विश्वनाथ सत्यनारायण यांच्या ‘वेयि पडगलु’ या या तेलुगू कादंबरीचा रावांनी ‘सहस्रफन’ असा हिंदी अनुवाद केला. ते स्वत: हिंदी व तेलुगू या भाषांमध्ये कविता करत. संस्कृत काव्यांचे त्यांचे पाठांतर होते. अयोध्या प्रश्नावर किंवा एरवीही अनेक आचार्य त्यांच्याशी चर्चा करायला येत; तेव्हा त्यांच्या शेजारी जमिनीवर बसून राव रसाळ संस्कृतात संवाद साधत. १९४८ ते १९५५ या काळात त्यांनी ‘काकतालीय पत्रिका’ या तेलुगू नियतकालिकाचे संपादन केले. नावाने आणि टोपण नावाने त्यांनी असंख्य लेख लिहिले. ‘मेनस्ट्रीम’ या साप्ताहिकात काँग्रेसच्या १९८९मधल्या पराभवानंतर ‘काँग्रेसमन’ या लेखकाने कठोर आत्मपरीक्षण करणारा लेख लिहिला. ते रावच होते, हे कालांतराने स्पष्ट झाले. त्या लेखाचे शीर्षकच ‘द ग्रेट सुसाइड’ असे होते. हा आत्मटीकेचा सूर विरोधकांपेक्षाही अधिक तिखट व नेमका होता. ‘इनसायडर’ ही त्यांची आत्मपर कादंबरी हा तर मोठा ठेवाच आहे. तसेच, महत्त्वाचे पुस्तका आहे.. ‘अयोध्या’. नरसिंहराव यांनी आपले गुरू स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाने एक प्रतिष्ठान स्थापन केले होते. या प्रतिष्ठानाने आता हैदाराबाद-सिकंदराबादच्या बेगमपेट या भागात रावांच्या संग्रहातील दहाहून अधिक भाषांमधील दहा हजारांहून अधिक पुस्तकांचे ग्रंथालय सुरू केले आहे. दुर्दैव म्हणजे, यंदा ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवेळी व प्रचंड पावसाचे पाणी या ग्रंथालयात शिरले आणि त्याचे नुकसान झाले. नरसिंहराव यांचा हा अनमोल ग्रंथठेवा वाचविण्याचे प्रयत्न आता चालू आहेत.
 
केंद्रीय शिक्षण किंवा मनुष्यबळ खात्याचे काम रावांनी सुरू केले, तेव्हा देशातील ४० टक्के शाळांमध्ये एकही फळा नव्हता. प्राथमिक म्हणजे तेव्हा पहिली ते चौथीच्या सत्तर टक्के शाळा केवळ एक किंवा जास्तीत जास्त दोन वर्गांमध्येच भरत असत. चारही इयत्तांची मुले शाळेत असली, तरी ३३ टक्क्यांहून अधिक शाळांमध्ये चारही इयत्तांना शिकवणारा केवळ एकच शिक्षक असे. स्वातंत्र्यानंतर जवळपास चार दशकांनी भारतात असणारी शिक्षणाची ही देशव्यापी अवस्था पाहून नरसिंहराव अनेक रात्री झोपू शकले नव्हते. शिक्षण हा भारतीय राज्यघटनेतील समावर्ती सूचीतला विषय असल्याने त्याची जबाबदारी केंद्र व राज्य अशा दोन्ही सरकारांची असते. मात्र त्यात अनेक जबाबदाऱ्या एकमेकांकडे ढकलून या विभागात कोणीच लक्ष घालत नाही. रावांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी चंग बांधला. गरज असेल तेथे राज्यांच्या मागे न लागता केंद्र सरकारने पैसा खर्च करावा, असा निर्णय घेतला. देशातल्या प्रत्येक शाळेसाठी किमान दोन वर्गखोल्या असल्याच पाहिजेत आणि प्रत्येक शाळेत किमान दोन शिक्षक असायलाच हवेत, असा धोरणात्मक बदल रावांनी करून घेतला. यानंतर, ग्रामीण भागातील साक्षरतेचा वेग वाढला. एकीकडे नवोदयसारखी सर्व जाती, धर्म, प्रदेशातील हुशार मुलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र शाळा आणि दुसरीकडे, प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण नेण्यासाठीची धडपड अशा दोन्ही आघाड्यांवर रावांनी काम केलेले दिसेल. पुढे रावांकडे पंतप्रधानपद आले, तेव्हा त्यांनी आग्रहाने बराच काळ शिक्षण खाते आपल्याकडेच ठेवले. भारताची अर्थव्यवस्था सावरताच शिक्षण खात्याची तरतूद वाढत कशी जाईल, याकडेही त्यांनी खास लक्ष दिले.
 
आधुनिकता आणि तंत्रस्नेह आणताना राजीव गांधी आणि त्यांच्या मित्रांमध्ये भारतीय परंपरांना सामावून घेत आलेल्या शहाणपणा किंवा सुज्ञपणाबद्दल काहीसा तिरस्कारही निर्माण झाला होता. नरसिंहरावांनाही त्याचा फटका बसला. त्यांची प्रकांड बुद्धी, अफाट आकलनशक्ती, विविध विषयांच्या ज्ञानाचा खजिना आणि पक्षावरील अढळ निष्ठा या त्यांच्या गुणांची ओळख सगळ्या तरुण नेत्यांनाही यथावकाश झालीच. पण या तथाकथित तरुण नेत्यांपैकी काहींना तर जुन्या काँग्रेस नेत्यांचे ऐसपैस बोलणे किंवा पोशाखही आवडत नसे. ही हद्दच होती. या असल्या उटपटांगपणामुळेच अनेक घोडचुका झाल्या. मात्र शाहबानो प्रकरणातील पोटगीचा निर्णय फिरविणे असो किंवा श्रीलंकेत शांतिसेना पाठविण्याची गंभीर चूक असो, रावांनी राजीव गांधी यांना स्पष्ट आणि ठोस विरोध केलेला दिसत नाही. खासगीत केला असला तर तो इतिहासाला ज्ञात नाही. ‘बोफोर्स’सारखे प्रकरण बाटलीतून निघालेल्या भुतासारखे दिवसागणिक वाढत गेले, तेव्हाही रावांच्या ज्ञानाचा किंवा अनुभवाचा उपयोग राजीवना झालेला दिसत नाही. किंवा कदाचित त्यांना तो करून घ्यायचाही नसेल. काँग्रेस, भाजपा किंवा इतरही मोठ्या पक्षांमध्ये जे काम सांगितलेले किंवा सोपविलेले नाही, त्यात नाक खुपसायचे नाही, अशी रीतच असते. रावांनी केलेल्या काही नोंदींमध्ये त्यांच्या दृष्टीने चुकीचे काही निर्णय होत असताना आलेली हतबलता दिसून येते.

pm_1  H x W: 0  
अर्थात, मंत्री म्हणून अशी हतबलता वाटणाऱ्या रावांनी स्वत: पंतप्रधान झाल्यानंतर अयोध्येचा प्रश्न नीट हाताळला नाही. किंवा आपल्या सहकाऱ्यांवर पुरता विश्वास टाकून तो सोडविण्यासाठी काही धाडसी पावलेही टाकली नाहीत. या प्रश्नाला हात घालण्यातही त्यांनी विलंब लावला. काँग्रेसचा हिंदू मतांचा जनाधार निसटतो आहे, याची प्रखर जाणीव झालेल्या नेत्यांमध्ये खरे तर नरसिंहराव हे अग्रणी होते. पण त्यावरचा उपाय योजण्यात त्यांनी कुचराई केली. ज्या नेत्याने आपल्या पक्षाची सारी विचार परंपरा बाजूला ठेवून पुरोगामी आर्थिक धोरण पत्करले आणि देशाला एका विनाशापासून वाचविले, तोच अलौकिक नेता रामजन्मभूमी प्रश्नाबाबत मात्र पुरोगामी आणि काळाची पावले ओळखणारी भूमिका घेऊ शकला नाही. यातून त्यांच्या पक्षाचे तर नुकसान झालेच, तसेच देशाचेही नुकसान होत राहिले.

अशा अपयशांचे काही काळे ठिपके सोडले तरी ‘परंपरा आणि नवता’ यांचा संगम असणारा, कुशाग्र बुद्धिमत्तेला कोणताही अविषय नसणारा, आपल्या केवळ राजकीय चातुर्याने भल्याभल्या राजकीय पैलवानांना चारी मुंड्या चीत करणारा, भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान व भारताचे भाषावैभव यांच्यावर निस्सीम प्रेम करणारा, ऐहिक ऐश्वर्याचा मोह नसणारा, कोणत्याही समस्येचे समग्र चित्र काही मिनिटांत आकलन करून घेणारा.. असा हा नेता होता. त्यांची जन्मशताब्दी खरे तर देशभर विविध उपक्रमांनी, शास्त्रचर्चांनी, भविष्यवेधी व्याख्यानमालांनी, साहित्य संमेलनांनी साजरी व्हायला हवी आहे. केंद्र सरकारनेही तेलंगणप्रमाणे पी.व्ही. नरसिंहराव जन्मशताब्दी समिती स्थापन करून साऱ्या देशभरात वैचारिक व बौद्धिक उपक्रम करायला हवेत.
 
 
रावांच्या चरित्राचे स्मरण आपण करीत राहायला हवे, नाहीतर सामानाची बांधाबांध करून घरी परतणारा एक थकलेला म्हातारा एक दिवस उलटा परतून भारतासारख्या खंडप्राय देशाचे वर्तमान आणि भविष्यच बदलून टाकतो, ही काही काळाने दंतकथा वाटेल. दंतकथा वाटावी, अशीच ही सत्यकथा असली तरी!