वयाच्या मानाने...

विवेक मराठी    24-Nov-2020
Total Views |
@प्रवीण दवणे 

पुष्कळदा आपण तरुण म्हणजे चपळ आणि वृद्ध म्हणजे मरगळलेला!, यासारख्या विशिष्ट गोष्टींचे संकेतच तयार करून ठेवले आहेत. परंतु एकदा का आयुष्याचे उद्दिष्ट ठरले आणि उद्दिष्ट पूर्ण करण्याचा ध्यास मनात निर्माण झाला की वयाच्या हातात आपले मन सापडत नाही. याचा अर्थ असा होतो की, एक असते वयाची साधना आणि दुसरे असते साधनेचे वय! कुठल्या वयाप्रमाणे जगायचे आणि तरुण राहायचे, ते ज्याचे त्याने ठरवावे ‘वयाच्या मानाने’ की ‘मनाच्या वयाने’!

davane_1  H x W
णीतरी अनोळखी वाटणारे, पण ओळखीचे असे मला रस्त्यात भेटले, त्यांनी विचारले, “ओळखलंत का?” मी आपली नेहमीचीच युक्ती केली. थोडेसे एक-दोन मजली हसलो. मी म्हटले, “तुम्हाला कोण विसरेल? आपली ओळख अगदी जुनी आहे.” खरे तर मी त्यांना पुरेसे ओळखलेले नव्हतेच! हे बहुधा त्या चाणाक्ष इसमाने ओळखले असावे. त्यांनी स्वत:हूनच आपण कसे, कुठे भेटलो होतो ते सांगितले. मी ओळखणे शक्य नव्हते, कारण सात-आठ वर्षांपूर्वी त्या इसमाच्या अॅमेझॉनचे पुरते सैबेरियात रूपांतर झाले होते आणि पोटही जवळजवळ हनुवटीला टेकायच्या बेतात होते. आता एवढा अजस्र बदल झाल्यावरही मी त्यांना ओळखावे, ही त्यांची अपेक्षा थोडी अवाजवीच होती. त्यांनी मला ओळखले याचा मला वाटणारा अहंकारयुक्त आनंद त्यांनी एका क्षणात धुळीला मिळवला. कारण ते म्हणाले, “वयाच्या मानाने तुम्ही अजून फारसे बदलला नाहीत.”
‘समझनेवाले को इशारा काफी है’.. मला जे काही समजायचे ते समजले. वयाच्या मानाने अशी एक दणकट टपली त्यांनी माझ्या टाळक्यावर ठेवून दिली होती. ही घटना अगदी साधीशीच, परंतु ‘वयाच्या मानाने’ ही गोष्ट अनेक पदरांनी, अनेक चेहर्यांनी मला व्यापून उरली. किती सापेक्ष संकल्पना आहे ही! आपण कुणालाही दुखावत नाही, अशा रितीने मनातली गोष्ट मात्र जाणवू द्यायची, या गोष्टीसाठी चतुर माणसाने ‘वयाच्या मानाने’ ही ‘टर्म’ शोधून काढली.

ज्याप्रमाणे कुणालाही दुखवू नये या हेतूने खरे तर या पदाचा चतुरपणे माणसे उपयोग करतात, त्याप्रमाणेच कौतुक करतानासुद्धा ‘वयाच्या मानाने’चा छानच उपयोग करता येतो. विचार केल्यावर कळले की इतकी लवचीक, कुठेही आणि कुणालाही फिट्ट बसणारी दुसरी गोष्ट नसेल. एखादे तीन-चार वर्षांचे लहान मूल आठव्या सुरात बेसूर गाणे जरी गात असेल आणि आपण त्या मुलाच्या घरातच आतून येणार्या गरमागरम कांदेपोह्याची वाट बघत असलो, तर ‘वयाच्या मानाने’ हे पद ऐन वेळेला धावून येणार्या मित्रासारखे उपयोगी येते. आपण जर त्या मुलाच्या पालकाला म्हणालो, “नाही हो अजून तुमचा बंड्या सुरात गात. त्याला जरा रियाज करू द्या, गाणं शिकू द्या आणि मग गायला सांगा” तर आपल्याला अर्धा कप चहावरच फुटावे लागेल. पण आपण त्या मुलाच्या पाठीवर कौतुकाची थाप ठोकून म्हटले, “व्वा! तुमचा बंड्या वयाच्या मानाने छान गातो. सूर समजायला अजून काही वर्ष लागतील; परंतु ‘वयाच्या मानाने’ एवढं गाता येणं हे खरंच ग्रेट आहे.” हे ऐकल्यावर आतून फुलून येऊन पण संकोचाची झाल लपेटून पालक म्हणतात, ”आपण एवढं म्हणावं हे आमचं भाग्यच!”
 
अशा प्रकारे ‘वयाच्या मानाने’ या पदाने आपल्याला किती आधार दिलेला असतो.
 
हे पद किती प्रकारे वापरता येईल पाहा - ‘वयाच्या मानाने बरे दिसता’, ‘वयाच्या मानाने छान चालता’, ‘वयाच्या मानाने झेपत नाही’. मला आठवते, आमच्या मराठीच्या प्राध्यापिका सरोजिनी वैद्य यांना कुणीतरी म्हणाले, “तुम्ही अजून पूर्वीसारख्याच दिसता. तीस वर्षांपूर्वी दिसत होत्या तशाच.” सरोजिनी वैद्य उत्तरल्या, “म्हणजे मी तीस वर्षांपूर्वीसुद्धा इतकीच म्हातारी दिसत होते की काय?”
 
समोरच्या माणसाचा चेहरा बघण्यासारखा झाला. मग सावरून तो गृहस्थ म्हणाला, “तसं म्हणायचं नव्हतं मला. मला म्हणायचं होतं - वयाच्या मानाने अजून तुम्ही तरुण दिसता.”
 
सरोजिनी वैद्य यांच्यासारखी स्पष्टव्यक्ती प्राध्यापिकाच हे सुनावू शकते. अशा लोकांपुढे ‘वयाच्या मानाने’ची जादूची छडी चालत नाही.
 
हेच पद एका वेगळ्या आदरानेही आपण संबोधू शकतो. वयाच्या पंचाण्णवव्या वर्षीसुद्धा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे रायगड चढून जातात, तेव्हा आपण आदराने म्हणतो, ‘वयाच्या मानाने किती उमेदीत आहेत बाबासाहेब.’ तेव्हा आपल्याला वयाचे कॅलेंडर झुगारून देऊन ते कसे कार्यरत आहेत हेच सांगायचे असते. वयाच्या सत्तरीत स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर ‘दीदी तेरा देवर दिवाना’ हे गाणे पंचविशीतल्या माधुरी दीक्षितसाठी गातात, तेव्हा त्यांच्या स्वराचे चिरतारुण्यच आपल्याला सुचवायचे असते. येथे वयाच्या मानाने त्या कोवळ्या स्वरात गातात, हे म्हणताना वयसुद्धा त्यांच्या स्वराला स्पर्श करू शकले नाही, हेच रसिकांना म्हणायचे असते. पुष्कळदा तर माझा अनुभव असा आहे, जन्मतारखेनुसार वयाने प्रौढ झालेली माणसेच अधिक तरुण असतात. याचे कारण आयुष्याचा खरा अर्थ तारुण्याचे बोट सोडल्यानंतर प्रौढपणातच कळत असतो. अशाच वेळी समरसून जगण्याच्या ऊर्मी प्रबळ होतात.
 
 
एकदा का आयुष्याचे उद्दिष्ट ठरले आणि उद्दिष्ट पूर्ण करण्याचा ध्यास मनात निर्माण झाला की वयाच्या हातात आपले मन सापडत नाही. मी एकदा प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना विचारले होते, “आशाताई, वयाच्या सत्तरीतसुद्धा तुम्ही ‘रंगीला रे’सारखं गाणं कसं म्हणू शकता? काय रहस्य आहे याचं?” छान हसून त्या म्हणाल्या, “अरे, वय आपल्या हातात नाही, पण ‘मन’! ते तर आपल्या हातात आहे.”
 
 
या एका वाक्याने मला शिकवले, ‘गाणे’, ‘वय’ गात नसते. ‘मन’ गात असते. आपण आपल्या ढोबळ दृष्टीच्या चश्म्याने म्हणत असतो, ‘वयाच्या मानाने काय गातात त्या!’ आज तरुण गायक-गायिकासुद्धा तारुण्याचा जो रंग शब्दांना देऊ शकत नाहीत, ती धुंदी ‘वयाच्या मानाने’ नसते, तर अनुभवाचे वय व रियाजाचे रसायन त्यात असते.
 
 
पुष्कळदा आपण विशिष्ट गोष्टींचे संकेतच तयार करून ठेवले आहेत. उदाहरणार्थ, तरुण म्हणजे चपळ आणि वृद्ध म्हणजे मरगळलेला! तरुण म्हणजे देखणा आणि प्रौढ म्हणजे निबर, थोडा करडा होत गेलेला! तरुण म्हणजे ध्येयवादी आणि म्हातारी माणसे फक्त ‘संध्याछाया भिववीत हृदया’ म्हणत असलेली! तरुण म्हणजे रसिक आणि वय ज्येष्ठ झाले म्हणजे लालित्यापासून दूर गेलेला, या ढोबळ विभाजनानेच आपण एखाद्याला वयाच्या मानाने उत्साही, तरुण, रसिक, देखणा ठरवून टाकतो. माझा तर या उलटच अनुभव आहे. माहीत असलेली काही उदाहरणे मी देतो.
 
 
गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांची प्रतिमा पाहा, म्हणू आपण वयाच्या मानाने देखणे दिसत आहेत म्हणून? असे तजेलदार देखणेपण मला वयाच्या पंचविशीच्या तरुणाच्या चेहर्यावरही दिसत नाही. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेले पु.ल. देशपांडे यांना आपण म्हणू ‘वयाच्या मानाने’ रसिक आहेत म्हणून? दाद द्यावी ती पुलंनीच! जगण्यावर तुडुंब प्रेम असलेले पु.ल.! आयुष्याच्या सोबतीने अधिकाधिक मधुर होत गेले. ऐंशी वर्षे ओलांडल्यावरही माधुरी दीक्षितला घेऊन तिच्यावर सिनेमा काढण्याचा उत्साह असलेले चित्रकार हुसेन मी अगदी जवळून पाहिले. रणरणत्या उन्हातही पायात पादत्राण न घालता शहामृगाच्या वेगात धावणारे हुसेन मी पाहिले. मऊ, मुलायम रुपेरी केस मानेपर्यंत रुळणारे आणि डोळ्यात धुंद सुरमा घातल्यासारखी चमक असे चित्रकार मकबुल फिदा हुसेन यांना मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मी जितक्या वेळा पाहिले, तितक्या वेळा मला ते अधिक अधिक तरुणच वाटले. त्या तेजाकडे दिपून जाऊन बघताना ‘वयाच्या मानाने’ हा पडदा माझ्या आड आला नाही.
 
 
डोक्यावर पदर घेऊन, मोठे कुंकू लावलेल्या पंचाहत्तरीच्या शांताबाई शेळके ढंगदार लावणी लिहिताना मी पाहिल्या. शब्दांतून शृंगार रसराज बहरला होता. कुणी म्हणाले नाही तेव्हा ‘वयाच्या मानाने’ तरुण लिहितात म्हणून. कारण प्रतिभावंत लेखणीला कालनिर्णयाचे उंबरठे नसतात. आज अमिताभ बच्चन सत्तरी ओलांडूनही अनेकांना करोडपती खेळवत पंचविशीच्या उत्साहाने काम करीत असतात. आपण केव्हातरी आदराने म्हणतो, “या वयातसुद्धा अमिताभ चपळ आहेत.” राजकारणात तर ऐंशी वर्षे ओलांडल्यावरच माणूस तरुण होतो. पाहा त्या नेत्यांचा प्रचंड उत्साह! अजूनही सत्तेची ओढ आहे. सतत ‘मीच अजिंक्य असेन’ ही जिद्द आहे. उन्हा-पावसाची काळजी न करता हे नेते जनतेच्या मनावर स्वार आहेत. स्वप्नांच्या अश्वाला वय लगाम घालू शकत नाही आणि म्हणूनच क्षेत्र कुठलेही घ्या, ‘वयाच्या मानाने’ हा अडसर धावणार्याला रोखू शकत नाही.
 
 
अनेकदा वयाचा इतका बाऊ केला जातो, की त्यामुळे असलेल्या वयातसुद्धा मनातल्या निराशेच्या वयाची भर पडत जाते. पु.ल. देशपांडे यांना त्यांच्याच वयाचे एक ज्येष्ठवयीन गृहस्थ म्हणाले, “भाई, काय आजची मुलं-मुली! कसल्या आजच्या फॅशन्स! सगळं काही बदललंय ना आता?” आपले लाडके भाई हसत हसत म्हणाले, “आजोबा, काहीही बदललेलं नाही, बदललंय ते आपलं ‘वय’!
 
 
अशीच एक कवितेच्या चांदण्यांनी न्हालेली, झंकारलेली दुपार मी अनुभवली. त्या उन्हाला वयाचा स्पर्श नव्हता. कविवर्य बा.भ. बोरकर यांचा सत्तरावा वाढदिवस ‘ग्रंथाली’ या प्रकाशन संस्थेने आयोजित केला होता. व्यासपीठावर वय झुगारलेली तरुणाई उपस्थित श्रोत्यांना समृद्ध करीत होती. व्यासपीठावर कविश्रेष्ठ बोरकरांबरोबर त्यांचा गौरव करण्यासाठी पु.ल. उपस्थित होते. शेजारी कविवर्य विंदा करंदीकर, कविवर्य वसंत बापट आणि साक्षात बाबा आमटे! त्या वेळी सत्काराला उत्तर देताना बोरकर म्हणाले, “आज माझा सत्तरावा वाढदिवस आहे, हे आपण म्हणता म्हणून मी विश्वास ठेवतो; परंतु ज्या ज्या वेळी मला कविता सुचते, त्याक्षणी मी तुमच्या जगात नसतो. माझ्या लौकिक वयातून ते ईश्वरी जगातून मी असलेले वय वजा करा, मग कळेल मी सोळाच वर्षांचा आहे!” रसिकांनी टाळ्यांचा गजर केला. त्यात काही टाळ्या माझ्याही होत्या. असे बोरकर अखेरच्या श्वासापर्यंत कविता करत राहिले. आपण म्हणू का त्यांना ’वयाच्या मानाने’ लिहित राहिले!
 
 
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यासमोर ज्यांना नृत्य करण्याची संधी मिळाली होती, त्या प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सितारादेवी यांचे कथ्थक नृत्य ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये प्रसिद्ध नृत्यगुरू मंजिरी देव यांनी त्यांच्या श्री गणेश नृत्यकला अकादमी या संस्थेमार्फत आयोजित केले होते. भाग्यवान डोळ्यांनी नृत्याचा तो दीपोत्सव अनुभवला. पंचाहत्तरी ओलांडलेल्या सितारादेवी नृत्यसमाधी जगताना आम्ही पाहिल्या. थरारून टाकणारा अनुभव होता तो! जवळजवळ तास-दीड तास नृत्याची झपूर्झा लागली होती. ती समाधी लोपल्यानंतर अचानक एक मंत्रभारला रसिक अनपेक्षितपणे भर रंगायतनमध्ये ओरडला, “सितारादेवी, आपकी उमर सचमुच कितनी है?” घामाने भिजलेल्या सिताराजी ओढणीने घाम टिपत ध्वनिपेक्षकाकडे आल्या आणि चुनरी स्वत: स्वत:च्या चेहर्यावर ओढत हसून म्हणाल्या, “परदे में रहने दो!”
 
 
आणि प्रेक्षागृहात हशा आणि टाळ्यांचा आषाढ कोसळला. आता काय म्हणायचे या नृत्याला! सिताराजी ‘वयाच्या मानाने’ छान नाचतात, असे म्हणण्याचे धाडस तरी आपल्याला होईल का!
 
 
संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी गीतेवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. ‘भावार्थ दीपिका!’ म्हणजेच आपली ज्ञानेश्वरी! आदराने आणि कौतुकाने आपण त्यांच्या वयाचा उल्लेख करतो, तो करणेही आपल्या साधनेला साजत नाही. कारण तेथे वय हा मुद्दाच येऊ शकत नाही. शेकडो जन्माचे पूर्वसंचित त्यामागे असते. झरा जिथे प्रकट होतो, तिथेच त्याची सुरुवात नसते. तो खडकातून, डोंगर-कपारीतून शेकडो किलोमीटर प्रवास करून आलेला असू शकतो. त्या झर्याचे वय कधी कुणाला सांगता येईल? शेकडो वर्षे तपोवनात पाखरांना फळे आणि माणसांना सावली देत, वारा-वादळ झेलत उभे असलेले वृक्ष ‘वयाच्या मानाने’ हिरवेगार आहेत असे आपण म्हणतो का?
 
 
एक असते वयाची साधना आणि दुसरे असते साधनेचे वय! कुठल्या वयाप्रमाणे जगायचे आणि तरुण राहायचे, ते ज्याचे त्याने ठरवावे ‘वयाच्या मानाने!’ की ‘मनाच्या वयाने!’