बाळासाहेब चितळे एक संघप्रभावित व्यक्तिमत्त्व

25 Nov 2020 12:08:59
@दत्तात्रय चितळे
 
संघकार्यात विविध जबाबदार्या समर्थपणे पेलणारे आणि संघकार्य व व्यवसाय यांची उत्तम सांगड घालणारे सुप्रसिद्ध व्यावसायिक कै. बाळासाहेब चितळे यांचे हे जन्मशताब्दिपूर्तीचे वर्ष. त्याचे औचित्य साधत त्यांच्या जीवनकार्याचा करून दिलेला परिचय.
 

chitale_2  H x
 
बाळ श्रीपाद चितळे यांचा जन्म 17 ऑगस्ट 1920 या दिवशी झाला. त्या दिवशी नागपंचमी होती. नुकतेच लोकमान्यांचे दुखःद निधन झाले होते, त्यामुळे टिळकभक्त आईवडिलांनी आपल्या नवजात बालकाचे नाव ‘बाळ’ असे ठेवले. नावाचाही संस्कार व्यक्तीवर होतो असे म्हणतात. या बाळनेही आपल्या संपूर्ण आयुष्यात देशहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले.
 
 
रा.स्व. संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक या भूमिकेतून, बाळासाहेबांनी जीवनातील प्रत्येक निर्णय आणि कृती देशहितासाठी पोषक ठरेल अशा भूमिकेतून केली. एक प्रामाणिक, चारित्र्यसंपन्न, बुद्धिमान, धैर्यशाली, संयमी, धोरणी आणि संघाच्या विचारांनी पूर्णपणे भारावून गेलेला माणूस असे त्यांचे एका वाक्यात वर्णन करता येईल.
 
1940 साली योगायोगाने पुणे ते मुंबई या प्रवासामध्ये त्यांच्या डब्यात कल्याण स्टेशनवर डॉ. हेडगेवार स्थानापन्न झाले. अगदी अनपेक्षितपणे झालेली ही भेट बाळासाहेबांच्या आयुष्यावर कायमचा प्रभाव टाकून गेली. डॉक्टरांसारख्या एका मोठ्या नेत्याचा सहवास लाभल्यामुळे सर्व जण आनंदित झाले होते. लोकसंग्रहाची आवड असलेल्या डॉक्टरांनी डब्यातील सगळ्यांशी परिचय करून घेतला. बाळ चितळेलासुद्धा, “शाखेत जातोस का? कोणत्या शाखेत? मुख्य शिक्षक कोण आहे?” वगैरे प्रश्न विचारले. बाळासाहेबांनी संकोचापोटी मी शाखेत जातो असे सांगितले. परंतु पुढील प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. तरीसुद्धा डॉक्टरांनी तो संवाद अतिशय कौशल्याने वळवून पुढे नेला आणि सर्वांना कायमचे आपलेसे केले. पुण्यामध्ये घरी आल्यावर बाळासाहेबांच्या मनात डॉक्टरांशी झालेला संवाद पक्के घर करून बसला होता. त्यांना डॉक्टरांच्या मनाचा मोठेपणा आणि माणसे जोडण्याची कला खूप भावली आणि त्यांनी त्वरित संघशाखेत जायला सुरुवात केली.
 
 
पुढे बाळासाहेबांनी दिवसेंदिवस संघकार्यामध्ये स्वतःला झोकून दिले. 1943मध्ये त्यांनी सिव्हिल इंजीनिअरिंगची पदवी प्राप्त केली. संघ शिक्षा वर्गाचा तीन वर्षांचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आणि पुण्यातील इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी धरली. त्या काळात पुण्यामध्ये डॉ. आप्पासाहेब पेंडसे हे संघाचे प्रचारक होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आणि प्रेरणा म्हणून बाळासाहेबांनीसुद्धा संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून बाहेर पडायचे ठरविले. परंतु त्यांनी लग्न करून, संसार करून संघकार्य जरूर करावे, असा आईवडिलांचा ठाम आग्रह होता. मोठ्या मिनतवारीने आणि मा. बाबाराव भिडे यांच्या आदेशावरून बाळासाहेबांनी लग्नासाठी मान्यता दिली. परंतु वडिलांनासुद्धा अट घातली की, मी लग्नानंतर काही वर्षे माझा संपूर्ण पगार संघकार्याला अर्पण करणार. 1944 ते 1948 प्राध्यापकाची नोकरी केल्यानंतर 1948 साली संघावर घातलेल्या बंदीमुळे संघाने केलेल्या सत्याग्रहामध्ये बाळासाहेबांनी पुण्यातील पहिल्या तुकडीचे नेतृत्व केले आणि तुरुंगवास भोगला.

chitale_1  H x  
 
1948मध्ये संघबंदीमुळे इंजीनिअरिंग कॉलेजमधील सरकारी नोकरी गेली. बाळासाहेबांनी काही वर्षे खाजगी बांधकाम व्यवसायिकांकडे नोकरी केली आणि 1953मध्ये स्वतःचा कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय सुरू केला. त्यांना मिळालेल्या पहिल्या कामापासून अनेक आव्हाने येत होती. परंतु त्यांनी चतुर व्यवहारज्ञान वापरून कामे मिळविली आणि यशस्वीपणे पूर्ण केली. पुण्यातील अनेक सुंदर बंगले, मनपाची शाळा, नगरवाचन मंदिराची इमारत, इंजीनिअरिंग कॉलेजचा मेटॅलर्जी विभाग, अहमदनगरमधील नगरपालिकेचे रुग्णालय, श्रीरामपूरची नगरपालिका, भाटघर येथील रंगाचा कारखाना, भिलवडी येथील कृष्णेवरील पूल, कोयनानगर येथील सेवकांच्या वसाहती, अरण्येश्वर येथील पूरग्रस्तांच्या वसाहती, आकुर्डी येथील बजाज ऑटोमधील वसाहती अशी अनेक बांधकामे उत्तम प्रकारे केली.
 
 
पुण्यामध्ये संघाचे ज्येष्ठ नेते मोरोपंत पिंगळे यांच्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध आला. बाळासाहेबांच्या घरी मोरोपंतांचे नियमित येणे-जाणे असे. आपले जीवन संघाच्या कार्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात खर्च झाले पाहिजे, हा बाळासाहेबांच्या मनातील मूलभूत हेतू नेहमीच कार्यरत राहिला. त्यामुळेच प्रचारक म्हणून संघासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेल्या व्यक्तींबद्दल त्यांच्या मनात अतीव आदर होता. कोणत्याही प्रचारकाच्या अडीअडचणीला, त्यांच्या प्रकृतिस्वास्थ्यासाठी, त्याच्या प्रवासातील सेवा-सुविधांसाठी, त्यांच्या पुण्यातील निवास व्यवस्थेसाठी अशा अनेक प्रकारे बाळासाहेब सेवाभावी वृत्तीने प्रचारकांबरोबर सतत उभे राहात. अनेक ज्येष्ठ प्रचारक बाळासाहेबांच्या घरी रहात असत. बाळासाहेबांच्या घरी राहून कै. नानाराव पालकर यांनी त्यांच्या अनेक पुस्तकांचे लेखन निर्विघ्नपणे पार पाडले. पुढे संघाचे अनेक नेते त्यांच्या आजारपणानंतर हॉटेल श्रेयसमध्ये विश्रांतीसाठी वास्तव्यास होते. त्यांची सेवा घरच्यासारखी केली जाई.
अनेक हितचिंतकांनी दिलेल्या सल्ल्यानंतर 1963-64मध्ये बाळासाहेबांनी आपटे रोडवर हॉटेल ‘श्रेयस’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या बाळासाहेबांच्या सात्त्विक वृत्तीमुळे आणि संघसंस्कारांमुळे त्यांनी हॉटेल व्यवसायामध्ये मांसाहारास, मद्यपानास आणि कोणत्याही अनैतिक गोष्टींना थारा न देणे या तीन तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे ठरवले. काही लोकांनी मद्यपान व मांसाहाराशिवाय हॉटेल चालू शकणार नाही असे सांगितले. परंतु बाळासाहेबांना विश्वास होता की, या गोष्टी न ठेवतासुद्धा हॉटेल व्यवसाय चालू शकेल. त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि सिद्ध करून दाखविले.
हॉटेलचे नामकरण करताना त्या नावामध्ये अर्थपूर्ण संदर्भ आणि आदर्श विचार असावेत, असा दृष्टिकोन बाळासाहेबांनी आर्वजून ठेवला होता.
श्रेयश्च प्रेयश्च मनुष्य मेतस्तौ, संपरित्य विविनक्ती धीरः ॥
 
- Both, Good and Pleasant approach the Man, Wise man chooses the Good.
 
कठोपनिषदामधील या सुभाषिताला अनुसरून हॉटेलचे नाव ‘श्रेयस’ असे ठरले.
 
हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक ग्राहक पूर्ण समाधानी व संतुष्ट होऊन गेला, तर त्याच्या तोंडी प्रसिद्धीमुळे किमान दहा नवीन ग्राहक येतात. आपल्या हॉटेलमध्ये आपण दिलेल्या सन्मानाच्या आदरातिथ्यामुळे आपली प्रसिद्धी निश्चितच कानोकानी पसरेल आणि पुण्यामध्ये आल्यावर श्रेयसचा पत्ता शोधत ग्राहक येतील, असा त्यांचा दृढ विश्वास होता. म्हणूनच त्यांनी कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीपेक्षा ग्राहकांना उत्तम सुविधा, सेवा आणि आदरातिथ्य यावरच सर्व लक्ष केंद्रित केले. परिणामी हॉटेल सुरू झाल्यापासून सहा महिन्यांतच 80% खोल्या भरू लागल्या आणि शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी हॉटेल फुल्ल होऊ लागले.
 
हॉटेल सुरळीत चालू झाल्यानंतर बाळासाहेबांना त्यांच्या मुलांवर व्यवसायाची पूर्ण जबाबदारी हळूहळू सोपवल्याने त्यांना संघकार्याच्या प्रवासासाठी जास्त वेळ देणे शक्य झाले. महाराष्ट्र प्रांताचे बौद्धिक प्रमुख, संपर्क प्रमुख अशा जबाबदार्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. पुण्यातील संघ शिक्षा वर्गाचे सर्वाधिकारी, महाराष्ट्र कार्यकारणीचे कायम सदस्य, 1983मध्ये झालेल्या तळजाई येथील भव्य प्रांतिक शिबिराचे उभारणी प्रमुख अशा अनेक जबाबदार्या त्यांच्यावर होत्या.
 
 
1960च्या दशकात संघाला अनेक पातळ्यांवर व विशेषत: सरकारी यंत्रणेकडून विरोध होत असे. त्या काळात अनेक सरकारी परवानग्या, परवाने, शिबिरांसाठी रेशन, कार्यक्रमांकरिता सार्वजनिक जागांची उपलब्धता अशा अनेक सुविधा प्राप्त करून घेण्याची जबाबदारी बाळासाहेबांवर असे. कारण त्यांच्या संभाषणकौशल्य आणि तर्कशुद्धपणे संघाचे महत्त्व केवळ देशहितासाठीच आहे हे सोप्या भाषेत पटवून सांगण्याची हातोटी या गुणांमुळे त्यांनी अनेक विरोधकांनासुद्धा आपलेसे केले होते. समाजातील संघाबाहेरील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना संघाची जवळून ओळख करून देण्यासाठी संघाच्या विविध उत्सवांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्याची महत्त्वाची जबाबदारी बाळासाहेबांनी अनेक वेळा पार पाडली.
 
 
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबरच मोठ्या पदावरील सरकारी अधिकार्यांबरोबर, मोठ्या उद्योगपतींबरोबर, अनेक ख्यातनाम विचारवंतांबरोबर, आध्यात्मिक साधुपुरुषांबरोबर संघातील अधिकार्यांच्या मुलाखती व चर्चा बाळासाहेबांनी अनेक वेळा घडवून आणल्या आणि त्यामुळे अनेक विरोधक संघाचे समर्थक बनले.
 
 
बाळासाहेब शेवटपर्यंत निष्ठावान संघस्वयंसेवक म्हणूनच आयुष्य जगले. त्यांच्या निवृत्तीच्या वयातही जेवढे म्हणून शक्य असेल तेवढे योगदान संघासाठी देण्यातच ते धन्यता व सार्थक मानत. विद्यार्थी साहाय्यक समिती, स्वरूप वर्धिनी, जनकल्याण समिती अशा अनेक संस्थांना आर्थिक व वस्तुरूपात ते सढळ हाताने साहाय्य करीत असत. व्यसनाधीन तरुणांसाठी एक व्यसनमुक्ती केंद्र सुरू करावे, तसेच गरिबांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य करावे आणि इतरही संस्कारक्षम उपक्रमांसाठी एक ट्रस्ट स्थापन करावा, अशी त्यांची प्रबळ इच्छा होती. ती पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मुलांनी स्वतंत्र निधी उभारून ट्रस्ट सुरू केला आहे.
 
सन 1992मध्ये अयोध्येमध्ये गेलेल्या कारसेवकांच्या तुकडीबरोबर काही ज्येष्ठ स्वयंसेवकांनी जाणे अत्यावश्यक आहे, अशी अपेक्षा संघपरिवाराकडून व्यक्त केली गेली. त्या वेळी क्षणाचाही विलंब न करता बाळासाहेब स्वतः काही सहकार्यांबरोबर अयोध्येकडे रवाना झाले. विवादित ढाचा जमिनीदोस्त केल्यानंतर उसळलेल्या दंगलीमधून कसेबसे मार्ग काढीत दोन दिवसांनी पुण्याला सुखरूप परतले.
 
मालतीबाई चितळे या बाळासाहेबांच्या पत्नी. त्यांनी बाळासाहेबांना संघकार्यासाठी आयुष्यभर पाठिंबा दिला. मालतीबाईसुद्धा राष्ट्र सेविका समितीच्या कार्यकर्त्या होत्या. त्यांनी आध्यात्मिक तपस्या अतिशय निष्ठेने केली होती आणि आणीबाणीच्या काळामध्ये खंबीरपणे शतचंडी यज्ञासारखे उपक्रम राबवून संघबंदी उठविण्यासाठी प्रयत्न केले होते.
 
 
बाळासाहेबांच्या घरातील आवारात अनेक वर्षे दैनंदिन शाखा भरत असे. त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत शाखेमध्ये प्रार्थना सांगण्याचे काम नियमितपणे केले. 13 एप्रिल 1996 रोजीसुद्धा त्यांनी शाखेमध्ये प्रार्थना सांगितली होती. त्याच दिवशी सायंकाळी अचानक हृदयविकारामुळे वयाच्या 76व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या कालावधीतसुद्धा संघपरिवारातील मित्रमंडळींबरोबर नियमितपणे संपर्क ठेवून अनेक ज्वलंत विषयांवर चर्चा घडवून आणण्यासाठी त्यांनी दर शनिवारी एक नियमित बैठक सुरू केली. या बैठकीत सर्व क्षेत्रांतील ज्येष्ठ विचारवंत दर शनिवारी श्रेयसवर एकत्र येत असत आणि साधकबाधक चर्चा करून अनेक समस्यांवर योग्य आणि रचनात्मक सूचना समाविष्ट करून संबंधित अधिकारी व्यक्तींना निवेदने किंवा पत्रव्यवहार पाठवीत असत. ही बैठक आजही नियमितपणे सुरू आहे, हे विशेष.
अलीकडेच, 17 ऑगस्ट 2020 रोजी बाळासाहेबांचा 100वा जन्मदिन होता. त्या निमित्ताने त्यांच्या जीवनाचा ओझरता परिचय करून देण्यासाठी हा लेखनप्रपंच.
दत्तात्रय बाळ चितळे
9850048637
Powered By Sangraha 9.0