एक शून्य उद्धवराव!

विवेक मराठी    27-Nov-2020
Total Views |
@देविदास देशपांडे

२८ नोव्हेंबर २०१९ रोजी गोरज मुहूर्तावर शिवाजी पार्कवर शपथ घेतल्यापासून या सरकारने अपयशांची एक मालिकाच सुरू केली. भीषण असे कोरोनाचे संकट आले, या संकटासमोर शासन-प्रशासनाची त्रेधातिरपीट उडाली.  पालघरमधील साधूंची हत्या, कोविड केंद्रांची अनागोंदी, पुण्यात कोविड केंद्रातील हलगर्जीपणामुळे पत्रकाराचा मृत्यू अशा अनेक घटना घडल्या. निसर्ग चक्रीवादळ,  विदर्भ व  पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी अशी संकटे आली. परंतु ना सत्ताधारी हलले, ना सत्तेची सूत्रे हलली.  त्यामुळे  या वर्षभरात उद्धव ठाकरेंच्या नावावर केवळ शून्य आणि शून्य जमा झाली.


cm_2  H x W: 0

सामान्यपणे वार्षिक आठवण किंवा सोहळा हा एखाद्या चांगल्या घटनेचा केला जातो. मात्र काही वाईट घटनासुद्धा असतात. त्यांचे व्रण कायमस्वरूपी राहतात आणि तो दिवस, ती वेळ विसरू म्हटले तरी विसरता येत नाही. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तो दिवस त्याच वर्गात मोडण्यासारखा आहे. निवडणूक निकालानंतर भाजपाला एकहाती बहुमत मिळत नाही, हे पाहून उद्धवरावांची मती फिरली आणि त्यांनी आढेवेढे घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचा अभिनिवेश ठाकरे यांनी बाळगला होता. त्यासाठी स्वतःच्या वडिलांना दिलेल्या वचनाचा हवाला त्यांनी दिला. मग त्यांच्याच बालबच्च्यांनी केलेल्या हाकाटीला प्रतिसाद देत, ‘अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी’ या भावनेने ते सत्तेच्या सोपानापर्यंत पोहोचले. त्याच दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाकलेल्या डावामुळे इकडे शिवसेनेच्या तंबूत बसलेल्यांची घालमेल चालली होती. परंतु न्यायालयाने तोंडी मतदान घेण्याचा आदेश दिल्यामुळे ते सरकार औटघटकेचे ठरले आणि ठाकरेंचे घोडे सत्तेच्या गंगेत न्हाले.
 
 
अखेर एकदाचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर आरूढ झाले. नाही म्हणायला राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा एक बेभरवशाचा आणि काँग्रेस नावाचा अर्धमेला भागीदार जोडीला असला, तरी मुख्यमंत्रिपद तर मिळाले होते. एरवी काँग्रेसच्या काळात गुरगुरण्याची आणि भाजपाशी युतीच्या काळात कुरकुर करण्याची भूमिका मनोभावे पार पाडणाऱ्या शिवसेनेला खरे म्हणजे ही सुवर्णसंधी होती. आपल्या कर्तृत्वाचे झेंडे रोवण्याचा मार्ग शिवसेनेसाठी मोकळा झाला होता. त्यामुळे इतकी वर्षे 'आम्ही यंव करू, आम्ही त्यंव करू' अशा डरकाळ्या फोडणाऱ्या शिवसेनेला आपला वारू चौखूर सोडायला काहीच हरकत नव्हती. मुंबई महापालिकेत तीन दशके सत्ता राबवूनही जी कर्तृत्वाची शिखरे गाठता आली नाहीत, ती शिखरे सर करण्याची 'तीच ती वेळ' आली होती. 
 
मात्र ते व्हायचे नव्हते. कारण भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात तसे 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रशासन चालवण्यासाठी जन्मालाच आलेले नाहीत. ते पक्ष चालवण्यासाठी जन्माला आलेले आहेत.'
 
पक्ष चालवणे आणि प्रशासन चालवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. उद्धव ठाकरेंची पक्षावर मांड आहे, कारण त्यांचे वडील (ज्यांचा हवाला त्यांना पदोपदी द्यावा लागतो) स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मनोमन श्रद्धा असलेल्यांची संख्या आजही कोट्यवधीच्या घरात आहे. वंशपरंपरेने उद्धव बाळासाहेबांची गादी चालवत असल्याचे हे अनुयायी मानतात आणि त्यासाठी उद्धव यांना पूर्ण पाठबळ पुरवतात. भलेही मग ते इतरांना भक्त म्हणून हिणवत असतील, पण भक्तीची ही भावना खास त्यांच्याच अंगवळणी पडलेली. म्हणूनच पक्ष मोडून पडण्याच्या कड्यावर आलेला असताना शिवबंधनाचा धागा बांध, मातोश्रीवर बोलावून बाळासाहेबांच्या प्रतिमेसमोर शपथा-आणा घे असले प्रकार चालतात. त्या चालतात, म्हणून मग पक्षही चालतो.

 
सरकारची गोष्ट वेगळी असते. तिथे एखाद्या विषयाची माहिती घेण्याची, मंत्रीमंडळाला दिशा देण्याची गरज असते. लोकांचा विचार करावा लागतो. प्रशासनातील नाना स्वभावाच्या लोकांना हाताळावे लागते. राज्य चालवताना प्रचंड वेळ द्यावा लागतो. नाना हितसंबंध सांभाळावे लागतात. ‘आले उद्धवजींच्या मना, तिथे कोणाचे चालेना’ असा हडेलहप्पी कारभार तिथे चालत नाही. तरीही मारून-मुटकून हे त्या पदावर बसले आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला.
 
 
राज्याची सगळी गतीच कुंठित झाली. बद्धकोष्ठ झालेल्या माणसाची रया प्रशासनाला, शासनाला आली. आधीच्या सरकारच्या निर्णयांना स्थगिती देणे आणि निर्णय फिरवणे यात उद्धवजींचा सगळा वेळ जाऊ लागला. जलयुक्त शिवार योजनेसारखी ग्रामीण भागाची संजीवनी असो किंवा मेट्रो कारशेडसारखा मुंबई महानगराचा जिव्हाळ्याचा मुद्दा असो, प्रत्येक निर्णय मागे घेण्यात किंवा स्थगित करण्यातच या सरकारची मर्दुमकी दिसू लागली. जोडीला नेहमीची किडूकमिडूक कोट्या असलेली वाक्ये!
 

cm_1  H x W: 0  
 
हा प्रकार महिना-दोन महिने चालतो, तोच मानवजातीवरचे आजवरचे सर्वात भीषण असे कोरोनाचे संकट आले. या संकटासमोर भल्याभल्यांची त्रेधातिरपीट उडाली. तिथे शासन-प्रशासनाशी फक्त मांडवलीपुरता संबंध असलेल्या उद्धव ठाकरेंचा पाड काय लागणार? तेव्हा यांचे उरलेसुरले सोंग गळून पडले. मोरोपंतांचा उत्तर 'बायकांत बालिश बहु बडबडल्या'नंतर शेवटी अर्जुनाला म्हणतो, 'बृहन्नडे! हें कुरुबळ कल्पांतसिंधुसें गमतें, ने रथ पुरात, माजें मन नयन हि पाहतां बहु भ्रमतें।।'
 
 
उत्तराची ती स्थिती कुरुबळ पाहून झाली होती, आपल्या उद्धवजींची स्थिती कोरोनाला बघून झाली, एवढाच काय तो फरक. उत्तराने आपला रथ महालात नेण्याची विनंती केली, उद्धवजींनी आपले बस्तान मातोश्रीतून हलवलेच नाही. लोक कोरोनाने बाधित झाले? होऊ द्या. लोक कोविड विषाणूमुळे मेले? मरू द्या. मी माझे स्थान सोडणार नाही. वाटल्यास अधूनमधून येऊन फेसबुकवर येऊन शिळोप्याच्या गप्पा मारीन, घरातील वडीलधाऱ्या मंडळींसारखे शांत-संयत बोलेन, काही चुकार कोट्या करीन, शब्दांचे खेळ करून परिस्थितीचा विसर पाडेन, पण बाहेर पडून काही प्रत्यक्ष कार्यवाही करणार नाही, ही त्यांची त्या वेळची भूमिका होती. एखाद्या डेली सोप ऑपेरालाही लाजवेल असा यांचा हा फेसबुक ऑपेरा बनला.
 
एकीकडे डॉक्टर, पोलीस यांसारखे घटक जिवाची पर्वा न करता कोरोनासारख्या छुप्या शत्रूशी लढा देत होते. दुसरीकडे राज्य सरकारची यंत्रणा सर्वच स्तरावर अपयशी ठरत होती आणि प्रशासनाचे प्रमुख घरी बसले होते. या कठीण प्रसंगी विरोधी पक्षनेतेपदी असताना देवेंद्र फडणवीस यांनी कोविड केंद्रांचे दौरे करून जबाबदार नेत्याची कर्तव्ये पार पाडली.
 


sanjay_1  H x W 
 
या उलट याच काळात वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाऊ देण्याचे प्रकरण, पालघरमधील साधूंची हत्या, कोविड केंद्रांची अनागोंदी, पुण्यात कोविड केंद्रातील हलगर्जीपणामुळे पत्रकाराचा मृत्यू अशा अनेक घटना घडल्या. निसर्ग चक्रीवादळ, आधी विदर्भामध्ये व मग पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी अशी संकटे आली. परंतु ना सत्ताधारी हलले, ना सत्तेची सूत्रे हलली. याच्या उलट उद्धवजींचे मुख आणि मस्तक असलेले संजय राऊत 'देवांनी मैदान सोडले' अशी मल्लिनाथी करून हिंदूंचा अपमान करत होते. स्वतः मुख्यमंत्री अधूनमधून येऊन “हिंदूंनी आपले सण सगळे निर्बंध पाळून साजरे करावेत, पण मुस्लिमांनी जमल्यास नियम पाळावेत” असा सल्ला देत होते.

 
या काळात मुख्यमंत्र्यांचे शिलेदार ज्याला जे वाटेल ते ज्ञान वाटत होते. परिवहनमंत्री विजेच्या स्थितीवर भाष्य करत होते, गृहमंत्री वैद्यकीय विषयावर बोलत होते आणि कशातच काही न कळणारे लोक शिक्षणावर बोलत होते. कोरोनाचा भीषण काळ नसता, तर एक फक्कड विनोदी फार्स म्हणून हा वग खपला असता.

 
शेवटी तो कोरोनाचा विषाणूच बिचारा दमून-भागून मंदावला आणि रुग्णांची संख्या कमी झाली, तेव्हा ‘अनलॉक’ या नावाने यांनी पुन्हा गोंधळ घालायला सुरुवात केली. आधी हॉटेल उघडण्यात गोंधळ, मग चित्रपटगृह उघडण्यात गोंधळ आणि सरतेशेवटी कडी म्हणजे शाळा उघडण्यातही गोंधळ. त्यासाठी नियमावली बनवायची तोशिससुद्धा घ्यायला हे सरकार तयार नाही. प्रत्येक ठिकाणी स्थानिक पातळीवर हा निर्णय घ्यावा, असा एक मोघम सल्ला देऊन सरकार मोकळे! स्थानिक म्हणजे जिल्हा, शहर, गाव की तालुका, हेसुद्धा निश्चित सांगण्याची तसदी घेतलेली नाही.
 
आणि या सगळ्यांवर कळस म्हणजे वीज बिलवाढीच्या गोंधळाचा. कोरोनाच्या काळात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाढीव वीज बिले आली. या वाढीव बिलांबाबत नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्याची दखल घेत लाजत काजत का होईना, पण लॉकडाउनच्या काळातील वीज बिलात सवलत देऊ, अशी घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली. त्यांनी त्यासाठीची फाइल अर्थमंत्री अजित पवारांकडे पाठवली. निधी नसल्याचे म्हणत अजित पवारांनी ती फाइल परत पाठवली. नंतर राऊत यांनी आपल्या वक्तव्यावरून सपशेल घूमजाव केले. एकुणात काय, तर सरकारने सूट देण्याच्या संदर्भात नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली.
 
थोडक्यात म्हणजे २८ नोव्हेंबर २०१९ रोजी गोरज मुहूर्तावर शिवाजी पार्कवर शपथ घेतल्यापासून या सरकारने अपयशांची एक मालिकाच सुरू केली. या वर्षभरात उद्धव ठाकरेंच्या नावावर केवळ शून्य आणि शून्य जमा झाली. उलट सोबत घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या पापांचे धनी व्हावे लागले. चि.त्र्यं. खानोलकरांनी आपल्या नाटकाच्या नायकाला 'एक शून्य बाजीराव' असे नाव दिले. आपल्याकडे चालू असलेल्या महाराष्ट्र विकास आघाडी नावाच्या नाटकाचे नायक 'एक शून्य उद्धवराव' आहेत.
 
देविदास देशपांडे
8796752107