‘तिसर्या पर्यायाकडे’ ज्ञानाचा तिसरा डोळा!

विवेक मराठी    27-Nov-2020
Total Views |
 @डॉ. कुमार शास्त्री 
 
वर्तमानाची इतकी चिकित्सक व कठोर समीक्षा करणारे दत्तोपंत, पुढे जागतिक वैचारिक पोकळी भरून काढणारे, एक समग्र वैश्विक जीवन दृष्टीकोन देणारे युगानुकूल व आधुनिकोत्तर काळासाठी एक सशक्त वैचारिक पाथेय देतात - थर्ड-वे! हा ‘थर्ड-वे’ देण्याची नैतिक व ईश्वरदत्त जबाबदारी भारतावर आहे. राष्ट्र पुनर्निर्माणाच्या ध्येयाशी समर्पित असलेला राष्ट्रभक्तांचा वर्गच हे परिवर्तनाचे कार्य पूर्ण करण्यासाठी कळीची भूमिका बजावेल, नव्हे, हेच हिंदू जीवन-दृष्टीकोनाचे खरे वैश्विक ध्येयव्रत आहे, अशी वैचारिक साद दत्तोपंत ‘तिसर्या पर्यायाकडे’मधून घालतात. श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या विषयावर ऊहापोह करणारा लेख.


RSS_4  H x W: 0 
श्रद्धेय दत्तोपंत हे मूलत: दार्शनिक व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या भाषणातून, लिखाणातून, विविध भाष्यांमधून, त्यांचे द्रष्टेपण अधोरेखित झाले आहे. मराठी, संस्कृत, हिंदी,बंगाली, मल्याळम आणि इंग्लिश भाषांवर प्रभुत्व असणार्या दत्तोपंतांनी विपुल लेखन केले आहे. डझनभर पुस्तके इंग्लिशमधून आहेत, तर दोन डझनाहून अधिक हिंदी व इतर भाषांतून. पण दत्तोपंतांचे खरे ‘वैचारिक देणे’ प्रकट झालेय ते ‘थर्ड-वे’- ‘तिसर्या पर्यायाकडे’ या पुस्तकातून. पंडित दीनदयाळजी म्हणताक्षणी त्यांची ‘एकात्म मानव दर्शन’ ही बौद्धिक संपदा डोळ्यापुढे जशी उभी होते, तशीच दत्तोपंतांचे नाव घेताच त्यांच्या ‘तिसर्या पर्यायाकडे’ (थर्ड-वे) लक्ष वेधले जाते!
कारण ‘तिसर्या पर्यायाकडे’ हा दत्तोपंतांनी मांडलेला राष्ट्रीय पुनर्निर्माणाचा युगानुकूल दिशावेध आहे. तो शाश्वत, वैश्विक सूत्रांचा एक संग्रहच आहे. हिंदुत्वाच्या मूळ बीजरूप प्रारूपाचे, संकल्पनेचे हे एक प्रगत उन्मीलन (झीेसीशीीर्ळींश र्ीपषेश्रवाशपीं) आहे.
मँचेस्टर येथील विदेशी पत्रकारांसमोर व पत्रपरिषदेसमोर पं.दीनदयाळजींनी एक मार्मिक विधान केले होते - “ढहश ुेीश्रव ळी ीींरपवळपस रीं ींहश लीेीीीेरवी ेष लेपर्षीीळेप!” संपूर्ण जगत एका भ्रांत अशा विभ्रमाच्या चौरस्त्यावर उभे झालेय! हे म्हणण्यामागे त्यांना म्हणायचे होते की, भांडवलशाही आणि साम्यवाद दोन्ही विचारधारांनी जगाला संभ्रमात टाकले आहे. आणि हा संभ्रम दूर करण्यासाठी त्यांनी एकात्म मानव दर्शन (विचारव्यूह) हा सिद्धान्त मांडला. या एकात्म मानव दर्शनच्या ग्रंथांना दत्तोपंतांनी जी प्रदीर्घ प्रस्तावना दिली आहे, तीच मुळी 166 पानांची! ही प्रस्तावना वाचतानाचा दत्तोपंताचा एकूणच दांडगा व्यासंग वाचकाला थक्क करून टाकतो. या प्रस्तावनेचे नाव आहे ‘अथातो तत्त्वजिज्ञासा’! मला तर हे वैचारिक देणे हे ‘थर्ड-वे’चे बीजांकुरण वाटते. एक छोटे ट्रेलर! पुढे ’राष्ट्र’ या श्रीगुरुजींच्या पुस्तकाला ‘पुण्याहवाचन’ या नावाने लिहिलेली प्रदीर्घ प्रस्तावना दत्तोपंतरूपी वामनाचे दुसरे वैचारिक पाऊल वाटते अन् तिसरे वैचारिक पाऊल, ज्याने पाश्चात्त्य विचारव्यूहाला पाताळात घातले, ते म्हणजे ‘तिसर्या पर्यायाकडे’! थर्ड-वे!
 
 
साम्यवादाच्या अपयशानंतर व भांडवलशाहीचीही त्याच मार्गावरील वेगवान अधोगती झाल्यावर जगातले बुद्धिवंत, प्रबोधनकारक, गत दशकांपासून ‘तिसर्या पर्यायांचा शोध घेत होते. अशा वेळी अगदी अनादी कालापासून, आमच्या कालजयी संस्कृतीतून, शाश्वत मूल्यांतून, विकसित झालेला हिंदू जीवन-दृष्टीकोन, त्याची समग्र जीवन विचारधारा व एकात्म आंतरिक दृष्टीकोन, हाच वर्तमान अराजक अवस्थेत संत्रस्त असलेल्या मानवतेला ‘तिसरा व एकमेव पर्याय’ म्हणून मार्गदर्शक ठरू शकेल, अशी दत्तोपंतांची अटळ श्रद्धा होती! ‘तिसर्या पर्यायाकडे’ या ग्रंथातून दत्तोपंतांनी समाजापुढे हीच वैचारिक श्रद्धासुमने ठेवली आहेत.
दत्तोपंत क्रांतदर्शी होते. प्रचारकाचे त्यांचे संघजीवन जगताना, त्यांनी वर्तमानाची कठोर समीक्षा केली. भारतीय संसदेचे ते राज्यसभेचे सदस्य असताना या कठोर समीक्षेचा पट आणखी विस्तारत गेला. प्रगल्भ झाला. यावेळी राष्ट्रीय प्रश्नांचे गांभीर्य, आंतरराष्ट्रीय पटलावरील घडामोडी, भविष्यात उद्भवणार्या समस्या, पश्चिमी जगतांतील पडझड व तत्कालीन घालमेलीची अवस्था, रशियाच्या पतनाची घटना व तिचा पूर्ववेध, चीनच्या साम्राज्यवादी भूमिकेची चाहूल, जागतिकीकरणाच्या नावे अमेरिकेचा व युरोपीय देशांचा ‘आर्थिक साम्राज्यवाद’ या बाबी त्यांनी पूर्वानुमानाने ओळखल्या होत्या. दत्तोपंत मूलत: व्यासंगी व्यक्तिमत्त्व असल्याने, सशक्त व चौफेर वाचनाचा त्यांचा आवाका त्यांनीच उद्धृत केलेल्या अनेक बौद्धिक संदर्भांतून या पुस्तकात व्यक्त होतो.
पश्चिमी जगतातील विद्वान युरोपीय अर्थवेत्ते, तसेच विविध राजकीय भाष्यकार तर ते जाणतच होते, याशिवाय आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, उरुग्वे, मेक्सिको, पेरू, क्यूबा, ऑस्ट्रिया, इटली, स्पेन, बेल्जियम येथील विचारवंतांची मतमतांतरे दत्तोपंत संदर्भसूत्र म्हणून इतक्या सहजतेने देतात की इथेच त्यांची ऋतंभरा प्रज्ञा वाचकाला अवाक् करून जाते, हे विशेष!
पाश्चिमात्त्य जगतातील अर्थविज्ञान, समाजविज्ञान, राज्यप्रणाली व विविध व्यवस्था, तसेच पाश्चात्त्य इतिहास यांचे त्यांनी काळाच्या कसोटीवर मूल्यमापन केले. पश्चिमी विचारव्यूहातील तार्किक उणिवा स्पष्टपणे अधोरेखित केल्या. पश्चिमी विचारव्यूह हा दयनीय अपयशानंतर मानवाला व समाजाला कल्पांताच्या कड्यावर नेऊन कडेलोट करणार काय? असा जागतिक प्रश्न त्यांनी बुद्धिजीवींपुढे उभा केला!
 
 
वर्तमानाची इतकी चिकित्सक व कठोर समीक्षा करणारे दत्तोपंत, पुढे जागतिक वैचारिक पोकळी भरून काढणारे, एक समग्र वैश्विक जीवन दृष्टीकोन देणारे युगानुकूल व आधुनिकोत्तर काळासाठी एक सशक्त वैचारिक पाथेय देतात -‘थर्ड-वे’!
हा ‘थर्ड-वे’ - हा ‘तिसरा पर्याय’ देण्याची नैतिक व ईश्वरदत्त जबाबदारी भारतावर आहे. राष्ट्र पुनर्निर्माणाच्या ध्येयाशी समर्पित असलेला राष्ट्रभक्तांचा वर्गच हे परिवर्तनाचे कार्य पूर्ण करण्यासाठी कळीची भूमिका बजावेल - नव्हे, हेच खरे हिंदू जीवन-दृष्टीकोनाचे वैश्विक ध्येयव्रत आहे,अशी वैचारिक साद, दत्तोपंत ‘तिसर्या पर्यायाकडे’मधून घालतात. (पृ. 279.)
दत्तोपंतांचे हे समस्त विचारधन मराठी भाषेतून अनुसर्जित केलेय ते मुंबईचे विचारवंत डॉ.मधुकर पुरुषोत्तम (बापू) केंदूरकर यांनी! ‘थर्ड-वे’ या मूळ इंग्लिश पुस्तकाचा मराठी अनुसर्जन-रूपबंध म्हणजे ‘तिसर्या पर्यायाकडे’! स्वत: दत्तोपंतांनी या मराठी पुस्तकाची प्रशंसा करताना स्पष्ट केलेय की मूळ प्रतिपादनाची स्पष्टता, सुगमता व सुसूत्रता लेखाकाने चांगली साधली आहे. ही प्रशस्ती या पुस्तकाबाबत बरेच काही सांगून जाते.
 
RSS_2  H x W: 0
 
1976 ते 1995 या काळातील दत्तोपंतांची विविध वैचारिक भाषणे, लेख यांचा एक सूत्रबद्ध मागोवा लेखकाने महत्प्रयासाने ‘एकात्म विचार’ म्हणून गुंफला आहे. नवीन पिढीला, हिंदुत्वाच्या अभ्यासकाला दत्तोपंतांच्या या विचारधनाची ही अनुपम भेट वाचकांसाठी ‘तिसरा डोळा’ जागवतो हे विशेष.
 
 
खरोखरीच, दत्तोपंतांचे ‘तिसर्या पर्यायाकडे’ हे वैचारिक देणे मला तरी ज्ञानाचा तिसरा डोळा वाटतो. माणसाचे दोन डोळे दृष्टीकोन देतात, तर ज्ञानाचा तिसरा डोळा प्रबोध शक्ती उलगडतो. गुरुतुल्य व्यक्तीच असे प्रबोधन करीत असतात. प्रस्तुत पुस्तकाच्या वाचकाला ‘ज्ञान होय अम्हासी’ या उक्तीचा प्रत्यय येतो! याचे कारण, या जगताचे शाश्वत, वैश्विक सूत्र, हे वैश्विक ऐक्याचे व मानवी कल्याण साधणारे आहे. जगतकल्याणाची हिंदू संकल्पना योगी अरविंदांनी ‘सामूहिक अध्यात्मीकरणातून’ मांडली, तर ज्ञानेश्वरांच्या पसायदानातून वा वेदांतील शांतिमंत्रातूनसुद्धा ती प्रकट झाली आहे. हीच विश्वव्रताची हिंदू संकल्पना एका नव्या पॅरॅडाइममध्ये, नव्या दृष्टीकोनातून, तसेच पाश्चात्त्य व पौर्वात्य, आधुनिकीकरण आणि पश्चिमीकरण अशा तौलनिक अभ्यासाद्वारे प्रस्तुत पुस्तकातून वाचकांसमोर ठेवली आहे.
 
 
पश्चिमी विचारवंत इमर्सन, पॉल मार्टिन ड्युबोस्ट किंवा अर्नोल्ड टॉयम्बी यांनासुद्धा पश्चिमी जगातील सध्याच्या ‘निर्वाणीच्या अवस्थेची’ चाहूल आधीच लागली होती. टॉयम्बी तर म्हणतो, “आपण सध्या अजूनही जगाच्या इतिहासाच्या संक्रमणात्मक पर्वात राहत आहोत. हे पर्व जर मानवजातीच्या आत्मघातात संपवायचे नसेल, तर पश्चिमी आरंभ असलेल्या या पर्वाचा शेवट मात्र भारतीयच असला पाहिजे.” (पृ.287.)
 
 
प.पू.श्रीगुरुजी याच आशयाच्या, कवी टेनिसनच्या ‘द प्ले’ या कवितेचे एक मार्मिक अवतरण देत असत - ‘प्रथमांकी दु:खभर्या दुनियेचा रंगमंच प्रवेशांतरातही भरुनि राही दु:ख तेच धीर धरि रसिका, पण नाट्य विश्वकर्मी हा पंचमांकी उलगडील नाट्यभूत अर्थ महा!’ याचा अर्थ, स्वभावत:च पराभूत होणार्या भौतिक उद्धटपणाचे तमोयुग संपून पूर्व-पश्चिमेच्या सर्व मानवतावाद्यांच्या अधीर प्रतीक्षेतील, एका नव्या वैश्विक व्यवस्थेचा शुभारंभ जवळ आला आहे....!(पृ.290.)
ही नवी वैश्विक व्यवस्था म्हणजेच ‘तिसर्या पर्यायाकडे’-‘थर्ड-वे’ आहे!
 
 
खरे तर एकूणच प्रस्तुत पुस्तक मुळातून वाचायला हवे. कारण विश्वव्यवस्थेचा कॅनव्हासच खूप मोठा आहे. त्यातील तौलनिक अभ्यास, प्रबोधनकारांचे संदर्भ, पाश्चात्त्य अर्थवेत्ते, त्यांचे विवेचन असा खूप मोठा वैचारिक विषय आहे. इतिहास, तत्त्वज्ञान, अर्थकारण, समाजकारण, राजकारण विविध विचारप्रवाह व त्याची समीक्षा हे सगळेच विश्लेषण मुळातून अभ्यासण्यात वेगळा बौद्धिक आनंद आहे. केवळ परिचय म्हणून काही कळीच्या मुद्द्यांना इथे स्पर्श करतोय. प्रस्तुत पुस्तकातील अर्थशास्त्राचे चिंतन असो वा राजकीय संकल्पनांचे विश्लेषण, एकेक विषय स्वतंत्र लेखनाचा व चिंतनाचा विषय आहे. त्यामुळे केवळ मूळ विषयाचा गाभा तेवढा मांडण्याचा हा तोकडा प्रयास इथे करतोय.
 
 
दत्तोपंतांचे समग्र वैचारिक विश्लेषण एका वाक्यात सांगायचे, तर ते आहे ’अथातो तत्त्वजिज्ञासा!’ एकात्म मानव दर्शनाच्या प्रस्तावनेत दत्तोपंतांनी हेच शीर्षक दिले आहे. ही तत्त्वजिज्ञासा विचारधारांची, विचारव्यूहांची, विविध व्यवस्थापक प्रणालींची आहे.
विशेषत: राष्ट्रीय पुनर्बांधणीची जी वैचारिक चौकट आपण स्वातंत्र्योत्तर काळात स्वीकारली, तिचे औचित्य पुनश्च तपासून पाहणे हा या तत्त्वजिज्ञासेचा प्रधान उद्देश आहे. कारण आपल्या राष्ट्रीय जीवनाची सर्वच अंगे - राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक - आज कमालीची संकटग्रस्त आहेत, असे का व्हावे? जागतिक पातळीवर तर आज माणूस हरवला, समाज दुभंगला, अन् निसर्ग खंगला असे पराभवाचे, दारुण अपयशाचे चित्र जगासमोर का उभे व्हावे? जग आणि जीवन याकडे बघण्याची आमची पृथकतावादी दृष्टीच दोषपूर्ण ठरतेय का? या नात्याने 17व्या शतकाच्या आसपास जी युरोपीय प्रबोधनवादाची पाश्चात्त्य विचारसरणी जगावर लादली गेली, ती कितपत ग्राह्य आहे, याचा मुळापासून विचार होण्याची गरज आहे... नव्हे, ती काळाची गरज आहे.
‘युरोपीय प्रबोधनवाद’ या विचारसरणीची मुळे इतिहासात 17व्या शतकापूर्वी थेट बेकनच्या व गॅलिलिओच्या काळापर्यंत मागे रेटता येईल. विवेकवाद, बुद्धिप्रामाण्यवाद, विज्ञाननिष्ठ जीवनदृष्टी, धर्माची राजकीय जीवनातून फारकत, व्यक्तिकेंद्री, सुखवादी अशी जीवनदृष्टी, ज्ञान म्हणजे सत्ता आणि शक्ती, तंत्रज्ञानाच्या विकासाला प्राधान्य व तांत्रिक विकास म्हणजेच मानवी समाजाचा विकास, असे समीकरण प्रस्थापित करणारा हा सगळा विचारव्यूह असलेली ही प्रबोधनवादाची तत्त्वे होती. जगालाही या तत्त्वांनी प्रारंभी भारावून टाकले. इहवाद, सुखवाद, उपभोगवाद, चंगळवाद, अर्थकेंद्री, व्यक्तिकेंद्री जीवनपद्धती यातूनच परिणामत: जन्माला आली. यामुळे मूल्यांचा विचार, नैतिकतेचा विचार, मानवी जीवन, समाजजीवन, त्यातील सौहार्द, प्रेम व भावनांचा विचार हा सगळा नैतिक विचारव्यूह मागल्या आसनावर गेला आणि अर्थकेंद्री, बाजारकेंद्री, पैसाकेंद्री, तंत्रविकास नि साधनांचा व माध्यमांचा विकास परिणामी प्रधान ठरू लागले! मूल्य, गुणात्मकता या बाबी गौण ठरू लागल्या, परिणामी सत्ता, ताबा, कब्जा, स्वामित्व या संकल्पनांच्या चौकटीत जीवनाच्या यशाचा व विकासाचा विचार करणारी एक दृष्टी रूढ आणि दृढ झाली. तिने जगावर 300 वर्षे राज्य केले आणि ते करण्यासाठी अर्थात हिंसा व महायुद्धेसुद्धा इतिहासाने बघितली!
 
RSS_3  H x W: 0
 
विशेष असे की, हीच विचारसरणी आम्ही स्वातंत्र्योत्तर काळात भारतातही आयात केली. तत्कालीन नवभारताच्या जडणघडणीसाठी आपण उदारमतवाद आणि समाजवाद यांचे नेहरूप्रणीत मॉडेल - ‘मिश्र अर्थव्यवस्था’ आम्ही स्वीकारली.
भारत एक सार्वभौम, लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष असे राष्ट्र आहे ही संविधानाची घोषणा केली. यातील एकही संकल्पना अस्सल भारतीय नाही. या संकल्पनांचा उदय युरोपातील प्रबोधनवादाशी प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे निगडित आहे. आज सत्तर वर्षांनंतर सर्वच आघाड्यांवर अपयश व संकटग्रस्तता दिसू लागल्यानंतर आज सर्वच विचारवंत या आयात केलेल्या संकल्पनांचा पुनर्विचार करत आहेत, ही जमेची बाजू म्हणावी लागेल!
 
 
‘दिशावेध’, ‘भौतिक विकास संकल्पना’, ‘संविधानात्मक राजकीय व्यवस्थेकडे’, ‘हिंदू जीवनदृष्टी’ इत्यादी या प्रकरणांमधून प्रस्तुत पुस्तकातून वरील संकल्पनांबाबत भरपूर विचारमंथन केलेले आहे. युरोपीय प्रबोधनवादातील तार्किक उणिवा कोणत्या, त्यामुळे व्यवस्थेवर, प्रणालीवर त्याचे गंभीर परिणाम कसे झालेत, या सर्वांचा परिणाम म्हणून जीवनाची सर्वच क्षेत्रे, न्याय, शिक्षण, पर्यावरण, अर्थकारण, राजकारण, सांस्कृतिक क्षेत्रेसुद्धा कशी भ्रष्ट नि संकटग्रस्त झाली आहेत, याचा संपूर्ण मागोवा तर्कशुद्धपणे या पुस्तकातून मांडला आहे, म्हणूनच हे पुस्तक मुळातून वाचणे अभिप्रेत आहे.
 
 
दत्तोपंतांनी सर्वच संकल्पनांचा परामर्श घेताना काही सूत्रे स्पष्ट केली आहेत-1) पश्चिमी नमुना हाच एकमेव प्रगतीचा आणि विकासाचा वैश्विक नमुना आहे, या दृष्टीकोनाला आमची मान्यता नाही. 2) आधुनिकीकरण म्हणजे पश्चिमीकरण हे सूत्र आम्हाला मान्य नाही, 3) तथाकथित प्रगत देशांचे आंधळे अनुकरण करण्याचा काहीच उपयोग नाही! गुरुदेव टागोर म्हणतात, “प्रत्येक देशाच्या प्रश्नाची प्रश्नपत्रिका वेगवेगळी आहे... तिसर्या जगात अस्तित्वात असलेल्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय परिस्थितीत व युरोपीय देशांतील परिस्थितीत साम्य वा समांतरता नाही... त्यामुळे त्या देशांनी स्वत:च्या परंपरा व आवश्यकता यांच्या अनुषंगाने स्वत:च्या समृद्धीचा मार्ग चोखाळावा.” (पृ.33.)
 
 
तसेच पुढे दत्तोपंत एक बाब स्पष्ट करतात- “केवळ पश्चिमी आहे म्हणून स्वीकार वा धिक्कार करावा हे बरोबर नाही. ज्ञान व सत्य हे स्वभावत: वैश्विक आहे. सत्यामध्ये वर्गीय, जातिनिविष्ट वा राष्ट्रसापेक्ष असे काहीही नसते.”
 
 
 
ज्ञानाचा परिस्थितीनुसार चिकित्सा करून, काय आत्मसात करायचे हे विज्ञान व तंत्रज्ञानाला ठरवायचे आहे. पश्चिमी राष्ट्रे ही नवजात राष्ट्रे असल्यामुळे त्यांची विचारप्रक्रिया व दिशा अप्रगल्भ आहे. धर्म, नीती, तत्त्वज्ञान या संदर्भात तर पश्चिमी राष्ट्रे अल्पवयीन आहेत. यामुळे पश्चिमेचे आंधळे अनुकरण हे आमच्या प्रतिभेची दिवाळखोरी वा पराकोटीची न्यूनगंडता व्यक्त करेल! या संदर्भात मेक्सिकोतील प्रसिद्ध लेखक इव्हॅन इलिच याचे ‘विकासाचे मिथ्य’ हा अनुभवही दत्तोपंत परखडपणे तिथे नोंदवतात.
राष्ट्रीय पुनर्रचनेच्या संदर्भात भौतिक व अभौतिक अशा दोन्ही प्रकारच्या मूल्यांद्वारा व्यक्तिगत विकास साधणारी समन्वयात्मक, परस्परपूरक अशी व्यवस्था हिंदू जीवनदृष्टीने विकसित केली आहे, हे स्पष्ट करताना महत्त्वाचे असे की, हिंदू जीवनदृष्टीत ‘नूतनीकरण’ हा परंपरेचा शत्रू नाही, उलट ‘परंपरा’ नि ‘नवता’ दोन्हीचा ती मिलाफ घडविते. तसेच परिवर्तनाला आमचा विरोध नाही. पण परिवर्तन कशाचे करायचे? भूतकाळाच्या वारशाची चिकित्सा करून जे वैश्विक, चिरसनातन आहे ते ठेवायचे आणि जे कालबाह्य, निरुपयोगी असेल ते टाकायचे! चिकित्सक स्वीकारातून सेंद्रिय एकात्मतेने सामावून घेणे हीच आमच्या संस्कृतीची शिकवण आहे. डॉ. राधाकृष्णन यांनी म्हटल्याप्रमाणे, “भारताचा जीवित हेतूच अनेकतेत एकत्व पाहणे आहे. भेद पुसून नव्हे, तर भेद राखून एकात्म, एकसंघ अनुभवणे, ती अनुभूती प्रत्यक्षात आणणे, हे भारताचे मूलभूत उद्दिष्ट आहे!” (पृ.56.)
 
 
पुढील प्रकरणात वसाहतवादाची कूटनीती, साम्राज्यवादी सत्तांचा विस्तार, जागतिक मूलतत्त्ववाद, राष्ट्रबाह्य दहशतवाद, इहवाद, मानवपेशी-केंद्री मानवतावाद या स्थित्यंतरात्मक संकल्पनांचा आढावा भौतिक विकास संकल्पनेच्या अनुषंगाने घेतला आहे. आधुनिकीकरणाला आमचा विरोध नाही. वर्तमान व नजीकच्या काळाची वैशिष्ट्ये ओळखून पद्धती अवलंबणे इथे अभिप्रेत आहे, पण याचा युरोपीय अर्थ (पश्चिमीकरण) अप्रस्तुत ठरतो. इथे दत्तोपंत अरेबियाचे राजे फाहद, तुर्कस्थानचा गाझी मुस्ताफा, गुन्नर मिरडाल, जोमो केन्याटा, सीझर शावेद, मार्टिन ल्यूथर किंग, डॉलिनौ डोल्सी, वेनियो नियॉन या श्रेष्ठींचा पश्चिमीकरणाला कसा विरोध होता, हे सविस्तर देतात.
 
 
दुसर्या महायुद्धानंतर, आंतरराष्ट्रीय घटना व विकसित व विकसनशील राष्ट्रे यांच्या नात्यांमधून, ‘पश्चिमी नमुना स्वीकारणे’ हाच विकासाचा वैश्विक नमुना स्वीकारणे, ही भावना जगात कशी सार्वत्रिक रुजवली गेली, पण तिचा स्वीकार व नकार आमच्या राष्ट्रीय मानसात कसा बसत नाही, हेही दत्तोपंत उदाहरणासह स्पष्ट करतात.
 
 
 
दत्तोपंतांनी मांडलेले मुक्त व्यापारापासूनचे ‘आर्थिक चिंतन’ स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. डमस्मिथ, रिकार्डो, मार्शल, रॉबिन्स, मार्क्स ते अगदी हेक्शर ओलिन यांचे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, या विचारवंतांचा ते मागोवा घेतात. तसेच उदारमतवाद, भांडवलशाही, समाजवाद, साम्यवाद हा सगळा आर्थिक विश्लेषणाचा मूळ गाभा नवीन अभ्यासकांसाठी वैचारिक खाद्य पुरवणारा अभ्यासनीय दस्तऐवज आहे. अमेरिकेची दुटप्पी नीती, जपानी निर्यात व्यापार नीती, गॅट करार, डंकेल प्रस्ताव, जागतिकीकरण, तसेच अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्र यांची फारकत, स्वदेशीची प्रखर संकल्पना, आर्थिक गुलामगिरीविरुद्ध लढा, हे सगळे, तसेच आजचे अर्थकारण कसे ‘साम्राज्यवादी’ झाले, यातून विषमता शोषणकारक व्यवस्था, नफाखोरी, पर्यावरणीय संकटे कशी उभी झाली आहेत, हे आर्थिक जगताचे विदारक वर्तमान ’वास्तव’ हा जवळपास शंभर पानांचा विस्तारपट आहे.
 
 
संक्षेपाने, दत्तोपंतांच्या मते ‘उत्पादनवाढ म्हणजे विकास हे समीकरणच भ्रामक आहे.’ अमर्याद उत्पादन, अनिर्बंध उपभोग, तसेच आक्रोशकारक दुकानदारी, भंपक बाजारू व्यवस्था, मोठे-विशाल प्रकल्प, मोठ्या शहरांसाठी केंद्रीकरण, मक्तेदारी व त्यासाठीच विज्ञान, तंत्रज्ञान वापरणे भांडवलशाहीचे द्योतक आहे. कृत्रिम गरजा व ‘हायटेक जीवनशैली’ हे घटक म्हणजे विकास!
 
विकासाच्या या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर पाश्चात्त्य विचारवंतांजवळ नाही, कारण यांत जीवनाच्या साफल्याचे तर्कशास्त्र नाही व समाजाच्या रचनेचेही तर्कशास्त्र नाही. मानवी जीवनाचे अंतिम श्रेयस काय? जीवनहेतू काय, जीवनसाफल्य काय, याचीही उत्तरे नाहीत, नैतिकता तर या व्यवस्थेने संपुष्टातच आणली आहे!
 
 
या पार्श्वभूमीवर एकूणच जीवनदृष्टीचा युगानुकूल अन्वय व प्रत्यक्ष कार्यवाही, त्या आनुषंगिक अर्थरचना, विकास संकल्पना याचा विचार हिंदू जीवनदृष्टीतून करणे आवश्यक आहे, याकडे दत्तोपंत लक्ष वेधतात. इस्लामी अर्थतज्ज्ञ, विचारवंत यादृष्टीने जसे विचार करीत आहेत, तसेच भारतातही चिंतन कसे सुरू आहे याचा ते मागोवा घेतात. अर्थशास्त्रकार ‘कौटिल्य’, शुक्रनीती, हिंदू अर्थचिंतन करणारे, मान्यवर के. टी. शहा, के. व्ही. रामास्वामी अय्यंगार, के.जी. गोखले, के.एम.मुशी, आळतेकर, घोषाल, जयस्वाल, मुखर्जी, एस.के.मैत्र व नागपूरचे डॉ.म.गो.बोकरे या प्रभृतींच्या प्राचीन भारतीय अर्थशास्त्राच्याअभ्यासाकडे, हिंदू अर्थशास्त्राकडे दत्तोपंत लक्ष वेधतात. ही सर्व प्रासादचिन्हे ते मार्गदर्शक मानतात.
 
 
1972मध्ये श्रीगुरुजींनी आर्थिक समस्यांबाबत (ठाणे बौद्धिकात) जो मूलभूत हिंदू दृष्टीकोन स्पष्ट केला, त्यात जीवनाच्या समग्रतेचा व एकात्मतेचा संदर्भ दिला आहे. या संकल्पनेच्या आधारे आर्थिक विचार विकसित होऊ शकतो. या विचाराचाही मागोवा घेणे जरुरी आहे (पृ.149.) पुढे डॉ.पी. आर. ब्रह्मानंद यांच्या ‘धर्मानॉमिक्स’चा उल्लेख करून, पश्चिमी व हिंदू दोन विचारधारांची मूल्य व्यवस्था, संस्थात्मक रचना व संदर्भ निकष हेही कसे वेगवेगळे आहे, हे सविस्तरपणे ते नोंदवितात.
 
 
पश्चिमी विचारधारेत ‘द्वैत विचार’, पृथगात्मता, कप्प्याकप्प्यांची विचारप्रक्रिया आहे. (मालक व मजूर, पती व पत्नी, व्यक्ती व समाज) प्रसिद्ध तत्त्ववेत्ता इरिस मरडॉक याला पृथगात्म, द्वैती विचारधारा मानतो, यात संघर्ष, ईर्षा, स्पर्धा व हिंसेला प्रवृत्त करणारा विचार मानतो. त्याने ‘ब्रोकन टोटॅलिटी’ - ‘दुभंगलेली समग्रता’ असे या विचारव्यूहाचे ग्रंथरूपाने वर्णन केलेले आहे. ही व्यवस्था एरिक फॉर्मनेही सांगितल्याप्रमाणे संग्रहप्रधान व संचयप्रधान आहे, हेही लक्षात घ्यायला हवे.
 
 
 
तर ‘भारतीय विचारधारा’ ही एकात्म विचारप्रक्रिया व परस्परपूरक, परस्परानुकूल, अवयवअवयवी समाजरचना अशी व्यवस्था निर्देश करणारी आहे. पं. दीनदयाळजींच्या एकात्म मानव दर्शनाचा आर्थिक विचार जो विकेंद्रीकरणावर, श्रमप्रधान तंत्रज्ञानावर आधारित आहे, तोच दत्तोपंत आर्थिक चिंतनाची सूत्रे म्हणून नोंदवतात. यात जीवनसमग्रतेचे चिंतन असून अंतरंगातून एकात्म भाव प्रकटला आहे. ‘संविधानात्मक व्यवस्थेकडे’ हे पूर्ण प्रकरणच संविधान, शासन व्यवस्था, न्यायपालिका या तिहेरी व्यवस्थांची कठोर समीक्षा करणारे आहे. प्राप्त वर्तमानात संविधान हे विकासाचे माध्यम आहे, हे मूळ सूत्र आहे. सध्याच्या सामाजिक, राजकीय, शासकीय पर्यावरणात व्यवस्था राबवण्याची, विविध यंत्रणा निर्माण करण्याची जबाबदारी देशाच्या संविधानात्मक अनुषंगाने होत असते. भारताच्या संविधानात्मक संकल्पनेवर व रचनेवर, तसेच न्यायव्यवस्था व तिच्या रचनेवर पश्चिमी नीतीचा व आकृतिबंधाचा जबरदस्त प्रभाव आहे. यामुळे इथेही भारतीय सांस्कृतिक सत्त्वाच्या आधारावर पुनर्विचार करण्याची, भारतीय राजकीय संरचनेला तिसरा पर्याय देण्याची आवश्यकता आहे.
 
 
 
स्वतंत्र भारतात शासकीय व्यवस्था, प्रशासन, शासकीय सवयी, शासकीय पद्धती, कायदेव्यवस्था ब्रिटिश पद्धतीनुसार तत्कालीन शासनाने कायम ठेवल्या. वसाहतवादी कायदेव्यवस्थाच परिवर्तनाची दखलही न घेता जशीच्या तशीच राबवण्यात आली आहे. ब्रिटिश न्यायव्यवस्थेतील लॉर्ड डेनिंग यांनी स्पष्ट केलेले सर्व दोष आजही न्यायव्यवस्थेत जसेच्या तसे आढळतात. राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकीयीकरण हीच शोकांतिका आजही दिसून येते. भारतीय घटनेच्या संदर्भातील परभृततेचा प्रभाव स्पष्ट करताना महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, एम. एन. रॉय, घटना समितीचे इतर मान्यवर सदस्य यांची मते त्यांनी उद्धृत केली आहेत. तसेच इंग्लंडची घटना, फ्रान्सची एकात्म घटना यांचे, इतर देशांच्या संविधानाचे दाखले देत तुलनात्मकदृष्ट्या आपण कुठे आहोत याची समग्र चर्चा इथे वाचायला मिळते. लोकशाहीची शोकांतिका, धर्मनिरपेक्षता-एक भ्रम, राष्ट्र-राज्य संकल्पना या बाबी राज्यशास्त्राच्या अभ्यासकासाठी नव्हे, तर राजकीय क्षेत्रातील सजग अशा प्रत्येक नागरिकाने वाचावे व चिंतन करावे असा हा सगळा गृहपाठ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय लोकशाही व सामाजिक लोकशाही यावर केलेले भाष्य, तसेच राजकीय समता व सामाजिक विषमता या विसंगतीवर संसदेत दिलेला गंभीर इशारा आमची राजकीय राष्ट्रीय शोकांतिकाच दर्शवते. वाचकांनी या बाबीचे चिंतन करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य ठरते.
 
 
सारांशाने, दत्तोपंतांनी वर्तमानातील जागतिक सभ्यतेची एक नैतिक-सांस्कृतिक समीक्षा मांडून तिला एक तितकाच मूलगामी असा पर्याय म्हणून ‘तिसर्या पर्यायाकडे’ हा एक प्रबोधनकारी मार्ग ‘पाथेय’ म्हणून दिला आहे. जगाचा द्वैती, पृथकतावादी, तुकड्यातुकड्यांनी विचार करून आता चालणार नाही, तर एक विश्वव्यापी अशी जीवनसमग्रतेची जीवनदृष्टी अधिष्ठान म्हणून असलेली व्यवस्था जगाला आज अभिप्रेत आहे. ज्या व्यवस्थेसाठी, ज्या पर्यायासाठी मानवजातीचा आकांत चालला आहे, तो तिसरा एकमेव पर्याय देण्याची ‘ईश्वरदत्त’ जबाबदारी भारतावर आहे. दत्तोपंत म्हणतात, “राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या ध्येयाशी समर्पित असलेला हिंदू जीवन दृष्टीकोन जपणारा राष्ट्रभक्तांचा वर्गच या कामाला लायक आहे, तोच या नवीन समग्र वैश्विक जीवन दृष्टीकोन तयार करण्यामध्ये कळीची भूमिका बजावेल!” (पृ.279.)
 
 
एकूणच, दत्तोपंतांनी दिलेले हे विचारांचे नवनीत ‘अर्थतो तत्त्व जिज्ञासाच्या’ विचारमंथनातून साकारले आहे. ‘तिसर्या पर्यायाकडे’ हे पुस्तक कार्यकर्त्यांसाठी तर संग्राह्य आहेच, तसेच अभ्यासकांचा ज्ञानाचा ‘तिसरा डोळा’ जागवणारा तो ज्ञानसंवर्धक असा ठेवा आहे, हे निश्चित.