हिंदी विवेकच्या सुहृद – मृदुलाजी

28 Nov 2020 16:21:26
@अमोल पेडणेकर

राष्ट्रीय आणि सामाजिक जाणीव प्रगल्भ करण्यामध्ये आपले सक्रिय योगदान देणार्या मृदुला सिन्हाजी हिंदी विवेक मासिक पत्रिकेसाठी नेहमी आत्मीयतेने आपले योगदान देत असत. त्यांच्या संपूर्ण आयुष्याची सामाजिक, साहित्यिक आणि राजकीय यात्रा अत्यंत समृद्ध होती. भारतीय महिलांच्या मनामध्ये आपल्या कर्तृत्वाने मृदुला सिन्हा यांनी दुर्गम विश्वास निर्माण केला होता. एक समृद्ध आणि सर्वार्थाने समाधानी महिला व्यक्तिमत्त्व म्हणून त्या सतत नजरेसमोर राहतात. अशा गोव्याच्या माजी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांना विवेक परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
 
 
हिंदी विवेक मासिक पत्रिकेच्या पहिल्या अंकापासूनच मृदुला सिन्हा यांच्याशी आमचा संपर्क सुरू झाला. हिंदी भाषेमध्ये विवेकच्या वतीने मासिक सुरू होत आहे आणि या पहिल्या अंकामध्ये तुमचा लेख आम्हाला अपेक्षित आहे असे त्यांना सुचविले. त्यानंतर चार दिवसांच्या आत मृदुला सिन्हा यांनी हिंदी विवेकच्या पहिल्या अंकाकरता आपला लेख पाठविला होता. राजकारणाशी आणि साहित्याशी अत्यंत जवळचे नाते असलेल्या मृदुला सिन्हा यांनी हिंदी विवेकच्या पहिल्या अंकाला दिलेला तो आशीर्वादच होता. त्यानंतर वेळोवेळी मृदुला सिन्हा यांचे लेख, कथा किंवा अन्य साहित्य हिंदी विवेकच्या अंकामध्ये प्रकाशित होत होते.


bjp_1  H x W: 0
त्या गोव्याच्या राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्या, त्यानंतर यथावकाश मी त्यांना भेटायला गोवा येथील राजभवनात गेलो होतो. सहज बोलताना मी त्यांच्याशी हिंदी विवेक वाचक वृद्धी योजनेसंदर्भात चर्चा केली. त्या वेळी त्या सहजतेने म्हणाल्या, “तुम्ही गोव्यातील महिलांना त्या पाठक वृद्धी योजनेमध्ये सहभागी करून घ्या. गोव्यातील महिलांचा शिक्षणाचा स्तर चांगला असल्याकारणाने त्या महिला अत्यंत प्रबुद्ध आहेत. कोकणी संस्कृतीला गोव्यातील महिला अत्यंत घट्टपणे धरून आहेत. त्यांनी आपली संस्कृती आणि परंपरा अत्यंत संकटाच्या काळातही जपून ठेवलेली आहे. या महिलांना तुम्ही हिंदी विवेकचे वर्गणीदार करण्याचे आवाहन केले, तर या महिला तुम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य देऊ शकतात.”

मृदुला सिन्हा यांच्या या वक्तव्यानंतर मी त्यांना म्हटले, “हिंदी विवेकचे तीन वर्षांसाठी शंभर वर्गणीदार करणार्यात महिलांसाठी आम्ही ही योजना निश्चित करू; पण ज्या महिला 100 वर्गणीदार करतील, त्यांचा सत्कार तुमच्या हस्ते या राजभवनात करण्यात येईल का?” क्षणाचाही विचार न करता मृदुला सिन्हाजी म्हणाल्या, “मला गोव्यातील कर्तबगार महिलांचा सत्कार करायला नक्कीच आवडेल. हिंदी विवेक हे राष्ट्रीय साहित्य प्रसारित करणारे मासिक आहे. या मासिकाच्या प्रचार-प्रसारासाठी योगदान देणार्या महिलांचा मी या राजभवनात नक्की सत्कार करेन” आणि खरेच गोव्यातील महिलांनी हिंदी भाषेत प्रकाशित होणार्या हिंदी विवेकच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला. जवळजवळ 20 महिलांनी या योजनेमध्ये प्रत्येकी शंभर वर्गणीदार केले व राज्यपाल भवनामध्ये राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

आपण स्वतः समर्थ महिला असल्याचा सार्थ अभिमान मृदुला सिन्हा यांना होता, त्याचबरोबर आपल्या आसपासच्या सर्वसामान्य महिलाही राष्ट्रीय विकासात योगदान देऊ शकतात, त्यांना आपण त्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे हा विश्वासही त्यांना होता हे विशेष होते.

मृदुला सिन्हा यांच्याशी बोलताना कधीही पुरुषी अन्यायासंदर्भात उगाच चर्चा जाणवत नसे. “एक साहित्यकार, राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ता असा माझा जो प्रवास आहे, या संपूर्ण प्रवासात तीन पुरुषांनी मला सहकार्य केलेले आहे.” असे त्या नेहमीच आवर्जून सांगत. “एक माझे वडील, दुसरे माझे सासरे आणि तिसरी माझे पती अशा पुरुष मंडळींनीच मला या स्थानापर्यंत पोहोचवलेले आहे.”
त्यांच्या आयुष्यासंदर्भात त्यांचे व्यक्तिगत मत विचारले, तर त्या म्हणत - माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये लक्ष्मणरेषा हा शब्द मी कधी अनुभवलेलाच नाही. मला सामाजिक, साहित्य, राजकारण क्षेत्रांतली सर्व कामे करण्यासाठी प्रोत्साहित केले गेले. फक्त समाजाबरोबर आपण राहिले पाहिजे, मग तो राजकीय मंच असो, सामाजिक मंच किंवा साहित्य मंच असो. गोव्याचे राज्यपाल असतानाही त्यांनी स्वच्छता अभियानाकरता स्लोगन लिहिले, कविता लिहिल्या, जनजागृती कार्यक्रमात जाऊन विषय समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. हे सारे करताना एक सर्वोत्तम साहित्यिक म्हणून त्यांच्या मनामध्ये नेहमी ही चिंता असे. उत्तम लेख, कथा, कविता निर्मितीच्या माध्यमातून माझ्याकडून समाजात चांगले वातावरण निर्माण करण्याकरता साहाय्य कसे होऊ शकेल याचे चिंतन त्यांच्या मनात नेहमी चाललेले असे. साहित्य आणि राजकारण या दोघांनाही सत्यम, शिवम, सुंदरम मानत होत्या. त्यांचे म्हणणे होते - साहित्य आणि राजकारण दोघांचाही विचार एकच आहे. समाजाचे आणि राष्ट्राचे हित साधणार. फक्त त्यांची कार्यपद्धती वेगळी आहे.
 
राष्ट्रीय आणि सामाजिक जाणीव प्रगल्भ करण्यामध्ये आपले सक्रिय योगदान देणार्या मृदुला सिन्हाजी हिंदी विवेक मासिक पत्रिकेसाठी नेहमी आत्मीयतेने आपले योगदान देत असत. त्यांच्या संपूर्ण आयुष्याची सामाजिक, साहित्यिक आणि राजकीय यात्रा अत्यंत समृद्ध होती. भारतीय महिलांच्या मनामध्ये आपल्या कर्तृत्वाने मृदुला सिन्हा यांनी दुर्गम विश्वास निर्माण केला होता. एक समृद्ध आणि सर्वार्थाने समाधानी महिला व्यक्तिमत्त्व म्हणून त्या सतत नजरेसमोर राहतात. अशा गोव्याच्या माजी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांना विवेक परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
Powered By Sangraha 9.0