वसंतलक्ष्मी

विवेक मराठी    28-Nov-2020
Total Views |
 @पराग वेदक
 
बेडेकर उद्योगाचे वसंतराव बेडेकर यांच्या पत्नी रोहिणी बेडेकर (उषावहिनी) यांचे कोविडमुळे अलीकडेच निधन झाले. वसंतरावांना उद्योगात आणि संसारात समरसून साथ करणार्‍या उषावहिनींचे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांशी मातृवत नाते होते. अशांपैकी एक असलेल्या पराग वेदक यांनी उषावहिनींचे रेखाटलेले शब्दचित्र.


bedekar_1  H x

नव्वदच्या दशकात जेव्हा मी विद्यार्थी चळवळीत सक्रिय झालो, त्या वेळी आज सहजपणे उपलब्ध असणार्‍या अनेक सुविधांचा अभाव होता. विविध कार्यक्रमांकरिता निधी लागायचा. सगळी सोंगं आणता आली, तरी पैशाचं सोंग आणता येत नाही आणि मग अशा वेळी एका हक्काच्या माणसाची आठवण व्हायची आणि ते म्हणजे बेडेकर लोणची मसालेवाले. विद्यार्थी परिषदेकरिता, विवेकानंद प्रतिष्ठानकरिता त्यांनी मला काहीच कमी पडू दिलं नाही. माझ्या आजवरच्या सामाजिक प्रवासात ते हिमालयासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले. हळूहळू वसंतरावांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा परिचय होऊ लागला आणि हे सर्व सदस्य आम्ही करत असलेल्या सामाजिक कामात हिरिरीने उतरू लागले. विद्यार्थी परिषदेचे पूर्वांचल भागाचे संघटन मंत्री सतीश वेलणकर उर्फ व्ही. सतीशजी (सध्याचे भाजपाचे राष्ट्रीय सह संघटन मंत्री) यांच्याबरोबर मी वसंतरावांकडे जेवायला गेलो होतो. त्या वेळी पहिल्यांदाच मी उषावहिनींना पाहिलं. उषावहिनींनी त्या दिवशी केलेल्या कुळथाच्या पिठल्याची चव अजूनही माझ्या जिभेवर आहे. सतीशजींनी ईशान्य भारतातील कामासाठी वसंतरावांकडे आर्थिक मदत मागितली आणि वसंतराव नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांना लगेचच ’हो’ म्हणाले.
SEIL (आंतरराज्य छात्र जीवन दर्शन) प्रकल्पाअंतर्गत ईशान्य भारतातील विद्यार्थी वसंतरावांकडे काही दिवस राहायलाही होते. विद्यार्थी परिषदेची दक्षिण मुंबईची पूर्णवेळ कार्यकर्ती दीपाली जांभेकर ही वसंतरावांकडेच निवासाला असायची. या सर्वांनीच उषावहिनींची आणि बेडेकर कुटुंबीयांची मायेची सावली अनुभवली आहे.
 
उषावहिनी वसंतरावांच्या संयुक्त कुटुंबाचा कणा होत्या. कुटुंबवत्सल उषावहिनी अतिशय धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा, भगवद्गीता आदी ग्रंथांचं त्यांचं सतत वाचन चालू असे. येणार्‍याजाणार्‍याला त्याविषयी सांगत असत, त्यांनाही अशी पुस्तकं वाचण्यास प्रवृत्त करत असत. वसंतरावांकडे नेहमीच वेगवेगळे धार्मिक-सामाजिक उत्सव सुरू असतात. मग परमपूज्य गोविंददेवगिरी यांच्या उपस्थितीतील मार्गशीर्ष महोत्सव असो की गुढीपाडव्याची यात्रा, उषावहिनी उत्साहाने सगळ्यांचं हवं-नको ते बघत असत. वसंतरावांकडे त्यांच्या नातेवाइकांचा, संघपरिवारातील कार्यकर्त्यांचा, अतुल-अजितच्या मित्रपरिवाराचा सतत राबता असे. ही माउली हसतमुखाने आपल्या दोन्ही सुनांच्या - शिल्पावहिनी आणि अपर्णावहिनी यांच्या मदतीने मोठ्या आनंदाने सर्वांचं आगतस्वागत करत असे. वसंतारावांना व्यवसाय वाढवताना, टिकवताना आलेल्या अडचणीत उषावहिनी सतत त्यांच्या बरोबर होत्या आणि त्यामुळेच सर्व प्रकारच्या अडीअडचणींना तोंड देत वसंतरावांनी धीरोदात्तपणे बेडेकर कंपनी टिकवली आणि वाढवली. घरातील अनेकांची आजारपणं, स्वत:च्या दोन्ही पायांच्या गुडघ्याची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया या सर्वांना त्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने तोंड दिलं. त्यांच्या गुडघ्याच्या प्रत्यारोपण शस्त्रकियेनंतर बरोबर एक महिन्याने त्यांनी चारधाम यात्राही पूर्ण केली. पंढरपूरच्या वारीचा महत्त्वपूर्ण टप्पा त्या अनेक वर्षं डॉ. रामचंद्र देखणे यांच्या दिंडीतून पायी पार करत. या माउलीची पुण्याई इतकी थोर की, पंढरपूरच्या रुक्मिणी मंदिराचे मुख्य पुजारी भागवताचार्य वा.ना. उत्पात त्यांना आपली बहीण मानत. प्राचार्य राम शेवाळकरांपासून परमपूजनीय सरसंघचालक सुदर्शनजींपर्यंत अनेक महानुभावांचं आपल्या घरी आगतस्वागत करण्याचं भाग्य या माउलीला लाभलं. कर्तव्यदक्ष सून व पत्नी, प्रेमळ आई, सासू व आजी या सर्व भूमिका त्यांनी शंभर टक्के निभावल्या.
 
2018 सालच्या ऑगस्ट महिन्यात माझी क्रिएटिनिन लेव्हल 10.5पर्यंत गेली होती. मऊ भातावरून मी हळूहळू पेजेवर आलो होतो. वसंतराव आणि उषावहिनी या काळात हृषीकेशला स्वामी गोविंददेवगिरींच्या भगवद्गीतेच्या प्रवचनाला गेले होते. अजितभाईंनी माझ्या बिघडत चाललेल्या प्रकृतीविषयी त्यांना फोनवरून माहिती दिली. वसंतरावांनी तातडीने मला फोन केला आणि म्हणाले, “मी आता हृषीकेशच्या राममंदिरात उभा आहे, आजच स्वामीजींनी आपल्या प्रवचनात सांगितले की कोणत्याही परिस्थितीत आपला आत्मविश्वास ढळू द्यायचा नाही. आपला आत्मविश्वास ढळला तर परमेश्वरही आपल्याला मदत करत नाही, तेव्हा तू तुझा आत्मविश्वास ढळू देऊ नकोस.” तद्नंतर माझं उषावहिनींशीही बोलणं झालं. त्यांनीही मला खूप धीर दिला. फोन ठेवतानाच माझ्या अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती आणि जवळजवळ एक महिन्यानंतर मी दोन पोळ्या खाल्ल्या. अजित बेडेकर, डॉ. सुनील दळवी मला नाही म्हणत नव्हते, याचा फायदा घेऊन मी 20 दिवस डॉ. व्यंकटेश जोशी यांच्याकडे आयुर्वेदिक उपचार घेतले, परंतु त्या काळात माझी क्रिएटिनिन पातळी 15.5पर्यंत गेली. दरम्यान वसंतराव आणि उषावहिनी हृषीकेशला असल्यामुळे अजितभाई माझ्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते. वसंतराव मुंबईत परतल्यावर मी त्यांच्यापुढे सरेंडर झालो, त्यांना म्हटलं की तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. पण त्या वेळेसही माझं मन जराही न दुखावता माझी पत्नी प्रतिभा, मंगलप्रभातजी लोढा यांच्याशी चर्चा करून पुन्हा एकदा अ‍ॅलोपॅथी ट्रीटमेंट घेण्यास मला उद्युक्त केलं. अजितभाई, मंगलजी मला डॉ. हेमल शहांकडे घेऊन गेले आणि या आधुनिक धन्वंतरीने माझ्यावर तातडीने उपचार करून डायलिसिसद्वारे माझी क्रिएटिनिन पातळी 6वर आणली. जन्माष्टमीच्या दिवशी मला डिस्चार्ज मिळाला. बेडेकरांच्या ऑफिसमधूनच मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, म्हणूनच घरी जाण्यापूर्वी आधी ऑफिसमध्ये जाण्याची इच्छा मी व्यक्त केली. अजितभाई गाडी घेऊन हॉस्पिटलला आले. डिस्चार्ज मिळायला उशीर झाल्यामुळे आम्ही बेडेकर सदनमध्ये येईपर्यंत वसंतराव वर घरी गेले होते. अजितभाई मला आणि पत्नीला घेऊन घरी गेले. उषावहिनी तेव्हा जन्माष्टमीचं भजन म्हणत होत्या. मला पाहताच त्या उठल्या व त्यांनी मीठ-मोहरीने आम्हा उभयतांची दृष्ट काढली. माझे आणि प्रतिभाचे डोळे भरून आले. घरात गेल्यावर त्यांनी मला खुर्चीवर बसवलं व साखरपाणी दिलं. जन्माष्टमीची पूजा आणि भजन झाल्यावर दोन्ही सुना घरी नसतानाही अजितभाई आणि त्यांची मुलं आदित्य व अनुष्का यांच्या मदतीने आम्हा दोघांना गरम गरम जेवण वाढलं. या वयातही स्वतः उभं राहून गरम गरम पोळ्या करून आग्रहाने वाढल्या. मलाही बर्‍याच दिवसांनी घरचं जेवण मिळाल्यामुळे मीही तृप्त होऊन मनातल्या मनात ‘अन्नदात्री सुखी भव’ म्हणत उठलो. नंतर गप्पांच्या ओघात उषावहिनी प्रतिभाला सहज म्हणाल्या, “एकदा माहेरी आल्यासारखी आमच्याकडे राहायला ये” आणि एक नवी जिद्द, नवी उमेद आणि आणखी एक आई घेऊन मी आणि प्रतिभा घराकडे परतलो.
 
त्यानंतर माझ्या मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या वेळी त्या आणि त्यांचे कुटुंबीय आमच्या मागे धीरोदात्तपणे उभे राहिले. या वर्षी जून महिन्यात माझ्या डाव्या पायाचं अ‍ॅाम्प्युटेशन झालं, त्या वेळीही त्या सतत मला आणि प्रतिभाला धीर देत होत्या. कडक पथ्यपाणी करण्याविषयी मला सतत बजावत होत्या.
 
 
कोव्हिडमुळे त्यांना खाजगी इस्पितळात दाखल केल्यावर त्यांच्याशी मी दोनदा फोनवरून बोललोही. मात्र अखेरचे 4-5 दिवस त्यांची प्रकृती खालावत गेली आणि मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज 12 ऑक्टोबर रोजी संपली. भागवताचार्य वा.ना. उत्पातांच्या अकाली मृत्यूचा धक्का त्या सहन करू शकल्या नाहीत आणि आपल्या या मानलेल्या भावापाठोपाठ त्याही वैकुंठवासी झाल्या.
 
दुर्गाबाई भागवतांनी ’ऋतुचक्र’ या आपल्या पुस्तकात वसंत ऋतूचं वर्णन करताना वसंतलक्ष्मीच्या शुभ्र हास्याचं वर्णन केलं आहे... तीच ही वसंतलक्ष्मी.. वसंतरावांची गृहलक्ष्मी... आम्हा कार्यकर्त्यांची आणि अतुल-अजितच्या मित्रमैत्रिणींची अन्नपूर्णा आम्हा सर्वांनाच पोरकं करून गेली. आम्हा कार्यकर्त्यांची मायेची सावली हरपली.