बाळकृष्ण नाईक - सज्जन शक्तींच्या समन्वय साधनेचा सेतू

विवेक मराठी    30-Nov-2020
Total Views |
@मधुभाई कुलकर्णी

RSS_1  H x W: 0

विश्व हिंदू परिषदेचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक बाळकृष्ण नाईक यांचे 19 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झाले. बाळकृष्ण हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यात एकरूप होऊन त्यांनी अद्वितीय असे कार्य केले आहे.

हम करें राष्ट्र आराधन, आराधन तन से, मन से, धन से
तन मन धन जीवन से
अन्तर से, मुख से, कृति से
निश्छल हो निर्मल मति से
श्रद्धा से मस्तक नत से
हम करें राष्ट्र अभिवादन
हम करें राष्ट्र आराधन...

काही व्यक्तींचे जीवन पूर्णतः या काव्यपक्तींप्रमाणे राष्ट्राला समर्पित असते. जीवनात सर्व काही मिळालेले असताना किंवा जे हवे ते मिळविण्याची क्षमता असताना, संधी असताना, सर्व प्रकारचे भौतिक सुख समोर असतानाही या व्यक्ती आरामाचे, सुखासीन आयुष्य जगण्यास नकार देतात आणि ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ या उक्तीप्रमाणे राष्ट्र उभारणीसाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालतात. एकदा राष्ट्र निर्माणकार्यासाठी उडी मारल्यानंतर मग त्यांना कोणतेही ऐहिक सुख माघारी ओढू शकत नाही. ते तन-मन-धन-कृतीने त्या कार्यात इतके तल्लीन होऊन जातात की त्यांचे मस्तक सदासर्वकाळ राष्ट्रासमोर अपार श्रद्धेने झुकलेले असते. अशाच थोर व्यक्तिमत्त्वांमध्ये मला जाणीवपूर्वक एक नाव घ्यावेसे वाटते, ते स्व. बाळकृष्ण नाईक यांचे.

गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्र उभारणीच्या कार्यात समर्पित असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाचे, प्रचारकाचे जीवन खरे तर पूर्णतः या भारतभूमीच्या कल्याणासाठी वाहिलेले असते. पण ज्या स्थितीतून, परिस्थितीतून बाळासाहेबांनी (बाळकृष्ण नाईक यांनी) स्वतःला या कार्यात झोकून दिले, ते पाहता अशा स्वयंसेवकांसमोर आपणच नतमस्तक होतो. संभाजीनगर (औरंगाबाद)मधील प्रसिद्ध वकील उत्तमराव नाईक यांचे बाळासाहेब ज्येष्ठ सुपुत्र. सधन अशा कुटुंबातील बाळासाहेब हे मुळातच अत्यंत हुशार होते. त्यांच्या हुशारीचे उदाहरणच द्यायचे झाले, तर त्यांनी मोर्वी (गुजरात) विद्यापीठातून मिळविलेली बी.ई. पदवी तीही सुवर्णपदकासह आणि कोलकत्यामधून मिळविलेली एम.ई. ही पदवीसुद्धा सुवर्णपदकासह एवढे पुरेसे ठरावे. त्याकाळी शिक्षण घेताना एम.ई. होणे ही तशी फार मोठी बाब होती. एवढ्यावर त्यांना कुठेही मोठी नोकरी मिळणे सहजसाध्य होते. मात्र, एवढ्यावर समाधान मानण्याची बाळासाहेबांची तयारी नव्हतीच. त्यामुळेच पुढे अमेरिकेत कॅलिफोर्निया विद्यापीठात त्यापुढचे उच्चशिक्षण घेऊन एम.एस. ही पदवीही सुवर्णपदकासह प्राप्त केली आणि बाळासाहेबांनी नाईक कुटुंबीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवत पुन्हा भारतात पाऊल ठेवले.

RSS_2  H x W: 0

अमेरिकेत उच्चशिक्षण घेत असतानाच त्यांचा संपर्क रामकृष्ण मिशनच्या कार्याशी आला होता. अमेरिकेत अशोकानंद यांच्याशी त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते. अशोकानंद यांना स्वामी विवेकानंदांच्या समकक्षच मानले जायचे. अर्थात त्यांचे कार्य तेवढे थोर होतेच. त्यांच्या माध्यमातूनच रामकृष्ण मिशनच्या कार्याशी बाळासाहेबांची ओळख झाली. याच वेळी देशकार्यात रुचीही निर्माण झाली असावी. अमेरिकेतून उच्चशिक्षण घेऊन आलेला हा तरुण युवक विमानातून भारतभूमीवर पाऊल ठेवेल तोच मुळी सूट-बुटात, कडक इस्त्री केलेल्या कपड्यांमध्ये, अत्यंत रुबाबात, अशीच सर्वांची धारणा होती आणि तशी ती चूकही नव्हती. मात्र, अमेरिकेत उच्चशिक्षण घेताना काही वर्षे तिथे वास्तव्य केले असले आणि त्या संस्कृतीचा, राहणीमानाचाही अभ्यास झालेला असला, तरी या तरुणावर असलेल्या भारतीय संस्कारांमध्ये जराही कमतरता आलेली नव्हती. ‘एम.एस. विथ गोल्ड मेडल फ्रॉम कॅलिफोर्निया’ असा हा युवक भारतात परतला तोच मुळी धोतर, झब्बा अशा पूर्णतः भारतीय, महाराष्ट्रीय पोषाखात. त्याला पाहताच अनेकांच्या भुवया उंचावल्याही, तर आपले संस्कार टिकून असल्याचे पाहून कुटुंबीयांची छाती अभिमानाने फुलून आली होती.
 
बाळासाहेबांच्या कुटुंबीयांशी माझा चांगला परिचय होता, परंतु विदेशात असलेल्या बाळासाहेबांशी तशी फारशी ओळख झालेली नव्हती. मी तेव्हा संभाजीनगरात (औरंगाबादला) रा.स्व. संघाचा जिल्हा प्रचारक म्हणून काम करीत होतो. भारतात आल्यावर एक-दोनदा जिल्हा प्रचार कार्यालयावर त्यांचे येणे-जाणे झाले, ओळख झाली. अशाच एका भेटीत त्यांनी सहज प्रश्न केला, “तुमची प्रवासाची बॅग कुठे आहे?” त्यांच्या या प्रश्नावर मी माझ्या पिशवीतील एक कुर्ता-पायजमा आणि अंगावरील एक कुर्ता-पायजमा दाखविला. ते पाहून त्यांनी आश्चर्याने प्रश्न केला, “फक्त एवढेच सामान, एवढ्यावर भागते का?” माझे त्यावर साधे सोपे उत्तर होते, “आम्हा प्रचारकांना आणखी काय हवे असते? एवढेच पुरेसे आहे.” आमचा तो संवाद त्या दिवशी तिथे थांबला. पुढे काही दिवसांतच अचानक माझ्याकडे येऊन त्यांनी प्रश्न केला, “प्रचारक म्हणजे काय काम करता तुम्ही? प्रचारकाला पात्रता काय हवी?” मी तेव्हा चोवीस-पंचवीस वर्षांचा असेन आणि त्यांच्या तुलनेत शिक्षणही कमीच होते. मला पहिले त्यांचा प्रश्न म्हणजे माझी गंमत करण्यासाठी विचारलेला असावा असे वाटले. प्रचारकासाठी पात्रता काय हवी, अशा या प्रश्नाला माझ्याकडे तसे समर्पक उत्तर नव्हते. कारण प्रचारक होण्यासाठी पात्रता अशी ठरलेली नव्हती. देशासाठी आणि संघकार्याला आयुष्य समर्पित करण्याची तयारी असलेला कोणीही प्रचारक होऊ शकतो, एवढेच मला माहीत होते. मात्र त्यानंतर बाळासाहेब जे बोलले, त्याने मला विचारमग्न होण्यास भाग पाडले. ते म्हणाले, “मला प्रचारक व्हायचंय.”


RSS_3  H x W: 0
 
इतके प्रचंड शिक्षण घेतलेली व्यक्ती, समोर मोठे करिअर उभे असताना ते सगळे सोडून मला प्रचारक व्हायचंय असे सांगते, हे ऐकल्यावर साहजिकच माझ्या मनात प्रश्नांची अनेक वर्तुळे घोंगावू लागली होती. अर्थात बाळासाहेब त्यांच्या विचारावर ठाम होते. बहुधा निर्णय पक्का केल्यावरच त्यांनी माझ्यासमोर हा विचार मांडला होता आणि त्यासाठी इतक्या दिवसांपासून संघ, संघकार्य, प्रचारक याबाबत माझ्याकडून सर्व विचारपूस करून ते माहिती जाणून घेत होते. दत्ताजी भाले तेव्हा येथे विभाग प्रचारक म्हणून कार्यरत होते. मी त्यांना दत्ताजी भाले यांच्याकडे घेऊन गेलो. अर्थात त्याआधी त्यांचा दत्ताजींशी परिचय झालेला होता.
दत्ताजींनाही या उच्चशिक्षित तरुणाच्या प्रचारक होण्याच्या निर्णयावर प्रश्न पडला असावा. दत्ताजींनी त्यांना घरच्यांची अपेक्षा विचारली, तेव्हा बाळासाहेबांचे थेट उत्तर होते, “ते मी पाहून घेईन.” पण साहजिकच घरच्यांचा त्यांच्या या निर्णयाला विरोध झालाच. हा विरोध संघकार्यास निघालेल्या मुलाबद्दल नव्हता, तर एवढे मोठे उच्चशिक्षण दिले, अगदी विदेशातही शिक्षण दिले आणि एवढे सगळे केल्यावर हा मुलगा करणार काय.. तर ‘प्रचारक’ होणार? घरच्यांचा प्रश्न साहजिक होता, ‘मग एवढे शिक्षण घेतले कशाला? कॅलिफोर्नियातून एम.एस. पदवी मिळविली ती ‘प्रचारक’ होण्यासाठी का?’ एक ना दोन त्यांचे अनेक प्रश्न, पण सर्व रास्तच होते. तेव्हा बाळासाहेबांनी घरच्यांना सांगितले, “माझ्या शिक्षणासाठी एवढी वर्षे मला दिलीतच ना, तर मग माझे शिक्षण आणखी दोन वर्ष सुरू आहे, असे समजा आणि मला केवळ दोन वर्षे द्या. नाही जमले तर मी परत येईन आणि वडीलधारी मंडळी सांगतील त्याप्रमाणे करीन.” पण बाळासाहेबांनी जरी घरच्यांकडून केवळ दोन वर्षांची परवानगी काढली असली तरी त्यांच्या मनाने दृढ निश्चय केला होता तो ‘पूर्णवेळ प्रचारक होण्याचाच.’
 
घरून परवानगी मिळाली आणि पुढे बाळासाहेबांचे जीवन पूर्णतः संघमय झाले. अत्यंत सुखवस्तू कुटुंबातील हा तरुण एक अंगावर आणि एक सोबत अशा पोषाखासह परभणीमध्ये ‘प्रचारक’ म्हणून काम करू लागला. परभणीमध्ये त्यांनी दोन वर्षे हे काम केले. त्या वेळी भय्याजी दाणी संघाचे सरकार्यवाह होते. तेव्हा त्यांनी महाराष्ट्राच्या सर्व प्रचारकांची बैठक घेतली आणि त्यात विचारणा केली की, “पश्चिम बंगालमध्ये कोणाला काम करायची इच्छा आहे?” अशी विचारणा करताच सर्वप्रथम हात वर झाला तो बाळासाहेबांचाच आणि अशा प्रकारे प्रचारक म्हणून बाळासाहेबांनी महाराष्ट्रातून पश्चिम बंगालकडे कोलकत्यात सीमोल्लंघन केले.
 
 
1966मध्ये विदेशातून औरंगाबादेत आलेल्या बाळासाहेबांनी त्याच वर्षी संघाचे पूर्णवेळ काम सुरू केले आणि 1982पर्यंत ते प्रचारक म्हणून कार्यरत होते. प्रचारक म्हणून घराबाहेर पाऊल टाकल्यावरही त्यांनी घरच्यांशी संपर्क मात्र नित्यनेमाने ठेवला होता. दर सोमवारी ते एक काम आवर्जून करीत असत, ते म्हणजे घरी पत्र लिहिणे. या त्यांच्या पत्र लिहिण्यात कधीही खंड पडला नाही आणि प्रत्येक पत्राच्या शेवटी एक ओळ हमखास लिहिलेली असायची, ती अशी - ‘श्यामच्या लग्नाचा विचार करावा.’ या ओळीचा अर्थ सुस्पष्ट होता की, त्यांनी स्वतः आजन्म ब्रह्मचारी राहण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्येक पत्रातील ती शेवटची ओळ अगदी श्याम म्हणजे त्यांचे छोटे बंधू श्याम नाईक यांचा विवाह ठरेपर्यंत कायम होती.
 
 
1982ला रा.स्व. संघाने मग त्यांच्यावर विश्व हिंदू परिषदेत काम करण्याची जबाबदारी सोपविली. मालदा येथे त्यांनी विहिंपचे संघटनमंत्री म्हणून काम सुरू केले. त्यांच्याकडे बंगाल प्रांताची जबाबदारी आली होती. बौद्ध-हिंदू समन्वय हा बाळासाहेबांच्या आस्थेचा मुख्य विषय होता. विश्व हिंदू परिषदेसाठी त्यांनी बौद्ध-हिंदू समन्वयाचे अहोरात्र काम केले आणि त्यात त्यांना मोठे यश आलेही. बौद्ध-हिंदू समन्वयाअंतर्गत त्यांनी सारनाथ, काशी, प्रयागराजला कार्यक्रम घडवून आणले. या कामासाठीच त्यांनी भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा अमीट ठसा उमटलेल्या कंबोडिया, भूतान, सिलोन, म्यानमार, बांगलादेश, लावोस, नेपाळ, मलेशिया, श्रीलंका, थायलंड, व्हिएतनाम, सिंगापूर, इंडोनेशिया या देशांचा प्रवासही केला. बौद्ध-हिंदू समन्वय हा त्यांच्या आग्रहाचा विषय होता. त्यामुळेच बहुधा नियतीनेही त्यांच्या अंतिम यात्रेत कुशीनगर-गोरखपूर हा प्रवास त्यांना घडविला. कुशीनगर हे भगवान गौतम बुद्धांचे स्थान आणि गोरखपूर हे हिंदू पीठ. जीवनाच्या अंतिम प्रवासातही त्यांनी तीच बाब सिद्ध केली. अयोध्या, कुशीनगर, काशी, सारनाथ असा प्रवास त्यांना करायचा होता. कुशीनगर भगवान गौतम बुद्धांचे निर्वाणस्थान. बाळासाहेबांची तब्येत बिघडली ती कुशीनगरला आणि त्यांना गोरखपूरला जाताना 19 नोव्हेंबर 2020ला आपला देह सोडला.
विपश्यना हा बाळासाहेबांच्या श्रद्धेचा एक विषय. काशीचे भन्ते ज्ञानजगज्जीत आणि बाळकृष्ण नाईक यांचे एकमेकांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते. त्यांच्यामुळेच बाळासाहेब विपश्यनेकडे वळले. औरंगाबादला जेव्हा केव्हा भन्ते ज्ञानजगज्जीत यांचे येणे होत असे, तेव्हा त्यांचा मुक्काम नाईक कुटुंबीयांकडेच होत असे. बाळासाहेबांना दम्याचा खूप त्रास होता. विशेषतः पावसाळ्यात तो खूप उफाळून यायचा. अशात विपश्यनेची मोठी मदत झाली. बाळासाहेब हे खूपच मृदुभाषी होते. आपल्या कार्यासाठी ते आग्रही असायचे, पण त्यांना रागावताना कोणीही पाहिलेले नाही. दम्याच्या त्रासामुळे अनेकदा त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. मात्र विश्रांती घेण्याचा सल्ला विश्व हिंदू परिषदेच्या कार्यात राहून बौद्ध-हिंदू समन्वयाच्या कार्यासाठी नेहमीच धुडकावून लावला, तोही विनम्रपणे. ठरलेल्या कार्यक्रमाबद्दल, प्रवासाबद्दल ते खूप आग्रही होते, हट्टी होते. त्यांच्या तब्येतीची चिंता करणारे जे कार्यकर्ते होते, ते त्यांना म्हणायचे की तुम्ही फार हट्टी आहात. तेव्हा बाळासाहेब त्यांना म्हणायचे की, माझं नाव बाळ आहे, त्यामुळे बाळहट्ट मी करणारच. तब्येतीचे कारण देऊन कोणताही कार्यक्रम किंवा प्रवास त्यांनी कधीही रद्द केला नाही. आपले नाव बाळ आहे त्यामुळे बाळहट्ट पुरवावा लागेल, असे ते घरातच म्हणत असत असे नाही, तर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्येही असेच म्हणायचे. विपश्यनेमुळे त्यांना मोठी मन:शांती मिळत असे. मालद्याला संघटनमंत्री असताना त्यांनी शंभर सत्संग सुरू केले होते. त्यांच्या या कार्यामुळे विश्व हिंदू परिषदेलाही मोठा आयाम मिळाला. विहिंपसाठी हे मोठे योगदान होते. विहिंपचे प्रमुख अशोकजी सिंघल यांनीही बाळासाहेबांच्या या कार्याचे कौतुक केले होते.
 
 
समन्वय चेतना मंचाच्या माध्यमातून त्यांनी जैन, बौद्ध, शिख, वीरशैव, लिंगायत या धर्मावर आधारित सज्जन शक्तींची समन्वय साधना केली, हे त्यांचे मौलिक कार्य आहे. भौतिकवादावर मात करण्यासाठी भारताने दिलेली मानवतावादाची दृष्टीच उपयुक्त ठरेल, हा त्यांचा विचार सर्वांसाठीच प्रेरक होता. बहुआयामी असुरी शक्तीच्या, भोगवादाच्या विरोधात उभे राहण्यासाठी या सज्जन शक्तींचा समन्वय साधणे, एकत्रीकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांचे मत होते.
कल्याणकारी विश्वाच्या निर्मिती हे या भारतमातेचे एकमेव उद्दिष्ट आहे, हे बाळासाहेब नेहमीच ठामपणे सांगत. जैन, बौद्ध, शिख, वीरशैव, लिंगायत या सज्जन शक्तींच्या समन्वयासंदर्भात त्यांनी केलेला अभ्यास अत्यंत सूक्ष्म असा होता. ‘भारतमातेच्या पुत्ररूपात या समाजाची निर्मिती झालेली आहे. विश्वकल्याणकारी भारतमातेच्या रूपात आम्ही सर्व जण भारतीय आहोत. आमच्या इंद्रियांवर विजय मिळविण्याचे ‘महावीर व्रत’ घेऊन त्यासाठी प्रयत्नशील असल्याने आम्ही ‘जैन’ आहोत. इंद्रियांपेक्षाही स्वतःला वर नेत अनुभूती निर्वाणाच्या ‘बोधी साधने’त सक्रिय असल्याच्या नात्याने आम्ही ‘बौद्ध’ आहोत. ‘सत् श्री अकाल’ची अनुभूती करणार्या परमपूज्य संतांचे आणि गुरूंचे शिष्य या नात्याने आम्ही ‘शीख’ आहोत. मनात अनाठायी दडून बसलेल्या दुष्ट शक्तींवर, विकृतींवर विजय मिळविण्याचा पुरुषार्थ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अर्थात आम्ही ‘आर्य’ आहोत. विश्वकल्याणासाठी नीलकंठ बनणार्या भगवान शिवशंकराच्या साधनेत आमचे जीवन समर्पित आहे, अर्थात आमचा हा संपर्ण समाज ‘वीरशैव’ आहे. चार पुरुषार्थांच्या आधारे आम्ही जीवनातील हीन भाव दूर करण्याचे व्रत आम्ही अंगीकारले आहे. सर्वांगीण विकासाच्या सनातन राष्ट्रसाधनेत पुढे सरसावलेला असा हा आमचा संपूर्ण समाज ‘हिंदू’ आहे’ असा अत्यंत मोठा, व्यापक विचार घेऊन त्यांनी आपले आयुष्य या विचारालाच समर्पित केले.
 
समाजसेवेत पूर्णतः जीवन समर्पित केलेले असतानाच कुटुंबाकडेही त्यांचे सातत्याने लक्ष असे. वडिलांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचा विचार त्यांनी आपल्या घरी मांडला. कुटुंबाची त्यासाठी तयारी होतीच, पण त्याच वेळी त्यांच्या वडिलांच्या - उत्तमराव नाईक यांच्या विचारांचा मोठेपण बघा, आपल्या मुलाचे संघकार्यासाठी वाहून दिलेले जीवन त्यांच्या डोळ्यासमोर होतेच. त्यामुळे आपल्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यावेळी प्रचारक म्हणून जीवन समर्पित केलेल्या व आपल्यासोबतच सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचा योग असलेल्या प्रचारकांचाही गौरव करावा, असा विचार वडिलांनी मांडला. 1998 हे ते वर्ष. प्रांत संघचालक, ज्येष्ठ स्वयंसेवक प्रल्हादजी अभ्यंकर यांनाही हा विचार आवडला आणि त्यांनी तो उचलून धरला. सगळी तयारी झाली, मात्र त्या वेळी नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. या सोहळ्यापूर्वीच उत्तमराव नाईक यांचे निधन झाले. त्यामुळे तेव्हा तो सोहळा रहित करावा लागला. मात्र, पुढच्याच वर्षी प्रल्हादजी अभ्यंकर यांची वयाची 80 वर्षे पूर्ण होत होती आणि त्यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा व्हायचा होता. त्यामुळे प्रल्हादजींसह प्रचारकांचा गौरव सोहळा करण्याचा विचार स्वतः बाळकृष्ण नाईक, बंधू श्याम नाईक यांच्यासह ज्येष्ठ स्वयंसेवक श्रीराम साठे यांनी मांडला. मात्र, दुर्दैव असे की या सोहळ्यापूर्वीच प्रल्हादजींचे निधन झाले. सर्वांसाठीच हे दुःख खूप मोठे होते. मात्र, ठरविलेला कार्यक्रम रद्द न करता पुढे तो प्रल्हादजी अभ्यंकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ असे त्याला स्वरूप देऊन करण्यात आला. 14 स्वयंसेवकांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा या वेळी डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. करवीरपीठाच्या शंकराचार्यांचे आशीर्वाद या सोहळ्यास मिळाले, तर सरसंघचालक सुदर्शनजी, मोरोपंत पिंगळे, मा.गो. वैद्य अशा आदरणीय व्यक्ती या सोहळ्यास आवर्जून उपस्थित होत्या.
 
वडिलांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने बाळासाहेबांनी प्रचारकांप्रती ठेवलेले हे उदाहरण अत्यंत मोलाचे होते. यानंतर त्यापेक्षाही मोठे उदाहरण त्यांनी समाजासमोर ठेवले ते आपल्या पंचाहत्तरीच्या सोहळ्याच्या वेळी. अर्थात 75 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने आपला कौतुकसोहळा व्हावा, असा कोणताही विचार बाळासाहेबांच्या मनातही नव्हता, परंतु कुटुंबीयांच्या आग्रहाखातर यासाठी तयार झालेल्या बाळासाहेबांनी या वेळी आपल्याबरोबरच पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या त्या वेळच्या प्रचारकांबरोबरच बौद्ध, शीख, जैन समाजातील समाजसेवकांचाही गौरव आपल्याबरोबर व्हावा, असा मनोदय व्यक्त केला. एका अर्थाने त्यांच्या स्वतःच्या ‘सद्भाव से समन्वय’ या विचारशृंखलेतील ‘सज्जन शक्तींच्या समन्वय साधने’ची या कार्यक्रमातूनही त्यांनी कृतिशील पूर्तता केली. या वेळी अशा 51 विभूतींचा नेत्रसुखद सोहळा सर्वांनी अनुभवला.
 
बाळासाहेबांच्या या संपूर्ण कार्यात त्यांनी मांडलेला विचार कृतीत आणण्याची पूर्ण जबाबदारी त्यांचे छोटे बंधू श्याम नाईक यांनी नेहमीच पार पाडली. कुटुंबासाठी श्याम हे बाळासाहेबांची सावलीच जणू. संत एकनाथांच्या भूमीत पैठण नगरीत जन्म झाल्याने जन्मतःच बाळासाहेबांचा पिंड आध्यात्मिक असावा. पुढे त्याला रामकृष्ण मिशनच्या विचारांनी प्रेरणा मिळाली अन् संघ, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशकार्य करताना बौद्ध-हिंदू समन्वयाचे मोठे कार्य त्यांच्या हातून सिद्ध झाले. कार्यकर्ता प्रशिक्षण हा त्यांचा अतिशय आग्रहाचा विषय होता. कार्यकर्ते तयार झाले तर संघटन मजबूत होते, यावर त्यांचा सातत्याने भर होता. सहा वर्षे कार्यकर्ता प्रशिक्षणचे ते मार्गदर्शकही राहिले. यातूनच भारतभूमीतील सज्जन शक्तींच्या समन्वय साधनेतून राष्ट्र आराधना करताना बाळासाहेबांनी आपल्यासारखेच शेकडो प्रचारकही तयार केले. त्यामुळेच त्यांचे हे कार्य त्यांच्या नंतरही शेकडो पटींनी वेगाने पुढे जात राहील आणि ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ या उक्तीप्रमाणे राष्ट्र उभारणीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणार्यांमुळे विश्वकल्याणाचा मार्ग निश्चितच सुकर होईल.
 
शब्दांकन : गिरीधर पांडे