अविस्मरणीय वेगवान प्रवासाचा अनुभव देणारा ‘ट्रॅफिक’

विवेक मराठी    30-Nov-2020   
Total Views |
ही कथा आहे त्यागाची, प्रेमाची, मैत्रीची, विश्वासघाताची, अहंकाराची, तुटलेल्या आणि जुळलेल्यासुद्धा मनांची. भर रस्त्यात रहदारी चालू असताना, ट्रॅफिक सिग्नलपाशी असणार्या माणसांच्या दिशा वेगळ्या असतात, उद्दिष्टे वेगळी असतात. अनोळखी असणारे ते सर्व फक्त आपल्या सिग्नलची वाट पाहत, तेवढ्यापुरते एकत्र असतात. या चित्रपटातसुद्धा चार वेगवेगळी माणसे या सिग्नलकडे एकमेकांना जोडली जातात.


Traffic - Malayalam Movie
भारतातले कोणतेही महानगर घ्या. रस्त्यावरच्या वाहतुकीचा उडालेला बोजवारा येथील नागरिकांना नवीन नाही. रोजचे ट्रॅफिक जॅम आपल्या पाचवीला पूजले आहेत. पोटासाठी माणसे अक्षरशः धावत असतात आणि घरातून निघताना ज्या अवस्थेत बाहेर पडू त्याच अवस्थेत संध्याकाळी घरी परतू याची काहीच शाश्वती नसते, ही वस्तुस्थिती आहे. ट्रॅफिक सिग्नल कितीही कार्यक्षम असू दे, गाड्या आणि रस्ते यांचे प्रमाण जेव्हा व्यस्त होते, तेव्हा यंत्रणा कोसळते. अपघात होतात, एका क्षणात होत्याचे नव्हते होऊन जाते. गर्दी थोड्या काळासाठी थबकते, स्वतः वाचलो याचा सुस्कारा सोडते आणि जे घडले, त्याकडे पाठ फिरवून गंतव्याकडे वाटचाल करते.
 
असेच काहीसे घडते कोची शहरात. दिवस असतो सोळा सप्टेंबर. कामकर्यांचा दिवस सुरू झालेला असतो. रस्त्यावर, फुटपाथवर लोकांची ही गर्दी. दुकाने गिर्हाइकांनी भरून गेली आहेत. फुटपाथवर चालायला जागा नाही. पादचार्यांनी रस्त्याच्या कडेचा ताबा घेतला आहे. गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. रस्त्यावरची माणसे जमेल तसा वाहनांमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. माणसांना आपल्या गंतव्याकडे पोहोचायची घाई आहेच, तशीच वाहनेही इंचाइंचाने पुढे सरकत आहेत. खरे तर हॉर्न वाजवूनही उपयोग नाही, पण वैतागलेल्या मनासाठी जोराने हॉर्न वाजवणे हा मनातील राग काढून टाकण्याचा उपाय आहे.
 
अचानक सिग्नल सुरू होतो. गाड्या सुटतात आणि एक दुर्दैवी घटना घडते. एका मोटरबाइकचा अपघात होतो. ब्रेक लागतात. माणसे मदतीला धावतात. अॅम्ब्युलन्सचा आवाज बघ्यांचे काळीज कापत हॉस्पिटलचा रस्ता धरतो. चेन्नईमध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित मल्याळम चित्रपट ‘ट्रॅफिक’ हा चित्रपट संपल्यानंतरसुद्धा तुमचा पाठलाग करतो. ही केवळ अपघाताची कथा नाही. ही कथा आहे त्यागाची, प्रेमाची, मैत्रीची, विश्वासघाताची, अहंकाराची, तुटलेल्या आणि जुळलेल्यासुद्धा मनांची. भर रस्त्यात रहदारी चालू असताना, ट्रॅफिक सिग्नलपाशी असणार्या माणसांच्या दिशा वेगळ्या असतात, उद्दिष्टे वेगळी असतात. अनोळखी असणारे ते सर्व फक्त आपल्या सिग्नलची वाट पाहत, तेवढ्यापुरते एकत्र असतात. या चित्रपटातसुद्धा चार वेगवेगळी माणसे या सिग्नलकडे एकमेकांना जोडली जातात.
 
तशी ही कथा चौघांची. एकाच बिंदूला मिळालेली. ट्रॅफिक हा ’हायपरलिंक’ चित्रपट आहे. संगणकात हायपरलिंक म्हणजे एक अशी लिंक किंवा दुवा, जेथून त्याच जागेवर थांबून दुसर्या माहितीचा किंवा जागेचा सहज आढावा घेता येतो. ट्रॅफिकमध्ये चार स्वतंत्र कथा आहेत. त्यांचा स्वतंत्र आरंभ आणि शेवट आहे. एका कारणासाठी जरी त्या एकत्र दिसल्या, तरी ते प्रयोजन संपल्यावर त्या स्वतंत्र मार्गांनी पुढे सरकणार आहेत.
 
पहिली कथा आहे दूरदर्शनसाठी काम करणार्या पत्रकार रेहान (विनीथ श्रीनिवासन)ची. येणारा दिवस त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे. केरळचा सुपरस्टार सिद्धार्थ शंकर (रहमान) याची मुलाखत घेण्याची संधी त्याला मिळाली आहे. अदिती (काधल संध्या) नावाची एक मुलगी त्याच्या आयुष्यात आलेली आहे. ती नुकतीच घटस्फोटाच्या दुःखातून बाहेर पडलेली असली, तरी त्या दोघांच्यात एक हळुवार नाते निर्माण होत आहे. फक्त त्याच्या जवळच्या मित्राला ह्याची कल्पना आहे.
 
 
 
दुसरी कथा आहे ती सुपरस्टार सिद्धार्थची. तो, त्याची पत्नी आणि मुलगी असे छोटे कुटुंब. वरवर अतिशय सुखी, पण त्याला दुःखाची काळी किनार आहे. ही मुलगी हृदयविकाराने ग्रस्त आहे. वडील आपल्या कामात गर्क. स्वतःच्याच प्रतिमेत अडकलेले. पैसे, लोकप्रियता आणि प्रतिष्ठा यापलीकडे त्यांचे लक्ष नाही. मुलगी आणि पत्नी हे जाणून आहेत. आपल्या मुलीच्या काळजीने आई खचून गेली आहे.
 
तिसरी कथा आहे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुदेवन नायरची. बहिणीच्या मुलीच्या शिक्षणासाठी फी देण्यासाठी तो लाच घेतो आणि पकडला जातो. पेपरमध्ये ही बातमी छापून आल्यावर साहजिकच घरातील नाराजीला तोंड देणे भाग आहे. आतापर्यंत आपला मामा, आपला अभिमान वाटणार्या पोरीसाठी ही शरमेची गोष्ट आहे. वरिष्ठ मंत्र्याला लाच देऊनच त्याला आपली नोकरी टिकवावी लागते, हे तर विडंबन आहे. समाजाची यंत्रणा जरी अशीच वरपासून खालपर्यंत किडलेली असली, तरी स्वतःच्या घरातील लोकांच्या नजरेतून घसरण्याची त्याला मात्र खंत आहे.
 
चौथी कथा आहे नामवंत हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एबेलची. त्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे आणि आपल्या पत्नीला नवीन गाडीची भेट देऊन चकित करायचे आहे.
 
 
सोळा सप्टेंबरला आपल्या पहिल्या मुलाखतीसाठी जाताना रेहानच्या मोटरबाइकचा अपघात होतो. त्याचा मित्र वाचतो, पण रेहान कोमात जातो. तो वाचणे शक्य नाही, तर निदान त्याच्या अवयवांचे प्रत्यारोपण करता येईल का? आता चार वेगळ्या कथा एका वळणावर येऊन उभ्या राहतात.
 
 
सिद्धार्थच्या मुलीला हृदयाची गरज आहे. अचानक प्रकृती गंभीर झाल्याने ती पलक्कड येथील रुग्णालयात दाखल झाली आहे. जर हृदय उपलब्ध झाले तर ती जगू शकेल, पण रेहानचे वडील याला तयार होतील का? डॉक्टर असल्याने आपला मुलगा वाचू शकणार नाही याची कल्पना आहे त्यांना. तरीही हृदय दोन तासांत पोहोचू शकले, तरच त्या मुलीला जीवदान मिळणार! मग स्वतःच्या हाताने व्हेंटिलेटर थांबवून मुलाचा मृत्यू जवळ आणायचा का? हा प्रश्न आहे.
 
त्याहूनही मोठा प्रश्न आहे, रहदारी चालू असलेल्या रस्त्यावरून गाडीने 150 किलोमीटर अंतर दोन तासांत कापणे. वाईट हवामानामुळे विमानसेवा बंद पडली आहे. रेहानची प्रेयसी पुढाकार घेऊन त्याच्या वडिलांचे मन वळवते. लाच घेतल्याने बदनाम झालेला सुदेवन गाडी वेळेत पोहोचवण्याची जबाबदारी घेतो. पोलीस कमीशनर अजमल नझर पहिल्यांदा हे मिशन पूर्ततेला नेण्यासाठी तयार होत नाहीत, कारण यात धोका असतो. डॉ. सायमन डिसूझा यांच्या कानउघडणीमुळे त्यांना आपली चूक समजते. आता वेगाची आणि वेळेची शर्यत सुरू होते. सुदेवनबरोबर असतात डॉ. एबेल आणि रेहानचा मित्र.
प्रवास सुरू होतो आणि काही वेळानंतर डॉ. एबेल सुदेवनला धमकी देऊन, जंगलाचा रस्ता धरायला सांगतो. ज्या पत्नीवर त्याचे प्रेम असते, तिचे त्याच्याच जिवलग मित्राशी अफेअर असल्याचे त्याला समजते. रागाच्या भरात, घेतलेल्या नवीन गाडीने तो आपल्या पत्नीला उडवतो. नंतर चूक समजते, पण उशीर झालेला असतो. आता पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी पळून जाणे हा एकच मार्ग त्याच्यापुढे असतो.
 
जसजसा वेळ जातो, तसतशी ती मुलगी वाचण्याची शक्यता धूसर होत जाते. एबेलचे मन वळवणे शक्य होते का? योग्य त्या वेळेत शस्त्रक्रिया होऊन ती मुलगी वाचते का?
 
चित्रपटचा शेवट सुखद आहे, पण या निमित्ताने माणसांच्या प्रवृत्तीचे विविध पैलू नजरेसमोर येतात. अनैतिकता आणि भ्रष्टाचार ही एकाच वर्गाची मक्तेदारी नाही. साध्या कॉन्स्टेबलपासून मोठे नेते आपापल्या परीने समाज पोखरतात. सोयीने तत्त्वे वापरतात. सुपरस्टारची पत्नी आपल्या नवर्यावर टीका करते, कारण त्याचे घरापेक्षा, मुलीपेक्षा स्वतःवर, स्वतःच्या समाजातील प्रतिमेवर प्रेम आहे; पण त्याच प्रतिमेचा उपयोग करून मुलीसाठी मदत मिळवताना, त्यासाठी अनेकांचे आयुष्य धोक्यात घालताना तिला खंत वाटत नाही.
 
 
केरळ राज्य तसे पारंपरिक. कुटुंबसंस्थेला मानणारे राज्य. आता तिथेही गेल्या काही वर्षांत घटस्फोट, विवाहबाह्य संबंध, वाढलेली गुन्हेगारी असे चंगळवादाचे परिणाम दिसून येत आहेत. केवळ कौटुंबिक संस्था नाही, तर राजकीय, सामाजिक सर्वच संस्था भ्रष्टाचाराने पोखरून गेल्या आहेत. लाच घेतल्याच्या गुन्ह्यातून सुटण्यासाठी लाच देणे, नामांकित नटाच्या मुलीसाठी गरज आहे म्हणून, मृत्युशय्येवर असलेल्या एका मुलाच्या वडिलांवर राजकीय नेत्यांनी आणि सरकारी नोकरदारांनी दबाव आणणे, जोखीम असतानासुद्धा पोलीस फोर्सवर जबरदस्ती करणे, भले हेतू मुलीला वाचवणे हा असेल, अर्थात ती मुलगीसुद्धा एका सुपरस्टारची मुलगी आहे म्हणूनच हे शक्य होते. ह्या सर्व गोष्टी समाजातील खालावलेल्या नैतिकतेचे वास्तववादी दर्शन घडवतात. चार वेगवेगळ्या कथा असूनही या चित्रपटची पटकथा कुठेही विसकळीत होत नाही. भूमिकासुद्धा अतिशय ठसठशीत. मोजक्या सीन्समध्येही कथेला उठाव देतात.
 
अर्थात किडलेले समाजजीवन हा चित्रपटाचा विषय नाही. ही केवळ पार्श्वभूमी आहे. माणसे चुकतात, मोहात पडतात, मूल्ये विसरतात, पण चुकलेली वाट हाच शेवट नसतो. नियती प्रत्येकाला संधी देते. चित्रपटात हायवे सोडून गाडी एका भलत्याच रस्त्याला लागते, तसेच या चित्रपटातील पात्रेसुद्धा एक वेगळा रस्ता पकडतात, भरकटतात, पण नंतर स्वतःला सावरून पुन्हा योग्य त्या वळणावर विसावतात. अपघातात गेलेला रेहान परत येत नाही, पण त्याच्यामुळे एका मुलीला जीवनदान मिळते. एक कुटुंब एकत्र येते. पोलीस कॉन्स्टेबलची गेलेली पत भरून येते. शेवट चांगला करणे हेसुद्धा आपल्या हातात असते, हा संदेश देऊन ट्रॅफिक चित्रपट संपतो.. जेव्हा यातील पात्रे एक नवीन दिशा पकडून जीवनाची नव्याने सुरुवात करतात.