साम्यवादी व भांडवलशाही विचारसरणींपेक्षा वेगळा तिसरा पर्याय

विवेक मराठी    06-Nov-2020
Total Views |
 @किशोर शशीतल
 
ऋषितुल्य दत्तोपंत ठेंगडी यांच्या Third Way या पुस्तकावर प्रस्तुत लेख आधारलेला आहे. या पुस्तकामध्ये शाश्वत विकासाच्या (sustainable developmentच्या) आकृतिबंधाबाबत साम्यवादी व भांडवलशाही या दोन विचारसरणींपेक्षा वेगळा तिसरा पर्याय काय असू शकतो याविषयी जे विचार मांडले आहेत त्यावर हा लेख आधारलेला आहे. त्यामधील नवीन सामाजिक-आर्थिक रचना कशी असावी याबद्दल जे विवेचन केले आहे, त्याचा संक्षेपाने घेतलेला हा धावता आढावा आहे.


dattopant thengadi books_
तसे पाहिले, तर Third Way हा काही दत्तोपंतानी वेगळा लिहिलेला समग्र प्रबंध नाही. त्यांनी वेगवेगळ्या निमित्ताने दिलेल्या भाषणांचा व लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे. साम्यवादाच्या अपयशानंतर व भांडवलशाहीचीसुद्धा त्याच दिशेने वाटचाल चालू आहे व दिवसेंदिवस ती अधिक वेगवान होत असल्याचे अनुभवास येत असल्यामुळे पश्चिम जगतामधील अमेरिकेसह सर्व देशांमध्ये या दोन विचारप्रणालींपेक्षा अन्य विचारप्रणालीचा - म्हणजेच 'तिसऱ्या पर्यायाचा' (Third Wayचा) गेली पंचवीस वर्षे शोध चालू आहे. तेथील थोर विचारवंत पीटर ड्रकर, सॅम्युअलसन सहित अन्य विचारवंतांना भांडवलशाहीच्या अटळ विनाशाची लक्षणे दृग्गोचर होऊ लागली होती. आपल्याकडेही सध्या नवनवीन समस्या निर्माण होत आहेत. त्यांची समाधानकारक उकल करण्यास स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ज्या समाजव्यवस्थेची चौकट आपण स्वीकारली होती, ती चौकट पुरेशी समर्थ नाही हे दिवसेदिवस स्पष्ट होत चालले आहे. थोर विचारवंत जेफर्सनचे सांगणे होते की प्रत्येक पिढीला तिच्या धारणेप्रमाणे तिच्या सुखाला, आनंदाला प्रेरक ठरेल अशा प्रकारची समाजव्यवस्था निवडण्याचा अधिकार आहे. आपल्याकडेही जी चौकट भारतीयांचे जीवन सुखी, समृद्ध, व समाधानी करू शकेल अशा चौकटीची आकांक्षा समाजमनात बळावू लागली आहे. बऱ्याच जणांना नवीन व्यवस्था कोठली असेल, तिचा blue print (आक्रॄतीबंध) कसा असेल हे जाणण्याची उत्सुकता असते. परंतु थोर विचारवंत मानवेंद्र नाथ रॉय, पं. दीनदयाळ उपाध्याय, स्वातंत्र्यवीर सावरकर, मार्क्स वा लेनिन यांच्यासारख्यां विचारवंतांचा कुठलाही परिपूर्ण असा blueprint सादर करण्यास विरोध होता, कारण त्यांना अशा ब्लू प्रिंटमध्ये निरर्थकता दिसत होती. कारण हे विचारवंत practical approachवर विश्वास ठेवणारे होते. Blueprint तयार करून समाजापुढे ठेवणे म्हणजे पुढील पिढ्यांचे हात बांधून ठेवणे आहे, असे त्यांना वाटत होते. आदरणीय दत्तोपंतही याला अपवाद नव्हते. माननीय दत्तोपंत्तांचे विचार होते की असा आराखडा वा आकृतिबंध हा मूलभूत तत्त्वप्रणालीच्या मार्गदर्शक सिद्धान्तांच्या प्रकाशात केल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष कार्यवाहीतून उलगडत जाणारी (progressive unfoldment) गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यवाहीच्या अगोदर नव्या सामाजिक आर्थिक व्यवस्थांची केवळ मार्गदर्शक स्थूलरेखाच देणे योग्य आहे. प्रत्येक विचारप्रणाली अशी स्थूलरेखा देतच असते. दत्तोपंत यांचे कार्यकर्त्यांना सांगणे होते की भावी सामाजिक-आर्थिक व्यवस्था निर्माण करण्यासंबधी आपल्यापैकी प्रत्येकाने गंभीरपणे सखोल चिंतन करावे व राष्ट्रीय स्तरावर यासंबंधी चर्चा घडवून आणावी व शक्यतो होईल तेवढी सहमती घडवून आणावी. मा. दत्तोपंत आज आपल्यात नाहीत. पण त्यानी पाहिलेले स्वप्न पुरे करण्यासाठी आपण अथक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. Third Way या पुस्तकात दत्तोपंतानी काय सांगितले आहे ते पाहण्याअगोदर आपण त्यांच्या जीवनपटावर एक दृष्टिक्षेप टाकून मग पुढे जाऊ या.
युगद्रष्टे दत्तोपंत ठेंगडीजींचे पुण्यस्मरण


भारतीय मजदूर संघाचे संस्थापक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजीवन प्रचारक राहिलेले, थोर प्रज्ञावंत, विचारवंत व द्रष्टे असलेल्या आदरणीय दत्तोपंत ठेंगडी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचा जन्म १० नोव्हेंबर १९२० रोजी झाला व १४ ऑक्टोबर २००४ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. शेवटपर्यंत ते कार्यरत होते. साधी राहणी व व उच्च विचारसरणी यांचे ते मूर्तिमंत प्रतीक होते. ते ऋषितुल्य जीवन जगले. हिंदू जीवनदृष्टी हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. संघाचे आजीवन प्रचारक राहिल्यामुळे मातृभूमीप्रती असलेले त्यांचे प्रेम, भक्ती व निष्ठा याविषयी वेगळे काही सांगावयास नको. ते अत्यंत कुशल संघटक होते. कामगार क्षेत्रामध्ये साम्यवाद्यांनी आपल्या देशद्रोही धोरणांनी धुमाकूळ घातला होता (१९६२, चिनी आक्रमण). कामगार क्षेत्र साम्यवाद्यांना आपली जहागीर वाटत होती. दत्तोपंतांनी त्या क्षेत्रात भारतीय मजदूर संघ नावाने १९५५मध्ये संघटना बांधण्यास शून्यापासून सुरुवात करून त्यांच्या हयातीमध्येच तिला पहिल्या क्रमांकाची संघटना म्हणून सरकारकडून (ते विरोधी विचाराचे असूनही) मान्यता मिळवून दिली व अशा रीतीने कामगार क्षेत्रात राष्ट्रवादी विचार रुजविला. तसेच शेतकऱ्यांमध्ये 'भारतीय किसान संघ' या नावाने संघटना बांधली व आज ती संघटनासुद्धा क्रमांक एकची संघटना म्हणून मान्यतापावली आहे. विद्यार्थ्यांमधील अभाविप व सामाजिक समरसता मंच या संघटनांनाही त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्या संघटना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अग्रस्थानी आहेत. भारत हा केवळ मनुष्यमात्रांच्या वास्तव्याकरिता निर्माण झालेला केवळ एक खंडप्राय भूभाग नसून प्रत्यक्ष परमेश्वराने मानवाच्याच नव्हे, तर चराचर सृष्टीचे कल्याण करण्याकरता निर्माण केलेले हे राष्ट्र आहे, ही पंतांची धारणा होती. मानवी जीवन शाश्वत, सुखी, आनंदी, व समाधानी व्हावे याकरिता ५००० वर्षांपेक्षा जास्त परंपरा असलेल्या या भारतवर्षांमध्ये आपल्या थोर ऋषिमुनींनी जे विचारधन आपल्याला दिले आहे, जे ज्ञानभांडार आपल्याला सुपुर्द केले आहे, त्या विचारांच्या, ज्ञानाच्या प्रकाशात मनुष्यमात्राने आपल्या जीवनाची कालक्रमणा केली तर तो सुखी व समृद्ध जीवन जगू शकेल, यावर त्यांची दृढ निष्ठा होती. दत्तोपंतांचे स्मरण करताना त्यांनी आपल्या कार्यपद्धतीमध्ये नेहमी वापरलेल्या तीन शब्दप्रयोगांची आठवण होणे सहाजिकच आहे - Hasten slowly, Progressive unfoldment आणि Responsive cooperation हे ते ३ शब्दप्रयोग होत.
 
हिंदू जीवनदृष्टीतील उत्तम, उदात्त विचारांचे त्यांनी जीवनभर समाजप्रबोधन केले. आपल्याकडे पश्चिमेची भ्रष्ट नक्कल होत असलेली पाहून ते समाजाला सांगावयाचे की "तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी". ही भ्रष्ट नक्कल चुकीची तर आहेच, तशीच आत्मघातकीसुद्धा ठरेल. ते टागोरांच्या सांगण्याची आठवण करून द्यायचे. टागोर नेहमी सांगत असत की "परमेश्वराने प्रत्येक राष्ट्राकरिता त्यांच्या स्वभावानुसार वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका काढल्या आहेत." परंतु दुर्दैवाने समाजाला त्या वेळी आपल्या स्वत्वाचा विसर पडला होता. पश्चिमेकडील वैभव पाहून त्याचे डोळे दिपून गेले होते व रशियामध्ये साम्यवादी विचारसरणीकडेही बरेच जण आकर्षित झाले होते. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांना आपण जे समाजप्रबोधन करीत आहोत ते अरण्यरुदन ठरत आहे की काय, असे वाटायचे. परंतु धीरोदत्त दत्तोपंत त्यांच्या द्रष्टेपणामुळे आपल्या विचारावर ठाम होते. भांडवलशाही व साम्यवादी विचारसरणी त्यांच्यामधील असलेल्या अंतर्विरोधामुळे यशस्वी होऊ शकणार नाहीत, मानवापुढील ज्या जटिल समस्या आहेत, त्यांचे निराकरण या दोन्ही विचारसरणीना शक्य नाही व आज ना उद्या त्यांचे पतन अटळ आहे असे ते सातत्याने प्रतिपादन करीत राहिले आणि विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात सोव्हिएत युनियनचे पतन झाल्यावर दत्तोपंतांच्या सांगण्यातील प्रचिती समाजाला आली. त्याचप्रमाणे भांडवलशाही जीवनपद्धतीसुद्धा आचके देत असल्याचे समाजाच्या प्रत्ययास येऊ लागले होते. त्यांनी गेल्यानंतर १० वर्षानी त्यांना प्रतीत असलेले भारतीय समाजाचा 'स्व'भाव व स्वत्व जागृत झालेले आज आपण पाहत आहोत.
 
दत्तोपंत जेव्हा राज्यसभेचे सदस्य (दोन टर्म्स) होते, तेव्हा त्यांच्या अजातशत्रू स्वभावामुळे कम्युनिस्ट सदस्यांशीही त्यांचे मधुर संबंध होते व त्यांच्यात नेहमी वेगवेगळ्या विषयावर चर्चा व्हावयाची. अशाच एका चर्चेच्या दरम्यान संघसंस्थापक आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांचा विषय निघाला असताना 'एखाद्या श्रेष्ठ व्यक्तिमत्त्वाच्या श्रेष्ठपणाच्या मूल्यमापनाचा Criteria काय आहे?' अशी पृच्छा झाल्यावर उत्तर दिले गेले की "His greatness can be measured by his lengthening shadow on the future" हे उत्तर परमपूजनीय डॉक्टरांच्या बाबतीत होते, तरी आज ज्या विचारांच्या प्रकाशात भारतामध्ये परिवर्तनाच्या प्रक्रियेने जो वेग घेतला आहे व जगामध्ये विशेषत: पश्चिम जगतामधील विचारवंतांचे तिसरा पर्याय म्हणून हिंदू चिंतनाकडे लक्ष जाऊ लागले आहे, त्यावरून तो Criteria दत्तोपंतानासुद्धा लागू होत असल्याचे दिसत आहे. दत्तोपंताविषयी परमआदराची किंबहुना भक्तिभावाची भावना म्हटली तरी चालेल, अशा माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मनाला अतीव समाधान वाटत आहे. तिसऱ्या पर्यायाच्या प्रारूपासंबंधी त्यांनी काय मांडणी केली आहे, ते पाहू या.
 
 
dattopant thengadi books_

सर्वप्रथम 'स्व'चा जागर, नंतर पर्याय मांडणी
 
माननीय दत्तोपंत सांगायचे की आपले दिशावेध प्रारूप (approach paper) समाजासमोर सादर करण्याच्या अगोदर समाजाची ते स्वीकारण्याची मानसिकता तयार करावी लागेल, otherwise the entire exercise will prove to be an exercise in futility. त्यामुळे अगोदर आपल्याला योग्य ते वैचारिक वातावरण तयार करावे लागेल. त्यासाठी समाजमनातील आधीच्या गैरसमजाची वैचारिक, मानसिक जळमटे काढून टाकल्याशिवाय समाजमन अशा प्रकारच्या प्रारूपाच्या स्वागतासाठी तयार होऊ शकणार नाही. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी व आजही त्यांच्या प्रभावाखाली असलेल्या आपल्याकडील त्यांच्या शागिर्दांनी आणि डाव्या विचारवंतांनी समाजमनामध्ये जे जे काही हिंदू म्हणून आहे (हिंदूंचा इतिहास, परंपरा, धर्म, तत्त्वज्ञान, व विज्ञान) त्याविषयी घृ‍णा वाटावी म्हणून पद्धतशीरपणे अनेक मिथ्ये आणि कपोलकल्पित गोष्टी बिंबविण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यातून ही जळमटे निर्माण झाली आहेत. त्यामुळे प्रारूप प्रस्तुत करण्यापूर्वी अहिंदूकरण्याच्या खोडसाळ हेतूने जो दुष्प्रप्रचार केला गेला आहे, त्याच्यावर आघात करून तो समूळ नष्ट करणे अत्यावश्यक आहे.

 
दत्तोपंत पुढे हेसुद्धा सांगतात की, समाजामध्ये भांडवलशाही व साम्यवादाविषयीचे आकर्षण त्यांच्या विफलतेमुळे ओसरत चाललेले प्रत्ययास येत आहे. अशा वेळी पश्चिमी जगतातील विचारांचे अध्ययन करून ते जणू आपलेच विचार आहेत अशा आविर्भावात भारतीयांच्या माथी मारत आहेत त्या pseudo secular विचारवंताना त्यांचा their idea of India या नावाखाली जो राष्ट्रघातक खेळ चालला आहे, तो संपला आहे आणि त्यांचा हा धंदा आता किफायतशीर राहिलेला नाही याची जाणीव करून देण्याची वेळ आलेली आहे. मेकाॅलेपुत्रांबरोबर आपला जो वैचारिक संघर्ष चालला आहे, तो आता अंतिम चरणापर्यंत आलेला असून त्यांच्यावर शेवटचा घाव घालण्याची वेळ आली आहे.

 
त्यांचे आणखी एक सांगणे होते‌, ते म्हणजे एक आवश्यक पथ्य पाळावे लागेल. आपल्याला ज्यांच्याशी चर्चा करावयाची आहे, त्यांना आपण आपले विचार मांडताना ज्या शब्दावलींचा उपयोग करू, त्यांतून आपल्याला जो अर्थ convey करावयाचा आहे तोच अर्थ त्यांनासुद्धा प्रतीत असला पाहिजे याची खात्री करूनच मगच चर्चा करावी लागेल, तरच ती चर्चा अर्थपूर्ण होऊ शकेल. तसेच आपल्या प्रारूपाला समाजाचीसुद्धा मान्यता मिळवावी लागेल. त्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील. कारण त्यांच्या मान्यतेशिवाय सर्व व्यर्थ आहे. ठेंगडीजी याकरिता भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी constituent assemblyमध्ये अल्पसंख्याकांच्या हक्करक्षणाच्या समस्येचा विचार करताना जे म्हटले होते, ते आणि अब्राहम लिंकन यांचे उद्गार quote करतात. बाबासाहेब म्हणतात की 'हक्क हे कायद्याने नव्हे, तर समाजाच्या सामाजिक व नैतिक सद्विवेकबुद्धीमुळे जपले जातात. हक्क मान्य करण्याची सामाजिक विवेकबुद्धी असेल तरच ते हक्क सुरक्षित रहातील. जर समाजाचा विरोध असेल तर कोणताही कायदा, कोणतीही संसद वा न्यायपालिका त्या हक्कांची हमी देऊ शकणार नाही.' त्याचप्रमाणे लिंकन सांगायचे की 'सामाजिक भावनेचे बळ असेल तर कोणतीही गोष्ट अपयशी ठरणार नाही, पण त्याच्या अभावी मात्र कोणत्याही गोष्टीत यश येणार नाही.' या सर्व गोष्टींचा विचार करून समाजाची मान्यता मिळविण्यासाठी अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आता तिसरा पर्यायाविषयी ठेंगडीजी काय म्हणतात, ते पाहू या.
  
तिसरा पर्याय शोधण्याची गरज

साम्यवादी विचारसरणी व भांडवलशाही जीवनपद्धती मानवापुढील जटिल समस्या सोडविण्यात असमर्थ आहेत असे अनेक विचारवंतांच्या लक्षात आल्यामुळे 'तिसऱ्या पर्यायाचा 'शोध घेण्यास सुरुवात झाली आहे, याचा या लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेला आहे. त्या पर्यायासंबंधी माननीय दत्तोपंतांनी काय विवेचन केले आहे, हे पाहण्याअगोदर साम्यवाद व भांडवलवाद का विफल झाले, यासंबंधी Third Way पुस्तकात काय म्हटले आहे त्यांचा थोडक्यात आढावा घेऊन मग तिसरा पर्याय म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून आपले हिंदू चिंतनच आहे व तेच मानवापुढील सर्व जटिल समस्यांचे निराकारण करू शकते, हे मा. दत्तोपंतानी प्रतिपादन केले आहे ते पाहू या.


dattopant thengadi books_
तसे पाहिले, तर या पुस्तकात साम्यवादाच्या विफलतेवर त्यानीं फार भाष्य केलेले दिसत नाही. साम्यवाद संपूर्णतया विफल झाला आहे हे असे म्हटले, तरी तो त्या विचारधारेतील अंतर्विरोधामुळे झालेला असून त्याला काही अन्य कारणेही जबाबदार आहेत व त्यांचे योग्य मूल्यमापन अजून झाले नाही, एवढेच दत्तोपंतांनी म्हटले आहे. Failure of Communismवर फारसे भाष्य न करण्याचे एक कारण असे असावे की, ठेंगडीजींचे पक्के मत होते की भारतीय समाज हा मुळातच अत्यंत धर्मप्रिय समाज आहे. अहिंसेवर त्याची गाढ श्रद्धा आहे. आध्यात्मिकतेला व नैतिकतेला मानणारा हा समाज आहे. असा हा समाज, 'धर्म ही अफूची गोळी आहे' असे सांगणाऱ्या, ईश्वराचे अस्तित्व नाकारणाऱ्या व हिंसेला प्राधान्य देणाऱ्या साम्यवादी विचारसरणीवर आधारित असलेली सामाजिक-आर्थिक व्यवस्था कधीही स्वीकारणार नाही, याची त्यांना पक्की खात्री होती. त्यांची चिंता वेगळीच होती. ते बघत होते की, १९९१मध्ये परकीय गंगाजळीमध्ये खडखडाट झाल्यामुळे आयात-निर्यात व्यापारातील तूट भरून काढण्यासाठी आपल्याकडील सोने इंग्लंडमधील बँकेत गहाण टाकावे लागले होते. तसेच IMF आणि WORLD BANK यांच्या दबावाखाली जागतिकीकरणाचे, उदारीकरणाचे व खाजगीकरणाचे धोरण स्वीकारून परकीय भांडवलाला व बहुराष्ट्रीय कंपन्यांना/उद्योगधंद्यांना आपले दरवाजे उघडुन द्यावे लागले होते. तसेच G7 राष्ट्रांच्या दबावाखाली विकसनशील देशांवर अन्याय करणाऱ्या WTOचे (GATTचे नवे रूप) सदस्यत्व स्वीकार करण्याच्या करारावर सही करावी लागली होती. या सर्व गोष्टींमुळे भारतापुढे आर्थिक गुलामगिरीचे संकट उभे राहण्याचा धोका दिसू लागला होता. तशांतच पश्चिमी जगतामधील भौतिक समृद्धी पाहून त्याचे अनुकरण करण्यास येथला आंग्लाळलेला अभिजन वर्ग (Elite Class) आकर्षित झालेला दिसू लागला होता. अशा वेळी तिसरा पर्याय मांडण्याच्या अगोदर पश्चिमी जगामधील भांडवलशाही समाजव्यवस्थेचे ओंगळ स्वरूप, त्या व्यवस्थेमध्ये असलेले अंतर्विरोध, तिची लयाला जाण्याची वाटचाल हे समाजापुढे आणणे पंतांना अगत्याचे वाटले, म्हणून या पुस्तकात पश्चिमी modelमधील त्रुटी, त्यातील अंतर्विरोध व त्याची विनाशाकडे चाललेली वाटचाल याची त्यानीं विस्ताराने मांडणी केली आहे. ती काय आहे, ते पुढे पाहू या.
भांडवलशाही-उदय व उत्कर्ष व ऱ्हास


युरोपच्या मध्ययुगीन काळात धर्मकल्पना व धर्मवर्चस्वाचा प्रभाव तत्कालीन समाजावर होता. परंतु मध्ययुगानंतर विज्ञानकेंद्रित प्रबोधनाचा (Renaissanceचा) काळ सुरू झाला. त्यातून वैज्ञानिक क्रांती झाली. मानवी जीवनाची महत्ता प्रस्थापित झाली. याचा परिणाम म्हणून धर्मकल्पना, धर्मवर्चस्व, पोपशाही, सरंजामशाही यांना विरोध सुरू झाला. त्यातून राष्ट्र कल्पनेचा विकास झाला व पुढे जाऊन राष्ट्र -राज्य (Nation-State) संकल्पना अस्तित्वात आली. थोडक्यात, धर्मवर्चस्वावर आधारित समाजव्यवस्थेचा लय होऊन व्यक्तिस्वातंत्र्यावर आधारित एक इहवादी समाजव्यवस्था अस्तित्वात आली. या सर्व बदलांचा स्रोत वा प्रेरणा ही भावात्मकतेपेक्षा विरोधावर आधारलेली होती. या सर्वांचा परिणाम एका बाजूला एकांगी व्यक्तिवाद व उपयुक्ततावाद निर्माण होण्यात झाला, तसेच दुसर्‍या बाजूला परमेश्वराने हा निसर्ग, ही सृष्टी मानवाच्या सुखासाठीच निर्माण केली आहे व त्यामुळे त्याचा आपण आपल्या सुखासाठी परिपूर्ण उपयोग करून घेतला पाहिजे या विचाराच्या प्रभावाखाली विज्ञाननिष्ठा वाढली व त्यातून अनेक शोध लागले, वैज्ञानिक क्रांती झाली. त्याचा परिणाम औद्योगिक क्रांती होण्यात झाला व त्यातून भांडवलशाही समाजरचना अस्तित्वात आली. मनुष्यमात्राच्या गरजा (needs) अनंत आहेत, परंतु त्याच्या पूर्ततेकरिता जी साधने (resources) लागतात, ती मात्र मर्यादित आहेत; त्यामुळे त्या मर्यादित साधनांचा कशा तऱ्हेने (optimum) उपयोग केला तर समाज सुखी होईल, हा विचार घेऊन पश्चिमी जगतामध्ये अनेक अर्थतज्ज्ञांनी वेळोवेळी आपले सिद्धान्त मांडले. अॅडम स्मिथपासून हिक्स, सॅम्युअलसनपर्यंत अनेक जणांनी जेव्हा जेव्हा भांडवलशाहीपुढे काही समस्या उभ्या राहिल्या, तेव्हा तेव्हा त्यांच्यावर मात करून पुढे जाण्याकरिता नवनवीन सिद्धान्त मांडले. तेथील आर्थिक चिंतन हे पुढे जाणारे व गतिशील आहे. त्यांत अगणित संकल्पना व सिद्धान्त सिद्ध करून ते चिंतन progressive आहे हे दाखविण्याच्या प्रयत्नांनी भांडवली आर्थिक चिंतनाचा इतिहास भरलेला आहे. त्या चिंतनामध्ये‌ माणसाच्या भौतिक सुखाचा एकांगी विचार करत गेल्यामुळे वेळोवेळी तेथल्या समाजापुढे वेगवेगळ्या समस्या उभ्या राहिल्या व त्यावर उपाय म्हणून वेळोवेळी विविध सिद्धान्त मांडले गेले. परंतु ते उपाय मलमपट्ट्याच ठरल्या. उलटपक्षी त्या समस्यांनी अकराळविकराळ स्वरूप धारण केलेले दिसू लागले. विसाव्या शतकामध्ये सर्वात प्रथम धक्का दिला तो १९२९मध्ये अमेरिकेत आलेल्या मंदीने, जी पुढे दहा वर्षे टिकली. अनेक जण कंगाल झाले. बेकारीत भरमसाठ वाढ झाली. रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. अर्थव्यवस्था ठप्प झाली. दुसरा धक्का बसला तो साठच्या दशकात तेलाचा भाववाढीने, जिने पुढे रौद्र स्वरूप धारण केले. त्यातून सावरतो न सावरतो, तोच १९८७मध्ये शेअर बाजार कोसळला व लाखो लोक देशोधडीला लागले. आता हा लेख लिहिताना आठवण होत आहे ती एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच आर्थिक समृद्धीचे वैभव दाखविणाऱ्या Twin Towerवर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला व नंतर एक तपापूर्वी २००८मध्ये पश्चिम जगताला हादरवून टाकणारे अमेरिकेतील sub-prime crisis व आता कोरोनामुळे संपूर्ण युरोपात व अमेरिकेमध्ये कोसळत चाललेली अर्थव्यवस्था व मृत्यूचे चाललेले तांडव. ही सर्व संकटे आली ती अतिहव्यासामुळे.
 
भांडवलशाही विचारसरणीमधील दोष


एखादी व्यवस्था चुकीच्या गृहीतकावर आधारलेली असेल, तर ती व्यवस्था काही काळ जरी आनंद देत असली, तरी कालांतराने तिच्यामध्ये निहित असलेल्या अंतर्विरोधामुळे तिच्यामधील दोष प्रकट होऊ लागतात व ती व्यवस्था लयाला जाण्याची प्रक्रिया सुरू होते व अंततोगत्वा ती व्यवस्था कालबाह्य ठरुन विनाश पावते, असा इतिहासाचा दाखला आहे. ह्या भांडवलशाही सामाजिक-आर्थिक व्यवस्थेचे आज तसेच काही होत असल्याचे अनुभवास येत आहे. एक मान्यवर आधुनिक विचारवंत काप्रा यांच्या म्हणण्याप्रमाणे पाश्चिमात्यांनी अंत:प्रेरणेच्या सुजाणतेऐवजी विवेकनिष्ठ ज्ञान, धर्माऐवजी विज्ञान, सहकार्याऐवजी स्पर्धा, निसर्गसंपत्तीच्या जपणुकीऐवजी तिचे शोषण यांना झुकते माप दिले. आपले विचार व भावना, आपली मूल्ये व धारणा, आपल्या राजकीय व सामाजिक चौकटी यांचे असंतुलन व या सर्वांच्या मुळाशी असलेला एकूणच सांस्कृतिक असमतोल हेच तेथल्या आजच्या निर्वाणीच्या अवस्थेचे नेमके कारण आहे. काप्रा पुढे जाऊन सांगताहेत - What we need, then, is a new paradigm, a new vision of reality, a fundamental change in our thought, perceptions and values.

भांडवलशाहीमधील प्रमुख दोष

 
भांडवलशाही व्यवस्था प्रामुख्याने इहवादी आहे. त्यामुळे व्यक्तीचे शरीर, मन व बुद्धी यांचा एकात्म (integrated) विचार न करता फक्त शरीरसुखाचाच विचार केला आहे. भौतिक सुखावर सगळा भर आहे. तेथे असे मानले गेले आहे की इंद्रियगोचर जड वस्तुमान (matter) हेच मूलभूत आहे व मन (mind) वगैरे त्यावरील केवळ इमले (super structure) आहेत. परिणामत: तिकडे सामाजिक-आर्थिक व्यवस्था हीच मूलभूत मानली गेली व एकदा का योग्य व्यवस्था निर्माण होऊन कार्यरत झाली म्हणजे आपोआप समाजामध्ये योग्य ते मानसिक बदल (psychological) होतील असे त्यांना वाटत होते. परंतु त्यांचे हे मांडणे पूर्णतया चुकीचे आहे, हे आता निरपवादपणे सिद्ध झाले आहे.
 
 
दुसरा दोष असा आहे की की भांडवलशाही व्यवस्थेमध्ये व्यक्तिस्वातंत्र्यावर फार जोर दिला गेला असल्यामुळे तेथे व्यक्ती व समाज यामध्ये करारस्वरूप (contract) नाते आहे, असे मांडले गेले. यामुळे व्यक्ती समाजविन्मुख होऊ लागली. उलटपक्षी आपल्याकडे व्यक्ती व समाज यांमध्ये organic relationship असल्याचे प्रतिपादन केले आहे. आपल्याकडे जशा जशा जाणिवा प्रगल्भ होत जातात, त्यानुसार व्यक्ती प्रथम स्वतःपुरताच विचार करते, नंतर कुटुंबाचा, त्यानंतर समाजाचा, मग राष्ट्राचा व सरतेशेवटी विश्वाचा, चराचर सृष्टीचा विचार करते असे मांडले गेले आहे. हिंदू चिंतन व पश्चिमेकडील सामाजिक चिंतन यांमधील हा मूलभूत फरक आहे.
 
 
भांडवलशाहीच्या अध:पतनाची कारणे
 
१) संकीर्ण विचारपद्धती (fragmented thought system), २) नीतिमत्तेशी फारकत घेणे, परिणाम भ्रष्टाचार, गुन्हेगारी, स्वैराचार यामध्ये प्रचंड वाढ, ३) उपभोगाला प्राधान्य - त्याची चंगळवादात परीणिती, ४) फक्त आणि फक्त नफ्याचा विचार, ५) राष्ट्रीय उत्पन्नाविषयी चुकीची संकल्पना - वाममार्गाने, भ्रष्टाचाराने व गुन्हेगारी मार्गानेही मिळवलेल्या संपत्तीचा राष्ट्रीय सकल उत्पादनात समावेश, ६) भांडवलदार (मालक) आणि मजूर या दोनच वर्गांचा विचार - इतरांचा विचार नाही, ७) शारीरिक समाधानाशिवाय मानसिक समाधान म्हणून काही असते त्याचा विचार नाही. केवळ ऐहिक बाजूचाच विचार केल्यामुळे व्यक्तीच्या व समाजाच्या जीवनात असंतुलन होते, हे तेथील विचारवंतांना समजू शकले नाही. त्यामुळे तेथील चिंतन हे नेहमी 'हे का ते' (either /or या ismमध्ये) अशा परस्परविरोधी विचारांवर आधारलेले राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या विचारात विकास हाच केंद्रबिंदू राहिला, तरी त्यांची दृष्टी एकांगी असल्यामुळे विकासाच्या कल्पनेची परिणती म्हणून समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर असंतुलन झालेले पहावयास मिळते. आपल्याकडे अशी एकांगी दृष्टी नाहीये. आपल्याकडे शरीरसुखाबरोबर मानसिक समाधानालासुद्धा प्राधान्य दिले आहे. आपल्याकडे वैचारिक गोंधळ नाही. आता J. Hicks (1904-1989)सारखे सुप्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ सांगून गेले की भविष्यातील वेध घेणाऱ्या गुणधर्मांचा पश्‍चिमेकडील आर्थिक चिंतनात अभाव आहे. त्यामुळे futuristic विचारांचा वा घटनांचा वेध घेण्यास आपण असमर्थ आहोत. दुसरे थोर अर्थशास्त्रज्ञ Samuelson (1915-2009) या विचाराशी सहमत होते. त्यांचे म्हणणे होते की अमेरिकी अर्थशास्त्रज्ञांना अमेरिकन सरकारचा राजाश्रय आहे (they are 'kept' economists). Daniel Bell याने आपल्या संपादित केलेल्या Crisis in Economic Theory या ग्रंथामध्ये वर्तमान आर्थिक चिंतनातील अगतिकता दाखवून दिली आहे. वॉशिंग्टनचा सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ हर्बर्ट स्टेन याने आपल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीनंतर आपल्या Washington Bed Time Stories नावाने लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत पुढील दोन गोष्टी अधोरेखित केल्या आहेत - १) अर्थतज्ज्ञांना फारसे काही माहीत नसते, २) अर्थनीती ठरविणाऱ्या राजकारण्यासकट इतर लोकांना अर्थशास्त्रज्ञापेक्षाही कमी जाण असते. भांडवलशाही सामाजिक-आर्थिक व्यवस्थेसंबंधीच्या सध्याच्या दुरवस्थेबद्दल केवढे विदारक भाष्य! एका बाजूला प्रचंड समृद्धी आली, तरी अंगभूत मर्यादांमुळे त्याचसमवेत तेथील समाजाचे फार मोठ्या प्रमाणावर अध:पतन झालेले दिसत आहे. एकीकडे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमधून समृद्धीचे डोंगर उभे असताना दुसरीकडे मात्र भयानक आर्थिक विषमता, अफाट शहरीकरणातून बिघडलेले समाजस्वास्थ्य, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, हिंसाचार, व्यसनाधीनतेचे थैमान, कुटुंबसंस्थेचे विघटन, एकपालकत्व असलेली मुले, मानसिक व शारीरिक विकृतींचे आणि आत्महत्येचे वाढते प्रमाण, वाढत्या स्वैराचारामुळे कुमारी मातांचे व अनाथ संततींचे प्रश्न, समृद्धीमुळे निर्माण झालेला व्यक्तीच्या मनातील परात्मभाव, समाजापासून तुटून निघण्याची भावना, निसर्गाचे अतिप्रमाणात शोषण केल्यामुळे निर्माण झालेले पर्यावरणाचे प्रश्न इत्यादी हे सर्व पश्चिमी संस्कृतीने जगाला दिलेली देणगी आहे.
 
साम्यवाद अगोदरच कोसळलेला व आता भांडवलशाहीचाही शनै: शनै: होत असलेला ऱ्हास व तिचा मृत्यू हा अटळ आहे हे पटल्यामुळे हिक्स, सॅमुअलसन प्रभृती या दोन्हीपेक्षा तिसरा काही पर्याय आहे का याचा विचार करू लागले होते. त्यांतच भारताने जगाला दिलेले योग, ध्यानधारणा, आयुर्वेद, मन:शांती देणारे संगीत, आरोग्यदायकी संतुलित भारतीय आहार यामुळे एक soft power म्हणून आता भारताची गणना व्हावयास लागली असल्यामुळे आपल्या हिंदू चिंतनाकडे जगाचे, विशेषत: पाश्चिमात्य विचारवंतांचे लक्ष जाऊ लागले आहे.ॱत्या चिंतनाविषयी मा. दत्तोपंतांनी काय म्हटले आहे, त्याच्यावर आता दॄष्टिक्षेप टाकू या. 
 
 
हिंदू जीवनदृष्टी


स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 'सारे जहांसे अच्छा हिंदोस्ता हमारा' या काव्यपंक्तीने सुरुवात केलेली एक उर्दू शायरी फार लोकप्रिय झाली होती. यात एका ओळीत शायर हिंदुस्तानाविषयी मोठ्या अभिमानाने विचारतो की, 'क्या बात है की हस्ती मिटती नही हमारी?' मानवी इतिहासामध्ये अनेक संस्कृती निर्माण झाल्या आणि कालौघात नष्टही झाल्या. पण पाच हजार वर्षांपेक्षा जुनी असलेली हिंदू संस्कृती - जिच्यावर या काळात अनेक आक्रमणे झाली, संकटे आली, पण हिंदू संस्कृतीने या सर्वांवर मात करुन नुसतीच टिकून राहिली नसून दिवसेदिवस वर्धिष्णू होत आहे. आज पुरे विश्व संत्रस्त आहे. दिङमूढ अवस्थेत आहे. जगापुढे अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. त्यातून मार्ग कसा काढावा या विचारात असताना त्यांना आपल्या कालजयी संस्कृतीमध्ये, आपला जीवनविषयक जो दृष्टीकोन आहे, त्यामध्ये आशेचा किरण दिसून राहिला आहे. 'क्या बात है की हस्ती मिटती नही हमारी?' याचे उत्तर आहे की, आपली संस्कृती द्वैतावर नव्हे तर अद्वैतावर, संघर्षावर नव्हे तर सहकारावर, भोगावर नव्हे तर त्यागावर उभारलेली आहे. हिंदू संस्कृती विविधतेला भेद न मानता या एकात्म सृष्टीचा प्रकृतीने पुरुषाच्या संयोगाने मांडलेला पसारा आहे अशी तिची धारणा आहे. एकात्मतेमध्ये विविधता हा तिचा ‌दृष्टीकोन आहे. हिंदू संस्कृती निसर्गाचे अपरिवर्तनीय कायदे आहेत, त्याच्या प्रकाशात सातत्याने बदलणाऱ्या सामाजिक-आर्थिक व्यवस्थेत युगानुकूल बदल घडवून पुढील वाटचाल करीत असते. म्हणून 'हस्ती मिटती नही हमारी!'

 
केवळ भौतिक पैलूवरच एकांगी भर दिल्याने व्यक्तिगत व सामाजिक जीवनात असंतुलन निर्माण होते, हे लक्षात घेऊन हिंदू संस्कृतीने अशा मूल्यांची जोपासना केली आहे ज्यायोगे व्यक्तीला शाश्वत, सुखी, आनंदी व समाधानी जीवन कंठता येईल. आपल्याकडे हिंदू चिंतनात मनाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सर्वप्रथम मन हे ज्ञानेंद्रियानी ग्रहण केलेल्या संस्काराची जुळवाजुळव करून बुद्धीकडे ठेवते आणि मग बुद्धी निर्णय घेऊन कर्मेंद्रियाकडे अंमलबजावणी करता सुपुर्द करते, असे सांगितले गेले आहे (गीतारहस्य, प्रकरण ८).

dattopant thengadi books_ 
पश्चिमी व आपल्या धारणेमध्ये एक मूलभूत फरक आहे व तो म्हणजे तेथे व्यक्ती आणि समाज यांच्यामध्ये करारस्वरूप (contract) नाते आहे असे मानले जाते. उलटपक्षी आपल्याकडे व्यक्ती व समाज यांच्यामध्ये organic relationship असते असे प्रतिपादिले आहे. व्यक्तीचा परिपूर्ण विकास, शाश्वत व अखंड समाधान हे हिंदू जीवनदृष्टीचे लक्ष्य आहे. वैयक्तिक आणि सामाजिक यांच्या भौतिक सुखाबरोबर आत्मिक सुखाचाही असा एकात्म (integrated) दृष्टीकोन हे हिंदू विचारप्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच हिंदू चिंतनामध्ये अर्थशास्त्राबरोबर शिक्षण, पर्यावरणशास्त्र व नीतिशास्त्र यांचासुद्धा विचार केला गेला आहे व आतासुद्धा तिसऱ्या पर्यायासंदर्भात तसाच विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. हिंदू दार्शनिकांनी 'अर्थ' हे स्वतंत्र वेगळे मूल्य न मानता चार पुरुषार्थांचा, म्हणजे साधनचतुष्टयाचा एकात्म भाग मानला आहे.
पश्चिमी व आपल्या दृष्टीकोनात मूलभूत फरक असल्यामुळे आपल्याला त्यांच्या कोठल्या गोष्टी मान्य नाहीत, याचेही पंतांनी विवेचन केले आहे, ते पुढीलप्रमाणे - १) पश्चिमेकडील model आपणास मान्य नाही. २) आपल्या पुरातन देशाला हे लज्जास्पद आहे. ३) युरोपियन समाजाला विकासाच्या वाटचालीत ज्या ज्या टप्प्यातून जावे लागले, त्याचप्रमाणे जगातील इतर समाजालाही जावे लागेल ही धारणा चुकीची असून आपल्याला ती मान्य नाही. ४) अंधानुकरण मान्य नाही, पण त्याचबरोबर पश्चिमेचे सर्वकाही त्याज्यही नाही. Truth and knowledge universal असते, त्यामुळे आपली भूमिका assimilationची असणे आवश्यक आहे. ५) पश्चिमेकडील प्रगत शास्त्र आणि तंत्रज्ञान याचा आपण जरुरीनुसार उपयोग करून घ्यावा. पण wholesale transplantation नको.
तिसऱ्या पर्यायाचा approach paper तयार करताना आपली संस्कृती प्राधान्येकरून ' धर्म' या पुरुषार्थावर आधारलेली आहे, हे लक्षात घेऊन त्या प्रारूपाचा प्रारंभबिंदू 'धर्म' असला पाहिजे असे दत्तोपंतांचे सांगणे होते व त्यामुळे त्यांनी या पुस्तकात धर्मविषयक जी मांडणी केली आहे, ती पाहू या.
 
धर्म - हिंदू जीवनदृष्टीची संदर्भचौकट

कोणत्याही अर्थपूर्ण चर्चेसाठी उचित अशा संदर्भबिंदू‌ची (reference pointची) आवश्यकता असते, अशी मा. दत्तोपंतांची धारणा होती. हिंदू जीवनदृष्टीसाठी 'धर्म' हा संदर्भबिंदू आहे. जगाच्या कल्याणासाठी अशी अर्थव्यवस्था हवी, जी कप्प्याकप्प्याच्या विचारावर वा संकीर्णतेवर आधारलेली नसून जीवनाच्या एकात्म दृष्टीकोनावर आधारलेली असेल. व याकरिता आपल्या सांस्कृतिक तत्त्वाशी सुसंगत व सनातन धर्मावर अधिष्ठित अशी सामाजिक-अर्थव्यवस्था देण्याची क्षमता भारताकडे आहे. व असा पर्याय देण्याची इतिहासदत्त जबाबदारी नियतीने भारतावर टाकलेली आहे, या विचारावर पंत ठाम होते. जे परिवर्तन आणावयाचे आहे, त्याचा संदर्भनिकष 'धर्म' आहे. जी नवीन सामाजिक आर्थिक रचना व व्यवस्था लावायची आहे, ती धर्माच्याच शाश्वत सिद्धान्ताच्या सूत्राप्रमाणे लावायची, ही हिंदूंची परिवर्तन पद्धती आहे. धर्म या शब्दाभोवती अनेक गैरसमज अजाणतेपणे किंवा बुद्ध्याच पसरविलेले आहेत. पुरोगाम्यांनी धर्माला बदनाम करून टाकले आहे. धर्म म्हणजे उपासना पंथ असे सांगून तो निधार्मिकतेच्या विरोधी आहे असा दुष्प्रचार केला गेला. पण म्हणून आपण 'धर्म' हा संदर्भबिंदू म्हणून स्वीकारण्याची आपली सुयोग्य परंपरा सोडता कामा नये.
 
धर्म ही संकल्पना ही एक वैशिष्ट्यपूर्ण अशी संकल्पना आहे व हिंदूंनी जगाला दिलेली ती खास देणगी आहे. धर्म ही संस्कृत भाषेतील अतिशय व्यापक, म्हटले तर all encompassing अशी संज्ञा आहे. तिच्या समानार्थी शब्द अन्य कोणत्याही भाषेत नाही. धर्म शब्दाचा अर्थ व त्याचा प्रयोग अतिशय व्यापक स्वरूपाचा आहे. जिवाच्या उन्नतीसाठी साहाय्यकारकी होणारे जे जे काही आहे, ते ते सर्व म्हणजे धर्म असे विद्वान लोक सांगतात. म्हणूनच द्रष्ट्या ऋषींनी 'धारणा करणारा तो धर्म' असे सांगितले आहे. धर्म या शब्दात वेगवेगळे अर्थ समाविष्ट आहेत. अगदी सांगावयाचे झाले तर धर्म म्हणजे न्याय, नैतिकता, सद्हेतुपूर्वक सात्त्विक वागणूक, विशिष्ट परिस्थितीमध्ये वागण्याची, करण्याची योग्य बाब, दान करणे, जिवाच्या वा वस्तूंचे नैसर्गिक गुणधर्म (उदाहरणार्थ तांदळाची जात, गव्हाची जात) इत्यादी. धर्म हा शब्द राजाची कर्तव्ये व अधिकार यांच्या संदर्भात वापरला जातो, तेव्हा तो राजधर्म म्हणून वापरला जातो, तसेच समाजरचनेसाठी 'धर्मराज्याची आवश्यकता' आहे असे म्हटले जाते, तेव्हा धर्म या शब्दाचा अर्थ केवळ कायदा असाच असतो. धर्मराज्य म्हणजे कायद्याचे राज्य. त्यामुळे हिंदू चिंतन जगाला तिसरा पर्याय देऊ शकतो हा जो आपला प्रतिपाद्य विषय आहे, त्याचे विवेचन करण्याची सुरुवात 'धर्म' ह्या संदर्भबिंदूपासून (point of referenceपासून) करावी लागेल आणि हीच आपली सुयोग्य परंपरा आहे व ती सोडता कामा नये, असे पंतांचे आग्रहपूर्वक सांगणे आहे. भारताच्या भावी संस्थात्मक आकृतिबंधाची निश्चिती करताना धर्माची वैश्विक तत्त्वे (universal principles) हाच अटळ संदर्भ असणे आवश्यक आहे, एवढे मात्र नक्की. भारतातील भविष्यातील संस्थात्मक विचार करताना त्या संस्था कोणत्याही उपासना पंथांच्या प्रभावापासून मुक्त असल्या पाहिजेत व त्यांची रचना अपरिवर्तनीय असे जे वैश्विक नियम आहेत त्यांच्या प्रकाशात झाली पाहिजे. परमेश्वरप्राप्तीसाठी करण्यात येणारी उपासना असा पुरोगाम्यांनी धर्माचा अत्यंत संकुचित अर्थ लावल्यामुळे आपल्याकडे फार मोठा अनर्थ झाला आहे. हिंदू तत्त्वज्ञानामध्ये मानवी जीवन सुखी, समाधानी व आनंदी होण्यासाठी चार पुरुषार्थ सांगितले आहेत. त्यापैकी 'धर्म' हा जो पुरुषार्थ सांगितला आहे, त्याला अग्रक्रम दिला असून त्याच्या प्रकाशात जीवन जगले तर संपूर्ण मानवजाती एक कर्तव्यनिष्ठ व समाधानी जीवनाची कालक्रमणा करू शकते, असे शास्त्रामध्ये प्रतिपादन केले आहे. व्यवहारत: धर्म ह्या संकल्पनेत अपरिवर्तनीय, शाश्वत, वैश्विक नियम आणि त्याच्या प्रकाशात नित्य परिवर्तनशील अशा प्रकारची सामाजिक, आर्थिक व्यवस्था या दोन्हींचा समावेश आहे. उदाहरणार्थ, स्त्री-पुरुषांच्या नात्यातील नैतिकता हा वैश्विक नियम आहे. पण ही नैतिकता टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी प्रस्थापित झालेल्या संस्थात्मक व्यवस्था (कुटुंब, विवाहसंस्था यासारख्या) कधीही शाश्वत वा वैश्विक असणार नाहीत. त्या वेगवेगळ्या काळात व वेगवेगळ्या पर्यावरणात वेगवेगळ्या असणार. काही जाचक बंधनांच्या विरुद्धची प्रतिक्रिया म्हणून मार्क्ससकट काही युरोपीय विचारवंतांनी कुटुंब व विवाहसंस्था यांचा धिक्कार केला आहे. त्यामुळे नैतिकतेची आवश्यकता नाही असा गैरसमज साम्यवादी वर्तुळात पसरला व त्यांनी 'इंक-पाॅट' प्रणालीचा (स्वैराचाराचा) पुरस्कार केला. पण लेनिन आणि ट्राॅटस्की यांच्यासारख्या जबाबदार नेत्यांनी या प्रणालीचा धिक्कार केला. कारण त्यांच्या मते जो स्वतःच्या खाजगी जीवनात विश्वासाने विसंबण्यासारखा नसेल, तो सार्वजनिक आयुष्यातही विश्वसनीय असूच शकणार नाही. साम्यवादी विचारसरणीच्या व भांडवलशाहीच्या अधोगतीला हेसुद्धा एक प्रमुख कारण आहे.
पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेले सनातन धर्माचे युगसंगत असे व्यवहार्य स्वरूप लक्षात घेऊनच भारताच्या भावी संस्थात्मक आकृतिबंधाचा विचार करावा लागेल, असे ठेंगडीजींनीं तिसऱ्या पर्यायाविषयी आपले विचार या पुस्तकात व्यक्त केले आहेत.

 
हिंदूंची विकास संकल्पना व आर्थिक चिंतन


देशविरोधी शक्तींनी हिंदू समाज दुर्बल करण्यासाठी हिंदू संस्कृतीविषयी जे अनेक गैरसमज पसरविले आहेत, त्यापैकी एक गैरसमज हा आहे की हिंदू चिंतनामध्ये आर्थिक नीतीविषयी काहीच चिंतन केलेले नाही आहे. परंतु हे खरे नाही. हा गैरसमज दूर करण्याची आत्यंतिक गरज आहे. आपल्या समाजामध्ये फार पुरातन काळापासून आदर्श व कल्याणकारक सामाजिक-आर्थिक व्यवस्थेच्या निर्मितीसंबंधी आपल्या विद्वान ऋषिमुनींनी सखोल चिंतन केलेले आहे. याचे विस्तृत विवेचन मा. दत्तोपंतांनी या पुस्तकात केलेले आहे. हे चिंतन समाजापुढे आणून त्या विषयात फार मोठ्या प्रमाणावर ‌प्रबोधन करण्याची गरज आहे, असेही ते सांगताहेत. प्राचीन काळी झालेल्या चिंतनाविषयी पुढे जाऊन ते सांगताहेत की समकालीन समाजव्यवस्था लक्षात घेऊन आपल्या शास्त्रवेत्त्यांनी वेळेवेळी तपशीलवार विचार केला होता. या विषयावरील संपूर्ण साहित्य भारतरत्न पा.वा. काणे यांच्या 'धर्मशास्त्राचा इतिहास' या ग्रंथात उपलब्ध आहे. आदरणीय काणे यांच्या म्हणण्यानुसार प्राचीन भारतीय वांङमयातील स्मृतिग्रंथ प्राधान्याने आर्थिक, सामाजिक, समाजशास्त्रीय स्वरूपाचे आहेत. त्या स्मृतींचे अठरा जण संहिताकार होते. शुक्र, बृहस्पती, मेधातिथी, विज्ञानेश्वर, जीमूथवाहन अशा भाष्यकारांचा त्यांनी उल्लेख केला आहे. प्राचीन शास्त्रवेत्त्यांनी रचलेल्या जवळजवळ सर्व अर्थशास्त्रांचा सूक्ष्म अर्क म्हणजेच कौटिल्याचा अर्थशास्त्र ग्रंथ आहे, असे कौटिल्याने म्हटल्याचेही काणे सांगतात. याचाच अर्थ कौटिल्यापूर्वीचा कितीतरी अगोदरच्या काळापासून अर्थशास्त्र ही ज्ञानशाखा सुनिश्चितपणे विकसित झाली होती आणि तिचे शास्त्रीय संहितीकरणसुद्धा झाले होते व या सर्व वांङमयाचा संदर्भासाठी म्हणून त्या काळी अभ्यासक्रमातही समाविष्ट केला गेल्याचे काणे सांगतात. राजसत्तेची प्राप्ती व ती जतन करण्यासंबंधीच्या ज्ञानाची शाखा म्हणजे अर्थशास्त्र अशी व्याख्या कौटिल्याने केली आहे. तसेच अर्थशास्त्र हे जीवनाचा फार व्यापक पट कवेत घेणारे शास्त्र असून त्यात सर्व मितींची दखल घेतली गेली आहे, असे आपल्या ऋषिमुनींचे सांगणे होते.
प्राचीन काळातील स्मृतिकारांनी वेळोवेळी अर्थशास्त्राचा विचार केला होता, त्याविषयी या पुस्तकात विस्ताराने मांडणी केली आहे. त्यावरून पूर्वीच्या काळातील चिंतनामधील व्यापकता लक्षात येण्याच्या दृष्टीने काही तुरळक तरतुदींचा उल्लेख पुढे करत आहे. १) मालक व मजूर यांच्या आदर्श संबंधाविषयीची तरतूद, २) उत्पन्नाचे वितरण कसे करावे याची तरतूद, ३) स्वयंरोजगार संकल्पनाचे सिद्धान्त, ४) वेतननिष्ठ रोजगारामध्ये वेतनाच्या विविध प्रकारासंबंधी, ५) मजुरांकरिता विविध कल्याणकारक योजनांसंबंधी, ६) अवांछनीय व्यवहारापासून ग्राहक संरक्षण देणाऱ्या कायदेशीर तरतुदी, ७) दिव्यांग, विधवा तसेच अन्य महिला वर्ग विनाव्यवसाय, विनावृत्ती राहता कामा नये याविषयाची तरतूद, ८) औद्योगिक वादांचे निराकरण करण्याची तरतूद, ९) सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद १०) कुशल कामगाराला उत्तेजनार्थ वेतन देण्याची तरतूद, ११) सेवकाच्या मानसिकतेची काळजी घेण्याची तरतूद, १२) पगारी वार्षिक रजेची तरतूद, १३) अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची तरतूद, १४) कारागीरांच्या व कामगारांच्या सुरक्षेला अग्रक्रम देण्याची व्यवस्था, त्यांना करातून सवलत देण्याची तरतूद इत्यादी. यावरून आपल्या पूर्वजांनी आर्थिक व्यवस्थेसंबंधी किती सखोल चिंतन केले होते, हे लक्षात येते.
 
मधल्या १००० वर्षांमध्ये हिंदू समाजाला सातत्याने परकीय आक्रमणाला तोंड द्यावे लागल्यामुळे आर्थिक विषयातील चिंतन काही प्रमाणात माघारलेले होते. तशात कालौघात बर्‍याच स्मृती नष्ट झाल्या. त्याचा गैरफायदा घेऊन राष्ट्रविरोधी शक्तीनी आर्थिक विषयावर किंवा आर्थिक प्रणालीवर आपले काहीच चिंतन नाही याचा बोभाटा केला.

dattopant thengadi books_ 
आधुनिक काळात, म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या आधारावर कामगार क्षेत्रात १९५५पासून भारतीय मजदूर संघ या नावाने दत्तोपंतांच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या संघटनेने दोन संचांची मांडणी केली आहे. तिचा आधार अर्थातच हिंदू अर्थचिंतन आहे. या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. त्या मांडणीतील काही तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत - १) अतिरिक्‍त श्रममूल्यांचे व्यवस्थापन प्रत्यक्ष कामगाराकडून होणे, ना मालकाकडून वा राज्य शासनाकडून, २) हिंदू नीतीप्रमाणे उद्योग विकसित करताना अशा उद्योगावर अधिक भर दिला पाहिजे, ज्यामध्ये अ) अर्थपुरवठा सामान्य जनतेकडून होण्याची व्यवस्था ब) कामगाराची मालकी असेल व तंत्रज्ञान विकेंद्रित असेल क) तज्ज्ञांची सेवा नेहमी उपलब्ध होण्याची व्यवस्था असेल, ड) संसदेची मान्यता असेल आणि धर्माने नियंत्रित केलेला असेल.
तसेच परमपूजनीय श्रीगुरुजींनी हिंदू चिंतनाच्या अंतर्गत जी काही महत्त्वाची सूत्रे त्यांच्या निधनाच्या ‌१ वर्षे अगोदर ठाणे येथे झालेल्या बैठकीत मांडली होती, त्यातील काही सूत्रांचा उल्लेख या पुस्तकात केला आहे. अर्थात ही सूत्रे सामाजीक-आर्थिक व्यवस्थेच्या बाबतीत व राष्ट्रनिर्मितीच्या बाबतीत आहेत. त्या सूत्रांच्या प्रकाशात नवीन आर्थिक व्यवस्था आपण उभी करू शकलो, तरच आपले राष्ट्र संपूर्णतया स्वावलंबी होऊन परमवैभवाप्रत पोहोचेल. ती सूत्रे पुढीलप्रमाणे - १) व्यक्ती व समाज यांचे नाते संघर्षाचे नसून परस्पर सहकार्यावर आधारलेले असले पाहिजे. एकच एक सत्त्व सर्वांमध्ये भरून राहिले आहे या धारणेवर आपली सामाजिक-आर्थिक व्यवस्था उभी करावी लागेल. २) आपल्या राष्ट्राशी पूर्ण एकात्मता साधारणारे संस्कार व्यक्ती व्यक्ती वर करणे आवश्यक आहे. हीच आपल्या सामाजिक-आर्थिक रचनेची वास्तव व मूलभूत चौकट असली पाहिजे. ३) या व्यवस्थेमध्ये नैतिकतेच्या आधारे भौतिक संपत्ती प्राप्त करून घेण्यावर भर दिला पाहिजे. तसेच आवश्यक तेवढ्याच संपत्तीचा भाग स्वतःसाठी व कुटुंबासाठी ठेवून उर्वरित समाजाला देण्यास व्यक्तीला संस्काराद्वारे उद्युक्त केले पाहिजे. ४) या व्यवस्थेमध्ये दुसऱ्यांच्या श्रमशक्तीचे शोषण करण्याला, तसेच संपत्तीची ओंगळ उधळपट्टी करण्याला मज्जाव असण्याची तरतुद पाहिजे. (पिळवणूक व चंगळवाद हिंदू संस्कृतीच्या सत्त्वाची सुसंगत नाही.) ५) प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा भागविणाऱ्या गोष्टी उपलब्ध करून देणे व त्यासाठी अधिकाधिक उत्पादन करणे, त्याचे न्याय्य वितरण करणे व राष्ट्रीय स्वावलंबनाच्या उद्दिष्टाप्रत समाजाला नेणे. ६) भांडवलप्रवण उद्योगाऐवजी श्रमप्रवण उद्योगावर भर देणे. ७) कामगारांच्या श्रमशक्तीचे मूल्य भागभांडवलाच्या अनुषंगाने करणे व श्रमशक्ती भागभांडवल म्हणून जमा करणाऱ्या कामगाराला भागधारक म्हणून प्रतिष्ठा देणे. ८) श्रमशक्तीचे अतिरिक्त मूल्य ही राष्ट्राची संपत्ती आहे याला मान्यता देणे. ९) निसर्गाचे शोषण न करता त्याचे दोहन करणे. १०) औद्योगिक मालकीच्या प्रकारांमध्ये त्या त्या उद्योगाची गरज व वैशिष्ट्य लक्षात घेऊन मालकीचा प्रकार ठरविणे. सर्वात शेवटी महत्त्वाचे 'धर्म' या संकल्पनेच्या मूलभूत सूत्राशी सुसंगत अशी विविध सामाजिक-आर्थिक रचना विकसित करणे.
 
नवीन सामाजिक-आर्थिक रचनेविषयी समाजाची मान्यता मिळविण्यासंबंधीच्या विषयाबाबत दत्तोपंतानीं दीनदयाळजींचे विचार quote केले आहेत. त्यासंबंधात पं. दीनदयाळ उपाध्याय सांगायचे की भारतीय विचारप्रणाली ही बिलकुल यथास्थितिवादी नाही. जुनी व्यवस्था बदलली पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते. त्यामुळे त्यांनी सर्व पश्चिमी विचारप्रवाहांचा व आपल्याकडील चिंतनाचा सखोल अभ्यास करून व औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळाची गरज लक्षात घेऊन युगानुकूल असलेली एक मांडणी केली. ती 'एकात्म मानव दर्शन' या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांचे सांगणे होते की अनेक जुन्या संस्थाच्या जागी नव्या संस्था निर्माण कराव्या लागतील. हे बदल बदलांना अनुकूल नसलेल्यांना मानवणार नाहीत. परंतु बदलाला पर्याय नाही. तो सृष्टीचा नियमच आहे. त्यामुळे यथास्थितिवादी (status quoism) मानसिकतेचा त्याग करून आपल्याला युगानूकुल परिवर्तन घडवून आणावेच लागेल.
 
 
वरील पार्श्वभूमीवर ठेंगडीजी हिंदू अर्थचिंतनावर आधारित असलेल्या दोन पुस्तकांचा व त्यांच्या लेखकांचा उल्लेख आपल्या Third Way पुस्तकात करतात. पहिले पुस्तक डॉक्टर बोकारे यांचे Hindu Economics हे आहे. या पुस्तकाविषयी ठेंगडीजी म्हणतात - 'युगानुकूल हिंदू आर्थिक चिंतनाच्या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरावा असे हे पुस्तक आहे. ते पुढे सांगतात की डाॅ. बोकरे यांनी पश्चिमी देशात विकसित झालेली संशोधन पद्धतीच अवलंबिली आहे. त्यांचे युक्तिवादही आधुनिक अर्थशास्त्रीय संचितावरच आधारलेले आहेत. रॉबिन्सनच्या वर्गीकरणाप्रमाणे हिंदू अर्थव्यवस्था ही भावात्मक सिद्धान्ताचा परिपाक आहे हा निष्कर्ष प्रोत्साहक आहे. दुसरा ग्रंथ डॉ. पी. आर. ब्रह्मानंद यांचा Dharmanomics हा आहे. याच्याविषयी मा. दत्तोपंत म्हणतात की जग विकासविषयक तत्त्वप्रणालीच्या संदर्भात एक हाताश पोकळीचा अनुभव घेत असलेल्या निर्वाणीच्या पार्श्वभूमीवर हा ग्रंथ अवतीर्ण झाला असून ती पोकळी भरून काढण्याचा जे प्रयत्न चाललेले आहेत, त्या दृष्टीने एक तातडीची गरज या पुस्तकाने पूर्ण केली आहे. हे पुस्तक तिसऱ्या मार्गाकडे निर्देश करीत असून या पुस्तकाच्या समग्र विवेचनातून व्यक्त होणाऱ्या चिंतनामधून डाॅ. ब्रह्मानंद प्रतिपादन करत आहेत की पश्चिमी व हिंदू असे दोन पूर्णतः भिन्न नमूने आहेत आणि त्यांची मूल्यव्यवस्था, संस्थात्मक रचना व संदर्भनिकष हेसुद्धा सर्व वेगवेगळे आहेत. त्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे थोडक्यात सांगता येतील - पश्चिमी व्यवस्थेची वैशिष्ट्ये कप्याकप्प्याने विचार करणे, व्यक्तीच्या केवळ अस्तित्वावर जोर, आत्मकेंद्रितपणा, लोभीपणा, उपभोक्तावाद, शोषण, कृत्रिम टंचाई, वाढत्या किमतीची अर्थनीती, मक्तेदारी भांडवलवाद, विषमतेची वाढती दरी, निसर्गावरील अत्याचार, वेतन-रोजगारावर भर असलेली प्रणाली, व्यक्ती, समाज व निसर्ग यांच्यातील निरंतर संघर्ष ही आहेत. याउलट हिंदू व्यवस्थेची वैशिष्ट्ये एकात्म विचारप्रक्रिया, शरीराबरोबर मन, बुद्धी व आत्मा या सर्वांचा विचार, सर्व समाजाचा विचार, अपरिग्रह, संयमित उपभोग, अंत्योदय, उत्पादनाची विपुलता, घटत्या किमतीची अर्थरचना, मुक्त स्पर्धा, न्याय व समताधिष्ठित व्यवस्थेकडे वाटचाल, निसर्गाचे दोहन, स्वयंरोजगारावर भर, व्यक्ती, समाज व निसर्ग यामध्ये संतुलन, सर्वेपि सुखिनः सन्तु दृष्टीकोन ही आहेत. हे दोन संपूर्ण भिन्न नमुने असल्याचे डाॅ. ब्रह्मानंद दाखवून देतात. ते काही हिंदू विचाराचे म्हणून जाणले जात नव्हते. परंतु त्यांनी सत्य काय आहे हे जाणले होते, ते त्यांनी मांडले.

डाॅ. ब्रह्मानंदांच्या ग्रंथामधील तुलनात्मक सूत्रे पाहून ठेंगडीजी सांगताहेत की लक्षात येते ते हे की आतापर्यंत वेगवेगळ्या संदर्भात व्यक्त झालेली एकात्म मानव दर्शनातील पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या आर्थिक चिंतनाची सूत्रे व गुरुजींचे आर्थिक नीतीविषयीचे संकेत यांच्याशी सुसंगत असेच विचार डॉक्टरानीं मांडले आहेत. शेवटी द्रष्टे दत्तोपंत सांगताहेत की काही मोजक्या पैलूंच्या विवेचनावरून लक्षात येते की हिंदू चिंतनामधील समाजपरिवर्तनाची प्रक्रिया हीच राष्ट्रीय आकांक्षाची पूर्तता करण्यास समर्थ आहे. ते पुन्हा स्पष्ट करून सांगताहेत की आपला देश श्रेष्ठतम करण्यासाठी आवश्यक असे सर्व घटक दैवी वरदानाने आपल्याजवळ आहेत. मानवी, बौद्धिक सामग्रीबाबत आपण जगातील कोणत्याही समाजापेक्षा कमी नाही आहोत. कमतरता कशाची असेल तर ती राष्ट्रीय इच्छाशक्तीची, ना गुणवत्तेची. म्हणून राष्ट्रीय इच्छाशक्तीचे जागरण व उत्थान हीच आपली topmost priority असली पाहिजे. पूजनीय श्रीगुरुजी सतत सांगायचे की Let us first build the builder and builder will build the nation.
माननीय दत्तोपंतांनी Third Wayच्या निमित्ताने मांडलेल्या विस्तृत अर्थचिंतनाचे सार संक्षेपाने मांडून झाले आहे. तसा हा ग्रंथ जवळजवळ ३०० पानांचा आहे. त्यामध्ये अर्थचिंतनाशिवाय अनेक विषय हाताळले गेले आहेत. प्रस्तुत लेख हा दत्तोपंतांनी मांडलेल्या फक्त सामाजिक-आर्थिक विषयाबाबत व तोही संक्षेपाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी काही महानुभावांचे विचार देऊन लेख संपवितो.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर - We are firstly and lastly Indians only. Given the time and circumstances, no power on earth can stop us from becoming superpower.
Arnold Toynbee - It is already becoming clear that a chapter which has a western beginning will have to have an Indian ending if it is not to end in the self-destruction of the human race.At this dangerous moment in human history the only way of salvation for mankind is an Indian way. Indian ideal is the finest. So a great spiritual responsibility rests on India. 

Revered ShriGuruji - Our real national regeneration should start with the Moulding of "man" instilling in him the strength to overcome human frailities and stand up as a shining symbol of Hindu manhood embodying within himself all our traditional virtues of love, self-restraint, sacrifice, service and character.We should unfailingly keep this vision ,the real essence of our glorious nationhood before our eyes, so that we can again rise to our original pedestal of word preceptor.
 
किशोर शशीतल
9422339328