बाळासाहेब देवरस : संघविचारांचे व्युत्पन्न भाष्यकार

विवेक मराठी    10-Dec-2020
Total Views |
@विराग पाचपोर
 
‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे महाराष्ट्रातील भक्ती आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोलले जाते. तशीच तुलना करायची झाली, तर आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी सूत्रपात केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देशव्यापी पायाभरणी द्वितीय सरसंघचालक प्रा. माधव सदाशिवराव गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांनी केली आणि त्यावर संघाला समाजोन्भिमुख करीत तृतीय सरसंघचालक मधुकर दत्तात्रेय उपाख्य बाळासाहेब देवरस यांनी त्यावर कळस चढविला, असे म्हटले तर ते मुळीच वावगे ठरणार नाही.


RSS_1  H x W: 0
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आजमितीस जगातील एक सर्वात मोठी गैरसरकारी संघटना आहे. भारतात तर संघाच्या ६० हजारावर शाखा आहेत. देशातच नव्हे, तर जगातील सुमारे ४० देशांत प्रत्यक्ष काम आणि तेवढ्याच अन्य देशांत संपर्क असलेली संघ ही अशी एक संघटना आहे, जिच्या माध्यमातून भारतात आणि भारताबाहेर लाखो सेवा कार्ये चालविण्यात येतात. संघाच्या मुशीतून तावून-सुलाखून निघालेली दिग्गज मंडळी आज राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आहेत. १९२५ साली देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करीत सामर्थ्यसंपन्न, संघटित हिंदू समाज आणि हिंदू राष्ट्राचे पुनरुत्थान करण्याचे स्वप्न उराशी बाळगून प्रारंभ झालेल्या संघाची वाटचाल स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजही शतकपूर्तीच्या दिशेने सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे सुरूच आहे.
 

सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....
 
डॉक्टर हेडगेवार यांच्यानंतर माधवराव सदाशिवराव गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांच्याकडे संघाची धुरा आली. श्रीगुरुजी सरसंघचालक झाले, त्या वेळी देशाची स्थिती स्फोटक होती. दुसरे महायुद्ध सुरू होते. इंग्रंजाची पीछेहाट होत होती. अशा वेळी स्वातंत्र्यासाठी जोरदार आंदोलन करण्याचा निर्णय काँग्रेस नेतृत्वाने घेतला आणि १९४२च्या ‘चले जाव’ आंदोलनाचे रणशिंग फुंकले. चाणाक्ष इंग्रजांनी हे आंदोलन दडपून टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण त्यामुळे जनतेत जी जागृती झाली होती, ती मात्र त्यांना दडपता आली नाही. याच सुमारास मुसलमानांची वेगळ्या देशाची मागणी जोर धरू लागली होती आणि शेवटी थकलेल्या काँग्रेसी नेत्यांनी फाळणीला मान्यता दिली आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत खंडित स्वरूपात स्वतंत्र झाला.
 
देशाची फाळणी आणि त्यानंतर झालेली महात्मा गांधींची हत्या व त्याचे निमित्त करीत पंडित नेहरूंनी संघावर घातलेली बंदी असे मोठे आघात श्रीगुरुजींच्या नेतृत्वाची कसोटी लावणारे होते. महात्मा गांधींचे विश्ववंद्य नेतृत्व, सर्व अधिकारसंपन्न सत्ता आणि संघद्वेषाने पेटलेले नेते आणि एकाकी पडलेला संघ अशी ही विषम लढाई होती. पण संघ यातून यशस्वीपणे बाहेर पडला. या घटनेनंतर संघात एक वैचारिक वादळ निर्माण झाले. या वैचारिक वादळातून संघाला बाहेर काढून, गांधीहत्येच्या धादांत खोट्या आरोपामुळे प्रतिकूल झालेले जनमत संघाच्या बाजूने वळवून पुन्हा संघकार्य उभे करण्याचे महाकठीण काम श्रीगुरुजींच्या काळात झाले. त्यात श्रीगुरुजींच्या सर्वंकष नेतृत्वाची खरोखरच कसोटी लागली होती. श्रीगुरुजींची जीवनयात्रा १९७३च्या जून महिन्यात संपली. आपल्यानंतर मधुकर दत्तात्रेय उर्फ बाळासाहेब देवरस यांनी सरसंघचालक म्हणून काम पाहावे, अशी योजना करून ते अनंताच्या यात्रेला निघून गेले.

नागपूर येथे ११ डिसेंबर १९१५ रोजी मध्यमवर्गीय कुटुंबात बाळासाहेबांचा जन्म झाला. त्यांचे वडील भय्याजी महसूल खात्यात अधिकारी होते. नागपूरच्या इतवारी भागात देवरस यांचा वाडा होता आणि गोंदियाजवळ कारंजा गावी शेती होती. बी.ए.,एलएल.बी.पर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते. त्या वेळच्या शिरस्त्याप्रमाणे बाळासाहेबांनी पदवी पूर्ण केल्यानंतर आयसीएस किंवा तत्सम सनदी परीक्षा द्यावी आणि मोठ्या पगाराची नोकरी करावी, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पण ते त्या मार्गाने न जाता देशकार्यासाठी जीवन समर्पित करते झाले. त्यांनी संघकार्य करण्याचा जो निर्णय घेतला, त्यामागे त्यांची आई खंबीरपणे उभी राहिली.
 
  वयाच्या ११व्या वर्षी संघात आलेला बाळ देवरस हा किशोर स्वयंसेवक वयाच्या ५७व्या वर्षी त्याच संघटनेचा ‘मित्र, मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ’ झाला. सुमारे २१ वर्षे बाळासाहेब सरसंघचालक होते. हा काळ संघाच्या आणि देशाच्या इतिहासातील सर्वात कठीण, आव्हानात्मक आणि देशाच्या भविष्याला दिशा देणारा होता. बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा खरा कस लागला तो या कसोटीच्या काळात. अचूक निर्णयक्षमता, योग्य मार्गदर्शन, नवीन विचार आणि प्रयोग यांना सामावून घेण्याची तयारी आणि समाजाच्या सर्वच क्षेत्रांत संघविचार समर्थपणे पोहोचविण्याची रणनीती हे बाळासाहेबांच्या व्यक्तित्वाचे आणि नेतृत्वाचे एक आगळे वैशिष्ट्य मानावे लागेल.
 
संघाच्या प्रशिक्षण प्रक्रियेतून तावून-सुलाखून बाहेर पडलेले बाळासाहेब हे पहिले सरसंघचालक होते. संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार आणि श्रीगुरुजी यांच्यासह काम करण्याची आणि त्यांची कार्यशैली जवळून पाहण्याची संधी त्यांना मिळाली. डॉक्टर हेडगेवार यांनी १९२५ साली विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रारंभ केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सामाजिक आशय देत सामाजिक समरसतेला अधिक अर्थपूर्ण आणि सुदृढ करण्याचे श्रेय बाळासाहेब देवरस यांना द्यावे लागेल. हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र या संघाने स्वीकारलेल्या सिद्धान्तांची बदलत्या परिस्थितीच्या संदर्भात योग्य व्याख्या करीत देशातील सर्व धर्म-पंथातील बुद्धिजीवी आणि विचारवंत यांना जर कोणी प्रभावित केले असेल, तर ते बाळासाहेबांनी. तसेच, ब्रिटिशांच्या धोरणाचे अनुसरण करीत समाजात फूट पाडून राज्य करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या स्वार्थी, सत्तांध राजकारण्यांचे खरे स्वरूप जनतेसमोर उघडे करण्याचे महत्वाचे कार्य ज्यांनी साधले, ते बाळासाहेबच होते. हे सर्व करीत असताना देशात उद्भवलेल्या समस्यांवर सुयोग्य मार्गदर्शन करीत दीर्घकालीन पण परिणामकारक उपायदेखील त्यांनी सुचविले. आणीबाणीच्या काळात झालेले सर्व अत्याचार विसरून ‘विसरा आणि क्षमा करा’ हा संदेश देत संपूर्ण समाजाला आपल्या सर्वसमावेशक विशाल हृदयाचे दर्शन त्यांनी घडविले. पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत अस्पृश्यतेविरुद्ध एल्गार पुकारून संघाला ब्राह्मण्याच्या दुष्ट चक्रव्यूहातून त्यांनीच बाहेर काढले. संघकार्य म्हणजे संघशाखा व शाखा म्हणजे कार्यक्रम आणि संस्कार यातून कार्यकर्त्यांची जडणघडण ह्या संघसूत्राचा त्यांना कधी विसर पडला नाही. त्याचबरोबर अशा संस्कारित कार्यकर्त्यांची योजना करून समाजाच्या सर्व स्तरांत - विशेषतः शोषित, पीडित, दलित, ग्रामीण, वनवासी, गिरिवासी घटकांमध्ये समाजोपयोगी कार्याच्या माध्यमातून संघविचार पोहोचविण्यासाठी विद्या भारती, वनवासी कल्याण आश्रम, विद्यार्थी परिषद, मजदूर संघ, किसान संघ, विश्व हिंदू परिषद इत्यादी संघटनांना अखिल भारतीय स्तरावर विस्ताराची प्रेरणा देत संघकार्याला सामाजिक आशय (social content) दिला तो बाळासाहेब देवरस यांनीच. या विशाल संघसृष्टीचे संतुलन चक्र म्हणून त्यांनी या काळात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संघपरिवाराच्या या विशाल वटवृक्षाचा भार समर्थपणे पेलण्यासाठी सतत शक्तिशाली बुंध्याच्या भूमिकेत ते राहिले आणि शरीर जर्जर झाले, तेव्हा प्रोफेसर राजेंद्र सिंह यांचेकडे सरसंघचालकपदाची सूत्रे सोपवून सहजतेने मोकळे झाले.
 


RSS_1  H x W: 0
 
बाळासाहेबाच्या क्षमतेची पूर्ण कल्पना श्रीगुरुजींना होती. त्यामुळे ते म्हणत की “संघात एकाच वेळी दोन सरसंघचालक नेमण्याची पद्धत नाही, म्हणून बाळासाहेब सरकार्यवाह आहेत.” बाळासाहेब संघाच्या प्रत्यक्ष जबाबदारीतून काही काळ बाजूला होते. त्यांच्या या ‘अज्ञातवासाबद्दल’ अनेक उलट-सुलट मते आहेत. पण सरकार्यवाह आणि सरसंघचालक म्हणून त्यांनी संघाला जी एक नवीन दिशा दिली, नवीन आयाम आणि आशय दिला, तो चकित करणारा आहे.
 
बाळासाहेब देवरस यांनी संघबंदी उठल्यानंतर नागपूरच्या ‘राष्ट्रशक्ती’ साप्ताहिकात लिहिलेल्या एका लेखात ‘संघ सर्व प्रश्न हाती घेणार आहे’ अशा आशयाचे विचार व्यक्त केले होते, असा उल्लेख पत्रकार दि.वि. गोखले यांनी त्यांच्या ‘आजचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ नामक लेखात केला आहे. हा लेख पुण्याच्या दैनिक केसरीच्या शुक्रवार, दि. ९ मे १९५२, पृष्ठ ५वर प्रकाशित झाला आहे.
त्यांच्या या विचाराला अनुसरून पहिल्या संघबंदीनंतर संघविचार समाजाच्या सर्व स्तरात जावा, यासाठी वृत्तपत्र क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय त्यांचाच होता. राजकीय क्षेत्रात संघाचे समर्थक उभे राहावेत असाही प्रयत्न त्यांनी केला आणि आयुष्याच्या शेवटी संघाचा स्वयंसेवक देशाचा पंतप्रधान झाल्याचे दृश्य त्यांनी पहिले. आणीबाणीच्या काळात लोकशाहीचे अस्तित्वच धोक्यात आले असताना संघाची पूर्ण शक्ती पणाला लावून त्यांनी या देशात लोकशाहीची पुन:स्थापना करविली. संघसंस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीनिमित्ता देशभरात सेवा कार्यांचे जाळे विणून समाजातील दलित, शोषित, पीडित सदस्यांना सर्वांबरोबर येण्यासाठी मदतीचा हात दिला. सामाजिक समरसता निर्माण झाली पाहिजे, त्यासाठी अस्पृश्यतेसारखी अन्यायकारक, अमानुष प्रथा समूळ नष्ट झाली पाहिजे असे मत त्यांनी परखडपणे मांडले.


सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा...
.
कुश पथकाच्या स्वयंसेवकांकडे डॉक्टरांचे बारीक लक्ष होते आणि ते विशेष आत्मीयतेने त्यांच्याशी वागत. या पथकातील प्रत्येक स्वयंसेवकाने संघ अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यावा, असा त्यांचा प्रयत्न असे. या कुश पथकात बाळासाहेब देवरस यांच्याबरोबर एकनाथजी रानडे, यादवराव जोशी, भाऊराव देवरस, बापूराव दिवाकर, नरहरी पारखी असे स्वयंसेवक होते. जिवलग मैत्री जोडण्याच्या कौशल्यामुळे बाळासाहेब या कुश पथकाचे स्वाभाविक नेते झाले होते. याच कुश पथकातून पुढे संघाचे दिग्गज कार्यकर्ते आणि नेते तयार झाले आहेत. बाळासाहेब देवरस हे त्या सर्वांचे प्रमुख होते. या सर्वांशी डॉक्टरांचा संबंध अगदी घरगुती स्वरूपाचा असे व त्यांच्या घरी जाण्या-येण्याचा त्यांचा आग्रह असे. डॉक्टरांच्या घरीही त्यांच्या बैठकी रंगत असत.
क्रांतिकारकांचे शिरोमणी सरदार भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा झाल्यानंतर संघातील कुश पथकाच्या स्वयंसेवक मंडळींमध्ये क्रांतिकारक मंडळींप्रमाणेच आपणदेखील काही करावे असा विचार बाळसे धरू लागला होता. सर्वांनी मिळून हा विचार डॉक्टरांच्या कानी घालण्याची जबाबदारी बाळासाहेबांवर सोपविली. हे सर्व डॉक्टरांकडे गेले आणि त्यांच्या कानी आपले विचार घातले. त्यांचे विचार ऐकून डॉक्टरांनी सतत सात दिवस रात्री १० ते सकाळी तीन वाजेपर्यंत कुश पथकाच्या बैठकी घेऊन त्यांना या विचारापासून परावृत्त केले आणि संघकार्याची महत्ता पटवून दिली. “डॉक्टरांचे तेजस्वी विचार आणि अमूल्य मार्गदर्शन यामुळे आमच्या विचारांच्या आणि जीवनाच्या आदर्शात आमूलाग्र परिवर्तन झाले. त्यानंतर आमच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळाली आणि आमची बुद्धी संघकार्यात स्थिर झाली” असे बाळासाहेबांनी ‘राष्ट्रधर्म’च्या एप्रिल १९८३च्या अंकातील एक लेखात नमूद केले आहे.
 
कुश पथकात सामील झालेले बाळासाहेब देवरस संघाच्या व्यवस्थेत विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळत आपली संघटनात्मक गुणवत्ता सिद्ध करीत सरसंघचालक झाले. एलएल.बी. झाल्यानंतर डॉक्टर हेडगेवारांनी नागपूरचे कार्यवाह म्हणून त्यांना नेमले. या काळात सर्व उपशाखांच्या कामात जिवंतपणा आणि एकसूत्रता आणण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. डॉक्टरांच्या प्रत्यक्ष सहवासात आणि देखरेखीखाली काम करण्याची जी संधी त्यांना मिळाली, त्याचे त्यांनी सोने केले. डॉक्टर हेडगेवार यांच्यासमोर आपल्या समाजाचे जे अपेक्षित चित्र होते, ते समजून घेण्याचे भाग्य बाळासाहेबांच्या वाटेला आले. ते पूर्णपणे आत्मसात करून त्यांनी पुढील जबाबदारीच्या काळात ते चित्र प्रत्यक्षात उतरवण्याचे प्रयत्न केले आणि त्यात त्यांना अपेक्षित यश मिळालेदेखील.
 
 

१९९६ साली १३ दिवसांचे का होईना, पण संघस्वयंसेवक अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले, त्या वेळी बाळासाहेब विकलांग अवस्थेत होते, पण अटलजींच्या शपथग्रहण समारंभाचे दृश्य दूरचित्रवाणीवर पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान उमटले होते. बाळासाहेब देवरस नावाच्या एका सामाजिक योद्ध्याच्या जीवनातील तो एक सर्वोच्च आनंदाचा क्षण होता.
 
१९४०च्या संघ शिक्षा वर्गातील उद्बोधनात डॉ. हेडगेवार म्हणाले होते की “आज हिंदू राष्ट्राचे लघुरूप मी पाहत आहे.” डॉक्टरांच्या या लघुरूपातील संघाचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले ते बाळासाहेब देवरस यांच्या काळात. ‘याची देही याची डोळा’ विशाल हिंदू राष्ट्राचे स्वप्न पूर्ण झाल्याचे डॉक्टर हेडगेवारांनी बाळासाहेबांच्या डोळ्यांनी पहिले असे म्हटले ,तर ते योग्यच होईल.
डॉक्टरांचे संघकार्यातील अतिशय जवळचे सहकारी, त्याचे ‘उजवे हात’ म्हणून समजले जाणारे अप्पाजी जोशी यांनी द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींचे वर्णन ‘डॉक्टरांचे हृदय’ असे केले होते. पण डॉक्टरांनी ज्यांच्या हृदयी आपल्या हृदयातील संघ स्थिर केला, त्या श्रीगुरुजींना बाळासाहेबांचे संघातील स्थान काय आहे याची पूर्ण जाणीव होती. जुलै १९४०च्या डॉक्टरांच्या प्रथम मासिक श्राद्धदिनी त्यांनी “हे आपले भावी सरसंघचालक आहेत” असा बाळासाहेबांचा परिचय नाशिकचे संघचालक दादासाहेब गोरवाडकर यांना करून दिला होता. तसेच एकदा महाल कार्यालयातून रेशीमबागेत संघाच्या उत्सवाकरिता श्रीगुरुजी, कृष्णराव मोहरील यांच्यासोबत टांग्यातून जात होते. थोडे अंतर गेल्यावर बाळासाहेब समवयस्क मित्रांसह पायी तिकडेच चालले होते. त्यांना पाहून श्रीगुरुजी म्हणाले, “ते पहा, खरे सरसंघचालक पायी चालले आहेत आणि नकली (स्वतःबद्दल) टांग्यातून.” १९४३च्या पुण्याच्या संघ शिक्षा वर्गात श्रीगुरुजी बाळासाहेबांचा परिचय करून देताना म्हणाले की “ज्यांनी संघसंस्थापक डॉक्टर हेडगेवार यांना पाहिले नाही, त्यांनी बाळासाहेबांकडे पाहावे. बाळासाहेब देवरस हे डॉक्टरांचे चालते-बोलते स्वरूप आहे. डॉक्टरांचे बोलणे, चालणे, वागणे कसे असेल हे जाणून घेण्यासाठी बाळासाहेब देवरस यांच्या बोलण्याकडे, वागण्याकडे पाहावे, त्याचा अभ्यास करावा.”
 

RSS_2  H x W: 0 
 
श्रीगुरुजी हे डॉक्टरांचे ‘हृदय’ होते, तर बाळासाहेबांच्या व्यक्तित्वात डॉक्टरांचा आत्मा आणि दृष्टी (Soul and Vision) संक्रमित झाली होती, असेच म्हणावे लागेल. डॉक्टरांच्या कल्पनेनुसार हजारो कार्यकर्त्यांची जडणघडण करून त्यांना समाजाच्या उत्थानाच्या कार्यात नेमून उद्दिष्ट गाठण्याचे डॉक्टरांचे स्वप्न बाळासाहेब देवरस यांनी पूर्ण केले. डॉक्टरांची संकल्पना सर्वार्थाने समजून घेत प्रत्यक्षात आणण्यासाठी हजारो सुयोग्य कार्यकर्ते घडविणे हे एक महाकठीण आणि Herculean Task होते. पण सर्वाना सोबत घेऊन चालण्याची अद्भुत क्षमता त्यांच्या ठायी होती.
 
प्रारंभी १९३९ साली त्यांची कोलकाता येथे प्रचारक म्हणून नेमणूक झाली होती. बंगालचा आणि संघकार्याचा जवळचा संबंध आहे. डॉक्टर हेडगेवार शिक्षणासाठी कोलकात्याला होते. श्रीगुरुजीदेखील संघकार्यासाठी आणि त्यापूर्वी स्वामी अखंडानंद यांचे शिष्य म्हणून बंगालमध्ये राहिले होते. बाळासाहेब देवरस काही काळ बंगालमध्ये प्रचारक असताना डॉक्टर हेडगेवार यांची प्रकृती ढासळत चालल्याने त्यांना नागपूरला बोलावून घेण्यात आले.
२१ जून १९४० रोजी डॉ हेडगेवार यांचे निधन झाले. त्यानंतर बाळासाहेबांची नागपूरचे कार्यवाह म्हणून पुन्हा नियुक्ती झाली. ते १९४६पर्यंत या पदावर होते. या काळात संपूर्ण देशात संघकार्य वाढविण्याच्या दृष्टीने त्यांनी मोठ्या संख्येने प्रचारक पाठविले. १९४६ साली प्र.ब. उपाख्य भय्याजी दाणी हे संघाचे सरकार्यवाह झाले आणि बाळासाहेब सहसरकार्यवाह. देशाच्या दृष्टीने तो अतिशय महत्त्वाचा आणि संक्रमणाचा काळ होता. दुसरे महायुद्ध समाप्त झाले होते, पण जगावर साम्राज्य गाजविणाऱ्या इंग्रजांचे प्रभावक्षेत्र कमकुवत झाले होते. महात्मा गांधींच्या नेतृवाखाली काँग्रेसने इंग्रजांना ‘चले जाव’चा ‘आदेश’ दिला, तर भारतीय समाजाला ‘करो या मरो’ असा संदेश देत १९४२ साली जनक्रांतीचे रणशिंग फुंकले. या काळात संघाची शक्ती चांगलीच वाढली होती. स्वाभाविकच संघाने या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत होती. श्रीगुरुजींनी याच सुमारास ‘प्रचारक’ ही अभिनव संकल्पना राबवून संघासाठी काही वर्षे आणि शक्य असेल तर संपूर्ण जीवन देणारे कार्यकर्ते देशभरात पाठवून शाखांचे जाळे विणले होते. प्रारंभी नागपूरहून असे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात देशभरात गेले. अशा कार्यकर्त्यांना तयार करणे, प्रेरित करणे आणि ते परत आल्यावर त्यांचे पुनर्वसन करणे अशी सर्व जबाबदारी बाळासाहेब पाहत असत. नागपूरच्या शाखेतून अधिक प्रमाणात पदवीधर तरुण प्रचारक म्हणून जावेत, असा त्यांचा सतत प्रयत्न होता.
 
 
संघबंदीच्या काळात सरकारने संघावर अन्याय केला आहे, हे धडधडीत दिसत असूनही एकही राजकीय नेता किंवा पक्ष तसेच वर्तमानपत्र संघाच्या बाजूने उभे राहिले नाही, याचे बाळासाहेबांना आश्चर्य व दुःख वाटत असे. त्यातून दैनंदिन शाखा जशी महत्त्वाची आहे, तसेच राजकीय व अन्य क्षेत्रातदेखील संघाचे विचार पोहोचविणे आवश्यक आहे, असे त्यांचे मत बनले. Organization, Mobilization and Action (म्हणजे संघटन, योजना आणि कृती) ही बाळासाहेबांची कार्य-त्रिसूत्री होती. १९४५-४६ साली महाविद्यालयीन कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी हे स्पष्ट केले होते. त्यांच्या मते संघटनेतून योग्य मनुष्यबळ तयार झाले की त्याची योजना एखाद्या सामाजिक उपयोगितेच्या क्षेत्रात झालीच पाहिजे. तरच अपेक्षित परिवर्तन घडून येईल. बाळासाहेबांचे हे भाषण ज्यांनी ऐकले, ते नागपूर ‘तरुण भारत’चे माजी संपादक दि.भा. उर्फ मामासाहेब घुमरे म्हणतात की “त्यांच्या त्या तीन इंग्रजी शब्दांनी जेवढा परिणाम साधला, तेवढा कदाचित शेकडो पुस्तके वाचून किंवा भाषणे ऐकून झाला नसता.”


 
बाळासाहेब देवरस यांच्याप्रमाणेच संघातील त्यांच्या अन्य सहकारी मंडळींनादेखील असेच वाटत होते. वसंतराव ओक, बलराज मधोक, भाऊराव देवरस अशी अनेक नावे या संदर्भात घेता येतील. त्यांच्या या सामूहिक चिंतनाचे फलित म्हणजे ‘भारतीय जनसंघ’ या नव्या राजकीय पक्षाची स्थापना होय. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी असा नवीन राजकीय पक्ष काढण्याचे ठरविताच काही संघकार्यकर्त्यांनी त्यात सहभागी होण्याचे ठरविले आणि त्यांना बाळासाहेबांचा पाठिंबा मिळाला. त्याच जनसंघाचे आज भारतीय जनता पक्षात परिवर्तन झाले असून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रस्थानी आणि काही महत्त्वाच्या राज्यात संघविचारांचे लोक सत्तेत आले आहेत. बाळासाहेब देवरस यांच्या द्रष्टेपणाची ही एक ओळख.
 
 
१९५० साली नागपूरहून प्रकाशित होणारे मराठी दैनिक ‘तरुण भारत’ चालविण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. त्यासाठी ‘श्रीनरकेसरी प्रकाशन ट्रस्ट’ स्थापन करून त्यांनी त्याची योग्य व्यवस्था लावली. ते स्वतः या ट्रस्टचे अध्यक्ष होते. त्यांच्याच प्रेरणेने देशात प्रमुख प्रांतात संघविचार म्हणजेच राष्ट्रविचार जनमानसात पोहचविण्याच्या उद्देश्याने विविध दैनिके, साप्ताहिके प्रारंभ झाली. आता संघावर कोणताही हल्ला झाला तरी तो परतून लावण्याचे एक पर्यायी तसेच प्रभावी माध्यम त्यांनी उभे करून दिले.
 सरकार्यवाह ते सरसंघचालक
 
१९६२च्या वर्षप्रतिपदेच्या दिवशी नागपूरच्या रेशीमबाग परिसरात डॉ. हेडगेवार यांचे भव्य, आकर्षक, लाखो स्वयंसेवकांचे श्रद्धास्थान असलेले स्मृतिमंदिर आणि समाधीचे उद्घाटन झाले आणि बाळासाहेब देवरस यांच्यावर संघाचे सहसरकार्यवाह म्हणून जबाबदारी देण्यात आली. १९६५ साली त्यांचे संघकार्यातील प्रिय मित्र आणि सहकारी भय्याजी दाणी यांचे निधन झाले आणि त्यांची सरकार्यवाहपदाची जबाबदारी बाळासाहेब देवरस यांच्याकडे आली. या काळात शाखा समाजोन्भिमुख करण्याकडे त्यांचे अधिक लक्ष असे. प्रत्येक शाखेने परिसरातील एक तरी वस्ती दत्तक घ्यावी, तेथे काही समाजोपयोगी कार्य करावे असे त्यांचे सांगणे असे. पुढे १९७३ साली श्रीगुरुजींच्या निर्वाणानंतर ते सरसंघचालक झाले. त्यांनी सरसंघचालक व्हावे असे श्रीगुरुजींनीच एक पत्रात लिहून ठेवले होते. त्यानुसार ते संघाचे ‘मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक’ (Friend, Philosopher and Guide) झाले. १९२६ साली संघात आलेला हा किशोर स्वयंसेवक ४७ वर्षांच्या प्रदीर्घ साधनेनंतर या संघटनेचा मार्गदर्शक बनला. बाळासाहेबांचे आणखी एक वैशिष्ट्य असे की संघाच्या पूर्ण व्यवस्थेत राहून त्यांनी स्वतःला संघानुकूल असे घडविले. संघाच्या मुशीत तयार झालेले हे व्यक्तिमत्त्व होते. हे पद स्वीकारताना ते विनम्रपणे म्हणाले, “संघसंस्थापक डॉ हेडगेवार आणि श्रीगुरुजी यांच्या तुलनेत मी सामान्य कार्यकर्ता आहे. पण या दोघांनी ‘देवदुर्लभ’ असा कार्यकर्त्यांचा संच तयार केला आहे. त्या कार्यकर्त्यांच्या मदतीने आणि सहकार्याने मी ही जबाबदारी पार पडू शकेन. ”
 
 
बाळासाहेब सरसंघचालक झाले, तो काळ देशाच्या आणि संघाच्या दृष्टीने अत्यंत कसोटीचा होता. १९७१च्या पाकिस्तानशी झालेल्या युद्धात भारताचा विजय झाला. बांगला देश नावाचा एक वेगळा स्वतंत्र देश अस्तित्वात आला होता. याचे श्रेय श्रीमती इंदिरा गांधींना होते. त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना निरंकुश सत्ता मिळाली होती. पण निवडणूक कायद्याचा भंग केल्याच्या आरोपाखाली त्यांची निवडणूक अलाहाबाद उच्च न्यायालयाने रद्द ठरवीत त्यांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास मनाई केली होती. देशात इंदिरा गांधी व काँग्रेस सरकारच्या विरोधात जनमत तयार होत होते. जयप्रकाश नारायण यांनी बिहारमधून संपूर्ण क्रांतीचे रणशिंग फुंकले होते, तर गुजरातमध्ये विद्यार्थी नेत्यांनी ‘नवनिर्माण आंदोलन’ उभारून सरकारविरुद्ध दंड थोपटले होते. अशा अस्थिर परिस्थितीत संघाला लक्ष्य करीत इंदिरा सरकारने काँग्रेस व साम्यवादी पक्षांच्या मदतीने संघविरोधी प्रचाराची आघाडी उघडली. संघावर बंदी घालण्याची भाषा पुन्हा एकदा वापरली जाऊ लागली.
 
 
सक्रिय राजकारणात सहभाग घेणे हे संघाचे काम कधीच नव्हते. डॉ. हेडगेवार आणि श्रीगुरुजी यांच्याप्रमाणेच बाळासाहेब देवरस यांनी पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार केला होता. पण आपले अपयश झाकण्यासाठी इंदिरा गांधींना बळीचा बकरा हवा होता. तो संघाच्या रूपाने मिळाला. १९७५ साली देशावर आणीबाणी लादून इंदिरा गांधी या कमालीच्या महत्त्वाकांक्षी महिलेने संघासहित अनेक संघटनांवर बंदी आणून हजारो निरपराध नागरिकांना तुरुंगात डांबले, त्यांचा अनन्वित छळ केला आणि देशाचे भविष्य अंधकारमय केले.
 
 
बाळासाहेब देवरस यांना अटक करून त्यांना येरवड्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले. संघाच्या हजारो कार्यकर्त्यांनी सत्याग्रह केला, आणीबाणीविरोधी वातावरण निर्माण केले. भूमिगत राहून जनतेचे मनोधैर्य कायम राखले आणि १९७७ साली आणीबाणी व संघबंदी उठविण्यात आल्यानंतर जनता पक्षाचे सरकार मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ झाले, तेव्हा संपूर्ण देशाला ‘विसरा आणि क्षमा करा’ असा संदेश देत बाळासाहेबांनी मनाचा मोठेपणा दाखविला. प्रथम संघबंदीनंतर श्रीगुरुजींनीही असाच मनाचा मोठेपणा दाखवीत “जीभ चावली गेली तर कोणी दात पाडून टाकत नाही” असे म्हटले होते. ही उदारता काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अभावानेच आढळून आली आहे. महात्मा गांधींच्या काळापासून काँग्रेसला जी संघद्वेषाची कावीळ झाली आहे, त्याचा उद्रेक आजही मधून-मधून होत असतो, हे आपण पाहतोच आहोत.
 
 
सरसंघचालकपदाची सूत्रे स्वीकारताच दिनांक ८ मे १९७४ रोजी पुण्याच्या प्रसिद्ध ‘वसंत व्याख्यानमाले’त ‘हिंदू संघटन आणि सामाजिक सुधारणा’ या विषयावर बाळासाहेब देवरस यांचे भाषण झाले. हे भाषण अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरले. ‘संघ ब्राह्मणांचा आहे’, ‘संघाला या देशात ब्राह्मणांचे राज्य पुन्हा आणावयाचे आहे’, ‘संघ अस्पृश्यता पाळणारा आहे’ असे अनेक बेछूट आरोप संघाचे विरोधक करीत आले आहेत. श्रीगोळवलकर गुरुजींच्या ‘नवा काळ’मधील मुलाखतीच्या आधारे संघावर असे आरोप करणारे बरेच नेते त्या काळी होते. अशा पार्श्वभूमीवर बाळासाहेबांचे हे भाषण झाले, हे महत्त्वाचे.
काळ्या लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्यांनी यादवीचा धोका पत्करला, त्या अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकनचा उल्लेख करीत बाळासाहेब या भाषणात म्हणाले, “जर अस्पृश्यता वाईट नसेल तर जगात काहीच वाईट नाही.” लिंकन म्हणाले होते, “जर गुलामगिरी वाईट नसेल तर जगात काहीच वाईट असू शकत नाही.” बाळासाहेब त्याच्याही पुढे जाऊन म्हणाले, “अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे आणि समूळ नष्ट झाली पाहिजे.” If untouchability is not wrong then nothing in the world is wrong. It must go, and go lock, stock and barrel. हे त्यांचे प्रसिद्ध इंग्लिश वाक्य होते.
 


RSS_2  H x W: 0 
 
संघबंदीच्या काळात अनेक तुरुंगात असताना त्यांची मुस्लीम नेत्यांशी संघाबद्दल चर्चा होत असे. त्यातून त्यांचे मतपरिवर्तन साधता आले. पुढे बंदी उठविण्यात आल्यानंतर संघ आणि मुस्लीम नेत्यांमध्ये सार्थक संवाद सुरू झाला. या संवादातून मुस्लीम समाजातील संघाबद्दलचे गैरसमज दूर करण्यास मदत झाली. संघात काही प्रमाणात मुसलमान युवक सहभागी होऊ लागले. माजी न्यायमूर्ती महम्मद करीम छागलासारखे मुसलमान उघडपणे “I am a Hindu by Race, but Muslim by faith” असे म्हणू लागले होते. बाळासाहेबांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानी होते.
 
 
‘या देशातील मुसलमान किंवा ख्रिश्चन हे बाहेरून आले नाहीत, ते इथलेच आहेत. काही पिढ्यांपूर्वी त्यांनी उपासना पद्धती बदलली असेल, पण त्यामुळे त्यांचे पूर्वज, संस्कृती आणि मातृभूमी बदलत नाही’ हे सत्य बाळासाहेब प्रखरतेने मांडत असत आणि त्याचा अपेक्षित परिणामसुद्धा दिसून येत असे. १२ कोटी मुसलमान जर हे सत्य समजून वागले, तर त्यांच्या मदतीने भारतीय जनसंघासारख्या सच्चा राष्ट्रवादी पक्षाला सत्तेच्या केंद्रस्थानी स्थानापन्न करणे सहज शक्य होऊ शकेल, असे बाळासाहेबांचे मत होते. (His vision was to propel a truly nationalist party like Bharatiya Jan Sangh to the centre-stage of power with this new awakening amongst the Muslims and Christians.) ह्या दूरदृष्टीने त्यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांना या देशाच्या राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पण सत्तांध, स्वार्थी आणि लबाड राजकारणी नेत्यांना यातील धोका लक्षात आला आणि त्यांनी त्यांच्या पठडीतील मुस्लीम नेत्यांना हाताशी धरून हा प्रयत्न सफल होऊ दिला नाही. १९७८ साली त्यांना हा प्रयत्न सोडून द्यावा लागला. पुढे १९९८ साली सुदर्शनजींनी या संवादाचे पुनरुज्जीवन केले. पण त्यामुळे महत्त्वाची २० वर्षे वाया गेली. अन्यथा त्यांना अपेक्षित परिवर्तन कदाचित अधिक लवकर घडून आले असते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या हजारो कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपासाठी जे काम केले, त्यामुळे भाजपाला ७ ते १५ टक्के मुस्लीम मते प्रथमच मिळाली आणि मुस्लीम बहुसंख्य मतदारसंघातून त्यांचे उमेदवार विजयी झाले. यातून बाळासाहेबांची दूरदृष्टी भविष्याचा अचूक वेध घेणारी होती, हेच अधोरेखित होते.

 
१९८९ हे संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांचे जन्मशताब्दी वर्ष होते. संघाने जुबिल्या साजऱ्या कराव्या हे स्वतः डॉक्टरांना मान्यच नव्हते. पण इथे त्यांचा परमशिष्यच त्यांची जन्मशताब्दी साजरी करायला निघाला होता. हे कसे? बाळासाहेबांचा यामागे काय हेतू होता किंवा असला पाहिजे? समाजजीवनाच्या अनेक क्षेत्रांत संघाचा विस्तार झाला होता. विश्व हिंदू परिषद, भारतीय मजदूर संघ, भारतीय जनता पक्ष, वनवासी कल्याण आश्रम, विद्या भारती या सर्व संघटना प्रचंड विस्तार पावल्या होत्या आणि या विस्ताराबरोबरच त्याचा संस्थागत अभिनिवेशसुद्धा विस्तारला होता. या सर्व संघटनांचा अहंकार हिंदुत्वाच्या सामूहिक अहंकारात पुन्हा एकदा विलीन करण्याची वेळ आली आहे, याची जाणीव बाळासाहेबांना झाली असावी. त्यासाठी डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीपेक्षा दुसरा चांगला मुहूर्त तो कोणता सापडला असता? हिंदुहिताचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर आणणे आणि त्यासाठी हिंदुहितार्थ काम करणाऱ्या या सर्व संघटनांना एकत्र आणून हिंदूंची एक सामूहिक शक्ती उभी करणे, असा दुहेरी हेतू बाळासाहेबांनी साधला.
 

RSS_1  H x W: 0
 
प्रकृती चांगली नसतानादेखील त्यांनी डॉ. हेडगेवार जन्मशताब्दीनिमित्त संपूर्ण देशभर प्रवास केला. डॉ, हेडगेवार जन्मशताब्दी समारोह समिती स्थापन करून त्यात देशातून गणमान्य व्यक्तींचा सक्रिय सहभाग मिळविला आणि सर्व कार्यकर्त्यांना आपण ‘डॉ. हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या संघाचे स्वयंसेवक आहोत’ याची प्रकर्षाने जाणीव करून दिली. याचा योग्य तोच परिणाम झाला. पुढच्या काळात एकात्मता यात्रा, संस्कृती रक्षा योजना, रामजन्मभूमी आंदोलन, हिंदू संमेलने यात हिंदुत्व आंदोलनाची आणि संघपरिवाराची संघटित हिंदू शक्ती काय करू शकते, याचा अनुभव सगळ्या देशाने आणि जगानेदेखील घेतला. त्याच सुमारास देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जन्मशताब्दी सरकारी खर्चाने साजरी होत होती, परंतु समाजाने त्याची दखलही घेतली नाही.

 
डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी निमित्ताने बाळासाहेबांनी संघात सेवा कार्यांचा एक नवीन आयाम जोडला. आज संघाच्या स्वयंसेवकांनी आणि त्यांनी स्थापन केलेल्या विविध संस्थांनी चालविलेल्या अशा सेवा कार्यांची संख्या दीड लाखावर गेली आहे. हा एक जागतिक विक्रमच आहे.
 
बाळासाहेब देवरस सरसंघचालक झाले, तो काळ देशाच्या दृष्टीने अत्यंत कसोटीचा होता. आणीबाणीचा उल्लेख वर आलेला आहेच. त्यानंतर १९७७ साली निवडणुका झाल्या, त्यात काँग्रेसचा पराभव झाला आणि जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. अनेक परस्परविरोधी राजकीय विचारधारा असलेल्या पक्षांचे ते इंदिरा विरोधातील एकत्रीकरण होते. त्यांत स्वाभाविकच जनसंघाची शक्ती अधिक होती. त्यामुळे यांचे महत्त्व वाढेल अशी भीती इतरांना न वाटली तरच आश्चर्य होते. अशा स्थितीत जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांनी भा.म. संघ, अ.भा.वि.प. या संघटनांनी जनता पार्टीत विलीन होऊन पक्षाच्या आघाड्या म्हणून राहावे, असे सुचविले होते. बाळासाहेबांनी ही सूचना क्षणाचाही विलंब न लावता फेटाळून लावली. “All trains leaving New Delhi station need not start from Platform Number One” हे त्यांचे या संदर्भातील प्रसिद्ध वाक्य होते. पुढे मधू लिमये प्रभृती समाजवादी नेत्यांनी दुहेरी सदस्यत्वाचा वाद निर्माण करीत जनसंघाच्या खासदार मंडळींना एकटे पाडण्याचा प्रयत्न केला. ही घुसमट अधिकच वाढली, तेव्हा जनसंघाचे पुनरुज्जीवन करण्याऐवजी भारतीय जनता पक्ष या नावाने नवीन पक्ष काढण्याची आणि ‘गांधीवादी समाजवाद’ हे तत्त्वज्ञान या पक्षासाठी मान्य करण्याची तयारी बाळासाहेबांनी त्या वेळी दाखविली, हे त्यांच्या दूरदृष्टीचे परिचायक आहे. राजकीय परिपक्वतेचा परिचय त्यांनी यातून करून दिला.
 
देशाच्या इतर भागात स्थिती स्फोटक होती. काश्मीर, पंजाब, आसाम, ईशान्य भारतातील अनेक राज्ये, तामिळनाडू या सर्व राज्यांत अतिरेकी कारवाया मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. दहशतवादी कारवायाही याच काळात सुरू झाल्या होत्या. पंजाबमध्ये मोगा येथे संघशाखेवरच अतिरेक्यांनी हल्ला करण्याची घटना घडली होती. मीनाक्षीपुरमचे धर्मांतर, आसाममधील बांगला देशी मुसलमानांची घुसखोरी, नागा, मणिपुरी, बोडो अतिरेक्यांच्या कारवाया, रामजन्मभूमी आंदोलन अशा अनेक घटना या काळात घडल्या. या सर्व घटनांत बाळासाहेब देशाला आणि समाजाला योग्य मार्गदर्शन करू शकले, कारण ते एक कुशल आणि मुरलेले मुत्सद्दी होते. उथळ राजकारणी आणि मुत्सद्दी यांच्यातील फरक स्पष्ट करताना बाळासाहेब नेहमी म्हणायचे, “राजकारणी नेत्याची नजर ही पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीवर असते, तर मुत्सद्दी हा पुढच्या पिढीच्या दृष्टीने विचार करीत असतो” त्यांच्या संपूर्ण जीवनात या मुत्सद्दी व्यक्तिमत्त्वाचे वारंवार दर्शन घडते. एका अर्थाने हा काळ त्यांच्या नेतृत्वाच्या कसोटीचा काळ होता आणि बाळासाहेब काळाच्या या कसोटीवर पूर्णपणे खरे उतरले.
 
संघात ‘एकचालकानुवर्तित्व’ आहे आणि यालाच संघाचे विरोधक हुकूमशाही, एकाधिकारशाही वगैरे विशेषणे लावून संघाला बदनाम करीत असतात. सरसंघचालक हे पद तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शकाचे आहे. संघाबाहेरच्या लोकांना नेमके हे कळत नाही. त्यामुळे संघात गुप्त निर्णय होतात, सरसंघचालक हे हुकूमशाह आहेत असा भ्रामक प्रचार केला जातो. बाळासाहेबांनी संघातील ही सामूहिक नेतृत्वाची पद्धती public domain मध्ये आणली. आणीबाणीच्या काळात ते स्वतः येरवड्याच्या तुरुंगामध्ये होते. पण संघाचे प्रमुख नेते भूमिगत राहून आंदोलनाचे संचालन व मार्गदर्शन करीत होते. आणीबाणीनंतर पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब म्हणाले, “एक सरसंघचालक जेलमध्ये होते, पण सहा-सहा सरसंघचालक बाहेर होते.” त्यांच्या काळात संघातील एकचालकानुवर्तित्व सहजपणे ‘सहचालकानुवर्तित्व’च्या कल्पनेत परिवर्तित झाले. आजही ही व्यवस्था सुरू आहे.
 
 
नागपूरला विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसंसदेत एकत्र जमलेल्या शंकराचार्य, महामंडलेश्वर, संत आणि साधू-महात्मे अशा धर्माचार्यांनी ‘यति सम्राट’ पदवीने बाळासाहेब देवरस यांचा गौरव केला. १९९५ साली २६ नोव्हेंबरला नागपूरलाच त्यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा दिमाखात पार पडला. १९९६ साली १३ दिवसांकरिता भारतीय जनता पक्षाचे सरकार अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली आरूढ झाले, तो सोहळा बाळासाहेबांनी दूरचित्रवाणीवर पाहिला, तेव्हा त्यांच्या क्लांत चेहऱ्यावर अतीव समाधान प्रकट झाले होते. त्यानंतर काहीच दिवसांनी १७ जून १९९६ला त्यांनी या नश्वर देहाचा त्याग केला.
 
 
बाळासाहेब देवरस यांचे संपूर्ण जीवन संघसमर्पित होते. त्यांचे जीवन देशभक्तीने प्रेरित झालेल्या एखाद्या व्रतस्थ योग्याप्रमाणे होते. मु.कृ. उर्फ बाबुराव चौथाईवाले यांनी वर्णन केल्याप्रमाणे उत्कृष्ट संघटक, योग्य मार्गदर्शक, संघविचारांचे व्युत्पन्न भाष्यकार, प्रगल्भ दूरदृष्टीचे धनी, सर्वांना कार्यप्रवण होण्याची सतत प्रेरणा देणारे नेते असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. ते आज नश्वर देहाने आपल्यात नसले, तरी त्यांचे विचार, आचार आणि व्यवहार आपल्यासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरणार आहेत. त्यांचे विस्मरण कधीच होऊ देऊ नये. एका कवीने अत्यंत योग्य शब्दात त्यांचे वर्णन केले आहे -
 
 
‘दाही दिशातून अमृत शिंपित अमृतमय जाहला, देशासाठी क्षण क्षण जागुनी कर्मयोगी शांतला!!’
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या कर्मयोगी जीवनाचे स्मरण नेहमीच प्रेरणा देत राहील, यात संशय नाही.
 
 
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि न्यूज भारती डॉट कॉमचे वरिष्ठ संपादक आहेत. ‘रा.स्व. संघातील देवरस पर्व’ या त्यांच्या पुस्तकाला विदर्भ साहित्य संघाने श्री दादासाहेब खापर्डे पुरस्काराने गौरविले आहे. संपर्क – 9422870842)