एक मनोहारी वारसा...

विवेक मराठी    11-Dec-2020
Total Views |

भारताचे दिवंगत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर  यांच्या  पुत्र उत्पल पर्रिकर यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणींचा संपादित अंश


parrikar_4  H x

राजकारणाशी आणि राजकीय विषयांशी आमच्या घराचा संबंध तसे म्हणाल तर तसा जुना. आमच्या घरी बाबांपूर्वी कोणाचाही प्रत्यक्ष राजकारणाशी कधीच संबंध आला नाही हे खरे; परंतु देशातील, आजूबाजूच्या परिस्थितीबाबतची राजकीय समज घरातल्या सगळ्यांनाच होती. त्यामुळे आमच्या घरी सकाळच्या नाश्त्याच्या वेळी असो अथवा दुपारी अगर रात्री जेवताना असो, जोरदार राजकीय चर्चा घडायच्या. आमचे संयुक्त कुटुंब. बाबांचे बंधू अवधूत, सुरेश, शिवाय बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांत वाढलेले आम्ही. त्यामुळे पक्षीय राजकारणात सक्रिय जरी नसलो, तरी राजकीय समज असायची. त्यामुळे राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर, सामाजिक विषयांवर तावातावाने चर्चा रंगायच्या.

सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....
 
 

पहिली राजकीय आठवण

माझा जन्म 1980चा. अभिजात 1987 सालचा. तत्पूर्वी 1975 साली आणीबाणीविरुद्धच्या संघर्षात बाबांचा आणि कुटुंबाचा सहभाग होता. मला जी राजकीय कार्यक्रमाची पहिलीवहिली आठवण आहे, ती म्हणजे मी पाच वर्षांचा असताना मांद्रे मतदारसंघात लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या प्रचारासाठी बाबा गेले होते, तेव्हा एकदा मीही ते आणि त्यांच्या मित्रमंडळींबरोबर गेलो होतो. रमाकांत खलप हे तेव्हा .गो. पक्षाचे शक्तिशाली उमेदवार होते. त्यांच्या विरोधात भाजपाने पार्सेकरांना उभे केले होते. पण तेव्हा भाजपाची ताकद खूप कमी होती. त्या पहिल्या प्रयत्नात पार्सेकरांना जेमतेम मते मिळाली होती.

शिशुवयापासून संघसंस्कार

लहानपणापासूनच मीदेखील संघसंस्कारांत वाढलो. घरातही अवघे संघमय वातावरण होते. संघसंस्कारांत आम्हीही वाढत होतो. संघाचे प्रचारक आले की एखादा दिवस तरी आमच्या घरी जेवायला यायचे. संघाची शिस्त आमच्यातही झिरपत गेली. काही काळ बाबा म्हापशाचे संघचालकही होते. त्यांचे बालमित्र संजय वालावलकर तेव्हा शाखा कार्यवाह होते. बाबांची रोज शाखेवर उपस्थिती अनिवार्य असायची आणि त्यांच्यासोबत आम्हीही जायचो.


parrikar_2  H x

एक दिवस तर मला आठवते की आम्ही संघाची शाखा भरवण्यासाठी संघस्थानावर गेलो, तर तेथे कोणीच आलेले नव्हते. पण शाखा तर भरली पाहिजे! जवळच गिरीश अभ्यंकर नावाचा कार्यकर्ता राहायचा. त्याच्या घरी शाखेचा भगवा ध्वज आणि स्तंभ ठेवला जाई. माझे वय तेव्हा असेल आठ-नऊ वर्षाचे. पण बाबांनी मला फर्मान काढले की त्यांच्या घरी जा आणि शाखेचा ध्वज आणि स्तंभ घेऊन ये. त्या दिवशी केवळ बाबा आणि मी अशा दोघांनीच संघशाखा भरवली. आम्हीच ध्वजारोहण केले, ध्वजप्रणाम केला आणि शाखा भरवली! बाबा मग वृत्तपत्र वाचत बसले. कोणीही आले नव्हते. आम्ही दोघेच शाखेचा नित्यक्रम उरकून रीतसर संघप्रार्थना म्हणून त्या दिवशी घरी परतलो!

बाबांसोबतछोटा चेतन

बाबांनी आम्हाला कधी चित्रपटाला वगैरे नेल्याचे फारसे आठवत नाही. एकदाच ते आम्हाला खास चित्रपट दाखवायला घेऊन गेले होते, तो होताछोटा चेतन.’ तो भारतातला पहिलाच त्रिमित चित्रपट होता आणि तेव्हा त्याचा खूपच बोलबाला झाला होता. आम्हाला तो पाहायचा होता, म्हणून बाबा आम्हाला त्याला घेऊन गेले होते. पण तेवढेच. बाकी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहावा वगैरे तसे आम्हालाही आकर्षण नव्हते. मात्र, बाबांचे वाचन दांडगे होते आणि आम्हालाही वाचनाची बालपणापासून आवड होती आणि आजही आहे.


parrikar_3  H x

बाबांचा स्वभाव आक्रमक होता, अशी अनेकांची तक्रार असते. पण ते व्यक्तिशः किती संवेदनशील भावनाप्रधान होते, हे आम्हाला ठाऊक आहे. एखाद्याशी धागे जुळले तर त्यांची मैत्री पाच मिनिटांत होऊन जायची. एखाद्याशी जुळले नाही तर कधीच व्हायची नाही. पण मैत्रीचे ढोंग नव्हते. जे काही असायचे ते स्पष्ट असायचे.


सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....
 
 

बालपणातील त्यांचे मित्र शेवटपर्यंत त्यांचे मित्रच राहिले. संजय वालावलकर, श्रीपाद नाईक, संजीव देसाई वगैरे मित्रमंडळी आणि त्यांची कुटुंबे यांच्यासह आम्ही भारतातील अनेक ठिकाणी सुट्ट्या आनंदात घालवल्या. अनेकदा तर असे व्हायचे की आईबाबांनीआम्ही कुठे तरी जाऊ या हंअसा बेत ठरवला तरी तो प्रत्यक्षात उतरेपर्यंत मित्रपरिवार मिळून पंधरा-वीस जणांचा तरी गट होऊन जायचा! बाबांनी एकदा मला आळंदीला नेले होते, पण तेव्हाही त्यांच्या जीजीजी 120 क्रमांकाच्या मारुती कारमध्ये आम्ही आठ-दहा जण मिळून आळंदीला गेलो होतो!

आईचे निधन आणि बाबांची व्यग्रता

2000 साली आमच्या कुटुंबावर एक आघात झाला. आमची आई गेली. मी तेव्हा वीस वर्षांचा. अभिजात तेरा वर्षांचा. आमच्यावरचा तो मोठा आघात होता. बाबा राजकारणात अधिक व्यग्र होत चालले होते. मुख्यमंत्री असताना एकदा कोणीतरी त्यांना आग्रह केला की मुलांसाठी तरी रोजच्या कामातून तीन दिवस उसंत घ्या. त्यांनी बाबांना कर्नाटकमधील शिरूर येथील एका रिसॉर्टचे नाव सुचवले. तीन दिवस बाबा मला आणि अभिजातला घेऊन तिथे राहायला गेले. ते असे ठिकाण आहे, जिथे मोबाइलची रेंज नसते. तेथे टीव्हीही नव्हता. त्यामुळे बाहेरच्या जगाशी संपर्क साधायचे काही साधन नव्हते. त्यामुळे आम्ही खुशीत होतो की आता आम्हाला बाबांचा तीन दिवस सहवास मिळेल. पण हाय रे दैवा! दुसर्या दिवशी बाबांची सरकारी गाडी फायलींचा ढिगारा घेऊन बाबांकडे हजर! बाबा बसले फायलींत डोके खुपसून. मला आणि अभिजातला तेथे ना काही विरंगुळा, ना मोबाइल, ना टीव्ही! शिवाय ते मे महिन्याचे ऐन उकाड्याचे दिवस. उरलेले ते दोन दिवस आम्ही तुरुंगात असल्यासारखे काढले आणि परत आलो!


parrikar_2  H x 

मित्र कधी झालो.. कळलेच नाही

त्यांचे-माझे पिता-पुत्राचे नाते समवयस्क मित्राचे कधी बनले, ते मलाच कळले नाही. अनेकदा ते त्यांच्यासमोरील काही विषयांमध्ये मित्रत्वाच्या नात्याने माझा सल्ला घेत. संरक्षणमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबांची निवड केली, तेव्हा बाबांनी कुटुंबीय म्हणून माझा सल्ला घेतला होता. खरे म्हणजे बाबांना इथे स्पष्ट बहुमत मिळाले होते. मुख्यमंत्रिपद सोडून दिल्लीला संरक्षणमंत्रिपद स्वीकारायला जावे की नाही, हा पेच होता. तिथे मोदींनाही 2014च्या निवडणुकीत 282चे सुस्पष्ट बहुमत मिळाले होते. अवघ्या देशामध्ये मोदी त्सुनामी आली होती. मीही माझे मत दिले की इथे तुम्हाला जेवढे बहुमत मिळाले आहे, त्याहून मोदींना मोठे बहुमत मिळालेले आहे. देशासाठी ही जबाबदारी तुम्ही स्वीकारायला हवी. सहा नोव्हेंबरला बाबा पुन्हा दिल्लीला गेले. मी आणि बाबांचे काही अगदी जवळचे लोक मिळून पणजीतील एका हॉटेलमध्ये त्यांची वाट पाहात बसलो. बाबा आल्यावर कळले की निर्णय झाला आहे. मोदींना ताबडतोब मंत्रीमंडळ विस्तार करायचा होता. संरक्षणमंत्रिपद स्वीकारण्यासाठी बाबांना तातडीने जावे लागणार होते.

 
parrikar_1  H x
 

सगळे मिस्तुराद!

शपथविधी वगैरे होऊन त्या पुढच्या आठवड्यात बाबा गोव्यात आले, तेव्हा त्यांनी आपली सुरक्षा वगैरे नेहमीप्रमाणे सोडून दिली. सरकारी वाहनाला जाऊ दिले. माझ्या गाडीत बसले. दिल्लीच्या अनुभवाविषयी एकच उद्गारले, “सगळे मिस्तुराद!” म्हणजे दिल्लीत संरक्षण मंत्रालयाचा व्याप म्हणजे सगळी सरमिसळ आहे, असे त्यांना म्हणायचे होते. लष्कर, हवाई दल, नौदल आणि लष्कराच्या इतर शाखांचा तो जडजंबाळ व्याप बाबांना समजून घ्यावा लागणार होता. पण त्यांनी ते सगळे आपल्या नेहमीच्या वृत्तीनुसार वेगाने आत्मसात केले. त्यापुढच्या आठवड्यात ते गोव्यात आले, तेव्हा त्यांना लष्कराची कोणती कोअर कुठे तैनात आहे ते सगळे माहीत होते! बाबांच्या संरक्षणमंत्रिपदाच्या कारकिर्दीवर कळस चढवला गेला तो लष्कराने केलेल्या दोन सर्जिकल स्ट्राइक्सनी. पहिला म्यानमारच्या हद्दीत झाला आणि दुसरा पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये. भारताच्या संरक्षण नीतीमध्ये आमूलाग्र परिवर्तन झाल्याचे त्याद्वारे जगाने पाहिले.

सर्जिकल स्ट्राइक्स

म्यानमारचा पहिला सर्जिकल स्ट्राइक झाला, त्या सुमारास बाबांचे पुण्यात काही काम होते. माझेही व्यवसायानिमित्ताने पुण्यात जाणे व्हायचे. बाबांनी त्यांच्या पुणे दौर्याच्या वेळी मलाही पुण्याला बोलावले. तेथून आम्हाला एका स्नेह्याच्या विवाहासाठी विशाखापट्टणमला जायचे होते. पुण्याच्या सरकारी विश्रामगृहामध्ये बाबांना भेटण्यासाठी स्थानिक राजकारण्यांची रीघ लागली. रात्री आम्ही भोजन केले. आम्ही विशाखापट्टणमला जायला निघणार, तेवढ्यात बाबांना फोन आला. आपल्याला तातडीने दिल्लीला परतावे लागणार असल्याचे त्यांनी मला सांगितले. काहीतरी मोठे घडले असावे अशी अटकळ मी मनाशी बांधली, कारण तत्पूर्वी पंतप्रधानांनी राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात काही आक्रमक विधाने केलेली होती. बाबांनाही तीच आक्रमकता अपेक्षित होती. “आमी वोगी रावता म्हणून डिटरन्ट नाअसे ते नेहमी म्हणायचे. बाबा दिल्लीला परत गेले आणि मी गोव्यात आलो. एक-दोन दिवसांनी मी कारखान्यात व्यग्र असताना बाबांचा फोन आला. म्हणाले, “घरी जा आणि बातम्या लाव!” मला काहीतरी मोठे घडले असल्याचा अंदाज आला. मी घरी जाऊन टीव्ही लावला. काही वेळातच म्यानमारच्या हद्दीत घुसून भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकची बातमी टीव्हीवर फ्लॅश झाली!


parrikar_3  H x 

बाबांच्या कारकिर्दीतील दुसरा मानाचा तुरा म्हणजे उरी हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय लष्कराने केलेला पाकव्याप्त काश्मीरमधील सर्जिकल स्ट्राइक. तेव्हा मी जपानमध्ये होतो. प्रवासात होतो. वाटेत विमानाला एक थांबा होता. तिथे उतरल्यावर पाहिले, तर बाबांचे पाच-सहा मिस्ड कॉल्स येऊन गेले होते. मी बाबांना फोन लावला. बाबा इतकेच म्हणाले, “जाले हा! केले हा!” मी वायफायला फोन जोडून बातम्या धुंडाळल्या, तेव्हा कळले की भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केला आहे! आमच्या अपेक्षांना मोदी सरकार जागले होते!

दिल्लीतला एकांतवास

दिल्लीतील वास्तव्यात बाबा खरे तर एकाकी पडले होते. संरक्षणमंत्रिपदी असल्याने लोकांपासून सावधगिरी बाळगणे क्रमप्राप्त होते. प्रामाणिक असल्यामुळे दलालांपासून चार हात दूर राहण्यासाठी ही खबरदारी घेणे गरजेचेच होते. कोणी त्यांच्यासह एखादा फोटो जरी काढला, तरी त्याचाही दुरुपयोग होणे सहज शक्य होते. त्यामुळे लोकांपासून दूर राहणे त्यांच्यासारख्या सतत लोकांत रमत आलेल्या लोकनेत्याला दिल्लीत जड गेले. कुटुंबापासून दूर राहिल्याने एकाकीपणाही आलाच असेल. त्यामुळे 2017च्या निवडणुकीनंतर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी मित्रपक्षांनी त्यांच्या नावाचा आग्रह धरताच ते गोव्यात परतले.


parrikar_1  H x 

दुर्धर आजारपणाचे संकट

पुढे बाबांवर ओढवलेले आजारपण हा आम्हा कुटुंबीयांसाठी फार मोठा धक्का होता. सततच्या व्यग्रतेमुळे त्यांनी आपल्या प्रकृतीची सतत हेळसांड केली होती. पहाटे साडेपाच वाजल्यापासून रात्री साडेअकरा-बारा वाजेपर्यंत बाबा कामात मग्न असायचे. संरक्षणमंत्री असतानाही त्यांचा हाच दिनक्रम होता. व्यग्र राहिल्यामुळे जेवणखाण वेळेवर होत नव्हते. विश्रांती कसली ती ठाऊक नव्हती. बाबांच्या आजारपणाचा सामना करणे कठीण होते. त्यांच्या नाकात अन्ननलिका आली, तेव्हाच पुढे काय वाढून ठेवलेले आहे हे आम्हाला कळून चुकले होते. पण आजारपणातही बाबांना कामाचा ध्यास होता. नाकातल्या नळीमुळे त्यांना बोलता येत नव्हते. पण मुंबईला केमोथेरपी केल्यावर शरीरात त्राण नसतानाही ते विधानसभेत लेखानुदान मांडण्यासाठी आले होते. रात्री पोटात दुखू लागल्याने तातडीने परत जावे लागले. तत्काळ शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते.

भारतातच उपचार घेण्याची इच्छा

बाबांना उपचारांसाठी अमेरिकेत जायचे नव्हते. आपल्याकडे वैद्यकीय सेवेला जो मानवी चेहरा असतो, तो तेथे नसतो. व्यवस्थेचा भाग म्हणून तेथे वैद्यकीय सेवा दिली जाते. त्यामुळे बाबांना पुढील उपचारांसाठी अमेरिकेत नेण्याच्या सूचना येऊ लागताच मीही द्विधा मनःस्थितीत सापडलो होतो. लीलावती इस्पितळात बाबा असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भेटीसाठी आले. तत्पूर्वी मोदी पोर्तुगाल भेटीवर गेले असता लिस्बनमध्ये असलेल्या अद्ययावत कर्करोग केंद्राविषयी त्यांना पोर्तुगालच्या पंतप्रधानांनी अवगत केले होते. त्यामुळे या भेटीत पंतप्रधान बाबांना म्हणाले कीआप वो देखिये’. आता तातडीने निर्णय घेणे आवश्यक होते. माझ्यावरही बाबांना उपचारार्थ विदेशात नेण्याचा दबाव वाढत चालला होता. बाबांना बोलता येत नव्हते. प्रकृती क्षीण झाली होती. त्या स्थितीतही त्यांनी एक पत्र लिहून माझ्या हाती दिले. आपल्यावर जे काही उपचार करायचे असतील ते आपल्याच देशात करावेत, असे त्यांनी त्यात लिहिले होते. निर्णय त्यांनी माझ्यावर सोपवला होता.

जबर इच्छाशक्ती

संध्याकाळपर्यंत त्यांची प्रकृती खालावली. शेवटी मी निर्णय घेतला आणि आम्ही त्यांना उपचारार्थ देशाबाहेर नेले. बाबांच्या या आजारपणाच्या काळात काही लोकांची मदत झाली. सर्वांत जास्त मदत कोणाची झाली असेल तर ती बाबांच्या इच्छाशक्तीची. पंतप्रधानही बाबांना म्हणाले होते, “ये सब दिमाग का खेल है इसे दिमागसे फेस करो

मांडवीवरचा तिसरा पूल - अटल सेतू - हे त्यांचे स्वप्न होते. आपल्या गंभीर आजारपणातही ते रोज जीएसआयडीसीचे अभियंते संदीप चोडणकर यांच्याकडे त्या पुलाच्या कामाच्या प्रगतीची तपशीलवार माहिती घ्यायचे. पुलाच्या उद्घाटनाची तारीख जवळ येऊन ठेपली, तेव्हा तर शेवटचे काही दिवस रात्री साडेनऊ-दहाच्या सुमारास ते मला चोडणकरांना फोन लावायला सांगायचे. स्पीकर फोनवर बाबा ते देत असलेली सगळी माहिती ऐकायचे. 26 जानेवारीला अटल सेतूचे उद्घाटन झाले, तेव्हा त्यांनी स्वतः तेथे उपस्थिती लावली. त्यांच्या क्षीण आवाजातही त्यांनी विचारलेलाहाउज् दी जोश?” हा प्रश्न आपल्याला आठवत असेल! डॉक्टरांनी आम्हाला सांगितले होते की बाबा फार तर तीन महिने आपल्यात असतील. पण बाबांनी तीन नव्हे, सहा नव्हे, तेरा महिने मृत्यूशी झुंज दिली. शेवटी ती अपयशी ठरले हे दुर्दैव!

बाबांनी काय दिले?

आज बाबा नाहीत. पण गोव्याला त्यांची उणीव पावलोपावली भासते आहे. लोक त्यांची ही भावना माझ्याकडे व्यक्त करतात. बाबांनी आम्हाला काय दिले याचा आज जेव्हा मी विचार करतो, तेव्हा असे लक्षात येते की त्यांनी आम्हाला भौतिक गोष्टी, सुखसोयी भले दिल्या नसतील, पण जन्मभरासाठी उपयोगी ठरेल अशी शिकवण दिली. शिकण्याजोगे असे अनंत देवदुर्लभ अनुभव दिले, जे आज आम्हाला सन्मानाने जगण्यास उपयोगी ठरत आहेत. मुलगा म्हणून पित्याकडून आणखी काय हवे?

 

(शब्दांकन : परेश वासुदेव प्रभू)

(पूर्वप्रसिद्धी - नवप्रभा दीपावली 2019)