एकाच वेळी तेलंगण आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांचे हृदय असलेले हैदराबाद शहर हे भारतातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक आहे. आयटी क्षेत्राची पंढरी असलेल्या या शहरात मुंबईप्रमाणेच देशाच्या कानाकोपर्यातून नोकरी-व्यवसायासाठी लोक येऊन स्थिरस्थावर झाले आहेत. येथे कॉस्मोपॉलिटन संस्कृती बहरत आहे. त्या अनुषंगाने या शहराचा विस्तारही वाढत आहे. अशा या बृहद् हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. याला कारण भाजपाने या निवडणुकीत दाखवलेला रस. या निवडणुकांमध्ये तेलंगणा राष्ट्र समितीला (ढठडला) सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी ‘मॅन ऑफ दि मॅच’ मात्र भाजपा ठरला. या निवडणुकीतील निकालात भाजपाचा ज्या प्रकारे ‘भाग्यो’दय झाला आहे, ते पाहता हैदराबादचे ‘भाग्यनगर’ होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
1 डिसेंबर रोजी एकूण 150 प्रभागांमध्ये या निवडणुका पार पडल्या. त्यात 46.5 टक्के मतदान झाले. 4 डिसेंबर रोजी या निवडणुकांचे जे निकाल जाहीर झाले, ते एकूण तेलंगणाच्या राजकारणालाच वेगळे वळण देणारे ठरले. राज्याच्या विधानसभेत केवळ 2 जागांवर असलेल्या भाजपाने महानगरपालिका निवडणुकीत 4वरून 48 जागांवर मुसंडी मारली, तर सत्तास्थानी आलेल्या टीआरएसला गतवेळच्या 99वरून 56 जागांवर रोखून धरले. खरे तर याआधीच दुब्बकाच्या पोटनिवडणुकीत भाजपाने या निकालाचा ट्रेलर दाखवला होता. टीएसआरचे दुब्बका मतदारसंघाचे आमदार सोलिपेटा रामलिंगा रेड्डी यांचे ऑगस्टमध्ये निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक घ्यावी लागली होती. हा मतदारसंघ टीआरएसचा बालेकिल्ला, त्यातच त्यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी रामलिंगा यांच्या विधवा पत्नी सुजाथा यांना उमेदवारी दिली. टीआरएसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र भाजपाही पूर्ण जोर लावून मैदानात उतरला होता. भाजपाच्या माधवानेनी रघुनंदन राव यांनी टीआरएसचा पराभव करत ही निवडणूक जिंकली. अगदी थोड्या मतांच्या फरकाने मिळालेला हा विजय भाजपाचा आत्मविश्वास वाढवणारा ठरला. माध्यमे, निवडणूक विश्लेषक सर्वच या निकालाकडे हैदराबाद महापालिका निवडणुकीची नांदी म्हणून पाहत होते. आणि घडलेही तसेच.
महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा पूर्ण तयारीने उतरला. तेलंगणचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नेत्यांनी सर्व प्रभागांत योग्य प्रकारे मोर्चेबांधणी केली. पक्षाच्या आयटी सेलने प्रचारात चांगली कामगिरी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अन्य राज्यांतील नेत्यांनीही या निवडणुकीच्या प्रचारात सहभाग घेतला होता. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उ.प्र.चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, द. बंगळुरूचे खासदार तेजस्वी सूर्या यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होता. हैदराबादमधील अन्य प्रांतीय नागरिकांना आकर्षित करण्यात या नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. तसेच कोरोना लसनिर्मितीचा आढावा घेण्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शहरातील उपस्थितीही या निवडणुकीच्या दृष्टीने परिणामकारक ठरली.
टीआरएसच्या जागा कमी होण्यास एकीकडे भाजपाचा वाढता प्रभाव कारणीभूत ठरला, तर दुसरीकडे राज्यातील टीआरएस सरकारविषयीची जनतेमधील नाराजीही त्यासाठी जबाबदार ठरली. कोरोनाची टांगती तलवार डोक्यावर असतानाच ऑक्टोबरमध्ये शहरात अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील कित्येक भाग जलमय झाले होते. लोकांचे भरपूर नुकसान झाले, तरीही मुख्यमंत्री के. चंद्रकांत राव यांनी किंवा राज्यातील कोणत्याही मंत्र्याने पूरग्रस्त भागाला भेट दिली नव्हती. पूर ओसरल्यावर सरकारने पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली. मात्र त्यातही सावळा गोंधळच अधिक. सरकारने पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 10 हजार रुपये मदत जाहीर केली. टीआरएसचे स्थानिक नेते आणि नगरसेवक यांच्याद्वारे ही मदत वितरित करण्यात आली होती. त्यातील बहुतेकांनी ती आपले हितचिंतक, कार्यकर्ते यांच्यामध्ये वाटली. बाधितांच्या यादीतील कित्येकांना मदतच मिळाली नाही. ज्यांना मिळाली, त्यातही काहींना अर्धीच रक्कम मिळाली. अनेक प्रभागांत असे प्रकार आढळून आले. त्यामुळे टीआरएस सरकारवर लोक नाराज होते. विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारला लक्ष्य केल्यावर मदत वितरणाचे काम ाशश ीर्शींर नावाच्या केंद्राकडे सोपवण्यात आले. याच दरम्यान निवडणुका जाहीर झाल्या, पण मदत वितरणाचे काम अर्धवट राहिले होते. त्या वेळी टीआरएसने वेगळीच खेळी केली. भाजपाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून मदत वितरण थांबवायला लावल्याचा आरोप मुख्यमंत्री राव यांनी केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार यांनी या आरोपांचा कडाडून विरोध केला. राव यांनी शहरातील भाग्यलक्ष्मीच्या मंदिरात जाऊन शपथेवर हे सिद्ध करावे, असे आव्हान त्यांनी दिले. हे तीन तासांचे लाइव्ह नाट्य वृत्तवाहिन्यांवरून जनतेने पाहिले होते. (शहरातील भाग्यलक्ष्मी या मंदिराच्या नावावरूनच हैदराबादचे भाग्यनगर असे नामांतर करण्याची मागणी भाजपा करत आहे.)
यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री मुहम्मद अली रोहिंग्या मुसलमानांना घरे देत असल्याचे फोटोही भाजपाने प्रकाशात आणले होते. टीआरएस सरकारचे अनधिकृत रोहिंग्यांचे लांगूलचालन करण्याचे धोरण हैदराबादच्या नागरिकांना रुचले नाही. या सगळ्याचा परिणाम मतदानावर झाल्याचे दिसले.
टीआरएस पहिल्या क्रमांकावर असली, तरी पक्षाच्या जागा निम्म्याहूनही अधिक घसरलेल्या आहेत. भाजपा आणि टीआरएस यांना मिळालेल्या मतांचा फरक लक्षात घेतला, तर तो केवळ 0.25 टक्के एवढा कमी होता. त्यामुळे टीआरएससाठी हा धक्का मोठा आहे.
एमआयएमने आपल्या 44 जागा राखण्यात यश मिळवले आहे. हैदराबादमधील पारंपरिक निजामशाही संस्कृतीच्या खुणा आजही टिकून असल्याचा फायदा या पक्षाला मिळतोय. तरीही भाजपाचे 4 उमेदवार चारमिनार प्रभागातील मुस्लीमबहुल परिसरातून निवडून आले, ही बाब लक्षात घ्यावी लागेल.
हैदराबादच्या राजकारणातील एकेकाळचा मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे. या पक्षाला 2016प्रमाणेच या निवडणुकीतही दोन जागांवर समाधान मानावे लागले.
हैदराबाद महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी आणि महापौरपदासाठी 65 जागांची गरज आहे. हा आकडा गाठणे टीआरएसलाही शक्य झालेले नाही. या परिस्थितीत एमआयएमचे महत्त्व वाढण्याची शक्यता आहे. खरे तर टीआरएस किंवा भाजपा दोघांच्याही प्रकृतीला एमआयएमची संगत मानवणारी नाही. त्यामुळे सत्तेची नवी समीकरणे काय असतील याकडे हैदराबादकरांचे लक्ष लागले आहे.
सत्तेत येवो ना येवो, भाजपासाठी मात्र हे निकाल मनोबल वाढवणारे आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार चांगली कामगिरी करत असले आणि अन्य महत्त्वाच्या राज्यांतही पक्षाचे सरकार असले, तरी दक्षिणायन मात्र भाजपासाठी कायमच अवघड गेले आहे. कर्नाटक वगळता अन्य दक्षिणी राज्यांत भाजपाला आपल्या अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. हैदराबादच्या निकालाने पक्षाचे क्षितिज विस्तारले आहे. आगामी तामिळनाडू निकालात आणि 2023च्या तेलंगण विधानसभा निवडणुकीत आपल्याला प्रभाव दाखवता येईल, असा विश्वास पक्षामध्ये निर्माण झाला आहे. तेलंगणच्या प्रादेशिक अस्मितेला वेठीस धरून खेळल्या जाणार्या राजकारणाचा रंग बदलत असल्याचे हे चिन्ह आहे. तसे झाल्यास हैदराबादचे भाग्यनगर होण्यापासून आणि तेलंगण विधानसौंधावर भगवा फडकण्यापासून भाजपाला कोणी रोखू शकणार नाही.