वीरांगना - कनिका राणे

विवेक मराठी    18-Dec-2020
Total Views |

ऑगस्ट 2018 मध्ये काश्मीरमध्ये गुरेझ भागात दहशतवाद्यांशी लढताना मेजर कौस्तुभ राणे या भारतीय जवानाला वीरमरण आले. पतीचा देशभक्तीचा, शौर्याचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांच्या निधनानंतर सैन्यदलात दाखल होण्याचा निश्चय त्यांची पत्नी कनिका राणे यांनी केला. पतीच्या अकाली निधनाचे झालेले डोंगराएवढे दु: गिळत, सैन्यात दाखल होण्यासाठी अथक परिश्रम आणि खडतर मेहनत घेऊन कनिका राणे नुकत्याच लेफ्टनंट पदावर नियुक्त झाल्या आहेत. या लेखात आपण या वीरपत्नीचा परिचय करून देत आहोत.


rane_1  H x W:

कोणत्याही देशाची सुरक्षा त्या देशाच्या सैन्यशक्तीवर अवलंबून असते. कोणता देश किती सामर्थ्यशाली आहे, हे त्या देशाच्या सैन्यबळावरून लक्षात येते. राष्ट्रसेवा हीच ईश्वरसेवा मानून आणि सर्व प्रकारच्या व्यक्तिगत सुखांवर तुळशीपत्र ठेवून सैन्यदलात दाखल होणार्या जवानांसह सर्व अधिकार्यांप्रती कृतज्ञ राहणे हे सर्वसामान्य नागरिकांचे कर्तव्य आहे. जेव्हा एखाद्या जवानाला वीरमरण प्राप्त होते, ते देशाच्या रक्षणासाठी - म्हणजेच पर्यायाने आपल्या रक्षणासाठी स्वीकारलेले असते, याची जाण आपण ठेवली पाहिजे.

2018 साली काश्मीरच्या गुरेझ भागात शत्रूशी लढताना वीरमरण प्राप्त झालेले कौस्तुभ राणे असेच एक भारतीय जवान. ऐन तारुण्यात हौतात्म्य पत्करणार्या कौस्तुभ यांच्याविषयी मनात आदर असला, तरी ते या लेखाचा विषय नाहीत. या लेखात परिचय करून देत आहोत त्यांच्या वीरपत्नीचा. पतीचा देशभक्तीचा, शौर्याचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांच्या निधनानंतर सैन्यदलात दाखल होण्याचा निश्चय करणार्या आणि तो प्रत्यक्षात आणणार्या कनिका राणे यांचा. पतीच्या अकाली निधनाचे झालेले डोंगराएवढे दु: गिळत, सैन्यात दाखल होण्यासाठी अथक परिश्रम आणि खडतर मेहनत घेऊन कनिका राणे नुकत्याच लेफ्टनंट पदावर नियुक्त झाल्या आहेत.

कौस्तुभ यांना वीरमरण आले, तेव्हा त्यांचा मुलगा अगस्त्य अवघा दोन वर्षांचा होता. स्वत:च्या दु:खाबरोबरच अपत्यवियोगाने दु:खी झालेल्या सासू-सासर्यांना सावरतानाच कनिका यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. देशाच्या सुरक्षेसाठी स्वत:च्या जिवाची बाजी कशी लावायची, हे त्यांना पतीच्या जगण्यातून समजले होते. त्यांचा शौर्याचा वारसा पुढे चालवावा, त्यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांचे देशसेवेचे व्रत आपण घ्यावे असे त्यांना वाटले. इच्छेला कठोर परिश्रमांची जोड देत त्यांनी ते वास्तवात उतरवले.

कनिका आणि कौस्तुभ यांचा प्रेमविवाह. कनिका यांची एम.बी..साठी निवड झाली आणि तेव्हा कौस्तुभने सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. ज्या क्षेत्रात जाऊ त्या क्षेत्रात आपल्यातील कौशल्यांचा, क्षमतांचा पुरेपूर वापर व्हायला हवा, अशी त्यांची इच्छा होती. 26/11च्या हल्ल्यात भारतीय सैन्याने केलेल्या असाधारण कामगिरीमुळे ते प्रभावित झाले होते. त्यातूनच सैन्यात दाखल होण्याच्या पर्यायाचा ते विचार करू लागले. त्यांनी कनिकाशी तशी चर्चाही केली. विवाहाची, सहजीवनाची स्वप्ने पाहणार्या कनिकानी कौस्तुभ यांच्या भावना, देशप्रेम समजून घेतले. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांना मनापासून साथ दिली. “तुला हे मान्य नसेल तर तू तुझा मार्ग निवडू शकतेसअसे कौस्तुभनी सांगितले, तरी कनिकाचा निर्णय बदलला नाही.

2011मध्ये सैन्यात लेफ्टनंट या पदावर दाखल झालेल्या कौस्तुभ यांनी थोड्याच कालावधीत आपल्या कामगिरीच्या बळावर, कॅप्टन आणि नंतर मेजर हे पद प्राप्त केले. मेजर पदावर बढती मिळाली होती, पण ते पद त्यांना सन्मानपूर्वक बहाल करण्याच्या सोहळ्यापूर्वीच काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आले.


rane_2  H x W:  

2014मध्ये कौस्तुभ कनिका विवाहबद्ध झाले. त्यांच्या या सहजीवनात सैनिकी जीवन कसे असते याचे कनिका यांना जवळून दर्शन झाले. आपला जीवनसाथी देशासाठी खूप मोलाचे योगदान देतो आहे, याची त्यांना जाणीव होती. त्यांच्या सैन्यदलातील कामगिरीचा अभिमानही होता. कौस्तुभ यांना वीरमरण आले, तेव्हा त्यांचा मुलगा अगस्त्य अवघ्या दोन वर्षांचा होता. त्यांच्या अकाली आणि आकस्मिक निधनाने कनिका यांच्यावर आभाळ कोसळले. कौस्तुभ या जगात नाही या सत्याचा स्वीकार करणे, ते पचवणे खूप कठीण होते. त्या म्हणाल्या, “आजूबाजूला काय घडतं आहे, याचंही भान तेव्हा नव्हतं. या दरम्यान कौस्तुभ यांच्या युनिटमधून त्याचं सामान घरी आलं. त्या सामानात त्याची पुस्तकं, डायरी, त्याच्या रोजच्या वापरातल्या वस्तू असं सगळं होतं. कौस्तुभला देशासाठी आणखी खूप मोठा पराक्रम करायची इच्छा होती हे तीव्रतेने जाणवलं. आधीपासून सैन्यात जाण्याचा माझा निर्णय झालेलाच, त्याच्या आठवणींना उजाळा देताना निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. शिवाय मी त्याच्या आठवणीत अशी उदास राहणं हे कौस्तुभलाही कधीच आवडलं नसतं. तो स्वतः ध्येयाने पछाडलेला माणूस होता. एखादं ध्येय ठरवायचं आणि त्याच्या पूर्तीसाठी अथक प्रयत्न करायचे, हे त्याचं वैशिष्ट्य. त्याच्यापासूनच प्रेरणा घेत मी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा निर्णय घेतला. खर्या अर्थाने सप्तपदी घातली.” सैन्यदलात जाण्याच्या निर्णयापर्यंतचा झालेला प्रवास कनिका यांनी उलगडून सांगितला. त्या पुढे म्हणाल्या, “जेव्हा मी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा घरातल्या लोकांनी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनी पाठिंबा दिला, पण त्यासाठी खूप संघर्षही करावा लागला. शिवाय माझा भाऊही त्याच्या नोकरीत बदली करून अगस्त्यला सांभाळण्यासाठी मुंबईत राहिला. त्याच वेळी, तुम्ही घेतलेला निर्णय किती धाडसी आहे आणि कशाकशाला सामोरं जावं लागणार आहे, याची कल्पनाही कौस्तुभच्या मित्रांनी मला दिली. माझी त्या सगळ्याला तयारी होतीच.

 

अर्थात मनात आलं म्हणून सैन्यात भरती झालो असं नसतं. सैन्यदलातल्या प्रवेशासाठी असलेली सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) परीक्षा उत्तीर्ण झाले. सैन्यदलात जाण्यासाठी पूर्वतयारीही खूप महत्त्वाची असते. त्यासाठी शारीरिक तंदुरुस्तीकडे (फिजिकल फिटनेसकडे) मी अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली. चेन्नई ऑफिसर्स ट्रेनिंग ॅकॅडमी (ओटीए)मध्ये जाऊन अकरा महिन्यांचं प्रशिक्षण घेतलं. ओटीएमध्ये प्रवेश घेतला आणि खर्या प्रवासाला सुरुवात झाली. हे ट्रेनिंग 20 ते 25 वर्षांच्या मुलांसाठी आखलेलं असतं. मी तिशीच्या उंबरठ्यावर होते. तिथूनच माझ्या परीक्षेला खरी सुरुवात झाली होती. या प्रशिक्षणात तुमच्याकडे श्वास घ्यायलाही वेळ नसतो. सकाळी चार वाजता प्रशिक्षण चालू होतं, ते रात्री तीन वाजेपर्यंत त्यासंबंधी काही ना काही चालूच असतं. मिळालेल्या एक तासात कपडे धुणं, युनिफॉर्म तयार करणं आणि झोपायचंही असतं.

आठवड्यातून दोन-तीनदा परेड असते.” ट्रेनिंगच्या काळातला दिनक्रम कनिका सांगत होत्या. “वीस-वीस किलोची वजनं घेऊन तुम्हाला धावायचं असतं. फक्त लेक्चरच्या वेळी थोडा आराम असतो, पण तेथेही मेंदू जागृत असावा लागतोच. कुठल्या वेळी कुठला प्रश्न विचारला जाईल, हे सांगता येत नाही. एनडीएमधील विद्यार्थी 4 ते 5 वर्षांत जे प्रशिक्षण पूर्ण करतात, ते आम्ही अकरा महिन्यांत पूर्ण करतो. शारीरिक, मानसिकदृष्ट्या आपण पूर्णपणे फिट असणं आवश्यक असतं. ॅकॅडमीत प्रवेश घेण्यापूर्वी प्रशिक्षणादरम्यान मला ते झेपेल की नाही याची चिंता होती. माझ्या निर्णयाचा मला फेरविचार तर करावा लागणार नाही ना, याचीही नाही म्हटलं तरी धास्ती वाटत होती. परंतु या सगळ्या कालखंडात मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खंबीर राहिले. कौस्तुभनेही त्याच्या ट्रेनिंगचे अनुभव सांगितलेले असल्याने थोडीफार कल्पनाही होतीच.”

हेे खडतर प्रशिक्षण पूर्ण करत कनिका राणे आता आर्मी कमिशन्ड ऑफिसर झाल्या आहेत. वरिष्ठांकडून त्यांच्या युनिफॉर्मवर दोन स्टार लावण्यात आले, हे नक्कीच अभिमानस्पद आहे. त्याविषयीचा आनंद व्यक्त करताना कनिका यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “माझ्या या यशामागे कौस्तुभची प्रेरणा हा महत्त्वाचा भाग आहे. घरातल्या लोकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद आहेत. मित्रपरिवारांनी दिलेलं प्रोत्साहन आणि याहून मोठी गोष्ट म्हणजे अगस्त्यने एवढ्या लहान वयात दिलेली साथ आहे. हे सर्व माझ्या पाठीशी होते, म्हणूनच मी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेऊ शकले. लेफ्टनंटपदी झालेली नियुक्ती ही माझ्यासाठी यशाची पहिली पायरी आहे, अजून खूप दूरवरचा पल्ला मला गाठायचा आहे. देशासाठी उत्तम कामगिरी बजावतानाच कौस्तुभ आणि मी अगस्त्यच्या भविष्याविषयी जी स्वप्नं पाहिली आहेत, ती मला पूर्ण करायची आहेत. कौस्तुभ देहरूपाने आमच्यात नसला, तरी तो मनाने कायम आमच्यात असणार आहे, याची मला खात्री आहे.”

या मुलाखतीच्या माध्यमातून तरुण पिढीला काय सांगाल?” या प्रश्नावर त्यांनी अगदी मनापासून विचार व्यक्त केले. “आजकालची पिढी ही मनीमाइंडेड झाली आहे. सर्वांना आरामदायक जीवनशैली हवी आहे. सर्वच गोष्टी इन्स्टंट आणि फास्ट हव्या आहेत. या पिढीत देशाविषयीचा आत्मीय भाव जागृत व्हायला हवा. इंटरनेट आणि सोशल मिडियाच्या बाहेर एक खरंखुरं जग आहे, याची जाणीव त्यांनी ठेवावी. राष्ट्रप्रेमाचा वारसा एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे गेला, तरच आपला देश पुढील काळात सुरक्षित राहील आणि समर्थ बनू शकेल. देशासाठी बलिदान करण्याची इच्छा आणि हिम्मत असणार्या जाँबाज तरुणांची भारतीय सैन्यदलाला गरज आहे. अशा जवानांची पिढी निर्माण व्हायला हवी. लष्कराची नोकरी म्हणजे जिवाला धोका असं मानतात. पण तसं पाहिलं तर धोका कुठल्या गोष्टीत नाही? आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर धोका असतोच, या धोक्यांवर मात करत पुढे जाणे हेच खरं आयुष्य आहे, हे तरुणांनी लक्षात घ्यावं.”

देशसेवेसाठी सिद्ध झालेल्या या वीरांगनेने दिलेला हा संदेश मोलाचा आहे, कारण तिने तो स्वतःच्या आयुष्यात आचरणात आणला आहे. सैन्यदलातील त्यांची कारकिर्द संस्मरणीय ठरावी, यासाठी विवेक समूहाकडून त्यांना शुभेच्छा!