@रणजित रमेश हिर्लेकर
रत्नागिरीपासून गोव्यापर्यंतच्या परिसरातील ही कातळशिल्पे कधी खणली? कोणी खणली? का खणली? कशासाठी खणली? हा कुतूहलाचा विषय आहे. अनेक ठिकाणी ही कातळशिल्पे स्थानिक लोकांनी पांडवांशी जोडली आहेत. ‘पांडवांचो सारीपाट’, ‘लिवलेला काप’, ‘महापुरुष’ अशा वेगवेगळ्या नावांनी ही कातळशिल्पे ओळखली जातात. खरे तर ही कातळशिल्पे नसून रेखाचित्रे आहेत. ही कातळचित्रे मानवाला शिल्प घडविता येण्यापूर्वीची प्राथमिक पायरी असली पाहिजे. त्यामुळे ही कातळचित्रे काही हजार वर्षांपूर्वीची असू शकतात. 
आपल्या कोकण किनारपट्टीला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. या किनार्यावर सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत. लक्षावधी वर्षांपूर्वी भूखंडांचे स्थलांतरण, भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक यातून या पर्वतरांगा तयार झालेल्या आहेत. या सह्याद्री पर्वतांच्या माथ्यावर ज्वालामुखीतील लाव्हा रसाचे थरावर थर पसरून ‘लॅटराइट’ या प्रकारच्या जांभ्या दगडाचे सपाट पठार तयार झालेले आहे. लॅटराइटने बनलेल्या या सपाट कातळी भागालाच कोकणात ‘सडा’ असे म्हटले जाते. ज्या गावाच्या शेजारी हे पठार असेल, ते त्या गावाच्या नावाने ओळखले जाते - उदा., जामसंडे सडा, दाभोळे सडा, कुणकेश्वर सडा इत्यादी. या भागातील पठारांची नावे अशीच पडलेली पाहायला मिळतात. या परिसरात घरांच्या बांधकामांसाठीदेखील याच जांभ्या कातळातील चिरे कातून काढून वापरले जातात. हा कातळ तासून काढायला अतिशय कठीण व कष्टदायक असतो. हा लॅटराइटचा जांभा दगड काही ठिकाणी अत्यंत कडक जांभळट, काळ्या रंगाचा असलेला आढळतो. वरच्या थराचा हा भाग अत्यंत कठीण थरांचा बनलेला असतो आणि अशा प्रकारच्या कठीण भागावरील सपाटीलाच अनेकदा कोरून तासून तयार केलेली कातळशिल्पे आढळतात. यांना पुरातत्त्वीय भाषेत ‘पेट्रोग्लिफ्स’ असे म्हणतात. या प्रकारची कातळशिल्पे आता रत्नागिरी-राजापूरपासून पार गोव्यापर्यंतच्या सर्वच दक्षिण कोकणात सापडू लागली आहेत.
1990 साली डॉ. दाऊद दळवी यांनी रत्नागिरी येथील निवळे फाट्यावरील कातळशिल्पे उजेडात आणली. ही कातळशिल्पे भौमितिक आणि अमूर्त रचनांसाठी प्रसिद्ध आहेत. लांबून पाहताना एकाद्या इलेक्ट्रिक सर्किटसारखी ही रचना दिसते. कोकणात अशी काही कातळशिल्पे असल्याचा हा पहिलाच उल्लेख आढळतो. प्र.के. घाणेकर यांनीही ‘कोकण पर्यटन’ या पुस्तकात कातळशिल्पांचा उल्लेख केलेला आढळतो. 1996-97 साली पालशेत भागात आर्किऑलॉजीचे काम सुरू असताना त्याच्या आसपासच्या भागातील कातळशिल्पे या टीमच्या पाहण्यात आली. त्या वेळी या रत्नागिरी-राजापूर परिसरातील कातळशिल्पांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या टीममध्ये सामिल असणार्यास श्रीकांत प्रधान यांनी रीतसर काम सुरू केले. त्यांनी त्याचे फोटोग्राफ्स, उत्कृष्ट रेखाचित्रे तयार केली. स्थानिक लोकसंस्कृतीचा या शिल्पांशी काही संबंध आहे का, याचा शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या कातळशिल्पावर त्यांनी शोधनिबंधही सादर केले आहेत.
त्यानंतर 2000 साली रवींद्र लाड यांनी बारसू, देवीहसोळ, सोलगाव, गावडेवाडी या भागातील कातळशिल्पे शोधून काढली. बारसू या गावातील कातळशिल्प तर इतके मोठे आहे की त्याचे फोटो काढण्यासाठी ड्रोन कॅमेराच पाहिजे. जमिनीवरून त्याचे नीट फोटो काढताच येणार नाहीत, इतके ते शिल्प मोठे आहे. यात एक मोठी विशाल मानवाकृती असून तिने दोन हातांनी दोन वाघ रोखून धरले आहेत, असे विलक्षण दृश्य या शिल्पात पाहावयास मिळते. जगातील अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये या प्रकारचे चित्रणे आढळली आहेत. सिंधू संस्कृतीतील एका मुद्रेवरदेखील असेच चित्र पाहायला मिळते. त्यामुळे या कातळशिल्पांचा प्रवास सिंधू संस्कृतीपासून सुरू झालाय का? असा एक प्रश्न लाड यांनी उपस्थित केला आहे.
त्यानंतरच्या काळात मालवण येथील जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत यांनी हिवाळे, कुडोपी येथील कातळशिल्पे उजेडात आणली. हिवाळे येथील कातळशिल्पांना स्थानिक लोक ‘पांडवांची चित्रे’ या नावाने ओळखत असत. कुडोपी गावाजवळ ‘बावल्यांचे टेंब’ या नावाने ओळखल्या जाणार्या पठारावर सुमारे साठहून अधिक कातळशिल्पे असल्याची नोंद त्यांनी केली आहे. या शिल्पांचे महत्त्व ओळखून त्यांनी यावर आपला शोधनिबंध ‘रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’च्या 2012 साली झालेल्या 17व्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सादर केला होता. त्यामुळे हा विषय जागतिक पातळीवर गेला. ‘ही कातळशिल्पे अतिशय भव्य व प्रेक्षणीय आहेत. वैविध्य, रचना, कलाकारी, सौदर्य, प्रमाणबद्धता या दृष्टीने ही कातळशिल्पे अतुलनीय आहेत. हे स्थळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून त्याचे नीट जतन होणे आवश्यक आहे. या कातळशिल्पांचा दर्जा पाहता त्या काळात या परिसरात वास्तव्य करणारा मानवी समूह अतिशय प्रगल्भ असला पाहिजे’ असा अभिप्राय प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ डॉ. सुंदरा अडिगा यांनी या परिषदेत व्यक्त केला होता.
आता अनेक क्षेत्रांतील मंडळी या कातळशिल्पांचा शोध घेत आहेत. नवनवीन कातळशिल्पे त्यामुळे उजेडात येत आहेत. यात नवीन सुशिक्षित संशोधक मंडळी तर आहेतच, त्याचबरोबर काही हौशी मंडळीही शोध घेत आहेत. सर्वांचा नामोल्लेख करणे जरी येथे शक्य नसले, तरी त्यांच्या कामामुळे कातळशिल्पांचा हा विस्तीर्ण पट अधिकच विस्तारित होत आहे. सुधीर रिसबूड व त्यांच्या सहकार्यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. रत्नागिरी-राजापूर भागातील अनेक कातळशिल्पे शोधून काढण्याची मोहीमच त्यांनी उघडली आहे. या शिल्पांचे दस्तऐवजीकरण करताना त्यांचे जतन-संवर्धन करण्याची त्यांची भूमिका आहे. कातळशिल्पे ज्या जागेत कोरलेली आहेत, त्या जमिनीचे मालक व शासन यांच्यामध्ये एक दुवा म्हणून काम करणे, जनजागृती करणे, नियोजनबद्ध विकासाचा आराखडा तयार करणे या हेतूने त्यांची ‘निसर्गयात्री’ ही संस्था काम करीत आहे.
2010 साली डॉ. दाऊद दळवी व रवींद्र लाड यांच्यासोबत स्वतः मी रत्नागिरी व राजापूर भागात कातळशिल्पांच्या शोधात हिंडलो होतो. त्या वेळी आम्ही निवळी फाटा, बारसू, गावडेवाडी, राजापूर, चिंद्रवली या ठिकाणांच्या कातळशिल्पांची पाहणी केली होती. त्यानंतर मी माझ्या मित्रांच्या मदतीने देवगड तालुक्यातील कातळशिल्पांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले. 2012 साली दाभोळच्या सड्यावर मला कातळशिल्प सापडले आणि त्यानंतर देवगडच्या इतिहास संशोधक मंडळाच्या माध्यमातून गेल्या दीड-दोन वर्षांत पंधरा ते वीस कातळशिल्पे सापडली आहेत.
रत्नागिरीपासून गोव्यापर्यंतच्या परिसरातील ही कातळशिल्पे कधी खणली? कोणी खणली? का खणली? कशासाठी खणली? हा कुतूहलाचा विषय आहे. अनेक ठिकाणी ही कातळशिल्पे स्थानिक लोकांनी पांडवांशी जोडली आहेत. ‘पांडवांचो सारीपाट’, ‘लिवलेला काप’, ‘महापुरुष’ अशा वेगवेगळ्या नावांनी ही कातळशिल्पे ओळखली जातात. खरे तर ही कातळशिल्पे नसून रेखाचित्रे आहेत. ही कातळचित्रे मानवाला शिल्प घडविता येण्यापूर्वीची प्राथमिक पायरी असली पाहिजे. त्यामुळे ही कातळचित्रे काही हजार वर्षांपूर्वीची असू शकतात. यांना ‘कातळशिल्प’ म्हणण्यापेक्षा ‘कातळचित्रे’ म्हणणे अधिक योग्य आहे. ही उठावाची चित्रे आहेत. चित्रकलेकडून शिल्पकलेकडे प्रवास करताना कधीतरी मधल्या काळात मानवाने या कातळचित्रांच्या निर्मितीस सुरुवात केलेली असली पाहिजे.
देवीहसोळ येथील ‘मांड’ या नावाने ओळखले जाणारे चित्र आता अनेक ठिकाणी आढळून आले आहे. एका विस्तीर्ण कातळावर खोदून कोरून काढलेले हे कातळचित्र आहे. एक आयाताकृती पट लांब पट्टे कोरून बाकीच्या कातळापासून वेगळा केलेला आहे. याला सरळ पट्ट्यांची बॉर्डर कोरलेली आहे. त्याच्या आत वळणे घेत जसा नाग चालतो तशा प्रकारचे खोल पट्टे कोरले आहेत. आतील भागामध्ये चौरस, गोल, आयाताकृती अशा विविध आकृत्या कोरलेल्या आहेत. या प्रकारच्या कातळचित्रात विविध प्रकारच्या आकृत्या असतात. नुकतेच काही महिन्यांपूर्वी वानिवडे या गावात सापडलेले कातळचित्रदेखील याच प्रकारचे आहे. आम्हाला आरे गावातील सड्यावर असेच एक कातळचित्र सापडले. साळशी येथील दुर्गसंवर्धनाचे काम करणार्या संतोष गावकर या तरुण उत्साही कार्यकर्त्याला याच प्रकारचे कातळचित्र सापडले. सोईसाठी या प्रकारच्या कातळचित्रांना आपण ‘मांड’ असे म्हणू या. या प्रकारातील कातळचित्रांना नागमोडी वळणाची नक्षी आढळते. पण साळशी येथील मांड या प्रकारातील कातळचित्राला ही नागमोडी नक्षी नसून काटकोनात वळविलेली आढळते. प्रधानसरांशी चर्चा करता “या चित्रांमध्ये अशा प्रकारचे बदल आढळतात” असे त्यांचे म्हणणे आहे.
आरे येथील मांड या प्रकारच्या कातळचित्रापासून अगदी थोड्या अंतरावर व्हाळीनजीक एक आकृती कोरलेली आढळली. ही एक मानवाची आकृती आहे. अत्यंत पुसट अशा रेषांनी ही आकृती रेखाटलेली आहे. त्यामुळे पटकन ती लक्षातच येत नाही. याची दोन्ही पावले बाजूला वळविलेल्या स्थितीत आढळतात. रत्नागिरीपासून कुडाळपर्यंतच्या अनेक गावांतील कातळसड्यांवर अशाच अनेक मानवाकृती कोरलेल्या आढळल्या आहेत आणि बाजूला वळविलेली पावले हे वैशिष्ट्य या प्रकारच्या बर्याच कातळचित्रांमध्ये आढळते. अनेक ठिकाणी या मानवाकृतींविषयी काही स्थानिक आख्यायिका सांगितल्या जातात. कुठे त्यांना महापुरुष, राखणदार असे संबोधले जाते. काही ठिकाणी अशा पाच-सहा मानवाकृती आढळल्या आहेत. त्यांना त्या भागातील लोक ‘पाच पांडव’ म्हणून ओळखतात. अशा ठिकाणी काही विशिष्ट विधी, पूजाअर्चा, भागवणी करण्याचे - म्हणजेच वार्षिक बळी देण्याचे प्रकारही केले जात असत, असे चौकशी करता आढळले आहे. यातील काही आकृत्या उंच लांब अजानबाहू असलेल्या जैन साधूंप्रमाणे भासतात. पण ठोस पुराव्याअभावी असा काही निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.
नाग, ससा, खेकडा, सांबर, कोल्हा, चित्ता, हत्ती, रानडुक्कर, अनेक प्रकारचे मासे व पक्षी यासारखी अनेक चित्रे यात आढळतात. प्रामुख्याने यात पाळीव प्राणी आढळत नाहीत. फक्त जंगलात शिकार केले जाणारे प्राणी या कातळचित्रांमध्ये आढळतात. त्यामुळे, शिकार करून त्यावर आपला निर्वाह करणार्या मानवसमूहाने ही चित्रे कोरली आहेत का? असाही प्रश्न उपस्थित होतो. दाभोळच्या कातळशिल्पात मानवी आकृतीचा फक्त कमरेखालचा भाग कोरलेला आढळतो. प्रामुख्याने हे स्त्रीचे चित्रण असावे, असे वाटते. तिच्या कमरेवर मेखलेप्रमाणे शिल्पांकन आढळते. तिच्या पायातही तोड्यासारखे कोरीवकाम आढळते. आजवर झालेल्या सर्व उत्खननात नवाश्मयुगापासून सिंधू संस्कृतीपर्यंतच्या काळातील मातीच्या मातृदेवता खूप मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. त्यांची पूजाअर्चा होत असल्याचेही संशोधनातून आढळले आहे. प्रसिद्ध संशोधक डॉ. रा.चिं. ढेरे यांनी आपल्या पुस्तकात लज्जागौरीविषयी खूप माहिती दिली आहे. कोकणात मध्ययुगीन कालखंडात तांत्रिक शाक्त संप्रदायाचे मोठे प्राबल्य होते. त्यामुळे दाभोळ येथील हे कातळशिल्प मातृदेवता असावी का? येथे तांत्रिक साधना होत असावी का? असेही प्रश्न उपस्थित होतात.
अनेक ठिकाणी अनाकलनीय भौमितिक रेखाटने आढळतात. बारसू येथील कातळशिल्प एका बाजूने सिंधू संस्कृतीतील विख्यात वाघ रोखून धरणार्या चित्रासारखे दिसते, तर उलट बाजूने पाहता ते एखाद्या गलबतासारखे दिसते. काहींच्या मते ती आकृती पंख पसरून उडणार्या गरुडासारखी दिसते. असे वेगवेगळे तर्क पुढे येतात. ठोस वैज्ञानिक पुरावे सापडत नसल्याने साम्य अनुमानांवर आधारितच अभ्यास करणे भाग पडते. अशा वेळी काही जण या चित्रांमध्ये चुना किंवा खडू टाकून रंगवून फोटो काढतात. पण हे अत्यंत चुकीचे आहे, कारण यामुळे त्या चित्राला तर हानी पोहोचतेच, त्याचबरोबर आपण ते चित्र रंगवून आपल्याला त्याचे जे आकलन झाले आहे, तेच कायम होऊन बसते. तसेच त्या मूळ रेखाटनाचे निरीक्षण करून नवीन तर्क करण्याला वावच उरत नाही. आज या सर्व कातळचित्रांचे फोटोग्राफ्स, अचूक रेखाटने, नकाशे तयार करून एकत्र करण्याची गरज आहे. बरे, हे एकट्यादुकट्याचे किंवा एखाद्या संस्थेचेही काम नाही. सर्वांनी एकत्र येऊन, एकमेकांना माहितीचे आदानप्रदान करीत, चर्चा करीतच हे काम करावे लागेल.
ही कातळचित्रे कोणत्या काळातील आहेत? हा प्रश्न तांत्रिकदृष्ट्या फारच अवघड आहे. नवाश्मयुगापासून अगदी आधुनिक काळापर्यंतच्या रचना यात असू शकतात. फार मोठ्या काळात कोरल्या गेलेल्या या अनंत रचना आहेत. त्या सर्व एकत्रित करून, त्यांची साम्यस्थळे लक्षात घेऊन त्यांचा अभ्यास करावा लागेल आणि तरच काही ठोस संशोधन हाताशी लागू शकेल. आज ही कातळचित्रे कोकणातील पर्यटनासाठी मोठे आकर्षण ठरणार आहे. भावी काळात परदेशी पर्यटक खेचून आणण्याची क्षमता या कातळचित्रांमध्ये आहे. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टीने त्याचे संशोधन, संवर्धन करून त्यांचे योग्य रितीने प्रेझेंटेशन करावे लागेल. या बाजूंवर आज ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे. या कातळशिल्पांमध्ये अनेक कोडी आहेत, ती भविष्यातील संशोधनातून सुटतील अशी आशा वाटते.
(लेखक भारताच्या प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान - अर्थात ‘भारतविद्या’ अथवा ‘प्राच्यविद्या’(खपवेश्रेसू) विषयाचे अभ्यासक आहेत.)
9423303670