शंकराचार्यांचा अद्वैत वेदान्त

विवेक मराठी    04-Dec-2020
Total Views |
अद्वैत वेदान्तमताचे उद्गाते असलेले सनातन वैदिक धर्मातील तत्त्वज्ञ आद्य शंकराचार्य किंवा आदि शंकराचार्य यांनी सांख्यांचा प्रधानकारणवाद आणि पूर्वमिमांसिकांचा ज्ञानकर्मसमुच्चयवाद खोडून काढत अद्वैतवाद प्रस्थापित केला आणि ज्ञानमार्गाचा पुरस्काजर केला. त्यांच्याविषयीची आणि त्यांनी रुजवलेल्या अद्वैत सिद्धांताची माहिती दोन भागात देत आहोत.

Adi Shankaracharya_1 

सदाशिव समारंभात्।
शंकराचार्य मध्यमात्।
अस्मद आचार्यपर्यंतं।
वन्दे गुरुपरंपराम्।

इसवीसनपूर्व सहाव्या शतकात भ. गौतम बुद्धांनी यज्ञहिंसेचा त्याग करून भारतीयांना नवा मार्ग दिला. सम्राट अशोक, अजातशत्रू आदी राजांच्या आश्रयामुळे भारतात, भारताबाहेर सर्वत्र वेगाने बौद्धमताचा प्रचार झाला. परंतु जसा गणेशोत्सव विशिष्ट हेतूने सुरू झाला तरी सध्या त्याचे अनेक तोंडी रूप झाले आहे, तसे काहीसे या विप्लवात घडले. समाजाची घडी विसकळीत झाली. ‘इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा’ याप्रमाणे वेदांविरुद्धच्या बंडात याच रचनेच्या आधारे उभा असणारा सामाजिक जीवनाचा पाया खिळखिळा होऊ लागला. साधारणपणे पहिल्या शतकापासून लोकांमध्ये पुन्हा वेदांकडे जाण्याचा कल वाढू लागला.
 
पहिल्या शतकात जेमिनी यांनी मीमांसासूत्रे रचली. वेदांच्या कर्मकांडातील - म्हणजे संहिता आणि ब्राह्मणे यांमधील वचनांचा समन्वय करणारे शास्त्र निर्माण झाले. वेदवचनांमधील अंतर्विरोध नाहीसा करून श्रुतिस्मृतिपुराणोक्त विधींची रचना लावण्यात आली. त्याआधारे समाजातील वेदनिष्ठा वृद्धिंगत केली गेली. ही परंपरा आठव्या शतकापर्यंत सुरू होती. वार्तिके, भाष्ये, अर्थशास्त्र, स्मृती, पुराणे यांच्या रचना झाल्या. चंद्रगुप्त, चाणक्य, विक्रमादित्य, शालिवाहन, हर्षवर्धन, पुलकेशी या यशस्वी राजांचा हा कालखंड! ग्रीक-हूण-शक यांची आक्रमणे परतावून लावून भारतात सुवर्णयुग रचले गेले!
आठवे शतक उजाडले. ज्यांचे मीमांसा सूत्रांवरील मत ‘भाट्टमत’ म्हणून सर्वत्र स्वीकारले जात होते, अशा कुमारिल भट्टांच्या कुळात त्यांच्या पुतण्याने ‘बौद्धमत’ म्हणजेच नास्तिक धर्म (वेद मान्यता नसणारा) स्वीकारला. त्याचे नाव धर्मकीर्ती. कुमारिल भट्ट रागावले. रागावलेल्या आपल्या चुलत्याला त्याने सांगितले, “निषेध्य बोधाद्धी निषेध्य बाध’ असेच म्हणतात ना मीमांसेत? मग खंडन करण्याआधी त्या मताचे पूर्ण ज्ञान मिळवा.”
वयाच्या चौथ्या दशेत कुमारिल ज्ञान मिळवण्यासाठी सिद्ध झाले. त्यांनी नालंदा ज्ञानपीठातील मुख्य आचार्य धर्मपाल यांचे शिष्यत्व पत्करले. अटीनुसार ते बौद्ध झाले. तेथे अभ्यासाच्या बरोबरीने चालणारी वेदनिंदा ऐकून त्यांचे मन विदीर्ण होत असे.
कोणता पंथ श्रेष्ठ, हे त्या काळात शास्त्रार्थ करून ठरत असे. शिक्षण पूर्ण झाल्यावर विशाल सभेचे आयोजन करण्यात आले. ठरल्याप्रमाणे वाद झाला. कुमारिलांच्या प्रतिभेमुळे त्यांचा विजय झाला. बौद्ध आचार्य धर्मपाल पराभूत झाले. मात्र धर्मपाल यांची मती बुद्ध, धम्म आणि संघापासून ढळली नाही. त्यांनी परमत न स्वीकारता प्राणत्याग केला.
नंतर कुमारिलांनी अनेक ठिकाणी शास्त्रार्थ केले व विजय मिळवले. मात्र आपल्या बौद्ध गुरूंना आपल्यामुळे जीवनाश करावा लागला आणि काही काळ आपण ईश्वराला व वेदांना नाकारले, या दोन दोषांचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी तुषानलात प्रवेश करण्याचे ठरवले. सर्व बाजूंनी तांदळाच्या कोंड्याचा ढीग करून त्यात वृद्ध कुमारिल भट्ट यांनी प्रवेश केला. अग्नी पेटवण्यात आला.
त्याच वेळी एक तेजस्वी यती तेथे आला. तो आचार्यांना म्हणाला, “हे पंडिताग्रणी, अद्वैत सिद्धान्ताच्या प्रचारासाठी मी प्रस्थानत्रयीवर भाष्ये लिहिली आहेत. आपण अद्वैत मत स्वीकारून या भाष्यांचे वार्तिक लिहावे, ही विनंती करण्यासाठी मी येथे आलो आहे. माझ्या कमंडलूतील जलाचे सिंचन करून हा अग्नी क्षणात शांत करतो.” (प्रस्थानत्रयी म्हणजे ब्रह्मसूत्रे, गीता, उपनिषदे आणि वार्तिक म्हणजे खंडनमंडनात्मक स्पष्टीकरण.)
त्यावर कुमारिल शांतपणे म्हणाले, “हे यतिराज, हा तुषानलप्रवेश वेदोक्तव्रताचा परिपाक आहे. मला गुरुहत्येचे आणि पथभ्रष्टतेचे प्रायश्चित्त घेऊ द्या. आपण माझा शिष्य मंडनमिश्र याचेकडे जावे. तो माझ्यापेक्षा कशातच उणा नाही. आपण माझ्यासाठी तारक ब्रह्माचे नामोच्चार करावे. आता अग्नी वाढत आहे.” एक आदर्श सनातनी महापुरुष सत्यपालनासाठी आत्मसमर्पण करत होता. अखेरीस अग्नी आतून पेटत गेला व गंभीरपणे तारकब्रह्म नामोच्चार ऐकत कुमारिलांचा जीव शरीर सोडून गेला! आणि तो तरुण यती - आचार्य शंकर - मंडनमिश्र यांच्याकडे जाण्यासाठी निघाला.. प्रस्थानत्रयीवरील भाष्ये घेऊन.

Adi Shankaracharya_1 

आचार्य शंकर आपल्या शिष्यांसह यतिराज मंडनमिश्र यांच्या माहिष्मती नगरीकडे निघाले. आद्य शंकराचार्यांची चरित्रे लिहिणाऱ्यांनी फार सुंदर प्रतीकांचा वापर करून मंडनमिश्र यांचा महिमा सांगितला आहे.
आचार्य एका पाणवठ्यावर विचारतात, “मंडनमिश्र कुठे राहतात?” त्यावर पाणी भरणारे पाणके सांगतात, “वेद स्वप्रमाणित आहेत की नाहीत? कर्माचे फळ कर्मसिद्धान्त देतो की ईश्वर? जग नित्य की अनित्य?’ असे पोपट आणि मैना यांचे संभाषण ज्या घरात सुरू असेल, ते घर यतिवर मंडनमिश्रांचे समजावे!!”
त्यांची आणि आचार्यांची भेट, संभाषण हे सारेच चरित्रकारांनी कौशल्याने रंगवले आहे. परंतु ‘दर्शन’ हा आपला विषय असल्याने आपण या स्थानी त्यास सामावून घेऊ शकणार नाही. पण ते सर्व हृदयाला आल्हाद देणारे व रंजक आहे!
क्रमशः