शेअर मार्केटचं गणित तर भल्याभल्यांना सुटत नाही आणि या आजी मार्केटचं सुटसुटीत विश्लेषण करून एकाच वेळी तीन पिढ्यांना ज्ञानगंगा पाजतायत. अर्थात त्यामागे त्यांची अभ्यासरूपी तपश्चर्या आहे. गेल्या दोन-तीन दशकांत भाग्यश्री फाटकांचा प्रवास गृहिणी ते शेअर मार्केट विश्लेषक असा झाला असला, तरी त्या आपलं गृहिणीपणही कौतुकाने मिरवतात.
लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक सेवेतील लोक सोडून बहुतेक सर्वांनाच घरी बसावं लागलं होतं. त्या वेळी अर्थार्जनाच्या दृष्टीने अनेकांनी शेअर बाजाराकडे मोर्चा वळवला. त्यापूर्वी इच्छा असूनही केवळ वेळेच्या अभावी शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करणार्या अनेकांनी येथील व्यवहार कशा प्रकारे चालतो यात जाणीवपूर्वक लक्ष घालायला सुरुवात केली. हा ट्रेंड लक्षात घेऊन या काळात शेअर बाजारातील गुंतवणुकीचे ऑनलाइन प्रशिक्षण देणार्यांचं, त्याविषयीचे वेबिनार, वर्कशॉप्स घेणार्यांचं सोशल मीडियावर पेवच फुटलं. कॉर्पोरेट वातावरणाचा अनुभव देणार्या या चकचकीत कार्यक्रमांची भुरळ कोणाला न पडती तरच नवल! मात्र या लखलखाटातही भाग्यश्री फाटक यांच्या रूपाने सौम्य पण खरा प्रकाश देणारी पणती लक्ष वेधून घेत होती.
शेअर बाजाराविषयी कुतूहल असणार्या, आवड असणार्या नेटकर्यांमध्ये त्या चांगल्याच लोकप्रिय आहेत. कुणी त्यांना फाटक मावशी म्हणतं, कुणी आजी म्हणतं, तर कुणी आई म्हणूनही संबोधतात. अतिशय सोप्या मराठीतून त्या हे शेअर बाजाराविषयीचं ज्ञान देतात. साठी ओलांडलेल्या आजींना ना नवीन तंत्रज्ञानाचं वावडं आहे, ना त्याविषयी न्यूनगंड आहे. त्यांच्या ब्लॉगना आणि घरच्या घरी मोबाइलवर तयार केलेल्या शेअर मार्केटविषयीच्या त्यांच्या व्हिडिओंना मिळणारा प्रतिसाद पाहून अचंबित व्हायला होतं! शेअर मार्केटचं गणित तर भल्याभल्यांना सुटत नाही आणि या आजी मार्केटचं सुटसुटीत विश्लेषण करून एकाच वेळी तीन पिढ्यांना ज्ञानगंगा पाजतायत. अर्थात त्यामागे त्यांची अभ्यासरूपी तपश्चर्या आहे. गेल्या दोन-तीन दशकांत भाग्यश्री फाटकांचा प्रवास गृहिणी ते शेअर मार्केट विश्लेषक असा झाला असला, तरी त्या आपलं गृहिणीपणही कौतुकाने मिरवतात.
मिरजेत बालपण गेलेल्या भाग्यश्रीताईंनी तेथील चिंतामण कॉलेज ऑफ कॉमर्समधून बी.कॉम.केलं. कॉलेजमध्ये अभ्यासाबरोबरच वक्तृत्वातही त्या आघाडीवर होत्या. बी.कॉम. फायनलच्या निकालानंतर लगेचच त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यावर त्यांनी ठाणे कॉलेजमधून एलएल.बी. केलं. नंतर 7-8 महिने नोकरी केली. मात्र मुलाच्या वेळी गरोदरपणात ती सोडली. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पुढे 17-18 वर्षं त्या घरीच होत्या. त्यांचे सासरे गाण्याचे क्लासेस घेत असत. त्यांच्या जोडीने त्याही गाणं शिकवू लागल्या. गृहिणी म्हणून घरादारात, मुलांमध्ये मन गुंतलेलं असलं, तरी त्याच्या जोडीला अधूनमधून त्या छोटे छोटे व्यवसाय करत असत. कधी हापूस आंबे विकत, कधी चॉकलेट बनवून विकत. (आजही त्या संक्रातीचे दागिने बनवणं, वाडी बनवणं, चॉकलेट तयार करणं या गोष्टी हौसेने करतात.) काही काळ (मुलगा लहान असताना) त्यांनी एल.आय.सी. एजंट म्हणूनही काम केलं. जसजशी मुलं मोठी होऊ लागली, तसतशी त्यांना एक पोकळी जाणवू लागली. मुलांचं स्वतंत्र विश्व होतं. तेव्हा आता स्वत:साठी काही तरी करायला हवं असं वाटू लागलं. वयाच्या 37-38व्या वर्षी त्यांनी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला, पण अनुभव नसल्याने फक्त 2000 रुपये पगाराची ऑफर आली. त्यांना स्वत:च्या बुद्धीला साजेसं असं जे काम हवं होतं ते अखेर त्यांना मिळालं घरातल्या कपाटात... जवळजवळ विस्मृतीत गेलेल्या कागदपत्रांमध्ये. त्यांचे यजमान 90-92 सालादरम्यान शेअरमध्ये गुंतवणूक करायचे. त्यातही फक्त आयपीओमध्ये करायचे. त्यातील काही शेअर्सची कागदपत्रं फाटकआजींना सापडली. यजमानांना तर त्यात लक्ष द्यायला वेळ नव्हता. आपल्याला तरी याचा काही उपयोग करून घेता येतोय का, याचा शोध घ्यायला त्यांनी सुरुवात केली.
‘या शेअर्सना काही किंमत आहे का? त्यातून काही पैसे उभारता येतील का?’ असा विचार करून त्यांनी शेअर मार्केटचा अभ्यास सुरू केला. मग लक्षात आलं की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी भांडवल हवं. यातील काही शेअर्स विकले जातील का? कशाला भाव आहे? कशाला नाही? हे सर्व त्यांनी लिहून काढलं. काही शेअर्स विकले. यजमानांनी एचडीएफसीचा आयपीओ 60 रुपये भावाने खरेदी केला होता. त्याचा भाव तेव्हा 360 रुपयांपर्यंत गेला होता. तिथे त्यांना थोडीशी दिशा मिळाली. आपण शेअर मार्केटचा अभ्यास केला, तर बुद्धीला वाव मिळेल, शिवाय कुणाची बॉसगिरी नाही. आपण घर सांभाळून हे करू शकतो, असा विचारही त्यामागे होता. त्या वेळी शेअर मार्केट शिकवणारं कोणी नव्हतं, त्याचे क्लास नव्हते. त्यामुळे स्वयंअध्ययन आणि बारीक निरीक्षण याच्या आधारे त्याच स्वत:च्या गुरू झाल्या.
त्या काळी ओएनजीसी, आयबीपी, महाराष्ट्र बँक आदी सात कंपन्यांचे आयपीओ एकदम आले होते. त्यांनी यजमानांना सांगितलंं की या सात आयपीओंपासून आपण सुरुवात करू या. शेअर मार्केट व्यवहारासाठी डीमॅट अकाउंट काढण्यापासून सुरुवात करावी लागणार होती. त्या वेळी ठाणे स्टेशनजवळ एका ब्रोकरचं कार्यालय असल्याचं कळलं आणि भाग्यश्रीताई त्यांना भेटायला गेल्या. योगायोगाने ते ब्रोकर त्यांचे मित्र आणि एलआयसीमधील सहकारी मधुसूदन कुलकर्णी होते. त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्येच भाग्यश्रीताईंना बसायला जागा दिली. तिथे बसून त्यांना शेअर बाजाराचे व्यवहार कसे चालतात, त्यातील परिभाषा यांचा अभ्यास करायचा होता. ब्रोकरचंच ऑफिस ते, तिकडे सगळेच पुरुष होते. त्यामुळे त्याबद्दल संकोच न बाळगता, त्यांच्यात वावरायला शिकावं लागणार होतं.
त्या सांगतात, ‘‘सुरुवातीला लोक मस्करीही करायचे. डाळ-भाताचा कुकर लावण्याइतकं सोपं नाही म्हणायचे. पण माझा अभ्यास सुरू असायचा. ब्रोकरकडे 25-30 माणसं असायची. माझ्या दृष्टीने ती 25-30 माणसं नसून 25-30 डोकी असायची. ती शेअर मार्केटचा वेगवेगळ्या प्रकारे विचार करायची. ते व्यवहार करत असताना मी त्यांचं निरीक्षण करत असे. त्यातून मला बोल्ट काय असतं? खरेदी-विक्री कशी करायची? हे कळू लागलं. नंतर नंतर मी जाता जाता काहींना सांगायला लागले की ‘तुम्ही हा शेअर का घेतला? या कंपनीची वाईट बातमी होती.’ मी सर्व आर्थिक घडामोडींचा अभ्यास करत असल्याने माझे अंदाज अचूक असायचे. हे त्या लोकांनाही हळूहळू कळू लागलं. मग त्यांच्या सांगण्यावरून मी त्यांना मार्केटविषयी शिकवायला लागले. त्यातून आमच्यात चांगलं मैत्र निर्माण झालं. त्यांना माझ्याविषयी आदर वाटू लागला. 1995मध्ये श्वासोच्छवासात अडचण निर्माण होऊन मी आजारी पडले. त्या वेळी या ऑफिसमधील लोकांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे माझी काळजी घेतली. त्या व्याधीचा त्रास आजही काही प्रमाणात होतो.’’
ब्रोकरच्या ऑफिसपासून भाग्यश्रीताईंनी शेअर मार्केटला सुरुवात केली. तेजी-मंदीच्या अनेक टप्प्यांमधून त्या गेल्या. अनेकांना त्या फोनवरून शेअर बाजाराविषयी मार्गदर्शन करू लागल्या. लोकांची मागणी लक्षात घेऊन दोन-अडीच वर्षांपासून त्यांनी क्रॅश कोर्स घ्यायला सुरुवात केली. 2012पासून त्या ब्लॉगद्वारे शेअर बाजाराविषयी मार्गदर्शन करत आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. यात घरच्यांचा पाठिंबा मोठा होता. पहिलं आव्हान होतं ते नवं तंत्रज्ञान अवगत करण्याचं. परदेशात असलेल्या त्यांच्या मुलाने आई-वडील दोघांनाही स्काइपवरून तंत्रज्ञानाची माहिती करून दिली. भाग्यश्रीताईंनी हाताने लिहिलेले लेख त्यांचेपती कॉम्प्युटरवर टाइप करून देत, मुलगा ते ब्लॉगवर अपलोड करत असे. www.marketaanime.com लिा ही त्यांची वेबसाइट आहे. दरम्यान या विषयावरची ‘मार्केट आणि मी’ व ‘फ्युचर ऑप्शन्स आणि मी’ ही दोन पुस्तकंही त्यांनी लिहिली. हा पुस्तकनिर्मितीचा प्रवासही त्यांना अनुभवसमृद्ध करून गेला. पुस्तकं त्यांनी हाती लिहिली होती. एका प्रसिद्ध प्रकाशकांकडे त्यांनी ही हस्तलिखितं छापण्यासाठी दिली होती. त्यांनी या विषयाला मार्केट नाही असं सांगून पुस्तकाचं काम रखडवून ठेवलं. अर्थात इच्छा असेल तर नवीन मार्गही सुचतात आणि फाटक कुटुंबीयांनाही पुस्तक प्रकाशनाचा एक वेगळा मार्ग मिळाला. यजमानांनी ती टाइप केली. मुलाने त्याची अक्षरजुळणी, एडिटिंग, हेडर-फूटर केलं, तर त्याचे एक मित्र नंदलाल पाटील यांनी मुखपृष्ठ तयार केलं. त्यांच्याकडे गाणं शिकायला येणार्या एका विद्यार्थिनीने मुद्रितशोधन करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर दोन्ही पुस्तकं प्रकाशित झाली आणि त्यांना उत्तम प्रतिसादही मिळाला. आता तर परदेशातूनही या पुस्तकांना मागणी येत आहे.
जेवणाचं ताट आणि शेअर बाजार
शेअर बाजार हा जेवणाच्या ताटाप्रमाणे असतो. ताटातील पोळी, भाजी, भात, आमटी हे पोट भरण्यासाठी असतात. त्याप्रमाणे काही शेअर हे आयुष्यभर तुमच्याकडे ठेवले, तर तुम्हाला चांगले पैसे मिळवून देतात. काही शेअर चटणीसारखे असतात, काही पापडासारखे असतात. आपण भाजीसारखी चटणी खात नाही किंवा चटणीसारखी भाजी खात नाही. कशाशी काय खायचं याचंही समीकरण ठरलेलं असतं. तसाच विचार शेअर घेतानाही केला पाहिजे. काही कोशिंबिरीसारखे झट के पट असतात. काही शेअर पाणीपुरीसारखे तेवढ्यापुरते तोंडाची चटक भागवतात,पण नंतर त्यांचा काही उपयोग नसतो. तर काही सीझनल असतात. शरीराच्या आरोग्याचा विचार करतो, तसा शेअरच्या आरोग्याचाही विचार केला पाहिजे. त्यांचं आरोग्य चांगलं असेल, तरच आपली गुंतवणूक वाढत राहील.
- भाग्यश्री फाटक
तसंच नागपूर तरुण भारतमध्ये आणि अन्य काही नियतकालिकांमध्ये त्यांचं या विषयावर लेखन सुरू असतं. लॉकडाउनच्या काळात 16 जूनपासून त्यांनी यूट्यूबवरून व्हिडिओही प्रसिद्ध करायला सुरुवात केली. यात त्यांना कॉलेजच्या दिवसापासून असलेली वक्तृत्वाची आवड आणि भाषेवरचं प्रभुत्व उपयोगी पडलं. त्यापूर्वी एका ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून पहिला क्रमांक मिळाला होता. त्यांचा हा आत्मविश्वास पाहून त्यांना मुलगा म्हणाला, ‘‘आई, तुला आता व्हिडिओ तयार करता येतोय. आपण यूट्यूबवरून दररोज तुझे व्हिडिओ टाकू या.’’ हे नवं आव्हान त्यांनी स्वीकारलं. पहिला व्हिडिओ तयार केला आणि मग घरातल्यांनी, विद्यार्थ्यांनी अधिक चांगला व्हिडिओ करण्यासाठी सूचना केल्या. त्यात सुधारणा करत व्हिडिओ तयार केला आणि 16 जूनपासून रोज व्हिडिओ द्यायला सुरुवात केली. ते व्हिडिओ लोकांना आवडून त्यांच्याकडूनही चांगला प्रतिसाद येऊ लागला. आज 38 हजारांवर त्यांचे सबस्क्राइबर्स आहेत.
शेअर मार्केटविषयी मार्गदर्शन करणं ही भाग्यश्रीताई देवपूजा मानतात. ते करताना त्यांना अनेक वेगळे अनुभव येतात. त्या सांगतात, ‘‘मी कोणाला लाखो रुपये उचलून देऊ शकत नाही. पण मी दिलेल्या ज्ञानाच्या मदतीने एखाद्याला लाखो रुपये कमावता येत असतील, तर ते मी दिल्यासारखे नाहीत का? अनेक पिढ्या त्यातून तयार होतील. मराठी माणूस शेअर मार्केटमध्ये कमी दिसतो. त्याची मार्केटची भीती दूर करणं हा माझा उद्देश आहे. मी अगदी भाजीवालीलाही कळेल अशा भाषेत शेअर बाजाराचे व्यवहार शिकवू शकते. माझा अमरावतीचा एक विद्यार्थी शेतकरी होता. शेळ्या-मेंढ्या पाळण्यापेक्षा शेतात बसून मोबाइलवरून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची, असं त्याने ठरवलं. त्या वेळी रात्री फोन केला की दर कमी लागत असत, त्यामुळे तो रात्री 10 वाजल्यानंतर मला फोन करायचा आणि शेअर मार्केटमधील अडचणी विचारायचा. त्यातून त्याने नफा मिळवल्यावर त्याने मला विचारले की ‘तुम्हाला काय देऊ?’ मी म्हटलं ‘काही देऊ नकोस. फक्त देवासमोर माझ्या नावाने सव्वा रुपया ठेव आणि या विषयातील लोकांचे गैरसमज दूर कर.’ एखादा शेतकरीही जोडधंदा म्हणून शेअर मार्केटचा विचार करू शकतो, हे त्या वेळी माझ्या लक्षात आलं.’’
भाग्यश्रीताईंच्या अर्थज्ञानाला एक तात्त्विक बैठक आहे. शेअर बाजाराला खेळ, जुगार म्हणून संबोधणार्यांना त्या स्पष्टपणे सांगतात, ‘‘मी लक्ष्मीशी कधीच खेळणार नाही. हे लक्ष्मीचं मंदिर आहे. इथे मार्केट उघडताना आणि बंद होताना घंटा वाजते.’’
भाग्यश्रीताई कोणालाही अमुक शेअर्स घ्या किंवा अमुक शेअर्स विका हे सांगत नाहीत. गुंतवणूक करणार्याने त्यासाठी स्वत: कष्ट केले पाहिजेत, बाजाराचा अभ्यास केला पाहिजे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या तत्कालीन स्थितीविषयी वाचन केलं पाहिजे आणि त्यावरून अनुमान लावून व्यवहार केले पाहिजेत, असं त्यांचं ठाम मत आहे. अभ्यासाशिवाय शेअर मार्केटमध्ये तरणोपाय नाही, हा त्यांचा विश्वास आणि अनुभवही आहे. अभ्यासामुळेच मंदीतही आपल्याला तोटा सहन करावा लागला नसल्याचं त्या सांगतात. मात्र अभ्यास न करता शेअर बाजाराचे व्यवहार करणार्यांचंच प्रमाण अधिक असल्याचं त्यांच्या लक्षात आले. त्या म्हणतात, ‘‘शेअर बाजार म्हणजे सट्टा नाही. ती एक गुंतवणूक आहे. शेअर म्हणजे काय, तर भांडवलाचा छोटासा हिस्सा आहे. शेअर होल्डर हा कंपनीचा मालक असतो. त्यामुळे कंपनीचे नुकसान झाले तर त्याला काही मिळत नाही. पण कंपनीचा भाव वाढला तर शेअर्सचा भाव वाढतो, शेअर होल्डरची भांडवली गुंतवणूकही वाढते आणि डिव्हिडंडही मिळतो. लोकांची अशी समजूत असते की कोणीतरी त्यांना सांगायचं की ‘अमुक अमुक शेअर घ्या.’ Share Market is not so easy.. शेअर बाजारात इन्कम टॅक्स आहे, सेल्स टॅक्स आहे, कस्टम ड्यूटी आहे, राजकारण आहे, अर्थशास्त्र आहे, करन्सी आहे, जागतिक स्तरावरचं सगळं ज्ञान आहे. त्यामुळे लोकांना अमुक एखाद्या घटनेने अमुक एखादे शेअर्स वाढतील किंवा घटतील हे लॉजिक वापरता आलं पाहिजे. अनेकांना कंपनीची निवड करता येत नाही. कंपनीच्या गुणवत्तेचा विचार ते करत नाहीत. नोकरीत 8-9 तास घालवल्यानंतर पगार मिळतो. तेवढाच वेळ शेअर मार्केटमध्ये घालवला, तर त्यातून तुम्हाला चांगले पैसे मिळतील. शेअर बाजारात दिव्यांग, अंध, मुके-बहिरे कोणीही पैसे कमावतो. हे केवळ बौद्धिक काम आहे. यात शारीरिक मेहनत नाही. आणि आता तर सगळे व्यवहार ऑनलाइन असतात.’’
शेअर बाजाराविषयी माहिती देताना भाग्यश्रीताई भाजी खरेदी, चूल पेटवणं किंवा जेवणाचं ताट यांसारखी रोजच्या जगण्यातील उदाहरणं देतात. त्यामुळे प्रेक्षक, वाचक ती अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात. मराठीबरोबरच हिंदी, इंग्लिश, गुजराती, कानडी या भाषाही त्यांना उत्तम प्रकारे येतात. त्यामुळे त्या आता हिंदीतूनही व्हिडिओ करू लागल्या आहेत. त्याशिवाय नव्याने शेअर बाजार शिकू इच्छिणार्यांसाठी ‘मार्केटचा श्रीगणेशा’ अशी मालिका त्यांनी यूट्यूबवर सुरू केली आहे. या व्हिडिओंनाही खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
फाटकआजींमुळे अनेकांना शेअर बाजाराची नव्याने ओळख होत आहे. शेअर बाजारातील छोट्या छोट्या संकल्पना उलगडू लागल्या आहेत. या क्षेत्रापासून महिला वर्ग एरव्ही दूर राहताना दिसतो. परंतु आजींमुळे त्यांनाही प्रेरणा मिळत आहे.
‘‘आजी, तुम्ही किती सोप्या पद्धतीने समजावता’’, ‘‘तुमच्यामुळे शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा आत्मविश्वास मिळतो.’’, ‘‘आजी, तुम्ही आमच्या शेअर मार्केटच्या गुरू आहात.’’ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांच्या व्हिडिओंना, लेखांना असतात. लोक त्यांना शेअर बाजाराविषयीच्या आपल्या शंका विचारतात आणि भाग्यश्रीताई त्यांना योग्य मार्गदर्शन करतात. त्यातून कोणाला नफा कमावता आला तर भाग्यश्रीताईंनाही त्यांच्याइतकाच आनंद मिळतो. आपले विद्यार्थी, वाचक, प्रेक्षक या सगळ्यांशीच भाग्यश्रीताईंचे खूप चांगले बंध जुळले आहेत आणि हीच त्यांच्या दृष्टीने मोठी कमाई आहे.