'सेवा संगम' - दर्शन सेवा कार्यांचे!

स्रोत: विवेक मराठी    दिनांक01-Feb-2020   
|


seva_1  H x W:

रा.स्व. संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत, सेवा विभागाच्या सहयोगी संस्था - 'जनकल्याण समिती', 'सेवावर्धिनी', 'सेवा सहयोग', 'समर्थ भारत' आणि 'स्पार्क' यांच्याद्वारा आयोजित 'सेवा संगम' हे पश्चिम महाराष्ट्रात चालू असलेल्या सेवा कार्याचे दर्शन घडविणारे प्रदर्शन नुकतेच पुण्यामध्ये 18 आणि 19 जानेवारी रोजी पार पडले. 'दर्शन सेवा कार्यांचं' ह्या टॅगलाइनपासूनच ह्या कार्यक्रमामागची भावनिक आणि तात्त्वि भूमिका लक्षात येत होती. पुण्याचे मा. महापौर मुरलीधर मोहोळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. सह सरकार्यवाह मनमोहनजी वैद्य, पुणे महानगरपालिकेचे स्वच्छता सेवादूत महादेवजी जाधव आणि विश्वसुंदरी प्रसिध्द अभिनेत्री युक्ता मुखी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्धाटन करण्यात आले. मा. मनमोहनजी वैद्य यांनी कार्यक्रमामागची भूमिका उद्धाटनासमयी स्पष्ट केली. शिक्षण, आरोग्य, ग्राामविकास, महिला सक्षमीकरण, रोजगार, स्वावलंबन, संस्कार, दिव्यांग व्यक्ती, पर्यावरण, सामाजिक सुरक्षा अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या एकूण 125 संस्था ह्या प्रदर्शनामध्ये सहभागी झाल्या होत्या. त्याद्वारे चालू असलेले काम आणि विविध प्रकल्प ह्यांची माहिती मिळाली. त्याचबरोबर सेवित व्यक्तींनी केलेल्या वस्तू, हस्तकला, पदार्थ ह्यांची विक्रीही झाली. प्रदर्शनाच्या अंतर्गतच चालू असलेल्या 'सेवा कट्टया'वर विविध विषयांवर चर्चा, गप्पा, प्रशिक्षणे आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा यांचे आयोजन केले गेले होते. पारंपरिक कलांचे सादरीकरण झाले. वारली, ब्लॉक पेंटिंग अशा हस्तकलांचे प्रात्यक्षिक दाखवून प्रेक्षकांना स्वत: अशा कलानिर्मितीचा आनंद घेता आला. बचत गटांच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे, कागदी पिशव्या करायला शिकणे, वारली चित्रकला, कुंभारकाम यासह विविध विषयांवरील कार्यशाळांनाही नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. या व्यतिरिक्त, 100 किलोपेक्षा अधिक रद्दी संकलन, त्यातून 5000+ कागदी पिशव्या निर्मिती अशा ह्या प्रदर्शनाच्या इतरही काही यशोगाथा सांगता येतील.


आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

एकूणच नियोजन आणि विषयसंपन्नता ह्या दुहेरी पातळीवर पुणेकरांनी दोन दिवस एक उत्कृष्ट कार्यक्रम अनुभवला. दोन दिवसांत हजारो लोकांनी भेटी देऊन सेवा कार्यात सहभागी होण्याविषयी आस्था दर्शविली आणि तशी तिथे नोंदणीही केली.

अशा एखाद्या कार्यक्रमाच्या यशाबद्दल बोलताना भेट दिलेल्या वा नोंदणी केलेल्या लोकांची संख्या, अशा संख्यात्मक निकषाबरोबरच भेटी दिलेल्यांच्या वृत्तीत झालेला भावनिक बदलही लक्षात घ्यायला पाहिजे. अनेक व्यक्तींनी भारावून ह्या कार्याबद्दल सद्भावना व्यक्त तर केल्याच, पण इतकी वर्षे अशा कोणत्याही समाजकार्यात सहभागी नसल्याची खंतही व्यक्त केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. सह सरकार्यवाह मनमोहनजी वैद्य यांनी उद्धाटनालाच म्हटल्याप्रमाणे, ''सेवा प्रकल्प जगभरात सुरू असतात, पण भारतातील सेवा प्रकल्पांना अध्यात्माचे अधिष्ठान असल्याने त्यांचे महत्त्व वेगळे आहे. आध्यात्मिक संस्कारांमुळे स्वत:तील 'मी'पणा कमी होऊन सामाजिक भावनेला मोठे स्थान मिळते. स्वामी विवेकानंद म्हणत, आता अन्य देवदेवतांना मनात स्थानच नको. आपले एकमेव दैवत म्हणजे आपले राष्ट्र. त्याचीच नित्य आराधना करा.''

ह्याच आध्यात्मिक अधिष्ठानावर रा.स्व. संघ सुमारे शतकभर उभा आहे. ह्याच सखोल विचारांच्या पायावर देशभरात संघाकडून साधारण दीड लाख सेवा कामांची उभारणी झाली आहे. एकात्मतेच्या आणि त्यागाच्या तत्त्वावर जगत असताना इथली माणसे, त्यांचे प्रश्न, त्यांच्यातील न्यूनत्व हे आपले होऊन जाते. अशा वेळेस सेवाभाव आपोआपच जागृत होतो आणि अशी कामे उभी राहतात. योग्य व्यक्ती, योग्य हात आवश्यक तिथे पोहोचून सुरू असलेली ही कामे समाजामध्ये उत्सुकता निर्माण करतात, तेव्हा ती समाजासमोर येणे आवश्यक ठरते.

seva_1  H x W:

समाजकार्य म्हटले की काही ठरावीक कार्येच सामान्य माणसांच्या डोळयासमोर येतात. मात्र हे प्रदर्शन बघितल्यानंतर समाजामध्ये कमतरता असलेल्या अनेक गोष्टी आणि ते न्यून भरून काढण्यासाठी प्रयत्न म्हणून विविध विषयांवर कार्यरत संस्थांची माहिती मिळाली. त्यावरून समाज सक्षमतेसाठी अजून बरीच मजल मारावी लागणार आहे, हे दिसून येतेय. वंचित मुलांना शाळेपर्यंत नेणे, स्वतंत्र अभ्यासिकांमधून त्यांचा अभ्यास घेणे, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न करणे, स्कूल किट्समार्फत शालेय साहित्य पुरविणे ह्यामध्ये अनेक संस्था कार्यरत आहेत. मुलांना आरोग्यचाचण्या आणि लसीकरणासारख्या आरोग्यसुविधा पुरविणे, वेश्या वस्तीतल्या स्त्रियांच्या मुलांसाठी पाळणाघरे, अभ्यासवर्ग, संस्कार शिबिरे आयोजित करणे ही एक प्रमुख आवश्यकता आहे. अपंग मुले निराधार बालके, घर सोडून आलेली मुले, एच.आय.व्ही.बाधित मुले यांचे भोजन, निवास, आरोग्य, पुनर्वसन, शिक्षण आणि स्वावलंबन असे यामागे अनेक उद्देश आहेत.

'सेवा सहयोग', 'स्व-रूपवर्धिनी', 'चैतन्य माउली विश्वस्त मंडळ' अशा संस्था वरील उद्देशांबरोबरच इतरही अनेक उद्देश ठेवून कार्यरत आहेत.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

महिला सक्षमीकरणामध्ये प्रामुख्याने परित्यक्ता वा अडचणीत असलेल्या महिलांना निवासासाठी आधार, समुपदेशन, वकिली सल्ला, विविध कौशल्य प्रशिक्षणे, बचत गट, जाणीवजागृती, अशा विविध पातळयांवर भारतीय स्त्री शक्ती जागरण, दृष्टी स्त्री अध्ययन आणि प्रबोधन केंद्र, स्नेहाधार, भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, चैतन्य महिला विकास यांसारख्या अनेक संस्था काम करत आहेत.

केवळ विशिष्ट विषय घेऊनच नाही, तर वंचित समाजाच्या समग्र विकासासाठी सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प, विवेकानंद केंद्र प्रशिक्षण व सेवा प्रकल्प असे प्रकल्प व्यवसाय प्रशिक्षण, आरोग्य, शिक्षण अशा सर्वच पातळयांवर प्रयत्न करत आहेत. विशेष मुलांसाठी काम करणारी 'अब' नॉर्मल होम, स्किझोफ्रेनिया जनजागृतीसाठी चालू असलेले प्रयत्न असे अनेक विषय आहेत.

कृषी व ग्रामविकासद्वारे खत प्रकल्प, माती परीक्षण, कृषी संशोधन व प्रशिक्षण, कचरा व्यवस्थापन, गोपालन, रोजगार निर्मिती कार्यक्रम आखले जात आहेत. मा. दत्तोपंत ठेंगडी स्थापित भारतीय किसान संघ शेतकऱ्यांना संघटित करून त्यांच्या उत्थानाचे कार्य करत आहे.

 
RSS_1  H x W: 0

पूर्णम इको-व्हिजनसारखी पर्यावरण क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी संस्था ई-कचरा विल्हेवाट, कपडे पुनःप्रक्रिया करून निर्मिती, इन्सिनरेटर मशीन्सद्वारे सॅनिटरी नॅपकिन विल्हेवाट, पर्यावरणपूरक सल्ला ह्या कार्यक्रमांद्वारे पर्यावरण संतुलन करण्याचे काम करत आहे.

खेळामध्ये कौशल्य विकासासाठी 'द ब्रिज'सारख्या संस्था अग्रागण्य आहेत. स्वावलंबनाच्या हेतूने व्यवसाय प्रशिक्षण देणारी स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान, वेल्हे येथे वसतिगृह आणि सर्वांगीण ग्राामविकासामध्ये कार्यरत 'तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास', वाचन आवड जपण्यासाठी कार्यरत 'अक्षर भारती', आजारी आणि वृध्दांसाठी निवारा म्हणून 'सावली केअर सेंटर', 'मातृसेवा निवासी सेवा केंद्र', 'संवेदना शुश्रुषा केंद्र', जनजाती समाजाच्या उत्कर्षासाठी 'वनवासी कल्याण आश्रम', अपंगांना कृत्रिम जयपूर हात व हात यासाठी मदत करणारी 'भारत विकास परिषद', आरोग्य सेवेसाठी 'सेवा भारती', 'सेवा आरोग्य फाउंडेशन', 'विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान', रक्तदानासाठी 'जनकल्याण रक्तपेढी', कुष्ठरोगी रुग्णांमध्ये त्यांच्या पुनर्वसनासाठी आणि उद्योजकता वाढीसाठी सर्वतोपरी मदत करणाऱ्या 'उद्योगधाम', 'दे आसरा फाउंडेशन', स्वावलंबनासाठी प्लंबिंग प्रशिक्षण देणारी 'ज्ञानदा' संस्था ही अजूनही काही कार्यक्षेत्रे आणि संस्थांची उदाहरणे आहेत.

ह्या सामाजिक संस्था अधिक सक्षमतेने कार्यरत राहण्यासाठीही 'सोशल वर्क प्रॅक्टिसेस ऍंड रिसर्च सेंटर (SPARC)', 'सेवावर्धिनी' ह्यासारख्या संस्था आणि 'समर्थ भारत'सारखा उपक्रम एक दुवा म्हणून कार्यरत आहेत. वरील अनेक संस्था एकापेक्षा अधिक आयामांवर कार्यरत आहेत. एका लेखामध्ये सर्वच संस्थांचा आणि त्यांच्या कामांचा निव्वळ धावता आराखडा मांडणेही शक्य नाही. मात्र समाजामध्ये आवश्यक असलेल्या गोष्टी आणि त्यासाठी पश्चिम महाराष्ट्र प्रांतात चालू कामे ह्यांची ही केवळ प्रातिनिधिक ओळख या लेखाच्या निमित्ताने घडविण्याचा हा एक प्रयत्न आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/  

लाखो वंचितांना ह्या सेवेचा फायदा होत आहे. परिस्थितीमध्ये अनेक सकारात्मक बदल होत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाच्या कथा उत्साहवर्धक आहेत. ह्या कामांमधून सक्षम महिला स्वत:च महिला सबलीकरणाचे काम करत आहेत. शेतीचे, आरोग्याचे, पर्यावरणाचे अनेक प्रश्न कसे हाताळायला हवेत, ह्यावर संशोधन चालू आहे. एकूणच सामाजिक, वैचारिक मंथनाच्या ह्या कार्यकृतींमुळे विकासाच्या दिशेने एक सकारात्मक वाटचाल होताना दिसत आहे. तरीही अशी कार्ये अधिकाधिक समाजव्यापी होण्यासाठी अजूनही स्वयंसेवकांची, आर्थिक मदतीची आवश्यकता आहे आणि म्हणूनच हे प्रदर्शन!

जेव्हा पाया काही सखोल विचारांवर आधारित असतो, तेव्हा उभारणी होत असते हेच सखोल विचार 'सेवा संगम' प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी रा.स्व. संघाचे अ.भा. कार्यकारिणी सदस्य मा. सुहासराव हिरेमठ ह्यांनी मांडले. हजारो लोकांनी भेट दिल्यामुळे आणि त्यांचा सेवाभाव जागृत झाल्यामुळे, सेवाभावाची जागृती करणारा हा कार्यक्रम यशस्वी झाला, असे ते म्हणाले. ''आपल्या देशात स्वामी विवेकानंद चरित्र वाचून सेवाभाव जागृत होतो, असे अनेक जण सांगतात. स्वामी विवेकानंद म्हणत की त्याग आणि सेवा हे भारताचे सर्वश्रेष्ठ आदर्श आहेत. ह्या वचनाची सर्वत्र प्रचिती येते. हे आदर्श शिकवावे लागत नाहीत, तर आपल्या रक्तात असतात.''

सुहासरावांनी आपल्या समारोपीय भाषणात एक आठवण सांगितली. आंध्र प्रदेशातील विध्वंसक वादळानंतर रा.स्व. संघामार्फत मदत आणि पुनर्वसनाचे काम सुरू होते. त्यासाठी काही कोटींची गरज होती. मंगळुरूमध्ये अनेक स्वयंसेवक घरोघरी जाऊन निधी संकलन करत होते. आवाहन करत होते. काही स्वयंसेवक ऑॅटो रिक्षामधून स्पीकरवर याविषयी आवाहन करत असताना एका भिकाऱ्याने त्याचा कटोरा समोर केला. त्याने त्याला मिळालेली सकाळपासूनची भीक मदतकार्यास दिली. हे केवळ इथेच घडू शकते. हे असे इथे रक्तातच असते.

''संघपरिवारात दीड लाख स्वयंसेवी संस्था आहेत. कर्तव्य, परमेश्वराची नि:स्वार्थी सेवा ह्या वृत्तीने कार्यरत आहेत. देशभरात इतरही सुमारे 25 लाख सेवा कार्ये चालू असतील. भ्रष्टाचारापेक्षा सेवा करणारे जास्त आहेत. सेवेची परंपरा हजारो वर्षांपासून आहे. मात्र संस्था बनून कामे करणे इंग्रजांनंतर सुरू झाले. पण पूर्वी संस्था नसताना कोणी अनाथ, दुर्लक्षित राहत नसे, त्यांना सामान्यांकडून आधार मिळतच असे.

वंचितांना सक्षम करणे हे सर्वांचे काम आहे. हिंदूंमध्ये सेवाविषयक सखोल चिंतन झाले आहे. श्रेष्ठ सेवा कोणती? ह्यावरही विचार आहे. ज्यांच्याकडे काही कमतरता आहे, त्यांची गरज भागवणे - उदा., तहानलेल्याला पाणी, गरजूला अन्न देणे, ही झाली तृतीय श्रेणीची सेवा. तर एखाद्याला स्वावलंबी, स्वाभिमानी बनविणे हे द्वितीय श्रेणीचे सेवाकार्य. पण आज आपण ज्याची सेवा करतो तो उद्या 'सेवा करणारा' बनेल अशी सेवा झाली, तर ती सेवा मात्र प्रथम श्रेणीची! विंदा करंदीकर जसे लिहून जातात - देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे... घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे... त्याप्रमाणे जो ह्या लाभांमधून उन्नत होईल, त्यानेही समाजाचे ॠण समजून काही भाग समाजाला द्यायला हवा. संघपरिवारात अशी अनेक उदाहरणे आहेत. स्व-रूपवर्धिनीच्या मदतीने शिकलेल्या चार मुलींनी पुढे जाऊन 3 वर्षे अरुणाचल प्रदेशात राहून वनवासी कल्याण आश्रमाचं पूर्ण वेळ काम केलं.''

सुहासराव हिरेमठ यांनी केलेले समारोपाचे भाषण हा कार्यक्रमाचा कळस होता, अधिकच प्रेरणादायक होता. लोकांचा सेवाभाव जागृत होणे हे ह्या प्रदर्शनाचे यश मानून त्यांनी एक 'त्रिसूत्री' लक्षात ठेवावी, असे सांगितले. 'सेवित सेवक बने', 'कर्मचारी कार्यकर्ता बने' आणि 'दान दाता समय दाता' बने. लोकांकडून तीन अपेक्षा व्यक्त करताना ते म्हणाले, ''सर्वांनी दर वर्षी योजना करून सेवा कार्य पाहावीत. दर वर्षी आपल्या मिळकतीतून, घरातील मंगल प्रसंगी काही रक्कम सेवा कार्यास द्यावी आणि कधीतरी स्वत:देखील कार्यकर्ता बनावे.''

सेवाभाव जागृत होऊन ह्या तीन सूत्रांवर आणि अपेक्षांप्रमाणे सेवा कार्यामध्ये कार्यकर्ते म्हणून सामील झालेले लोक आणि प्रतिसादाने उत्साही झालेले कार्यकर्ते हीच या प्रदर्शनाची उद्दिष्टपूर्ती! समारोपाच्या शेवटी 'दुरिताचे तिमिर जावो। विश्व स्वधर्म सूर्यें पाहो। जो जे वांच्छिल तो तें लाहो। प्राणिजात॥' असे म्हणत पसायदानात मागितल्यानुसार प्रत्यक्ष घडताना दिसणे, हीच अशा उपक्रमांची अंतिम फलश्रुती म्हणावी लागेल.

- विभावरी बिडवे

9822671110