प्रदूषणापासून त्वचा सांभाळा

विवेक मराठी    10-Feb-2020
Total Views |

 हवा प्रदूषित झाल्यावर तुम्ही-आम्ही लक्ष देतो ते श्वसनाच्या आजारांवर. त्याच वेळी वातावरण आपल्या त्वचेचीही वाट लागते... 

 
तुमची आमची त्वचा हे आपल्या शरीरातलं सर्वात मोठं इंद्रिय आहे. आपल्याला यकृत, हृदय, मूत्रपिंड, मेंदू अशा शरीरातल्या इंद्रियांची यादी सहज देता येईल. त्या इंद्रियांची आपण नीट काळजी घेऊ. यातलं कुठलंही इंद्रिय बिघडलं किंवा काम करेनासं झालं तर प्रचंड तणावाखाली येऊ. पण त्वचा हे सर्वात मोठं इंद्रिय असूनही त्याकडे तितकं लक्ष देत नाही. हे चुकीचं आहे. एखाद्याला भाजलं की मगच आपल्याला त्वचेचं महत्त्व कळतं, हे दुर्दैवी आहे. आजच्या काळात जेव्हा हवामानात बदल होताहेत आणि वायुप्रदूषण मोठया प्रमाणात वाढतं आहे, तेव्हा तरी आपण जागं व्हायला हवं आणि त्वचेला एरव्ही जे महत्त्व द्यायला हवं, ते दिलं पाहिजे.

naik_1  H x W:

अर्थात यासाठी आधी एक इंद्रिय म्हणून त्वचेचं काम नेमकं काय असतं ते समजून घेतलं पाहिजे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

त्वचा संपूर्ण शरीराला आवरण प्रदान करते. आतली महत्त्वाची सगळी इंद्रियं झाकून ठेवते. पण शरीर झाकून ठेवणं इतका मर्यादित विचार त्यामागे नाही. तुम्ही-आम्ही उष्ण रक्ताचे प्राणी. म्हणजे बाहेरचं तापमान कितीही असेना, आपल्या शरीरातलं आतलं तापमान एका विशिष्ट पातळीवरच असतं. उष्णतेच्या या देवाण-घेवाणीमागे त्वचा खूप महत्त्वाची भूमिका निभावते. त्वचेच्या खाली असलेली चरबीची पुटं एखाद्या अंगभूत स्वेटरसारखं काम करतात. थंडीत त्वचेखालच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि उन्हाळयात प्रसरण पावतात. त्यामुळे त्वचेतून वातावरणात फेकल्या जाणाऱ्या उष्णतेवर नियंत्रण राखलं जातं. वयोमानानुसार त्वचा कोरडी होते आणि त्वचे खालची चरबी कमी होते. याचा परिणाम म्हणून थंडीत शीतलहरींचे आणि उन्हाळयात उष्माघाताचे सर्वाधिक बळी वयस्कर माणसं असतात. आता वातावरणात बदल होताहेत. आपली पृथ्वी तापते आहे. इतकी उष्णता बाहेर फेकण्यासाठी त्वचा सक्षम आहे का, याचा विचार व्हायला हवा.

त्वचेच्या पेशी जे आवरण बनवतात, तेदेखील वैशिष्टयपूर्ण असतं. आतून बाहेरच्या बाजूला पेशी वाढत जातात. त्या वाढत असताना एकमेकांच्या मदतीने त्वचेवर अनेक पेशींचा मिळून एक सुरेख थर बनवत असतात. हा थर पाणी बाहेरून आत आणि आतून बाहेर जायला मज्जाव करतो. झोपडीवर एकावर एक रचून माडाची झावळं छप्पर म्हणून ठेवावीत आणि धुंवाधार पावसात पाण्याचा एक थेंब झोपडीत येऊ नये, तशातला हा प्रकार. असं नसतं तर रोज आंघोळ करताना आपण सुजलो असतो आणि उन्हाळयात पूर्ण कोरडे होऊन गेलो असतो. त्वचा यामधला अडसर बनून उभी राहते.

अर्थात या कामात त्वचेच्या वर असलेला तेलाचा अल्पसा थर पाणी बाहेरचं बाहेर ठेवण्यासाठी मदत करतो. पाण्याशी फार काळ संपर्क आला, तर मात्र त्वचेची ही यंत्रणा परिणामकारक ठरत नाही. सतत पाण्यात काम करणाऱ्या, धुणी-भांडी करणाऱ्या स्त्रियांच्या हातांकडे पाहिलं की याची कल्पना येते. त्यांच्या त्वचेवर असलेला तेलाचा तवंग साबणाच्या फेसाने धुऊन जातो. पावसाळयात शेतात राबणाऱ्या माणसांना चिखली होते, ती ही मंडळी कित्येक तास पाण्यात पाय रोवून असतात म्हणून. या वर्षी दुर्दैवाने खूप पाऊस पडला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूर आला. पाण्यात भिजल्याने त्वचा खराब होणं साहजिकच होतं.

 
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

सूर्यकिरणात असलेले अतिनील किरण त्वचेला बरीच इजा करू शकतात. त्वचा काळी पडते. ज्याला आपण टॅनिंग म्हणतो ते होतं. जेव्हा आपण पोहायला जातो, तेव्हा तलावातल्या पाण्याच्या प्रत्येक कणापासून सूर्यकिरण परावर्तित होतात. इतके किरण एकावेळी अंगावर आले की जणू हजारो सूर्य एकदम तळपल्यासारखं होतं. पोहून आल्यावर त्वचेवर जो काळिमा येतो, तो त्यामुळेच. अर्थात त्यासाठी प्रत्यक्ष तलावात उतरायला पाहिजेच असंही नाही. तुम्ही नुसते तलावाच्या बाहेर बसून राहिलात किंवा समुद्रकिनारी फेरफटका मारलात तरी असं होऊ शकतं. पाण्यावरून परावर्तन झालेली किरणं त्वचेवर तोच परिणाम करू शकतात.

 

सूर्यप्रकाशातल्या या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेचा कॅन्सर होतो हे सिध्द झालं आहे. जोपर्यंत वातावरणात ओझोन थर आहे आणि आसपास भरपूर झाडं आहेत, तोपर्यंत अतिनील किरणं पृथ्वीपर्यंत तितक्या तीव्रतेनं पोहोचू शकत नाहीत. दुर्दैवाने हळूहळू हा ओझोनचा थर नष्ट होतोय. जंगलं नाहीशी होताहेत. साहजिकच त्वचेचा कॅन्सर वाढण्याची भीती सतावते आहे. आपण मुळात गव्हाळ अथवा काळया रंगाची माणसं. त्यामुळं आपल्याला कॅन्सरचा धोका अंमळ कमी आहे. पण आहे.

कडक उन्हात राहिल्याने केसदेखील खराब होऊ शकतात, हे लक्षात घ्यायला हवं. सूर्यकिरणांपासून त्वचेला आणि केसांना होणारा त्रास वाचवणं शक्य आहे. अल्ट्राव्हायोलेट किरणं त्वचेच्या आत शिरू नयेत यासाठी लावायची मलमं उपलब्ध आहेत. ती वापरून त्वचेची बचत करता येते. या मलमांच्या वेष्टनांवर एक आकडा लिहिलेला असतो. सन प्रोटेक्शन फॅक्टर अथवा SPF. किरणावरोध किती प्रमाणात होतं, हे तो आकडा दाखवतो. आपल्या त्वचेसाठी कमीत कमी 30 तरी आकडा असायला हवा. केसांच्या बाबतीत 'हेअर प्रोटेक्शन फॅक्टर' असतो.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

आणखी एक प्रकारचं प्रदूषण आपल्याला सतावतं आहे. वायुप्रदूषणाचे फटके सगळयात आधी त्वचेलाच बसतात. धूळ, माती आणि अनेक रसायनं यांनी आपल्या आसपासची हवा पूर्वीसारखी निर्मळ राहिलेली नाही. म्हणून आपल्या त्वचेला सोसाव्या लागणाऱ्या प्रश्नांची मालिकादेखील वाढते आहे. धुळीचे कण त्वचेवर साचतात. त्वचेवर असलेली घामाची छिद्रं धुळीच्या कणांमुळे बुजतात. बुजलेल्या छिद्रांच्या आत रोगजंतूसुध्दा दडलेले असतात. यातून मुरुमं होतात. उन्हाच्या कडाक्यात येणारा घाम आणि तैलग्रांथीतून स्रवणाऱ्या तेलाची पुटंदेखील त्वचेवर तवंग तयार करतात. तेलकटपणानेसुध्दा मुरुमं वाढतात. तारुण्यात हे प्रमाण जास्त असतं, कारण या वयात बनणारे हॉर्मोन्स मुरुमांसाठी अनुकूल परिस्थिती तयार करतात.

प्रदूषणाचा त्वचेवरचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे त्वचेचा तजेला कमी होतो. ती वयस्कर माणसांसारखी बनायला लागते. प्रदूषणाचा मार इतक्या प्रमाणात झेलल्यानंतर असं होणं साहजिकच आहे. सोरियासिस नावाच्या त्वचेच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय त्यामागंदेखील प्रदूषण असावं असा संशय वैद्यकीय तज्ज्ञांना आहे.

हवेत असलेली रसायनं तितकीच धोकादायक. पॉलिसायक्लिक ऍरोमॅटिक हायड्रोकार्बन, व्होलटाइल ऑरगॅनिक कंपाउंड, नायट्रोजन ऑक्साइड, हवेतले धूलिकण आणि सिगारेटचा धूर यांचा त्वचेवरचा परिणाम सर्वश्रुत आहे. जेवढी हवा अधिक प्रदूषित, तितका या रसायनांचा परिणाम जास्त तीव्र झालेला दिसतो. त्वचेच्या सर्वात वरच्या थरावर यांचा परिणाम होतो.

रसायनांमुळे कंड सुटू शकतो. त्वचा कोरडी पडू शकते. सध्या अनेकांना खाज येते. ऍलर्जी होते. हल्ली एॅटॉपिक डरमॅटायटिस नावाचा त्वचेचा आजार बळावू लागला आहे. याचा थोडातरी दोष प्रदूषणाकडे जातो. अनेक ठिकाणी पाण्यातदेखील नको ती रसायनं उतरायला लागली आहेत. अशा प्रदूषित पाण्याने आंघोळ केल्यावर, त्या पाण्याने हात पाय धुतल्यावर त्वचेला काहीच होणार नाही असं समजणं भाबडेपणाचं आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

रस्त्यावर वाहनं वाढताहेत. त्या वाहनांमध्ये डिझेलवर चालणारी वाहनं मोठया प्रमाणात आहेत. डिझेलच्या धुरात पॉलिसायक्लिक ऍरोमॅटिक हायड्रोकार्बन नावाची रसायनं असतात. पूर्वापार आपल्याकडे स्वयंपाकासाठी लाकडं जाळली जायची. सुदैवाने मोदीजींनी हे बंद केलं. लाकूड जळत असतानादेखील त्यातून याच प्रकारची विषारी रसायनं बाहेर पडतात. यामुळे अकाली त्वचा म्हातारी होणं, त्यावर सुरकुत्या पडणं, त्वचेचा कॅन्सर, हातापायाला मुंग्या येणं, तसेच यकृताचे आजार होऊ शकतात.

रासायनिक कारखान्यांनी ओकलेला धूर, मोटारगाडयांतून बाहेर पडणारा धूर त्वचेला इजा करतो. या धुरात व्होलटाइल ऑरगॅनिक कंपाउंड असतात. यामुळे त्वचेला ऍलर्जी होते. विशेषतः मुलांमध्ये हे अधिक प्रमाणात दिसतं. आताशा धूर निर्माण न करणाऱ्या सी.एन.जी.सारख्या इंधनावर जगभर जोर दिला जात आहे. त्यामुळे कदाचित आपल्या त्वचेचं रक्षण होईल. पण अजून पुष्कळ करायचं बाकी आहे.

 
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

नायट्रोजन ऑक्साइड त्वचेतली आर्द्रता आणि लवचीकपणा कमी करतं. याने त्वचा अवेळी सुरकुतल्यासारखी वाटू लागते. रासायनिक धुरात जस्तासारखे धातू असतात. त्वचेसाठी तेही धोकादायक. सिगारेटचा धूर याच पठडीतला.

हवा प्रदूषित झाल्यावर तुम्ही-आम्ही लक्ष देतो ते श्वसनाच्या आजारांवर. त्याच वेळी वातावरण आपल्या त्वचेचीही वाट लावतेय हे आपल्या गावीही नसतं. आता असं करून चालणार नाही. औषधं घेऊनही कित्येकांच्या त्वचेचा कंड बरा होत नाही. येणारी खाज कमी होत नाही. आता फार उशीर करून चालणार नाही. आपल्या वातावरणाबाबत त्वरित जागरूक व्हायलाच हवं. अन्यथा आपलं काही खरं नाही.

9892245272