तत्त्वनिष्ठ आणि कर्मयोगी दांपत्य - अलका अणि डॉ. सत्यपाल सिंह

स्रोत: विवेक मराठी    दिनांक10-Feb-2020   
|

सखी सूत्र


stypal_1  H x W

डॉ. सत्यपाल सिंह तत्त्वनिष्ठ कर्मयोगी आहेत असे अलकाला वाटते. डॉ. सत्यपाल राजकारणात आल्यानंतरही त्यांच्या कार्यात अलकाचे संपूर्ण सहकार्य असते. आठवडयातून दोन-तीन वेळा ती बागपतला जाते. शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या बायकांसाठी झटते. त्यांच्यातलीच होऊन राहते.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

डॉ. सत्यपाल सिंह यांना आपण सगळे ओळखतो ते मुंबईचे धडाडीचे पोलीस संचालक म्हणून. मी त्यांच्या संपर्कात आले ते 1994मध्ये. किरीटजी भाजपाचे आमदार झाले, तेव्हा डॉ. सत्यपाल सिंग मुंबईत कार्यरत होते. खूप काही उंच, भारदस्त व्यक्तिमत्त्व नसले तरी त्यांची कमावलेली शरीरयष्टी आणि भेदक डोळे लक्ष वेधून घेत. त्यांनी गडचिरोलीत राहून नक्षलवाद या विषयावर नागपूर विद्यापीठातून Ph.D. केली आहे, हे ऐकल्यावर त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला. त्यावेळी त्यांची पत्नी अलकाशी माझी ओळख नव्हती. त्यामुळे साहजिकच डॉ. सिंग यांच्या पत्नीचे नाव अलका आहे, ती शिक्षिका आहे, तिने दिल्ली महानगरपालिकेत शिकवले आणि आता मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका आहे ह्याचीही कल्पना नव्हती.

 

त्यानंतर काही काळाने 2014मध्ये डॉ. सत्यपाल सिंह उत्तर प्रदेशातील बागपत येथून भाजपातर्फे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे कळले. थोडे नवल वाटले, कारण त्यांना भाजपाच्या कार्यक्रमात किंवा बैठकीत कधी पहिले नव्हते. निवडणूक जिंकल्यावर दिल्लीत महाराष्ट्र सदनात त्यांची आणि अलकाची ओझरती भेट झाली. खरी ओळख झाली ती कमल सखी मंचच्या कार्यक्रमातून. डॉ. प्राची जावडेकर आणि नीलम रुडी यांना आम्ही काहीजणी स्वयंप्रेरणेने कार्यक्रम आयोजनात मदत करायचो. त्यात नोंदणी करण्याची जबाबदारी नेहमी अलकाने स्वतःकडे घेतलेली असायची. सर्वांना मदत करण्याचा स्वभाव. शांतपणे बोलणार आणि चोख काम करणार यामुळे अल्पावधीतच मैत्री झाली. एकमेकींना 'अगंतुगं' करण्यापासून ते जिवाभावाच्या गोष्टी सांगण्यापर्यंत. अलका साउथ ऍव्हेन्यूमध्ये आमच्या घराजवळच रहायची. त्यामुळे येणे-जाणे, भेटणे नेहेमीचेच. त्यातूनच ती मनाने निर्मळ आणि भावनाशील आहे हे लक्षात येत गेलं. बोलण्यावागण्यात कधी कुठे आढयता नाही की मोठेपण नाही. उलट अडचणीही मनमोकळेपणे सांगायची आणि लोकांच्या समस्यांमुळे असाहाय्य वाटले तर तेही तिच्या चेहऱ्यावर सहजपणे प्रकट व्हायचे.

 

नोकरदार अधिकाऱ्याच्या कुटुंबाला राजकीय जीवनात रुळणे खूपच अवघड असते. त्यात अलकाच्या घरचा बारदाना मोठा. एकत्र कुटुंब. खूप सारे पाहुणेरावळे. बागपत हे दिल्ली राज्याच्या सीमेलगतच असल्याने सकाळी सकाळी पन्नास-शंभर माणसे घराबाहेर येऊन बसलेली असायची. हळूहळू या नव्या क्षेत्रात तिची घडी बसत गेली. ती स्वतः सत्यपालजींच्या लोकसभा क्षेत्रात जाऊ लागली. लोकांच्या अडचणी सोडवू लागली. गावी गेली की बायकांचा गराडा पडायचा, तिथून परतताना असंख्य तक्रारींचा भुंगा डोक्याला लावून यायची. त्यांच्यासाठी काय करता येईल, त्यांच्या अडचणी कशा सोडवता येतील हा विचार तिच्या डोक्यात सतत घोळत असे.

 

बागपत तसा मागास भाग. सर्वसामान्य जनता शेतीवर अवलंबून. शिक्षणाचे प्रमाण कमी. त्यात मुलींची लग्न लवकर लावण्याची प्रथा. त्यांच्यासाठी, मुलांसाठी ठोस कार्यक्रम राबवावा असे अलकाला वाटे. पण महिला बिचाऱ्या दैनंदिन अडथळे आणि कौटुंबिक समस्या यातून बाहेर येतील तेव्हा ना? हे पाहून अलका उदास व्हायची. तेव्हा बाकी काही करण्याआधी या महिलांना पारंपरिक जोखडातून मुक्त करण्याचा मार्ग तिने स्वीकारला. पल्ला लांबचा होता, पण योग्य होता. त्याला पर्यायही नव्हता.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

अलका आणि डॉ. सत्यपाल सिंग यांच्या लग्नाचा किस्सा गंमतीशीरच आहे. अलका तेवरिया, चौधरी चरणसिंग यांच्या गावातील शेतकरी कुटुंबातील. हरकेश सिंग आणि सुशीला या दांपत्याची मुलगी. वडील उत्तर प्रदेश सरकारच्या सिंचन खात्यात मुख्य अभियंता. मुलींनी शिकायला हवे याबाबत आग्राही. त्यामुळे त्यांनी आपल्या सर्व मुलींना शिकवले. अलकाने विज्ञानात पदवी घेतली आणि मेरठ येथे एम.एस्सीचे शिक्षण घेऊ लागली. एक दिवस वडील अलकाचे लग्न ठरवून आले. मुलगा सत्यपाल - 1980 साली आय.पी.एस. परीक्षा पास होऊन भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले होते. त्यांचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र होतं.

stypal_1  H x W

सत्यपालजींचे घराणे प्रख्यात लोकदल नेते अजित सिंह यांच्या बागपत क्षेत्रातील बसौलीचे. खेडयातील शेतकरी रामकिशनजी आणि हुकुमावती यांचे ते सुपुत्र. आपले लग्न कोणाशी होणार आहे याची सत्यपालजी यांनाही कल्पना नव्हती. मोठयांनी लग्न ठरवले म्हणजे योग्यच असणार, तेच रीतीचे असा त्यांचा विचार. अलका आणि सत्यपाल यांनी लग्नाच्या वेळीच एकमेकांना बघितले. म्हणूनच या विषयी सत्यपालजींना विचारले तर ते म्हणतात, ''व्यक्तिगत आयुष्यातील लक्षणीय आनंददायक घटना म्हणजे अलकाशी झालेले माझे लग्न.''

 

अलका तेव्हा मेरठला एम.एससी. करत होती. त्यानंतर तिने दुसरे वर्ष पूर्ण केले आणि मग महाराष्ट्रात नाशिकला सासरी आली. संसार सुरू झाला.

 

उत्तर प्रदेशातील जाट कुटुंबातील अलकाने नोकरी करणे म्हणजे एक धारिष्टय होते. जरी वडील पुरोगामी असले तरी लग्न झाल्यावर पती परमेश्वर हीच धारणा. अलका आपल्या उन्नतीचे सारे श्रेय सत्यपालजींना देते. त्यांनी कायम प्रोत्साहन दिले. सतत समजावले. पत्नीने प्रगती करावी असे त्यांना वाटे. अलकाने नोकरी मिळावी यासाठी शाळेत अर्ज दिला होता. मुलाखतीसाठी बोलावणे आले तेव्हा अलका गर्भवती होती. नववा महिना पुरा होत आलेला. नोकरीसाठी निवड झाली. दुसऱ्या दिवसापासून कामावर रुजू व्हायचे होते. अलका तयार नव्हती, पण पतीने समजूत काढली, प्रोत्साहन दिले. ती रुजू झाली. काही दिवसांतच बाळंत होऊन तिला मुलगी झाली. या पूर्ण काळात पती पहाडासारखे तिच्या पाठी उभे होते. नंतर काही वर्षांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम, असुरक्षित भागात बदली झाली. मुले लहान. पण नकारात्मक विचार करायचा नाही, उलट कामात लक्ष गुंतवायचे हे दोघांचे सूत्र. त्या काळात अलकाने बी.एड. केले आणि सत्यपाल सिंग यांनी 'नक्षलवाद' या विषयावर पीएच.डी. केले.

डॉ. सत्यपाल यांचा लहानपणापासूनच अध्यात्माकडे कल होता. आर्यसमाजी संस्कार होते. वेदिक शाळेत शिक्षण झाले असल्याकारणाने देव, धर्म, योगासने, श्रध्दा यावर जबर विश्वास, त्यामुळे कसोटीच्या काळातहीं ते कधी डगमगले नाहीत. पोलीस म्हणून काम करताना जिवावरचे अनेक प्रसंग आले.

अलकाने आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग सांगितला तो ऐकून अंगावर काटा आला. नाशिकला असताना, कारकिर्दीच्या सुरवातीलाच, 12 एप्रिल 1984ला दरोडेखोरांनी पंजाब नॅशनल बँकेवर हल्ला केला. तेव्हा दरोडेखोरांच्या हातात एके-47 होत्या आणि पोलिसांकडे साधी रिवॉल्व्हर. भीती वाटण्याजोगी परिस्थिती होती. काहीही होऊ शकत होते, पण पोलीस म्हणून कायदा आणि संरक्षण या धर्माचे पालन करणे जरूरीचे होते. सत्यपालजींची देवावर श्रध्दा होती. न डगमगता त्यांनी तो हल्ला परतवून लावला. ही चकमक चालू असताना अलका घाबरून गेली होती. वय लहान, जवळ धीर द्यायला कोणी नाही. त्यांची मुलगी चारू-प्रज्ञा फक्त एका महिन्याची होती. पण त्या प्रसंगाचा मोठया धैर्याने सामना केला.

त्यानंतर जेव्हा गडचिरोलीला नक्षलग्रास्त भागात बदली झाली. तो काळ कठीण होता. त्या वातावरणात अलकाला सुरुवातीला भीती वाटायची, पण नंतर पतीप्रमाणेच ती आणि मुलेही सकारात्मक दृष्टीने जगायला शिकले. अनेक प्रसंगांना न डगमगता सामोरे गेले.

 

डॉ. सत्यपाल सिंह राजकारणात आले ते योगायोगानेच. 2014च्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले. मा. मोदीजींच्या नेतृत्वाखाली उमेदवारांची चाचपणी चालू होती. डॉ. सत्यपाल सिंह यांचे नाव मध्य मुंबईतून पुढे येत होते. डॉ. सिंह म्हणाले, ''मला काहीच कल्पना नव्हती. पक्षाच्या अधिकाऱ्यांनी माझ्याशी चर्चा, विचारणा केली. कदाचित माझ्या आर्यसमाजी हिंदुत्ववादी पार्श्वभूमीमुळे हा योगायोग जुळून आला. घरचे तयारच नव्हते. निवडणुकीचा खर्च, घरचे अर्थकारण, मुलांची शिक्षणे, लग्न ह्याचा विचारही होताच त्यापाठी. अलकाचीही मानसिक तयारी नव्हती. पण एक नवीन आव्हान म्हणून स्वीकारायचे ठरवले. नंतर बागपत ही माझी जन्मभूमी असल्यामुळे तेथून लोकसभेची निवडणूक लढल्यास जास्त उपयुक्त ठरेल असे ठरले आणि लोकदलाच्या अजित सिंग याचा गड त्यांच्याकडून हिसकावून तेथे भाजपा जिंकली.'' त्यानंतर त्यांनी मानव संसाधन विकास विभागाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारीदेखील सांभाळली. या सगळया कार्यात अलकाचे संपूर्ण सहकार्य असते. आठवडयातून दोन-तीन वेळा बागपतला जाते. शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या बायकांसाठी झटते. त्यांच्यातलीच होऊन राहते. हे दांपत्य जरी महाराष्ट्रात विविध शहरांत राहिले असले, सत्यपालजींनी पोलीस सेवेत मोठी पदे भूषवली असली तरी त्यांची मूळ जीवनधारणा शेतकऱ्याचीच राहिली आहे. घरी रोज ताजे लोणी, शेतावर बनवलेला गूळ (त्यात तीळ, दाणे, काजू-बदाम घातलेले असतात) भाकरी असा साधासुधा शाकाहारी स्वयंपाक असतो. ते सर्व अलका स्वतःच्या देखरेखीखाली करते. तितक्याच सहजपणे सत्यपालजींना राजकीय आणि सामाजिक कामात मदत करते.


आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

डॉ. सिंह यांची आई अजूनही तंदुरुस्त आहे, कर्तृत्ववान आणि शिस्तप्रिय आहे. नीटनेटका हरियानवी पध्दतीचा पेहराव करून रोज कमीत कमी अर्धा ते पाऊण तास चालण्याने त्यांचा दिवस सुरू होतो. रात्री आरती-भजनात संपतो. मितभाषी, मितआहार असलेल्या त्या आजही कुटुंबाच्या आधारशीला आहेत.

मोठी मुलगी वकील 'चारू-प्रज्ञा' भाजयुमो कायदेविषयक विभागाची महिला सल्लागार आहे. दुसरी मुलगी 'रिचा-प्रमा' लग्न होऊन सासरी आहे. मुलगा 'प्रकेत-आर्य' उच्च शिक्षण घेतो आहे. सगळे आपापल्या व्यापात व्यग्रा आहेत. अलकानेही दिल्ली महानगरपालिकेच्या शाळेत शिकवून आपला राहिलेला नोकरीचा कालखंड नियमाप्रमाणे पूर्ण केला आणि आता सेवानिवृत्ती घेतली आहे. असे जरी असले, तरी निवडणुकीत मात्र सगळे घर प्रचारात व्यग्रा असते.

अलका म्हणते, जेव्हा डॉ. सत्यपाल सिंह यांनी 2014 साली मुंबई पोलीस कमिशनरपदावरून स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात उतरायचे ठरवले, तेव्हा त्यांचा प्रखर विरोध होता. राजकारण म्हणजे सज्जन माणसाचे काम नव्हे असे त्यांना वाटे. समोर लोक दलाचे बलदंड उमेदवार तत्कालीन मंत्री अजित सिंग. तो त्यांचा गड. मात्र एकदा निर्णय झाला, जिवावरचे प्रसंग आले, पण अलका आणि मुले सत्यपाल सिंह यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. 20142019 या दोन्ही वेळा जिंकले. आता तेच त्यांचे आयुष्य झाले आहे.

डॉ. सत्यपाल सिंह तत्त्वनिष्ठ कर्मयोगी आहेत असे अलकाला वाटते. त्यांच्या कुटुंबात मुलांच्या नावापुढे सहेतुक आडनाव लावलेले नाही. कारण आर्यसमाजी संस्कारामुळे वर्णव्यवस्थेवर आणि जातिव्यवस्थेवर त्यांचा विश्वास नाही. आध्यात्मिक प्रवचने करणे, लिखाण करणे त्यांना आवडते. त्याप्रमाणे ते वागतात. 'सुख दुख समे कृत्वा, लाभा लाभो जयाजयो' ही गीतेची शिकवण अंगीकारलेले हे दांपत्य माझे सुहृद आहेत, हे माझे भाग्यच!