भय संपायला हवे!

विवेक मराठी    10-Feb-2020
Total Views |

मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी प्रयत्न करायचे हे देशपातळीवर चालू असलेलं नियोजनबध्द काम दखलपात्रच आहे. या कामाच्या हेतूबद्दल मनात कसलाही संशय नाही. मात्र केवळ मुलींचे गर्भ वाचवून, जन्मल्यानंतर त्यांच्या शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करून समाजाला लागलेल्या या अत्याचाराच्या किडीचं उच्चाटन होणार नाही, असं या घटना सांगताहेत. जरब बसेल अशा जबर शिक्षेची तरतूद केवळ कागदावर राहिली की त्यातून ना कायद्याचा धाक निर्माण होतो, ना त्या शिक्षेचा - हीच गोष्ट पुन्हा पुन्हा अधोरेखित होते आहे. 

 
hinganghat_1  H
 
एकीकडे कायद्यातील पळवाटांचा आधार घेत निर्भयाच्या खटल्यातील बलात्काऱ्यांची पुढे चाललेली फाशी समाजातल्या संवेदनशील माणसांना अस्वस्थ करते आहे आणि त्याच वेळी महिलांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांमधली अमानुषता समाजातली भयाची पातळी वाढवते आहे. 7 वर्षांपूर्वी दिल्लीत घडलेल्या ज्या अमानुष घटनेने या देशातल्या स्त्रियांच्या सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं, त्या घटनेतील गुन्हेगार कायद्याचा आधार घेत, ठोठावण्यात आलेली फाशीची शिक्षा पुढे ढकलण्याच्या/रद्द करवून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. कायद्यातील तरतुदींच्या आधारे हे प्रयत्न चालू असल्याने कोणीही त्यांना अटकाव करू शकत नाही हे जरी खरं असलं, तरी त्याचा अप्रत्यक्ष परिणाम समाजातील दुष्प्रवृत्ती फोफावण्यावरही होतो आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

हिंगणघाट येथील एका तरुण प्राध्यापिकेला भर रस्त्यात जाळून मारण्याचा झालेला प्रयत्न, औरंगाबाद येथील एका प्रौढेचा जळीतकांडात झालेला मृत्यू, नागपूरमधील एका तरुणीच्या गुप्तांगात रॉड खुपसण्याचे केलेले अमानुष कृत्य... या गेल्या पंधरवडयातील समोर आलेल्या तीन घटना, त्याही फक्त महाराष्ट्रातल्या. देशाच्या अन्य भागांतली आकडेवारी एकत्र केली, तर परिस्थिती किती चिंताजनक आहे याची जाणीव होईल.

एकीकडे देशातील मुलींच्या सर्वांगीण विकासाचं उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या राष्ट्रीय उपक्रमासाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेली भरीव तरतूद, सरकारी पातळीवर त्यासाठी चाललेले नियोजनबध्द प्रयत्न आणि दुसरीकडे समाजात मुलींवर-स्त्रियांवर वाढत चाललेले अत्याचार, त्यातील वाढत चाललेलं क्रौर्य... या दोन्हीची संगती लावणं सर्वसामान्यांसाठी खरंच अवघड बाब आहे. गर्भातील स्त्रीभ्रूणाला नख लावू द्यायचं नाही, त्यासाठी समाजाचं मतपरिवर्तन करायचं, मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी प्रयत्न करायचे हे देशपातळीवर चालू असलेलं नियोजनबध्द काम दखलपात्रच आहे. या कामाच्या हेतूबद्दल मनात कसलाही संशय नाही. मात्र केवळ मुलींचे गर्भ वाचवून, जन्मल्यानंतर त्यांच्या शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करून समाजाला लागलेल्या या अत्याचाराच्या किडीचं उच्चाटन होणार नाही, असं या घटना सांगताहेत. जरब बसेल अशा जबर शिक्षेची तरतूद केवळ कागदावर राहिली की त्यातून ना कायद्याचा धाक निर्माण होतो, ना त्या शिक्षेचा - हीच गोष्ट पुन्हा पुन्हा अधोरेखित होते आहे.

एकतर्फी प्रेमातून जळीताच्या/ऍसिड हल्ल्याच्या घटना घडतात, असं सांगण्यात येतं. जिच्यावर खरं प्रेम असतं, त्या व्यक्तीचा जीव घेण्याचा, तिला आयुष्यातून उठवण्याचा विचार कोणी करू शकतं का? कल्पनेपलीकडचे विकृत अत्याचार करायला कोणी धजावू शकतं का? याची उत्तरं जर नकारार्थी असतील, तर आपण याला 'एकतर्फी प्रेम' असं लेबल कसं लावू शकतो? यातून 'प्रेम' या संकल्पनेचीही विटंबना होते आहे हे का लक्षात घेतलं जात नाही? खरं प्रेम असा मालकी हक्क प्रस्थापित करण्याची स्वप्न बघत नाही आणि कोणा एकाला भोग्यही बनवत नाही. या दुर्घटनांमागे असली तर फक्त स्त्रीदेहाबद्दल असलेली विकृत आणि भयंकर हाव आहे. हे गुन्हेगार फक्त अशिक्षित, अल्पशिक्षित वा निम्न आर्थिक स्तरातले आहेत असंही नाही. हिंगणघाट येथे तरुण प्राध्यापिकेलाजाळणारा शिकलेला होता. अलीकडेच औरंगाबाद येथील एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षकाला, सातवीतल्या मुलींना अश्लील चित्रफिती दाखवण्यावरून अटक झाली होती. ही उदाहरणं काय सांगतात? केवळ मुलगी शिकून, तिच्या गर्भातल्या हत्या थांबून समाजाचं आणि तिचंही भलं होणार नाही. त्यासाठी समाजातील पुरुषवर्गाचा आणि समाजाचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल. सर्वात आधी बाई ही आपल्यासारखीच रक्तहाडामांसाची माणूस आहे, आणि माणूस म्हणून आपल्याला असलेला जगण्याचा अधिकार तिलाही आहे, त्यात तिचा नकाराधिकारही गृहीत आहे, याची जाणीव तिच्या घरापासून समाजातल्या प्रत्येक घटकांना करून द्यावी लागेल. त्यासाठी सध्या होणारे प्रबोधनाचे/जागृतीचे प्रयत्न किती तोकडे पडत आहेत, हे या घटनांच्या वारंवारितेवरूनच लक्षात येत आहे. एवढंच नाही, तर या संदर्भात कडक कायदे करून वा केवळ सरकारी पातळीवरून उपक्रम चालवून समाज बदलत नाही, हेही अधोरेखित झालं आहे. या प्रयत्नांना साथ लागते ती समाजाची. समाजाची मानसिकता बदलण्याची जबाबदारी ही संपूर्ण समाजाची, त्यातल्या प्रत्येक घटकाची - सर्व स्त्रीपुरुषांची आणि समाजातील प्रत्येक संस्थेची आहे. केवळ कुटुंबसंस्थेची नाही, तर समाजाचा गाडा चालवणाऱ्या सर्व संस्थांची आहे. समाज म्हणून अशी आंतरिक जागृती जेव्हा होईल, तेव्हा बाह्य प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील. जेव्हा लिंगभेदापलीकडे घरात आणि बाहेर माणूस म्हणून प्रत्येकाचा आदर, सन्मान राखला जाईल, तेव्हा या प्रयत्नांना यश आलं असं म्हणता येईल. हा खूप दूरचा पल्ला वाटत असला, तरी त्या दिशेने सर्वांनी एकाच वेळी, संघटितपणे आणि सुटेसुटेही प्रयत्न करायला हवे आहेत.


आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

बाई ही भोग्यवस्तू आहे असा कळत-नकळत संदेश देणाऱ्या मनोरंजन माध्यमांचा समाजाच्या या मानसिक घडणीत वाटा आहे का, याचीही चाचपणी व्हायला हवी.

अत्याचारांची ही मालिका बायकांना हादरवून सोडणारी आहे. हे जग पुरुषाइतकंच बाईसाठीही बिनधोकपणे राहण्याजोगं कसं करता येईल, याचा विचार व्हायला हवा.