इतिहासाचे तत्त्वज्ञान मांडणारा इतिहासकार लिओपोल्ड रँके

विवेक मराठी    10-Feb-2020   
Total Views |

**रमा गर्गे**

आज  संशोधनामध्ये पुरातत्त्व, अभिलेखागार, हस्तलिखिते, पुराभिलेख, अक्षरवटीकाशास्त्र, भाषारचनाशास्त्र नाणकशास्त्र, वंशावळीचा अभ्यास यासारख्या ज्ञानशाखा विकसित होत आहेत. या सर्व बाबींचे श्रेय लिओपोल्ड रँके याला जाते, ज्याने इतिहासाला तत्त्वज्ञान आणि शास्त्र या दोन्ही ही ज्ञानशाखांमध्ये स्थान मिळवून दिले. 

बर्लिन येथील इतिहासाचा एक प्राध्यापक भौतिक जगात घडून गेलेल्या घटनांचा धांडोळा घेत असतो. पूर्वसूरींच्या लेखनातून बुध्दिवादाच्या साहाय्याने अंतिम सत्य शोधू पाहतो. या सगळया प्रयत्नांमध्ये त्याच्या लक्षात येते की काही तत्त्वांचा, घटनांच्या कारणांचा अन्वयार्थ बुध्दीला लागत नाही, तर्कशुध्द विश्लेषण देता येत नाही, तेव्हा मग तो त्या तत्त्वाला अदृश्य शक्ती दैवी शक्ती असे म्हणू पाहतो. जसजसा या सगळया विषयाच्या अंतरंगात हा तत्त्वज्ञ जाऊ लागतो, तेव्हा त्याच्या लक्षात येते की विचार हेदेखील दैवी प्रेरणा आहेत. विचारांमधूनच घटना, प्रसंग घडत जातात. भौतिक जगातील घटनांमध्ये अपरिहार्यता असते. हे मूलभूत चिंतन करणारा हा इतिहासाचा शिक्षक म्हणजे, इतिहासाचे तत्त्वज्ञान आकाराला आणणारा इतिहासशास्त्राचा जनक लिओपोल्ड रँके होय.

leopold von ranke informa

ईश्वरी अंशाचा, दैवी शक्तीचा प्रभाव मान्य करून पहिल्यांदाच त्याने इतिहासाकडे पाहिले. मात्र हे पाहणे पूर्णपणे वस्तुनिष्ठ होते. अशा प्रकारचे एकाच वेळी वस्तुनिष्ठ असणे आणि मानवी बौध्दिक कक्षेच्या बाहेरच्या गोष्टींना मानवाच्या चिंतनामध्ये स्थान देणे हे पहिल्यांदाच घडत होते.

अत्यंत बुध्दिवादी माणसाला जेव्हा सर्व प्रकारचे तर्क, सारे मार्ग वापरूनही बुध्दिनिष्ठ पध्दतीने एखाद्या घटनेचा अर्थ लागत नाही, तेव्हा त्या ठिकाणी तो मानवी आवाक्याबाहेरच्या दैवी शक्तीचे विवेचन करतो.

 

आणि मग इतिहास म्हणजे पुराणकथा, मनोरंजन करणाऱ्या राजे-राण्यांच्या कथा असे न राहता भौतिक आणि पराभौतिक अशा सत्याचा शोध घेणारे एक शास्त्र ठरते, जे विज्ञानासारखे केवळ प्रत्यक्षांतवादी नाही आणि कथा-कादंबरीसारखे काल्पनिकही नाही. 'सत्याचा शोध हाच इतिहासाचा आत्मा आहे' असे म्हणणारा रँके हा इतिहासाचा साधक होता, ज्याने इतिहासशास्त्र मांडून हा साधनामार्ग प्रशस्त केला.

1795मध्ये जर्मनीत थ्यूरिंगेन येथे लिओपोल्ड रँकेचा जन्म झाला. बर्लिन व हाले येथे त्याचे शिक्षण झाले. काही काळ त्याने फ्रँकफुर्ट येथे शिक्षक म्हणून नोकरी केली. नंतर तो बर्लिन येथे प्राध्यापक म्हणून इतिहास विषय शिकवू लागला.

हिरोडोटस, झेनोफिन, लिव्ही या पूर्वसूरींचे इतिहासविषयक सारे संशोधन, लेखन त्याने अभ्यासले. त्या काळात इतिहास शास्त्र आहे की कला याविषयी विद्वानांमध्ये वादंग सुरू असायचे. विज्ञानासारखे सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम इतिहासामध्ये असू शकत नाहीत, शास्त्रासारखे प्रयोगही करता येणार नाहीत, कारण या घटनांची पुनरावृत्ती होऊ शकत नाही, त्यामुळे शास्त्रशुध्दतेत बाधा येते आणि मानवाचा इतिहास असल्याने त्यामध्ये संस्कृती, मानवी संबंध, धार्मिक-आर्थिक अनुबंध यासारख्या बाबीदेखील स्वाभाविकपणे येणार, पण साहित्यासारखे कल्पनारम्य असे त्याचे स्वरूप असू शकणार नाही, असे वेगवेगळे विचार मांडले जात होते.

 

अशा वेळी इतिहासाला शास्त्र म्हणून रँकेने प्रस्थापित केले, आणि त्याच वेळी त्यातील मानवी अशा स्वरूपालाही यथायोग्य स्थान दिले.

 

त्याच्या लक्षात आले - 'इतिहासाची पुनरावृत्ती होत असते.' हा प्रसिध्द सिध्दान्तच इतिहासाच्या संशोधनाला बाधा आणतो. वर्तमानकाळातील घटना अनेकदा भूतकाळात घडून गेलेल्या घटनेसारखे वाटते आणि त्यावरून आपण भूतकाळातल्या घटनेचा अन्वयार्थ लावला जातो. इथेच संशोधकांची चूक होते, असे लिओपोल्ड याचे म्हणणे आहे.

 

हा तत्त्वज्ञ म्हणतो की, 'मानवी जीवन हे पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे पुढे जाणारे आहे. गेलेला थेंब पुढे जाणार, मागे परत येणार नाही. त्यामुळे भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यामध्ये अशी समानता, पुनरावृत्ती असू शकत नाही, तर शृंखला असू शकते.'
 

लिओपोल्ड रँकेने इतिहास संशोधनाच्या तर्कशुध्द सुसंगत शास्त्रीय पध्दतीची रचना केली. खरे म्हणजे त्याच्यामुळेच जगभरामध्ये इतिहासाच्या साधनांविषयी गांभीर्य निर्माण झाले. इतिहासाची संशोधन पध्दती विकसित झाली. साधनांचे चिकित्सक संशोधन, उत्खनने, ऐतिहासिक वास्तूंविषयी जाण, त्या जोपासण्याची वृत्ती रँकेमुळे वाढली.

 

सत्य हाच इतिहासाचा आत्मा आहे हे संशोधकाने एकदा स्वीकारले की तो पूर्वग्रह न बाळगता, वस्तुनिष्ठ पध्दतीने केवळ सत्य शोधू लागतो. त्यात त्याच्या भावना, इच्छा, प्रेरणा, वंश, राष्ट्रीयता असे काहीही आड येत नाही.

 

रँके म्हणतो की, 'तुम्ही जर एखादा विशिष्ट विचार प्रस्थापित करण्यासाठी इतिहासाचे लेखन करू लागलात, तर नसलेल्या ठिकाणी तुम्हाला तुमचा विचारच दिसू लागतो. मग पूर्वग्रहदूषित अशा दृष्टीकोनातून जे लिहिले जाते तो इतिहास नसतो.'

 

रँकेच्या मते सत्य शोधण्यासाठी वस्तुनिष्ठ दृष्टी असावी लागते. तटस्थपणे आणि निरपेक्षपणे सत्याचा शोध घेणे, काहीही न लपवणे आणि काहीही वाढवून न लिहिणे म्हणजे वस्तुनिष्ठता होय. इतिहासकार हा अधिकाधिक वस्तुनिष्ठ असला पाहिजे. मात्र असे असतानाही या शास्त्रशुध्द विषयाची मांडणी क्लिष्ट असू नये, असे त्याचे मत होते. सुलभ भाषा, भाषिक सौंदर्याने नटलेले असणे, वाचनीय असणे ही इतिहासाच्या लेखनाची वैशिष्टये असली पाहिजेत, असे रँके सांगतो. प्रसंग नेमकेपणाने रेखाटता यावा, यासाठी इतिहासकाराचा भाषेशी जवळचा संबंध असला पाहिजे. मात्र इतिहास वाड्.मयिन कलाकृती नाही, याविषयीही त्याची स्पष्टता असली पाहिजे, असे तो म्हणतो.

 

इतिहासाचा विचार करताना लिओपोल्ड रँके आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ती म्हणजे घडून गेलेल्या घटना या म्हणजेच इतिहास होत.


समकालीन घटना पुढे चालून इतिहास म्हणूनच जर प्रकाशात येणार असतील
, तर आत्ता समकालीन घटनांचा इतिहास का लिहू नये, असा त्या काळामध्ये एक विचारप्रवाह होता. रँकेने या विचारप्रवाहाला जोरदार विरोध केला. त्याच्या मते काही काळ गेल्यानंतरच प्रसंगाच्या सर्व बाजू उजेडात येतात. एखाद्या व्यक्तिमत्त्वाचे आणि घटनेचे बारीक धागेदोरे, घटनांची स्पष्टता, या बाबी घटना, व्यक्ती, प्रसंग आणि काळ जसजसा मागे पडत जाईल तसतसे अधिकाधिक उलगडत जातात. त्यामुळे समकालीन घटनांचा अभ्यास शास्त्रशुध्द पध्दतीने इतिहास म्हणून करणे अशक्य आहे, असेच रँकेचे स्पष्ट मत आहे.

 

स्वतः विकसित केलेल्या इतिहास लेखनशास्त्राला अनुरुन रँकेने अनेक पुस्तके लिहिली. हिस्ट्री ऑफ पोपस्, हिस्ट्री ऑफ रिफर्मेशन इन जर्मनी, 15 ते 18व्या शतकातील युरोपाचा इतिहास, तसेच प्रॅक्टिस ऑॅफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑॅफ वर्ल्ड हिस्ट्री यात त्याचे लेख संकलित केले आहेत.

 

ऐतिहासिक दस्तऐवज, कागदपत्रे, उत्खननात मिळालेले पुरावे, जुन्या वास्तू या सर्व बाबींचा कसून शोध घेऊन आणि कोणतीही काल्पनिक किंवा पूर्वग्रहदूषित अशी नजर न ठेवता केवळ सत्यनिष्ठ नजर ठेवून इतिहासाच्या संशोधनाकडे बघितले पाहिजे, असे रँके याचे मत होते.

 

इतिहासाला आत्यंतिक भौतिकवादी दृष्टीकोनातून आणि धार्मिक पौराणिक दृष्टीकोनातून बाहेर काढून सम्यक आणि शास्त्रीय अशी बैठक देणारा हा इतिहासाचा तत्त्ववेत्ता 1886 साली मृत्यू पावला.


 आज इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठता आली आहे. संशोधनामध्ये पुरातत्त्व
, अभिलेखागार, हस्तलिखिते, पुराभिलेख, अक्षरवटीकाशास्त्र, भाषारचनाशास्त्र नाणकशास्त्र, वंशावळीचा अभ्यास यासारख्या ज्ञानशाखा विकसित होत आहेत. या सर्व बाबींचे श्रेय लिओपोल्ड रँके याला जाते, ज्याने इतिहासाला तत्त्वज्ञान आणि शास्त्र या दोन्ही ही ज्ञानशाखांमध्ये स्थान मिळवून दिले.