
राष्ट्रजीवनात सुख-दु:खाचा, वैभव-पराभवाचा अनुभव येतच राहतो. सर्वकाळ वैभवाचा उपभोग घेणारे किंवा सदा अध:पतनाच्या गर्तेत सडत राहण्याइतके शापित कुठलेही राष्ट्र नाही. भारताच्या राष्ट्रजीवनातही असे अनेक चढउतार येऊन गेले आहेत. साऱ्या जगताला चकित करणारा उन्नती-अवनतीचा हा खेळ काही शतकांपूर्वी सर्वांना पाहायला मिळाला.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
अध:पतनापासून अंधकार
अरबस्तानात जन्म घेऊन अखिल मानवजातीला आपल्या झेंडयाखाली आणण्याच्या महत्त्वाकांक्षेने प्रेरित इस्लाममत तलवारीच्या धाकाने चारही बाजूंना पसरू लागले होते. साहसी-पराक्रमी व कठोर अरबांचे तुफानी आक्रमण सर्व दिशांना वाढत होते. पश्चिमेत स्पेनपर्यंत पूर्ण युरोप, उत्तर आफ्रिका, आशियात इराम, तुर्कस्तान, मंगोल इत्यादी त्यांन पाहता पाहता सर केले. राज्ये नष्ट झाली, जुने धर्म आणि धर्मस्थाने उद्ध्वस्त केली गेली. अत्याचार, हत्या, बलात्कार, स्त्री-वित्तादीचे अपहरण इत्यादी पापांना उधाण आले होते. हिमालयाच्या उत्तरेत चीनचा पूर्व महासागराच्या किनाऱ्यापर्यंतचा भाग पदाघाताखाली विव्हळू लागला. हिमालयाच्या दऱ्या पार करत भारतात सिंध, गांधार, उपगणस्थान, पंचनद्र प्रदेशात त्याची विध्वंसक क्रूर आक्रमणे सुरू झाली. तोपर्यंत भारतात स्वत्वाचे विस्मरण, राष्ट्रधर्माची उपेक्षा, संघजीवनाकडे दुर्लक्ष, स्वार्थबुध्दी, तदुत्पन्न परस्परकलह, आपापसातील द्वेष, विश्वासघात करण्याची, अनैतिक नीतीने ऐहिक उत्कर्ष साधण्याची दुर्भावना, स्व-पर विवेकभ्रष्टता आदी पराभवाला आमंत्रण देणाऱ्या, स्वातंत्र्य नष्ट करून पारतंत्र्याच्या बेडयांना आमंत्रण देणाऱ्या भयानक दुर्गुणांनी समाजजीवनाला उन्मार्गी व धर्मभ्रष्ट करून टाकले होते. सुव्यवस्थित देशव्यापी सत्ता राहिलीच नाही. छोटया छोटया राजसत्ता उदयाला येत होत्या. आपापसात भांडणतंटे करण्यापलीकडे काही करण्याची किंवा विचार करण्याची क्षमताच जणू नष्ट झाली होती. देशाच्या सीमांवर इस्लामच्या नावावर अरबांचे आणि धर्मांतरामुळे त्यांचे साथी झालेल्या तुर्कादींचे, त्यांच्या तुफानी शक्तींनी एकावर एक आघात होत होते. ते झेलत देशरक्षणाचा भार केवळ सीमास्थित पर्वतीय राजांवरच पडत होता. तेव्हा हे आक्रमण देशावरच आहे. तो केवळ त्या राजाचा प्रश्न होता. उलट पूर्ण समाजाचा, राष्ट्राचा, त्याच्या धर्म संस्कृतीचा, स्वातंत्र्याच्या मान-सन्मानाचा आहे, हे इतके सरळ साधे तथ्य समजण्याचे ज्ञानच तेव्हा लुप्त झाले होते. परिणामत: ते आक्रमण देशात यशस्वी होऊ लागले. या आक्रमणकर्त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व पराभूत होणाऱ्यांना अन्य देशांमध्ये ज्या अत्याचारांचा अनुभव आला, त्याची अतिभयंकर पुनरावृत्ती आपल्या पवित्र देशात झाली. पराभवामुळे संपूर्ण समाज धैर्य हरवून बसला होता. आपल्या जीवनवैशिष्टयांचे कसेबसे रक्षण करण्याच्या कामनेने जघन्य दासवृत्ती स्वीकारून, शत्रूला संतुष्ट करण्यासाठी कन्या, भगिनी आणि धन-रत्नादी समर्पित करण्याची, त्यातही गौरव मानून पुढे जाण्यासाठी मोठमोठे राजे-महाराजे उपाधीभूषित समाजधुरीणही पुढे सरसावत होते. मोठमोठया विद्वान पंडितांनी, 'दिल्लीश्वरो व जगदीश्वरो वा मनोरथान् पूरयितुं समर्थ:' यासारख्या रचना करून आक्रमक परकीय सत्ताधीशांपुढे लाचारीने लांगूनचालन करण्यातच स्वत:ला धन्य मानले. त्या शत्रुरूप शासकांच्या आनंदासाठी स्वकीयांशी द्रोह, विश्वासघातादी करून, त्यांच्या विनाशास कारणीभूत ठरल्यास कृतकृत्य मानण्यापर्यंत मानसिक, वैचारिक अध:पतनाच्या गर्तेत लोक पडत होते. थोडक्यात, असे म्हणता येईल की चोहीकडे अधर्म, दास्य, अध:पतनामुळे घोर अंधकार पसरला होता आणि या भीषण अवस्थेतून बाहेरय येण्यासाठी प्रकाशाचे लहानसहान किरणही दिसत नव्हते.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
लाचार दास्यजीवन
संपूर्ण देशात निराशा पसरली होती. पराक्रमी, कर्तृत्वसंपन्न पुरुषांनाही परकीय सत्ताधीशांची सेवा करण्याशिवाय काही सुचत नव्हते. प्रबळ राजपूत राजे-महाराजे दिल्लीच्या आसनावर आरूढ शत्रूची नेकीने चाकरी करण्यालाच राजनिष्ठेचा धर्म मानायचे. स्वतंत्र स्वकीय राज्याची कल्पनाही त्यांना सहन होत नव्हती. आपल्या बाहुबलाने व राजकीय चातुर्याने गोलकुंडा, अहमदनगर, बीदर इत्यादी राज्यांची आसने सुरक्षित ठेवणारे, बलशाली मोगल साम्राज्याला आव्हान देऊन त्या राज्यांचे रक्षण करणारे विजापूरचे सरदार या नात्याने दिग्विजय करत त्या राजाच्या राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारे, ज्याच्या साहस-शौर्य, चातुर्यावर विजापूर सलतनतीचे अस्तित्व अवलंबून होते, असे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील श्री. शाहजी स्वतंत्र राज्य प्रस्थापनेची इच्छा असूनही ते अशक्य आहे असे मानून लाचारीचे दास्य जीवन जगत होते.
समाजात व्याप्त नैराश्य
अशा अवस्थेत जेव्हा सर्वनाश अटळ दिसत होता, सर्व समाज अस्तित्व कसेबसे टिकविण्याची धडपड करत होता. हीन-दीन, अपमानित, मरणासन्न जीवन जगत होता, तेव्हा मोठमोठे साधुसंत चिंतित होऊन आर्त स्वरात सज्जनांचे व धर्माचे रक्षण करण्यासाठी वेळोवेळी प्रकट होण्याचे आश्वासन देणाऱ्या जगच्चालक, परमपिता परमात्म्याची प्रार्थना करून, या प्रलयंकारी संकटात रक्षण करण्याकरिता उत्कटतेने व एकाग्रा चित्ताने त्यास आवाहन करायला एकत्र यायचे. हताश समाजाला प्रोत्साहित करण्यासाठी राक्षसकुलविध्वंसी महापराक्रमी सर्वगुणसंपन्न मर्यादापुरुषोत्तम रामचंद्रांचे चरित्र भावपूर्ण ओजस्वी भाषेत वर्णन करायला, त्या रामभक्तीच्या आधारे जनजनाला सुघटित, स्वाभिमानी, स्वातंत्र्यभिलाषी, आत्मविश्वासी, विजिगीषू बनविण्याचे कर्तव्य पार पाडायला एकत्र येत होते. भगवंताला आपली हृदयावस्था प्रकट करताना रावणाच्या राक्षसी राज्याचे वर्णन करण्याच्या निमित्ताने देशाच्या तत्कालीन स्थितीचे हृदयविदारक वर्णन त्यांनी केले आहे. त्यामुळे त्या काळच्या भीतिदायक, असुरक्षित अवस्थेचा वाचकांना बोध होऊ शकतो. रावणादी नावांच्या जागी तत्कालीन शासकांची नावे ठेवल्याने आक्रमकांकडून होणाऱ्या अत्याचारांच्या भयाचे चित्र स्पष्ट होते. अशा परिस्थितीत केवळ मानवी शक्तीने यश मिळणे शक्य नाही. त्यासाठी परमेश्वराने अवतीर्ण होऊन दुष्टांचे निर्दालन केले, तरच स्वातंत्र्ययुक्त धर्मराज्य प्रस्थापित होऊन लोक सुखी होतील, अशी या साधूंची धारणा झाली होती. यावरूनच शासकांच्या अत्याचारांच्या आतंकाचे अनुमान लावता येऊ शकते, समाजमनातील व्याप्त नैराश्याचा बोध होतो.
अशक्याला शक्य करणे
अशा तिमिराच्छादित अवस्थेत जनसामान्याची आर्त भावना साकार होऊन मानवरूपात प्रकट झाली. नैराश्य दूर सारून आत्मविश्वासयुक्त विजिगीता मनुष्यदेह धारण करून व्यक्त झाली. स्वातंत्र्याची, धर्मभक्तीची, राष्ट्रभक्तीची ज्योती मनुष्यरूपात अवतीर्ण झाली. विजापूरचे बलशाली सामंत शहाजी भोसले यांच्या पुत्राच्या रूपाने भगवान शिवाच्या छत्रछायेत जन्म घेणाऱ्या या बालकाचे नाव शिवाजी असे ठेवले गेले. बाल्यावस्थेतच त्याची तेजस्विता अनुभवास येऊ लागली. विजापूरच्या बादशहासमोर आपल्या पित्यासमवेत उपस्थित राहण्यासाठी जात असताना वाटेत जनभावना मुद्दाम दुखावण्यासाठी गोवध करण्यास प्रवृत्त कसायाचे बाहू छाटून आपल्या निर्भीड धर्मश्रध्देचे प्रमाण देणाऱ्या, जो आपल्या धर्माचा, समाजाचा नाही तो आपला बादशहा कसा, असा विचार करून बादशहाला मानवंदना देण्यास नकार देणाऱ्या त्या अद्भुत बालकाच्या धिटाईने साऱ्या शहरात खळबळ उडवून दिली. मनोमन आनंदित झालेल्या पित्याने बाहशहाच्या क्रोधापासून या स्वातंत्र्याच्या धगधगणाऱ्या दीपशिखेला सुरक्षित ठेवण्यासाठी, आपण रागावल्याचे नाटक रचून, त्याला विजापूरहून लांब आपल्या पुण्याच्या जहागिरीचे सर्व अधिकार देऊन पाठवून दिले. आपल्या असामान्य प्रतिभासंपन्न, स्वातंत्र्याची उपासिका कर्तृत्ववान मातेच्या छत्रछायेत, दादोजी कोंडदेवासारख्या कुशल प्रशासक आणि धर्मसंस्कृतीसंपन्न विद्वानाच्या देखरेखीत बालक मोठा होत गेला. सर्व प्रकारच्या व्यवहारांचे ज्ञान, परिस्थितीचे आकलन करत दास्यतेच्या वातावरणाने क्षुब्ध, प्रभू रामचंद्रांच्या तेजोमय जीवनातून प्रेरणा घेणाऱ्या या बालकाने भगवान शंकरासमोर आपल्या काही साथीदारांबरोबर परदास्यमुक्ततेची प्रतिज्ञा केली आणि आपली स्वतंत्र पृथक सत्ता प्रस्थापित करण्यास प्रारंभ केला. धैर्य, शौर्य, कुशल सेनापतित्व, असमान्य चातुर्य, माणसांना पारखून त्यांना आपले अविभाज्य सहकारी बनवण्याची जन्मजात बुध्दी आणि जोडीला परमपुनित चारित्र्यसंपन्नता, अतूट धर्मश्रध्दा, औदार्य आदि श्रेष्ठ पुरुषाचे सद्गुण, आपल्या साथीदारांच्या सुखदु:खात सहानुभूतीने, मृदुतेने आणि प्रसंगी कठोरतेचा विवेकपूर्ण व्यवहार, आत्मविश्वास, विजयप्राप्तीबाबत नि:शंकता, धर्मराज्याच्या स्थापनेत ईश्वरी आदेशाची अनुभूती, अदम्य उत्साह, तसेच अगदी विषय परिस्थितीतही मनाचे संतुलन, इत्यादी अनेक गुणांचे अनोखे मिश्रण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अभिव्यक्त होत असल्याने, अल्पावधीतच ते जनसामान्यात आराध्य बनले. ते त्यांच्याकडे सज्जनांचे रक्षक, दुष्ट-दुराचाऱ्यांच्या कठोर काळाच्या रूपात पाहू लागले. ईश्वरी अवताराचे सर्व गुण त्यांच्यात दिसू लागल्याने पुढे त्यांना प्रत्यक्ष भगवान शंकराचाच अवतार लोक मानू लागले.
यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽश संभवम्॥ (गीता 10/41)
म्हणजेच या महामानवाला लोकांनी परमेश्वराचा अंशावतार मानून आपल्या हृदयसिंहासनावर विराजमान केले. नैराश्याच्या अंधकारातून बाहेर काढून स्वातंत्र्यसूर्याचे दर्शन करवणाऱ्या अतुलनीय साहसी शिवाजी महाराजांनी जणू अशक्य ते शक्य करून दाखवले. निष्प्राण जातीत नवजीवन फुंकून त्यात अवरुध्द पौरुषाला प्रवाही केले. यामुळेच अखिल जगताला ते आश्चर्य पाहायला मिळाले, जे शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र संभाजीचा औरंगजेबाने वध केल्यावर आणि द्वितीय पुत्राला जिंजीच्या किल्ल्यात वेढा घालून बंदी बनवल्यावर, तसेच संभाजीपत्नीला आणि पुत्रालाही बंदी केल्यावर त्या निर्णायक अवस्थेतही, स्वराज्याचा समूळ नाश करण्याच्या हेतूने प्रचंड शस्त्रसैन्याच्या बळावर, खुद्द औरंगजेबाच्या कुशल संचलनात ते भयानक आक्रमण झाले, ते परतवून लावताना इतका भीषण संग्राम झाला की, औरंगजेब परास्त निराश होऊन दक्षिणेत (महाराष्ट्रात) मरण पावला. स्वराज्य सुरक्षित राहिले. बंदी युवराज परतून छत्रपतींच्या सिंहासनाला विभूषित करू शकले आणि अल्पावधीतच दक्षिण-उत्तर स्वराज्याचा सीमाविस्तार होत गेला.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाशी श्री समर्थ रामदास स्वामींचा संबंध फार उशिरा आला असावा. अफजलखान प्रसंगामुळे थेट इंग्लंड इत्यादी युरोपीय देशांनाही जबरदस्त आश्चर्य वाटले आणि एका विजयोन्मेषयुक्त शक्तीचा उदय झाला आहे याचे सर्वांना प्रत्यंतर आले. तत्पश्चात श्री समर्थांनी स्वयं श्री शिवाजींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि देशातल्या या दोन प्रबळ स्रोतांचे मीलन झाले. श्री रामदास स्वामींच्या धर्मजागरणाचे आणि मठांच्या संघटनेचे काम याआधीच प्रसृत झाले होते. बरेच काही घडत होते. परंतु नवजागरणाचे हे दोन प्रवाह स्वतंत्रपणे वाहत होते. तिकडे प्रत्यक्ष व्यवहारात राजकीय स्वातंत्र्यप्राप्तीच्या हेतूने श्री शिवाजींचे यशस्वी प्रयत्न आणि इकडे श्री समर्थांची धर्मजागरणाने आत्मग्लानी मिटवून साहसी समाजनिर्मिती, या दोन्ही स्रोतांची युती होताच श्री शिवाजींचा राज्याभिषेक होऊन, ते छत्रपतीच्या रूपात संपूर्ण देशात श्रध्देय झाले असे म्हणायला हरकत नाही. तथापि श्री शिवाजीराजांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे कर्तृत्व त्यांची असामान्यता स्वयंभू होती. श्री समर्थांचे कर्तृत्व आणि आध्यात्मिक अधिकाराचे स्वत:चे असे श्रेष्ठत्व आहे.
शिवाजींचे अनुकरणीय चरित्र
श्री समर्थांसारख्या अध्यात्मसंपन्न साक्षात्कारी निरपेक्ष पुरुषालाही ज्याची स्तुती करण्याची इच्छा झाली, त्या शिवाजीच्या रूपाचे स्मरण करा, त्यांच्या प्रतापाचे, उद्यमाचे, नीतिचातुर्याचे, पवित्र गुणांचे, त्यांच्या सर्व गोष्टींचे स्मरण करा, असा उपदेश करण्याची प्रेरणा झाली. त्या छत्रपती शिवरायांच्या महत्तेचे वर्णन कोण करू शकते? प्रत्यक्ष गुरूच ज्याची स्तुती करताना थकत नाहीत, त्याचे चरित्र, त्याचे विविध पैलू किती प्रेरक व अनुकरणीय आहेत. महाकवींच्या प्रतिभेसाठी सुयोग्य विषय आहे. म्हणूनच त्यांच्या समकालीन महाकवी परमानंदांनी देववाणीत त्यांचे चरित्र गायले आहे. महाकवी भूषण यांनीही त्यांच्या चरित्रातील प्रसंगांनी आपले काव्य विभूषित करण्यात धन्यता मानली.
आजही धर्मश्रध्देची ग्लानी चरमसीमेवर पोहोचली आहे. गोमाता कण्हत आहे. धर्मग्लानीबरोबरच मातृभूमीची श्रध्दाही शिथिल झाली आहे. समाजाचे जीवन स्वत्व हरवून बसल्याने अस्ताव्यस्त झाले आहे. आपापसातीलर् ईष्या, द्वेष, मत्सर, असूया, कलह इत्यादी शिगेला पोहोचले आहेत आणि देशाच्या सीमेवरील शत्रू आक्रमण करण्याच्या योग्य संधीची वाट बघत सज्ज उभे आहेत. स्व-परविवेकभ्रष्टतेमुळे बुध्दिमान म्हणवणाऱ्यांची बुध्दीही भ्रष्ट झाली आहे. विश्वासघात, देशद्रोह करणारे उजळ माथ्याने मुक्त संचार करून जनसामान्यांना पथभ्रष्ट करण्यात गुंतले आहेत. व्यक्तीच्या नात्याने उच्चपदस्थही शुध्द चारित्र्याला जीवन उपेक्षित किंवा तुच्छ समजून सूक्तासूक्त कुठल्याही मार्गाने धनप्रतिष्ठा, पद प्राप्त करण्यासाठी, ती टिकवण्यासाठी आतुर झाले आहेत आणि एक प्रकारे शत्रू वाट बघत असलेल्या योग्य वेळेला ते आणखी लवकर आणण्यात हातभार लावत आहेत. अशा स्थितीत आदर्श, चारित्र्यसंपन्न, धर्मभक्त, साहसी, नीतिचातुर्याची मूर्ती, संघटनकुशल जगज्जेता, शत्रुंजय, स्वराज्यसंस्थापक श्री छत्रपती शिवाजींचे स्मरण करणे अतिशय उपकारक होईल.
(हिंदीचे सुविख्यात कवी, पं. श्यामनारायण पांडेय लिखित 'छत्रपती शिवाजी महाकाव्य' (सन 1968) या ग्रंथासाठीची संपादित प्रस्तावना. 'समग्र गुरुजी - खंड 6'मधून साभार)
-आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/