शिवप्रेरित स्वराज्याची राजगादी रायगड

स्रोत: विवेक मराठी    दिनांक12-Feb-2020

महाराजांनी आपल्या रांगड्या सोबत्यांबरोबर सह्याद्रीच्या दर्याखोर्यात हिंडताना स्वराज्याचे स्वप्न पाहिले. ते प्रत्यक्षात उतरवताना याच बेलाग कडाकातळांच्या आधाराने शौर्याचा, निष्ठेचा एकेक मानदंड रोवला. त्या सगळ्याचे स्मरण म्हणून हा भणाणता वारा अंगावर घेत वर्तमानाला तोंड देण्याचे धैर्य गोळा करावे.

 
Raigad_1  H x W

प्रिय जयराज,

हे पत्र रायगडावरून, थेट शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यापाशी बसून लिहीत आहे. वारा भणाणत आहे. आणखी थोड्या वेळाने सूर्य अस्ताला जाईल आणि किर्रर्र अंधारात मी माझ्या मुक्कामी पोहोचेन, त्याआधी हे.

कोणत्याही स्वातंत्र्यप्रिय स्वाभिमानी माणसाला असावे, तितकेच हे ठिकाण मलाही प्रिय आहे, काळजाजवळचे आहे. तूही इथे ये. जमल्यास एकटाच ये. रोप वेने नको, पायथ्यापासून चढायला सुरुवात कर. जिथे जिथे दम खाण्यास थांबशील, तिथे तिथे तुला आपल्या पूर्वजांचा संघर्ष आठवेल. एक नाही, अनेक - अगदी शहाजीराजांनी निर्माण केलेल्या तंजावर राज्यापासून तेएक किल्ला एक वर्ष लढवला तरी हे स्वराज्य साडेतीनशे वर्षे टिकेलअसे म्हणून स्वराज्य वाचवण्यासाठी स्वत:च्या प्राणांचे बलिदान देणारे छत्रपती शंभूराजे आणि वेळप्रसंगी स्वत: हातात तलवार घेणार्या आणि लोकांची उमेद टिकवून ठेवणार्या ताराराणीपर्यंत आणि त्यानंतरचेही सगळे आठवेल. सतत संघर्षरत राहिलेली माती, हीच आपली ऊर्जा आणि हेच आपले संचित!

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

तू बराच धाकटा आहेस, पण आम्ही घडलो-बिघडलो ते इतिहासाविषयी कोणताही संभ्रम नसण्याच्या काळात. आमचा इयत्ता चौथीचा इतिहास म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास! अगदी शिवनेरीपासून ते रायगडाच्या त्यांच्या समाधीच्या चित्रापर्यंत - सचित्र शिवाजी. ते चौथीचे पुस्तक ज्या कोवळ्या डोळ्यांनी वाचले, पाहिले, त्यातून पुढे कित्येक पुस्तकांची पाने उघडली, अनेक भुईकोट, डोंगरी, सागरी किल्ल्यांच्या अनघड वाटा उलगडत गेल्या.


Raigad_1  H x W

संघर्षाचा इतिहास नेहमी प्रेरणादायक असतो. तट, बुरुज, टेहळणीच्या जागा वर्तमानाला हाका देतात. चुकत असेल तर वाट दाखवतात. तू परवा मला सातार्याची गादी आणि कोल्हापूरची गादी, हे काय आहे असे विचारले होतेस. तुला ती सगळी वंशावळ, त्यातले बारकावे सांगताना आपल्याला अजून सगळे नीट आठवते, हे जाणवून मस्त वाटले; परंतु त्याचबरोबर एक बारीकसे भय मनाला चाटून गेले - इतिहासकथनाचे भय!

मला जर मनापासून, एकदम स्वयंस्फूर्तीनेशिवाजी महाराज की जयअसे जोरात म्हणायचे असेल, तर मनातल्या मनात मी दहादा विचार करेन. चारचौघात मी अशी आरोळी ठोकलीच तर आधी मला माझी जात विचारली जाईल. त्यावरून तिला अस्मितेचे वजन लावले जाईल. माझा गाव, प्रांत विचारला जाईल, त्यावरून त्याला हेतू चिकटवले जातील. हा उमदा राजा माझाही आहे, हे साधे म्हणणेही किती वेडेवाकडे करून ऐकले जाईल याचा भरवसा राहिला नाही. वातावरणात झालेला हा बदल बघून, माझ्यातल्या सामान्य माणसाला भय वाटते. ‘ज्यांना इतिहासाचे विस्मरण होते, ते इतिहास घडवू शकत नाहीतहे बाबासाहेबांचे वाक्य खरेच, पण किती प्रकारच्या स्वार्थी हेतूंनी प्रेरित होऊन या इतिहासाचे स्मरण होत आहे, ते पाहून, ऐकून मन विषण्ण होते. इतिहासातील लोकोत्तर नेत्यास आदर्श मानणे, त्याच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन राजकीय पक्षबांधणी करणे, अगदी त्याचा राजकारणासाठी वापर करणे हेही मी समजू शकते. कारण, सत्तेची चूल पेटती ठेवायची म्हणजे इतिहासातील असे चंदनही जाळले जाते. परंतु एकाच इतिहासाच्या तपशिलांकडे आपल्याला सोयीस्कर त्याच चश्म्यातून बघितलेले दिसते, दुसर्याला खोटे पाडून स्वत:ला खरे सिद्ध करण्याच्या दुराग्रहापायी जातीजातींमध्ये, समाजातल्या विविध घटकांमध्ये पाडली जाणारी दुही दिसते, तेव्हा मी हतबुद्ध होते.

 
 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

पुढच्या पिढीला कोणता इतिहास सांगावा, काय आदर्श सांगावेत, कसे सांगावेत या बाबतीत एक विचित्र गोंधळ झाला आहे, तयार केला गेला आहे.

समाजमाध्यमांतून इतिहास किती स्तरांवर विकृत होऊन कॅन्सरसारखा पसरत आहे, ते तिथे एखादा डिजिटल फेरफटका मारलास तर तुझ्या लक्षात येईल. या विकृतीकरणाच्या विस्फोटक काळात, इतिहास निरनिराळ्या रंगांत रंगवला जात आहे. सर्व बाजूंनी समाजमनाला पोखरणार्या इंटरनेट युगात ते रोखणे शक्यही नाही. मग अशा वेळी काय करावे? अशा वेळी, आधुनिक म्हणवली जाणारी सगळी संपर्काची साधनसुविधा दूर ठेवावी आणि इतिहास थेट आपल्या वर्तमान काळजात जिवंत ठेवणार्या खर्याखुर्या गड-कोट-किल्ल्यांवर भटकायला निघून जावे. हा असा भणाणणारा वारा डोळ्यांवरची झापडे उडवून लावतो. आपल्याच इतिहासाकडे स्वच्छ नजरेने पाहायला शिकवतो.

महाराजांनी आपल्या रांगड्या सोबत्यांबरोबर सह्याद्रीच्या दर्याखोर्यात हिंडताना स्वराज्याचे स्वप्न पाहिले. ते प्रत्यक्षात उतरवताना याच बेलाग कडाकातळांच्या आधाराने शौर्याचा, निष्ठेचा एकेक मानदंड रोवला. त्या सगळ्याचे स्मरण म्हणून हा भणाणता वारा अंगावर घेत वर्तमानाला तोंड देण्याचे धैर्य गोळा करावे.

आणखी काय लिहू? अंधारून येत आहे. मला आता पुढचे दिसत नाही. पण हा तेजस्वी पुतळा खोल अंधारात डोळे खुपसून उद्याच्या सूर्योदयाची आराधना करत राहणार, हे मला माहीत आहे.

 

इतिहास आणि वर्तमान यांच्या संधीक्षणापाशी हे पत्र थांबवते.

आल्यावर भेटू. हो, आपल्या बलदंड वाचनालयात चौथीचे इतिहासाचे पुस्तक तुला मिळेल. नाहीतर गूगल कर. बघ, कोणतेही बिरूद लागलेली स्वातंत्र्याची धडाडी मुखपृष्ठावरच कशी उठून दिसते ते!

तुझी,

शिवकन्या.