'राष्ट्राय नम:' राजपाल पुरी यांचा प्रेरक जीवनपट

स्रोत: विवेक मराठी    दिनांक12-Feb-2020   

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्याकडे वाटचाल करणाऱ्या प्रतिकूल काळात संघाने सिंध प्रातांची जबाबदारी राजपाल पुरी यांना प्रचारक म्हणून दिली. हे आव्हान त्यांनी स्वीकारले आणि केवळ आठ वर्षांच्या काळात राष्ट्राप्रती आपुलकी वाटणाऱ्यांचा गोतावळा त्यांनी निर्माण केला. नुकतेच त्यांच्या जीवनकार्याचे दर्शन घडविणारे, तसेच तात्कालीन सिंध प्रांत, भारत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यप्रणाली, असे बरेच विषय 'राष्ट्राय नम:' या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत पार पडले.

rajpal puri_1  

 

1918 साली सियालकोटमध्ये जन्मलेले राजपाल पुरी वयाच्या 21 व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी यांच्या आदेशानुसार सिंध प्रांतात प्रचारक म्हणून गेले. तत्कालीन स्वातंत्र्यपूर्व सिंध प्रांतातील सिंधी समाजाची परिस्थितीत अतिशय संपन्न, श्रीमंत किंवा कसलीही ददात नसल्यासारखीच होती. स्वत:च्या व्यापार-धंद्यात आणि पैसा कमावण्यात गुंग झालेला हा समाज होता आणि त्या समाजात हिंदुत्वाची, राष्ट्रवादाची ज्योत जागवण्याचे काम राजपाल पुरी यांना करायचे होते. मी-माझे हा विचार सोडून आपण-आपले इथपर्यंत तिथल्या समाजाला घेऊन यायचे होते.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

 

 

राजपाल पुरी यांच्यासमोर असे करणे एखाद्या आव्हानाहून कमी नव्हते. परंतु, राजपाल पुरी यांनी ते आव्हान स्वीकारले आणि ते हिंदुत्वाच्या-राष्ट्रीयत्वाच्या कामाला लागले. सिंध प्रांतात त्यावेळी मुस्लिमांची लोकसंख्या 70 टक्के तर सिंधी किंवा हिंदू समाजाची लोकसंख्या 30 टक्के इतकी होती. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्याकडे वाटचाल करणारा तो काळ असल्याने, मुस्लिम लीग वगैरे कट्टरवाद्यांचा प्रभाव वाढलेला असल्याने सिंधमध्ये दोन्ही समाजात तणावाची परिस्थितीही होतीच. परंतु, सिंधी समाजाचे त्याकडे म्हणावे तितके लक्ष नव्हते.

 

प्रचारक म्हणून आलेल्या राजपाल पुरी यांनी मात्र सिंधमध्ये आपल्या हिंदू बांधवांच्या एकत्रीकरणाचे काम हाती घेतले आणि जगाची फिकीर नसलेल्या सिंधी समाजाला त्यांनी स्वत:च्या धर्माची, देशाची चिंता करणे किती गरजेचे आहे, हे पटवून दिले. परिणामी दैनंदिन गाठीभेटी-संपर्काच्या माध्यमातून सिंधमध्ये धर्म व राष्ट्राप्रती आपुलकी वाटणाऱ्यांचा गोतावळा त्यांनी निर्माण केला. सिंधमध्ये संघाच्या शाखा सुरू झाल्या आणि त्यात 20 हजारहून अधिक बाल-तरुण स्वयंसेवक दाखल झाले.

 

सिंधी समाजातून इतक्या मोठया प्रमाणावर बाल-तरुणांनी शाखेवर येणे हे खरेच आश्चर्य होते. परंतु, त्यापुढचा चमत्कार म्हणजे राजपाल पुरी यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाने तब्बल 72 प्रचारक सिंधी समाजातून निर्माण झाले. विशेष म्हणजे राजपाल पुरी यांनी हे सर्व काम केले ते केवळ आठ वर्षांच्या काळात. नंतर भारताची फाळणी झाली आणि शेकडो, हजारोंच्या संख्येने सिंधी बांधव आपली मायभूमी सोडून भारतात विविध ठिकाणी स्थायिक झाले.

 

फाळणीचा काळ अतिशय दुर्दैवी घटनांनी भरलेला होता. कट्टर, धर्मांध मुस्लिमांनी सिंधी हिंदूंच्या चालवलेल्या कत्तली, बलात्कार आणि अत्याचारांनी कळस गाठला. मात्र, जीवाच्या आकांताने धावणाऱ्या सिंधी समाजाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आधार दिला. राजपाल पुरींचा या सगळयातला सहभाग अतिशय मोलाचा. म्हणूनच सिंधी समाज आजही राजपाल पुरी यांनी आपल्या अस्तित्वासाठी दिलेल्या योगदानाचे ऋण व्यक्त करताना दिसतो.

 
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

देशाच्या फाळणीनंतर राजपाल पुरी यांनी पंजाब, महाराष्ट्र, गुजरातसह देशभरात विविध ठिकाणी काम केले आणि वयाच्या 59व्या वर्षी त्यांचे निधन झाले. परंतु, वयाची साठी उलटण्याआधीच त्यांनी करून ठेवलेले कार्य सिंधी समाज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सर्वच स्वयंसेवक व प्रचारकांसाठीही एका दीपस्तंभासारखेच आहे. कारण राजपाल पुरी यांच्या ऐन उमेदीचा काळ हा अतिशय विषम परिस्थितीत कार्य उभे करण्यात गेला.

 

राजपाल पुरी यांच्याविषयी सांगण्याचे कारण म्हणजे, नुकतेच त्यांचे पुत्र रोहित पुरी यांनी आपल्या वडीलांच्या जीवनकार्यावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन. राजपाल पुरी फाऊंडेशन आणि भारतीय सिंधी समाजाच्या संयुक्त विद्यमाने 'राष्ट्राय नम:' या राजपाल पुरी यांच्या जीवन व कर्तृत्वाचा लेखाजोखा मांडणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन 10 फेब्रुवारीला मुंबई येथे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते झाले.

 

पुस्तक प्रकाशनाच्या वेळी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि राम नाईक यांनी आपले मनोगत मांडले. 'परिसाच्या स्पर्शाने केवळ लोखंडाचे सोने होते. परंतु, राजपालजींसारख्या परीसाच्या संपर्कात आलेल्याचे सोने नव्हे तर ती व्यक्ती स्वत:च परीस झाल्याचे सरसंघचालकांनी म्हटले. त्या इतिहासाची पुनरावृत्ती या जीवनचरित्रातूनही होईल व अनेकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

सोबतच, 'आपल्या किंवा कोणत्याही व्यक्तीच्या वा समाजाच्या पूर्वजांनी परिश्रम केले, कष्ट उपसले म्हणून भावी पिढीला चांगले दिवस येतात. आपल्या पूर्वजांनी केलेल्या परिश्रमाची आठवण आपण नेहमी ठेवली पाहिजे. राष्ट्राय नम: या पुस्तकाच्या माध्यमातून तेच काम झाल्याचे दिसते', असेही त्यांनी सांगितले. फाळणीच्या काळात सिंध व नंतर संकटाच्या काळात भारतात राजपालजींनी केलेले कार्य मोठे पराक्रमी आहे. अर्थात हे काम केवळ देश व समाजाप्रतीच्या आपुलकीच्या. आपलेपणाच्या भावनेनेच त्यांनी केले. हीच आपलेपणाची भावना इतरांतही रुजावी. ते काम हे पुस्तक करेल, अशी अपेक्षा सरसंघचालकांनी व्यक्त केली.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

इस्रायलचे उदाहरण देत डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, आपल्या मातृभूमीप्रतिच्या श्रध्दा व निष्ठेने ज्यू समाजाने आपले राष्ट्र पुन्हा निर्माण केले. तब्बल 1800 वर्षे ज्यू समाजाने आपल्या मायभूमीत परतण्याची कांक्षा जागृत ठेवली आणि ते त्यांनी करून दाखवले. 'फाळणीमुळे सिंध प्रांत पाकिस्तानात गेला. परंतु, सिंध आपला आहे, ही भावना सिंधी समाजच नव्हे तर प्रत्येक भारतीयाने-हिंदुने मनात बाळगली पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीलाही सांगितली पाहिजे. सिंधला कधीही विसरता कामा नये, उलट सिंधमध्ये एक दिवस सिंधी हिंदू असलाच पाहिजे, असे मत यावेळी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले.

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, माझ्या आयुष्यावर ज्या सिंधी समाजातील व्यक्तींचा प्रभाव पडला त्यांतले राजपालजी एक होते. हशू आडवाणी, झमटमल वाधवानी आणि राजपाल पुरी या त्रिमूतींचे माझ्या यशात मोठे योगदान आहे. लालकृष्ण अडवाणी यांच्या रुपात मला चौथा सिंधी भेटला. या चौघांचे ऋण व्यक्त करण्यासाठी पुस्तक प्रकाशनाच्या रुपाने मला संधी मिळाली. राजपाल पुरी सिंध सोडून भारतात आले तेव्हा त्यांना किती अडचणी आल्या असतील याची आपण कल्पना करू शकतो. त्यांच्या आयुष्याचा परामर्श या पुस्तकात घेण्यात आला आहे. या पुस्तकाचा सिंधी भाषेत तसेच अन्य भाषांमध्ये अनुवाद व्हावा जेणेकरून भावी पिढीला हे संचित उपलब्ध होईल, असे मत राम नाईक यांनी व्यक्त केले.

पुस्तकाचे लेखक आणि राजपाल पुरी यांचे पुत्र रोहीत पुरी यावेळी म्हणाले की, सिंधी समाजाला राष्ट्रीय विचारांकडे वळवून सात ते आठ वर्षांत संघाचे 72 प्रचारक देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य राजपाल पुरी यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, वकिली आणि उद्योजक व श्रमिकांतील समन्वय यांतील संतुलन हे त्यांचे वैशिष्टय होते. मनुष्यनिर्माणाच्या कार्यात त्यांचे अनन्यसाधारण असे योगदान आहे. वास्तविक त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा काही वर्षांपूर्वीच मी पुस्तकाच्या माध्यमातून घ्यायला हवा होता, असे वाटते. आज बाळ देसाई यांच्या प्रेरणेने हा ग्रंथ आकाराला आला आहे, असे त्यांनी सांगितले.

 

राष्ट्राय नम: या पुस्तकात केवळ राजपाल पुरी यांच्या कार्याचीच माहिती नाही तर तत्कालीन सिंध प्रांत, भारत, फाळणीचा काळ, लोकसंख्येचे या भूमीतून त्या भूमीत जाणे, समोर आलेली संकटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यप्रणाली आणि राजपाल पुरी यांच्या प्रसिध्दीपराङमुख व्यक्तिमत्त्वाचे दर्शनही या पुस्तकातून घडते.

 

पुस्तकाची छपाई, बांधणीदेखील उत्तम असून संस्मरणीय छायाचित्रांचा समावेशही त्यात केलेला आहे. त्यामुळेच त्याची वाचनीयता आणि संग्राह्य मूल्य वाढले आहे.

 

- महेश पुराणिक

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/