हिंदुत्वाचे अधिष्ठान भक्कम करणारा ऋषी पी. परमेश्वरन

स्रोत: विवेक मराठी    दिनांक14-Feb-2020

 परमेश्वरन रा. स्व. संघाचे प्रचारक असले तरी केरळचे प्रसिध्द चिंतक म्हणूनच नावाजलेले आहेत. परमेश्वरनजी म्हणजे एक ग्रंथालय... मूल्यांचा समूच्चय... भारतीय तत्त्वांचा खजिना होय! त्यांच्या कार्याची यादी केल्यास त्याचेच एक खंड बनेल. गेल्या सात दशकांपासून त्यांचे जीवन केवळ समाज, धर्म आणि भारतमातेसाठीच समर्पित आहे. त्यामुळेच देवभूमीत अनेक सामाजिक बदल झाले. 

  
Veteran RSS 'pracharak' P

2018मध्ये पद्मविभूषण अन् 2019मध्ये राष्ट्रपती भवनात 1 कोटी रुपयांचा महात्मा गांधी शांतता पुरस्कार स्वीकारून ती संपूर्ण रक्कम पुलवामा हत्याकांडातील जवानांच्या कुटुंबियांसाठी केंद्र सरकारला परत करणारा 94 वर्षांचा महात्मा... पी. परमेश्वरन यांची ही सार्थ ओळख म्हणता येणार नाही.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 भारतीय विचार केंद्राच्या माध्यमातून आपले कार्यक्षेत्र असलेल्या केरळमध्ये वैचारिक नवनिर्माणाचे अथांग कार्य उभे करणारे, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या संघटनेला दिशा देणारे, हिंदुत्वाचे वैचारिक अधिष्ठान भक्कम करणारे, भारतीय दृष्टीकोनातून मार्क्सची चिकित्सा करणारे, आधुनिक काळातील मूलभूत प्रश्नांवर सारगर्भ शाश्वत चिंतन मांडणारे ऋषी होते परमेश्वरनजी.


8 फेब्रुवारी 2020 रोजी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. ओडिशातील भुवनेश्वर येथे विवेकानंद केंद्राची अखिल भारतीय अधिकारी बैठक सुरू असतानाच ही वार्ता थडकली. विवेकानंद केंद्राची अखिल भारतीय अधिकारी बैठक ही परमेश्वरनजी यांचीच संकल्पना. पूर्वी केंद्राच्या कामाचा वार्षिक आढावा घेण्यासाठी हितचिंतकांची बैठक होत असे. परंतु, कार्याचा विस्तृत आढावा घेत घेत पुढील वर्षाच्या कामाचे नियोजन करण्यासाठी देशभरातील प्रमुख कार्यकर्ते एकत्र आले पाहिजेत आणि दरवर्षी वेगवेगळया राज्यात ही बैठक असते. यंदा प्रकृती ठीक नसल्यानेच त्यांना प्रवास अशक्य झाला होता. त्यामुळे ते 2020च्या भुवनेश्वर बैठकीला उपस्थित राहू शकले नव्हते. एका कौटुंबिक सोहळयात सहभागी झाले असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले.

परमेश्वरनजी हे भगवद्गीता, भारतीय इतिहास, आदिशंकराचार्य, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद या विषयांवरील समर्थ भाष्यकार. त्यांच्या जीवनावर स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वज्ञानाचा खोलवर प्रभाव होता. स्वामी विवेकानंद यांचे पुढील वचन त्यांनी आत्मसात केले होते - ''ऋषींनी जे शिकविले ते केवळ ग्राहण करायचे असे नाही. ऋषी आता काळाच्या पडद्याआड गेले आणि त्यांची मतेही पडद्याआड गेली. आता आपणच ऋषी झाले पाहिजे. ...काही थोडया लोकांनी तरी उठून उभे राहावे आणि म्हणावे की, परमेश्वराखेरीज आम्हाला अन्य इप्सित नाही. जगासाठी धर्मजागरण करणे हेच आमचे जीवितकार्य... श्रेष्ठ त्यागातूनच श्रेष्ठ कार्य उभे राहते. माझ्या शूर, गुणी मुलांनो! आपल्या योजनांवर काम करण्यासाठी स्वत:ची सर्व शक्ती वेचा! नाव, कीर्ती किंवा असल्या क्षुद्र गोष्टींच्या मागे लागू नका. झोकून देऊन काम करा... सामर्थ्य येईल, वैभव येईल, सद्गुण येतील, शुचिता येईल ! जे उदात्त, उत्तम, उन्नत आहे ते सारे येईल...!''

स्वामी विवेकानंदांच्या या विचारांना पुढे ठेवूनच परमेश्वरनजी यांनी जणु आपले जीवन घडवले होते. होय... घडवले होते... जाणीवपूवर्क घडवले होते... असे म्हणणेच अधिक योग्य आहे. कारण केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यातील मुहम्मा या छोटयाशा खेडयात सन 1927 मध्ये जन्मलेले परमेश्वरनजी शाळकरी वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. शिक्षण सुरू असतानाच त्यांच्यावर त्याग, समर्पणाचे संस्कार होत होते. बालपणीच त्यांच्या मनात अध्यात्माविषयी आकर्षण निर्माण झाली. त्यामुळे ते आद्य शंकराचार्यांची जन्मभूमी असलेल्या केरळातील कालडी येथे स्वामी अगमानंद यांना भेटायला गेले. त्यांना रामकृष्ण मिशनचे प्रमुख श्री रंगनाथानंद यांच्याकडून मंत्रदिक्षा मिळाली. शिक्षण पूर्ण होताच वयाच्या 27व्या वर्षी - 1954मध्ये संघाचे प्रचारक म्हणून स्वत:ला राष्ट्रकार्यात समर्पित केले. आपली जीवनयात्रा कोणत्या मार्गाने घेऊन जायची, हे विचारपूर्वक ठरवले आणि तब्बल सात दशके त्या मार्गावरून वाटचाल केली. भारतवर्षाच्या पुनरुत्थानासाठी स्वामी विवेकानंदांनी आखून दिलेला हा मार्ग होता. रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. के. ब. हेडगेवार यांनी दाखवलेला मातृभूमीसाठी स्वर्वस्व समर्पणाचा हा मार्ग होता.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 

केरळमध्ये संघाच्या ज्या तीन प्रचारकांनी सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणले त्यातील एक प्रमुख नाव - पी. परमेश्वरन. एकांतिक धर्मियांनी आणि कम्युनिस्टांनी उभ्या केलेल्या हिंस्र संग्राामात तसूभरही मागे न हटता आघातांमागून आघात पचवून संस्कृतीचा प्रवाह अखंड ठेवण्याचे कार्य ज्या देवदुर्लभ कार्यकर्त्यांनी उभे केले, त्यात परमेश्वरनजींचे स्थान अग्राणी राहिले.

Veteran RSS 'pracharak' P

केरळमधील दक्षिण टोकापासून उत्तरेच्या कासरगोडपर्यंतच्या गावागावात अन् घराघरांत परमेश्वरनजींचे नाव घेतले जाते. याचे कारण त्यांची वैचारिक शक्ती आणि त्यांचे त्यागमय जीवन. स्वत:चे असे काही नाही. किमान घरही नसलेला हा माणूस काही वर्षांतच केरळचे स्वरूप बदलून उत्तर भारताकडे वळला. यांचाच वैचारिक प्रभाव की ज्यामुळे कम्युनिस्ट मार्क्सला सोडून स्वामी विवेकानंदांचा फोटो ठेवून कार्यक्रम करू लागले! याचा परिणाम कम्युनिस्ट कार्यकर्त्यांवर दिसू लागला. कम्युनिस्ट कार्यकर्ते आपली ओळख विसरून जातील, अशी भीती वाटल्याने कम्युनिस्टांनी लवकरच विवेकानंदांना दूर केले हे वेगळे सांगायला नको.

पी. परमेश्वरनजी हे भारतीय संस्कृतीचे भाष्यकार असले तरी जगभरातील विचारवंत, तत्त्वज्ञ आणि जगाचा इतिहास याचा सूक्ष्म अभ्यास त्यांच्या विद्वत्ताप्रचुर लेखनातून डोकावतो. भाषा विद्वत्ताप्रचुर असली तरी लेखन बोजड नाही. संशोधन, लालित्य आणि सुगमता यांचा संगम त्यांच्या लेखनात आहे. परमेश्वरनजी म्हणजे एक ग्रांथालय... मूल्यांचा समूच्चय... भारतीय तत्त्वांचा खजिना होय! त्यांच्या कार्याची यादी केल्यास त्याचेच एक खंड बनेल. गेल्या सात दशकांपासून त्यांचे जीवन केवळ समाज, धर्म आणि भारतमातेसाठीच समर्पित आहे.
 


संस्कृतीवर आघात न करता बदल घडवणारा सुधारक

केरळमध्ये कर्कटक मास म्हणजे धो धो कोसळणारा पाऊस. फेसाळत येणारा समुद्र. किनाऱ्यावरील वादळ. या महिन्यात शुभ समारंभ नाहीत. आतापर्यंत न दिसणारे आजार कर्कटक महिन्याचीच वाट पाहत होते का, असे वाटावे अशा प्रकारे पसरतात. रोग्यांना जास्तीत जास्त मरणाचे भय वाटते. जेथे तेथे भूस्खलन, दरड कोसळणे, आजार, मृत्यू, हातांना काम नाही, सर्वत्र अपशकून. सोबतच सूर्यदर्शन नाही. एकूणच मल्ल्याळींच्या वाटयाला कर्कटक मास म्हणजे अशुभ मास. हजारो वर्षांपासून त्यांच्यात रुजलेली ही भावना काळानुसार परंपराच बनून गेली. काही गोष्टींचे आचरण करायचे नाही, हे नियम बनले होते. शुभ समारंभ करायचे नाहीत. कर्कटक मासात नव्या कार्याची सुरुवात करायला मल्ल्याळी घाबरत होते. केरळमध्ये झालेल्या कोणत्याही सुधारकाला हे अशुभ मास शुभ मासात परिवर्तित करणे साध्य झाले नाही. कम्युनिस्ट वर्षानुवर्षे सत्तेत राहिले तरी त्यांनी अशुभ मासाला आणखी अशुभ बनवून ठेवले. विचित्र गोष्ट म्हणजे कालौघात कर्कटक मासाला आणखी नवीन वाईट गोष्टी चिकटल्या. काही देवस्थानांमध्ये काही पूजाही करायच्या नाहीत, हे नियमही त्यात शिरले.

मात्र गेल्या काही वर्षांपासून कर्कटक मासाविषयी असलेली ती भावना बदलली आहे. अशुभ म्हणून ओळखला जाणारा कर्कटक मास आता केरळमध्ये 'रामायण मास' बनला आहे. केरळातील प्रत्येक हिंदू घरात, प्रत्येक लहान आणि मोठया देवस्थानांमध्ये संपूर्ण महिनाभर रामायण पठण चालते. महिन्याच्या शेवटी पठण संपते. काही संघ, संस्था सामुदायिक रामायण पठण आयोजित करतात. रामायण पठणामुळे यापूर्वी लोकांच्या मनात घर केलेले अशुभ असे सर्व नियम गायब झाले आहेत. दिनदर्शिकेतही 'कर्कटक मास'च्या जागी 'रामायण मास' म्हणून छापले जात आहे. या बदलाच्या मागे होते पी. परमेश्वरनजी.


बंगळुरू येथील विचारवंत संतोष तम्मय्या यांनी पी. परमेश्वरन यांचे केरळातील योगदान अतिशय समर्पक भाषेत मांडले आहे. श्री. तम्मय्या म्हणतात, केरळ म्हटले की राक्षसी कम्युनिस्टांमुळे सतत प्राण गमावणाऱ्या केरळच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची आठवण होते. आश्चर्य वाटते. एकीकडे जिहादी धर्मांधांची दहशत, दुसरीकडे कम्युनिस्टांचे सत्ताप्रेरित खूनसत्र. रा. स्व. संघाची धुळधाण व्हायला पूरक वातावरण आहे. सकाळी शाखेवर गेलेल्या मुलाला तो घरी परतेल, हा विश्वास नाही. त्याला शाखेवर पाठवलेल्या कुटुंबीयांनाही तो विश्वास नाही. अशात केरळमध्ये देशात सर्वाधिक शाखा आहेत! शतकानुशतके निरंतर मतांध आणि बाहेरील देशांतून आलेल्या व्यापाऱ्यांच्या थेट आक्रमणाला बळी पडून केरळ अजूनही केरळ म्हणूनच आहे! ही भूमी अस्तित्व आणि आपले ऐश्वर्य टिकवून आहे. कम्युनिस्टांची सत्ता असली तरी केरळात संस्कृती टिकून आहे. याला केरळमधील रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांचे अविश्रांत श्रम हेच कारण आहे. धनदांडग्यांच्या पायावर लोटांगण न घालणाऱ्या नि:स्वार्थ कार्यकर्त्यांची अविचल निष्ठाही यामागे आहे. धर्मासाठी प्राणही देईन, हे धैर्य यामागे आहे. मल्याळींच्या या गुणानेच केरळला वाचवले आणि घडवले आहे. त्याच गुणांनी आजच्या प्रतिकूल परिस्थितीतही राज्याचे वैभव सुरक्षित राखले आहे. काही व्यक्तींनी अशा गुणवान स्वयंसेवकांना घडवले. त्यात पी. परमेश्वरन यांचे नाव अग्राणी आहे.

पी. परमेश्वरनजी यांच्यामुळेच केरळमध्ये काही सामाजिक बदल झाले. परमेश्वरन रा. स्व. संघाचे प्रचारक असले तरी केरळचे प्रसिध्द चिंतक म्हणूनच नावाजलेले आहेत. केरळमध्ये ते लिहित नसलेली वृत्तपत्रे नाहीत. त्यांना संधी न देणाऱ्या दूरचित्रवाहिन्याच नाहीत. त्यांचा सन्मान न करणारा कम्युनिस्टही नाही. असा चिंतक रा. स्व. संघ वगळता अन्य कोणत्या संघटनेत सापडेल?

परमेश्वरनजी हे अष्टपैलू होते. कवी, प्रभावी वक्ते, समाजशास्त्रज्ञ आणि त्याचबरोबर ते प्रत्ययकारी लेखकही होते. केरळातल्या अनेक मान्यवर साप्ताहिकांनी त्यांच्या कविता प्रसिध्द केल्या आहेत. त्यांनी मल्याळम् भाषेत अनेक गीते रचली आहेत. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी केरळातल्या ज्या सांघिकाला मार्गदर्शन केले होते, त्या सांघिकाचे ते मुख्य होते. 1967 साली कोझीकोडे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली जनसंघाचे अधिवेशन झाले, तेव्हा परमेश्वरनजी यांना राष्ट्रीय सचिव करण्यात आले. काही दिवसांत अटलबिहारी वाजपेयी हे जनसंघाचे अध्यक्ष झाले, तेव्हा परमेश्वरनजी यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आले. आणीबाणीत ते काही महिने कारागृहात होते. तिथून सुटून आल्यानंतर त्यांना राजकारणात चांगली संधी होती पण त्यांनी वैचारिक स्वरूपाचे काम पत्करले. त्यांनी नानाजी देशमुख यांनी स्थापिलेल्या दीनदयाळ संशोधन संस्थेचे संचालक म्हणून काम पहायला सुरुवात केली. काही दिवस हे काम करून ते 1981मध्ये केरळात परत आले आणि हिंदू संघटनेला बळकटी देणारे अनेक कार्यक्रम हाती घेतले.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 198मध्ये कोची येथे त्यांनी रा.स्व. संघाचे प्रांत प्रचारक के. भास्कर राव, ज्येष्ठ नेते पी. माधवन आणि रंगा हरी यांच्या सहकार्याने विशाल हिंदू संमेलन आयोजित केले होते. या संमेलनात तत्कालीन सरसंघचालक प्रा. राजेन्द्रसिंह तथा रज्जुभैय्या आणि डॉ. करणसिंह यांनी मार्गदर्शन केले. त्याच वेळी त्यांनी 'भारतीय विचार केन्द्रम्'ची स्थापना केली. त्याचे उद्धाटन दत्तोपंत ठेंगडी यांच्या हस्ते करण्यात आले होते. तेव्हापासून ते केरळातल्या वैचारिक विश्वाच्या क्षितिजावर झळकत होते. त्यांनी केरळात हिंदुत्व आणि राष्ट्रवादी विचार यांच्या प्रचारार्थ मोठे काम केले आहे. त्यांच्या या कामाला तोड नाही. साम्यवादी पक्षातही त्यांचे मित्र आहेत. साम्यवादी नेते इ.ए.एस. नंबुद्रीपाद यांच्याशी त्यांचे अनेकदा वाद झाले आहेत. त्यांची रामजन्मभूमीच्या वादावर झालेली प्रकट चर्चा तर वैशिष्टयपूर्ण समजली जाते आणि तिचे राजकीय क्षेत्रात नेहमीच स्मरण केले जाते.

पी. परमेश्वरन यांनी स्वत:ला सत्तेच्या राजकारणापासून कटाक्षाने दूर ठेवले. 1992मध्ये त्यांना राज्यसभा सदस्यत्व देण्यात आले होते पण त्यांनी ते नाकारले. त्यांनी मल्याळम् भाषेतल्या 'केसरी' आणि इंग्राजीतल्या 'मंथन' या साप्ताहिकाचे संपादन केले. 'युवा भारती' हे मासिक आणि 'विवेकानंद केन्द्र पत्रिका' या अर्धवार्षिकाचे ते संपादक होते. 'प्रगती' या संशोधनाला वाहिलेल्या मासिकाचेही ते संपादक होते. 1997मध्ये त्यांना कोलकत्याच्या बडा बझार लायब्ररी या संस्थेचा हनुमान प्रसाद पोद्दार पुरस्कार मिळाला. 2002मध्ये ते माता अमृतानंदमयी देवी यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या अमृता कीर्ती पुरस्काराचे मानकरी ठरले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यातली काही पुस्तके बेस्टसेलर ठरली आहेत. या संबंधात त्यांच्या श्री नारायण गुरू यांच्यावरील पुस्तकाचा अवश्य उल्लेख करता येईल. श्री अरविंदन, भावियुदे दर्शनिकन, मार्क्स आणि विवेकानंद, तसेच भगवद्गीता अशी काही त्यांची पुस्तके आहेत. 'हिंदू राष्ट्राची हृदयस्पंदने'त्यांचा हा त्यांचा तीन खंडात प्रकाशित ग्रांथ फार नावाजला गेला आहे. अशा या कर्मयोग्याला भावपूर्ण श्रध्दांजली!

- सिध्दाराम पाटील,

संपादक, विवेक विचार

8806555588

(या लेखासाठी विवेक विचार, युवा भारती या नियतकालिकांचा आधार घेतला आहे.)
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/