क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे

विवेक मराठी    15-Feb-2020
Total Views |

 **जालिंदर कांबळे**

lahuji salve_1  

 या देशात छत्रपती शिवरायांचे स्वराज परत यावे, हा देश स्वतंत्र व्हावा, येथील रयत स्वाभिमानाने जगावी, वाढावी यासाठी देशात सशस्त्र क्रांती करून या मुलकाला परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी, ज्यांनी क्रांतिशाळा सुरू केली व अनेक महान क्रांतिकारक तयार करून या देशात क्रांतीचे वादळ सुरू केले ते लहुजी वस्ताद. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1794 रोजी पुरंदरगडाच्या पायथ्याला असलेल्या पेठ या गावी साळवे कुटुंबात झाला. हे कुटुंब दांडपट्टा, तलवार, कुऱ्हाड चालवण्यात पटाईत होते. गुप्त बातम्या काढणे व माग काढणे, शत्रूसैन्यात घुसून लढणे आदी कौशल्ये या कुटुंबाकडे होती. त्यामुळे महाराजांनी त्यांना 'राऊत' ही पदवी देऊन पुरंदरच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली होती. तेव्हापासून हे कुटुंब पुरंदर किल्ल्याचे रक्षण करीत होते.

आमच्या फेसबुक पेजला
like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/


ज्यावेळी लहुजींचा जन्म झाला तेव्हा किल्ल्याची जबाबदारी त्यांचे वडील राघोजी यांच्याकडे होती
, तर दुसरे बाजीराव पेशवे यांच्याकडे सत्ता होती. तसा पुरंदर किल्ल्याला मोठा इतिहास आहे. याच किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मही झालेला असल्याने त्याचे वेगळे महत्त्व आहे. पेशवे-होळकरांमध्ये झालेल्या युध्दात हरल्यावर दुसऱ्या बाजीरावांनी इंग्राजांशी तह केला आणि होळकरांना हरवून पुणे परत घेतले. पण पेशवे नावालाच पेशवे राहिले. सर्व कारभार इंग्राज पाहू लागले. हे येथील लोकांना आवडले नाही. काही दिवसांनी दुसरे बाजीरावही वैतागले आणि लढाई करण्याचे नक्की झाले. याच काळात राघोजीने एका वाघाला जिवंत पकडून गावात आणले होते व ही खबर पेशव्यापर्यंत पोहोचली होती. म्हणून पेशव्यांनी राघोजीस पुण्याला बोलावून घेतले आणि शिकारखाना संभाळण्याची जबाबदारी दिली.

साधारण 1812च्या आसपास पेशव्यांनी राघोजींना पुण्यास बोलावून घेतले आणि शिकारखान्याची जबाबदारी सोपवली. या वेळी लहुजी ऐन तारुण्यात होते आणि सर्व शस्त्रास्त्रांमध्ये तरबेज होते. शिवाय पैलवानगीमध्ये त्यांना तोड नव्हती. त्यावेळी हे कुटुंब जनाईच्या मळयात राहत होते. पेशव्यांनी इंग्राजांशी तह करून पुण्याची सत्ता इंग्राजांकडे दिली होती. पेशवे फक्त नावालाच पेशवे राहिले होते. इंग्राजांशी युध्द करून परत सत्ता मिळवण्यासाठी तयारी चालली होती. खूप मोठे सैन्य उभे केले जात होते. या सर्वांना शस्त्रास्त्रे पुरविण्याची योग्य अशी जबाबदारी पेशव्यांनी राघोजींना दिली. कारण त्यांना सर्व शस्त्रांचे उत्तम ज्ञान होते. शिवाय ते बंदूक चालवण्यातही तरबेज होते. राघोजींनी लहुजींच्या मदतीने आपल्यावरील जबाबदारी पूर्ण केली. यानंतर लढाईसाठी सैन्याची गरज होती, म्हणून राघोजींनी मांग, रामोशी व इतर मागास जातीतील हजारो सैनिक गोळा केलेहोते.

5 नोव्हेंबर 1817 रोजी खडकीच्या परिसरात युध्दाला सुरुवात झाली. घनघोर युध्द सुरू होते. पेशव्यांच्या सैन्याचा मारा जोराने होत होता. लढाई जिंकण्याची आशा निर्माण झाली, तेव्हाच इंग्राजांचे नव्या दमाचे सैन्य आले. लढाईच्या 12व्या दिवशी इंग्राजांबरोबर लढत असताना राघोजींना वीरमरण आले. राघोजी घोडयावरून खाली पडलेले लहुजींनी पाहिले. ते खाली पडले असताना इंग्राजांचे सैनिक त्यांना लाथाने, बंदुकीच्या दस्त्याने मारत होते. लहुजींना हे पाहवले नाही. ते त्या ठिकाणी घुसले आणि वडिलांना तेथून बाहेर काढले. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. राघोजींची प्राणज्योत केव्हाच मावळली होती. काही दिवसांतच पेशव्यांचा या लढाईत पराभव झाला. शनिवारवाडयावर इंग्राजांचा युनियन जॅक फडकू लागला. भगवा उतरल्याचे दु:ख लहुजींना झाले. काही दिवस ते विचार करीत होते. 'इंग्राजांना या देशातून हाकलून लावण्यासाठी परत युध्द केले पाहिजे. पण कसे?' असा विचार करीत असताना त्यांनी शपथ घेतली की येथून पुढे जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी!

यावेळी देशात अनेक बलाढय राजे होते, सरदार होते, जवळपास 564 संस्थाने देशात अस्तित्वात होती. जर ही सर्व ताकद एकत्र आली असती, तर आज देशाचे भविष्य वेगळे दिसले असते. कदाचित या देशात केवळ हिंदूच दिसले असते, पण तशी स्वप्ने कोणी पाहिली की नाही हे काळालाच ठावूक. पण लहुजींनी असे स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी 1822ला पुण्यात गंजपेठेत तालीम सुरू केली. हीच देशातील पहिली क्रांतिशाळा जिथे अनेक क्रांतिकारी घडले. या तालमीचे उद्धाटन हे सरदार रास्ते यांनी केले. त्यावेळी लहुजींनी दांडपट्टयाचे अनेक खेळ करून दाखविले. त्याचबरोबर बंदुकीने नेम धरणे, तलवारबाजी असे मर्दानी खेळ दाखवून लोकांना व तरुणांना आकर्षित करून घेतले. यानंतर अनेक तरुण लहुजींच्या तालमीत दाखल झाले.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 

लहुजी आता वस्ताद झाले, सर्वजण त्यांना वस्ताद म्हणू लागले. तालमीत कसरत होऊ लागली. मोकळया मैदानात दांडपट्टा फिरू लागला, तर डोंगरात बंदूक धडाडू लागली. अनेक पट्टे तयार होऊ लागले. वस्ताद त्यामधील निवडक पट्टयांना वेगळे करून त्यांना मातृभूमीविषयी सांगून त्यांच्यात देशभक्ती निर्माण करू लागले. अशांचा वेगळा गट निर्माण करून त्यांनी इंग्राजांच्या विरुध्द बंडकरी तयार केले व बंडाला सुरुवात झाली. बंडकरी अनेक ठिकाणी गुप्तपणे बंड करू लागले. सुरुवातीला इंग्राजांना हे बंड वाटत नव्हते.

 

याच काळात उमाजी नाईक यांचेही बंड सुरू होते. उमाजी व लहुजी एकाच भागातील होते. गावाला लागून लागून त्यांची गावे होती. एकदा उमाजींनी एका दरोडयासाठी काही पट्टयांची मागणी वस्ताद यांच्याकडे केली. पण वस्ताद यांनी त्यांना नकार दिला. त्यावेळी ते म्हणाले, ''आमचे काम वेगळे आहे. तुम्ही इंग्राजांच्या विरुध्द लढाईला उभे राहा. माझ्यासहीत सर्वजण तुमच्याबरोबर असू. तुम्ही या मुलकाचे राजे व्हा.'' नाईकांनी इंग्राजांच्या विरुध्द बंड करून 'प्रतिसरकार'ची घोषणा केली. काही दिवसांत फुटीरतेमुळे नाईक पकडले गेले, तेव्हा वस्तादांनी त्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही.

लहुजींच्या तालमीत अनेकजण येऊ लागले, तसे ज्योतिबा फुलेही आले. लहुजींच्या आखाडयात ते तयार झाले. वस्तादांचे ते आवडते होते. त्यांच्या शैक्षणिक कार्यात वस्ताद हिमालयासारखे त्यांच्या पाठीशी उभे होते. त्या काळात वस्तादांचे नाव पंचक्रोशित गाजत होते. पुण्याच्या बाहेरूनही तरुण येत होते. पुणे, नगर सातारा या भागापर्यंत त्यांचे क्रांतिकारक पसरले होते. लहुजींनी दूरदृष्टीने दलित मुलांनी शिकले पाहिजे हे ओळखून ज्योतिबांच्या मदतीने दलित मुलांसाठी गंजपेठेत 1851 साली शाळा सुरू केली. सर्वप्रथम या शाळेत त्यांनी त्यांची पुतणी मुक्ता हिला घातले व इतर दलित मुलेही शिकू लागली.

1857च्या बंडात लहुजींचे अनेक बंडकरी सामील होते, ते सर्वच्या सर्व स्वातंत्र्यासाठी शहीद झाले. सातारच्या बंडातही अनेकजण होते, तेही पकडले गेले आणि सातारच्या झेंडा मैदानावर फाशी गेले.

लोकमान्य टिळक यांनीही वस्तादांच्या तालमीत स्वातंत्र्याचे धडे घेतले. त्याचप्रमाणे वासुदेव बळवंत फडके हे तर वस्तादांचे जीव की प्राण होते. कारण मुलकाला स्वतंत्र करण्यासाठी वस्तादांना त्यांच्या रूपाने कदाचित शेवटचा आशेचा किरण दिसत होता. वासुदेवांनी जोमाने बंडाला सुरुवात केली. इंग्राजांच्या अनेक चौक्या उध्द्वस्त केल्या, खजिने लुटले. वस्तादांना खूप आंनद होत होता, पण वासुदेव फडक्यांनाही इंग्राजानी 1879मध्ये पकडले आणि खटला भरला आणि त्यांना संगमाच्या जवळ असलेल्या तुरुंगात ठेवले. वस्ताद त्यांना तेथून सोडविण्यासाठी म्हणून संगमाच्या परिसरात असलेल्या महादेव मंदिराजवळ राहू लागले. यावेळी वस्तादांचे वयही झाले होते, तरी त्यांची इच्छाशक्ती प्रबळ होती. वासुदेवांचा खटला सुरू होऊन त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली व त्यांना संगमावरून हलवून एडनच्या तुरुंगात पाठविण्यात आले. ही बातमी वस्तादांना कळल्यावर त्यांना खूप वाईट वाटले. तेव्हा स्वत:च इंग्राजांवर हल्ला करण्याचा बेत आखून त्याच परिसरात ते राहू लागले.

अशा या क्रांतिगुरू वस्ताद लहुजींनी 17 फेब्रुवारी 1881 रोजी या जगाचा निरोप घेतला.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/