इंदुरीकर महाराज यांना विरोध का?

विवेक मराठी    16-Feb-2020
Total Views |

***रवींद्र मुळे.****

इंदुरीकर महाराज यांनी व्यसनमुक्तीसाठी केलेले प्रबोधन ऐका. पण केवळ एका वक्तव्याने काही आभाळ कोसळले आहे अशा भावनेने त्यांच्यामागे शुक्लकाष्ठ लावण्याचा जो खेळ चालू झाला आहे, तो नीट समजून घेण्याची गरज आहे.
 

mahraj_1  H x W 

अस्सल ग्रामीण ढंगात प्रवचन / कीर्तन करणारा एक प्रबोधनकार! दीड दीड तास, दोन दोन तास लोकांना खिळवून ठेवणारा. त्यांच्या विषयात धार्मिक आधारावर प्रबोधन! कुटुंब एक राहावे म्हणून उपदेश! ग्रामीण लोकांना समजेल अशी भाषा. बेधडक बोलणे.

हल्लीच्या राजकारणी लोकांना पक्ष कुठलाही असला, तरी महाराज चुकले तर सोडत नाहीत. परवाच्या एका प्रवचनात म्हणे त्यांनी संतती होण्याच्या संदर्भात काही विधाने केली. (त्याला खरे तर जुन्या आयुर्वेद ग्रंथातील शास्त्रीय आधार आहेच.) त्यांनी आजच्या काळात हे मांडण्याची गरज होती का? यावर चर्चा होऊ शकते. त्यांनी मोबाइल आणि इंटरनेटद्वारे तरुणांना, मुलामुलींना केलेले प्रबोधन ऐका. त्यांनी व्यसनमुक्तीसाठी केलेले प्रबोधन ऐका. पण केवळ एका वक्तव्याने काही आभाळ कोसळले आहे अशा भावनेने त्यांच्यामागे शुक्लकाष्ठ लावण्याचा जो खेळ चालू झाला आहे, तो नीट समजून घेण्याची गरज आहे.

एकदा का पुरोगामी महाराष्ट्रअशी आरोळी दिली आणि फुले-आंबेडकर-शाहू महाराज यांचा महाराष्ट्रअशी सुरुवात केली की महाराष्ट्रातील सगळ्या विचारवंतांना हिंदू धर्माला शिव्या देण्याचे लायसन्स मिळते, असा येथील तथाकथित विचारवंतांचा समज झाला आहे. मग देव नाकारणे, हिंदू श्रद्धांना थोतांड मानणे, हिंदू श्रद्धांना अंधश्रद्धा म्हणून हिणवणे ही त्यांची पुढची पायरी. याच पद्धतीने येथील वारकरी संप्रदाय, ... महाराज यांच्या कार्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत हाजच्या यात्रेला सगळ्या सवलती देताना वारी, वारकरी यांच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेले. शाहू महाराजांचे आजचे वारस आणि महाराजांचे प्रत्यक्ष कार्य याकडे दुर्लक्षच केले गेले.

डों. बाबासाहेब यांची विचारसरणी सिलेक्टिव्ह ठेवत, त्यांनी हिंदू धर्माबद्दल कोरडे ओढले ते फक्त सांगायचे, पण त्यांनी बौद्ध धर्म का स्वीकारला, त्यामागचे त्यांचे म्हणणे सांगायचे नाही. त्यांचे पाकिस्तानबद्दलचे विचार हे पुरोगामी कधी सांगणार नाहीत. काँग्रेसशी त्यांचे झालेले मतभेद नेमके कोणते, हे सांगणार नाहीत. इंदुरीकर महाराजांना लक्ष्य करताना हा सिलेक्टिव्ह पुरोगामीपणा आहे.

महाराष्ट्राच्या जनतेने हे जाणून घेणे गरजेचे आहे की नाताळ आणि तत्सम ख्रिश्चन सण असताना जी भाषणे होत असतात, जाहिराती केल्या जातात, येशू अवतरणार असे सांगितले जाते; तुमचे आजार, मुलेमुली होणे अशा सर्व समस्यांना उत्तर एकच सांगितले जाते – तुम्ही ख्रिश्चन झाले पाहिजे... कधी कुठले वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया यावर आवाज उठवताना दिसत नाही

काल काही बांधवांनी इस्लाम धर्म स्वीकारला, त्यावर एका वृत्तपत्रात बातमी आली – जातीच्या भिंती तोडल्या गेल्या! इस्लाम धर्मात नंतर धर्म बदलल्यावर त्यांना वेगळे ठेवले जाते, हे त्यांनी माहीत करून घेतले पाहिजे. तेथेसुद्धा जाती आहेत, पण हे पुरोगामी त्याबद्दल कधी बोलणार नाहीत. मशिदीत अथवा मदरशात आजही अत्यंत जुनाट प्रकारचे, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे जे शिक्षण दिले जाते, त्यावर कधी नाही बोलणार! हाच त्यांचा selective पुरोगामीपणा!

इंदुरीकर महाराज हिंदू धर्मातील चुकीच्या अनेक परंपरा लाथाडून द्या असे सांगतात, पण हिंदू धर्माचा रास्त अभिमानही बाळगतात! धर्माद्वेष्ट्या मंडळींविरुद्ध आपल्या बोलण्यातून चाबूक चालवतात! हे ह्यांना सहन होत नाही. म्हणून मग अशा लोकांबद्दल संधी शोधतात आणि वेळ आली की त्यांच्या पुरोगामी ecosystemमधून अतिशय सुनियोजित हल्ला करतात. आज सगळ्या कीर्तनकारांनी, वारकरी मंडळींनी एकत्र येउन ही पुरोगामी पिलावळ उघडी करण्याची गरज आहे. अशा मंडळींना सोयीस्कर आश्रय देणारे राजकारणी उघडे करण्याची गरज आहे.

महाराजांची शैली, मांडणी किंवा विचार याबाबत मतभेद असू शकतात, पण एक नक्की तमाशाला जाणारा ग्रामीण माणूस त्यांनी प्रवचनाकडे आणला. तरुण, बाल, स्त्रिया, मुली यांना त्यांनी प्रवचन ऐकण्यासाठी बसायची सवय लावली. पण ज्यांना भगवा ध्वज, भगवा फेटा आणि भगवा रंग यांची कावीळ झाली आहे, त्यांना इंदुरीकर महाराज खटकणारच. गेल्या काही वर्षांपासून वारकरी संप्रदाय आणि कीर्तनकार-प्रवचनकार सामाजिक आणि प्रचलित परिस्थितीवर बोलायला लागले. त्यातून जनजागृती होण्यास सुरुवात होते आहे, त्याचा परिणाम म्हणून लोकांची राजकीय परिपक्वता वाढते आहे. ज्यांना हे नको आहे, ते अस्वस्थ आहेत; पण प्रत्यक्ष काही म्हटले, तर त्यांच्या पुरोगामित्वाच्या खोट्या प्रतिमेचे पंचनामे होतील, म्हणून काही इकोसिस्टिम आणि त्यांचे काही अ‍ॅम्प्लिफायर आणि स्पीकर यांच्याद्वारे चांगली माणसे जाणीवपूर्वक लक्ष्य केली जात आहेत. बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर अशा काही मंडळींनंतर यांनी वारकरी-कथेकरी यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. आम्ही म्हणू तो इतिहास, आम्ही सांगू ते स्वातंत्र्यसैनिक आणि आम्ही म्हणू तसे शिवाजी महाराज, संभाजीराजे, तुकाराम महाराज ही ती वृत्ती आहे. मांसाहार करण्यासाठी आमचा जन्म झाला आहे असे सांगून वैयक्तिक खानपानाला जातीय आणि राजकीय आशय देणारे, कधी एकादशी आणि वारी माहीत नसताना नको त्याला विठ्ठल म्हणणारी ही वृत्ती सत्तेच्या सावलीत थोडी अधिकच मुजोर आणि मग्रूर होत चालली आहे.

जोपर्यंत महाराज आणि कथेकरी पुराणातील भाकडकथा सांगत होते, तोपर्यंत या तथाकथित पुरोगाम्यांना काही घेणे-देणे नव्हते. पण जसे ते थोडे सामाजिक झाले, प्रसंगी राजकीय काही बोलू लागले, तेव्हा यांच्या पारंपरिक, लोकांना मूर्ख बनवण्याच्या धंद्याला धोका निर्माण झाला. यांनी महाराज आणि कीर्तनकार यांना बदनाम करण्याची संधी शोधायला सुरुवात केली. बहुजनांनी हिंदुत्व आणि हिंदू धर्म यापासून लांब राहिले पाहिजे, प्रसंगी अहिंदूंना मिठ्या मारल्या तरी चालतील, पण बारा बलुतेदार आणि अठरापगड तसेच राहावे, त्यात वाढ झाली तर चालेल ही ती पुरोगामी बुरख्याखालची वृत्ती आहे. महाराष्ट्रातील जनता योग्य वेळी धडा शिकवेलच. पण तूर्त पराचा कावळा करणार्‍यांपासून थोडे सावधही असावे, हे महाराज आणि प्रवचनकार, कीर्तनकार यांना प्रेमाचे सांगणे.

 

इंदुरीकर महाराज यांच्यासारख्यांना विनम्र सांगणे – तुमचे काम चालू ठेवा. कुठलाही पक्ष, संघटना यापेक्षा देशहितासाठी प्रबोधन चालू ठेवा. महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेला तुमची गरज आहे.