व्यवस्थाकेंद्रित दृष्टीकोन भाग - 1

स्रोत: विवेक मराठी    दिनांक17-Feb-2020   

आजपर्यंतच्या लेखांमध्ये आपण महाराजांच्या सुनिश्चित ध्येयाची (Well defined objectiveची), तसेच त्यांच्या कार्याच्या उच्च तात्त्वि अधिष्ठानाची माहिती घेतली. उच्च ध्येय आणि उच्च अधिष्ठान असणे एवढेच कधी पुरेसे नसते. त्याला चांगल्या व्यवहारी भूमिकेची जर जोड नसेल तर हा आदर्शवाद/उच्चता रूक्ष व्यवहारवादात कधीही वाहून जाऊ शकते. पण महाराजांचे अलौकिकत्व असे की त्यांची सर्व स्वप्ने, आदर्श उचित व्यवहारावर आधारित असल्याने ती प्रत्यक्षात उतरली व आदर्श कायम राहिले. आता हा उचित व्यवहारवाद महाराजांनी कसा सांभाळला व त्यासाठी कुठली सूत्रे अवलंबिली, ते पाहू या.

 
shivaji_1  H x

स्वराज्याचा कारभार करताना महाराजांनी ज्या व्यवस्था किंवा पध्दती उपयोगात आणल्या, त्या त्यांनी व्यक्तिनिष्ठ किंवा आत्मनिष्ठ न ठेवता संस्थानिष्ठ किंवा व्यवस्थाकेंद्रित ठेवल्या. आजच्या व्यवस्थापनाच्या भाषेत ह्यालाच System Oriented Approach असे म्हणतात. संबंधितांनी केवळ एकाच व्यक्तीला किंवा तिच्या मर्जीला किंवा तिच्या हितसंबंधांना बांधील न राहता संपूर्ण व्यवस्थेला, संस्थेला अथवा संस्थेच्या हिताला बांधील राहावे. व्यक्तीचे आदेश मानण्याऐवजी पदाचे आदेश मानावेत, व्यवस्थेची सोय, रीत व्यक्तिगत गोष्टींऐवजी जास्त महत्त्वाची मानावी असा त्याचा थोडक्यात अर्थ. आज सर्व जगात हीच पध्दत/व्यवस्था सर्वोत्तम मानली जाते. असा हा आजच्या काळात रूढ झालेला दृष्टीकोन महाराज 350 वर्षांपूर्वी महत्त्वाचा मानत होते हे विशेष. महाराजांनी आयुष्यभर ह्याच पध्दतीचा अवलंब केला. त्यांच्या मध्ययुगीन काळात, विशेषतः भारतात नेमकी उलट पध्दत रूढ होती. 'राजा बोले, दळ हाले', 'हम करे सो कायदा' अशा पध्दती व त्यामुळे तशा म्हणी, वाक्प्रचार रूढ झाले होते. व्यवस्था पध्दतीपेक्षा व्यक्तिगत पध्दतीच लोकांच्या पूर्णपणे अंगवळणी पडल्या होत्या. व्यवस्थाकेंद्रित पध्दतीचा फारसा परिचयसुध्दा इथल्या अभिजन, बहुजन अशा कोणालाच नव्हता. अशा काळात महाराज मात्र काळाच्या पुढे जाऊन व्यवस्थाकेंद्रित (Systems Oriented Approach) पध्दतीचा आग्राह धरीत होते! त्यांच्यातल्या द्रष्टया प्रशासकाचे ते लक्षण होते.

दैनंदिन कामकाजासाठी महाराजांनी चोख शिस्तशीर अशी कामाची विभागणी सर्व प्रधानांमध्ये केलेलीच होती. 'नेमून दिलेले आपापले काम चोख करावे' असा त्यासाठीचा दंडक होता. महाराजांकडे उपजतच असलेल्या दूरदृष्टीमुळे आपण एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी (रायगड/इतर महत्त्वाच्या जागी) नसलो किंवा आपल्या मृत्यूनंतर कुठेच नसलो, तरी आपले राज्य अव्याहत आणि सुरळीतपणेच चालू राहिले पाहिजे, असा त्यांचा आग्राह असे. तसेच आपल्या सहकाऱ्यांमध्येही ती जाणीव संक्रमित झाली पाहिजे, यासाठी ते जागरूक होते. त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या प्रसंगांमधील त्यांची वागणूक व निर्णय ह्या व्यवस्थाकेंद्रित दृष्टीकोनावर चांगला प्रकाश टाकते.

अफझलखान भेट

या मोहिमेतील अंतिम टप्प्यात अफझलखानाशी भेट आणि लढाई अपेक्षित होती. पण त्याआधी अफझलखानाने जावळीच्या खोऱ्यात येता येता स्वराज्याच्या मुलखाची प्रचंड हानी केली होती. पंढरपूर, तुळजापूर येथील पवित्र देवस्थानांचे मोठे नुकसान केले, महाराजांचे खुद्द मेव्हणे बाजाजी नाईक निंबाळकर ह्यांना ओलीस धरले! त्याचा उद्देश एवढाच होता की महाराजांनी त्यांच्या सोयीचा किल्ल्यांचा डोंगराळ मुलूख सोडावा व अफझलखानाच्या सोयीच्या सपाट, मैदानी मुलखात यावे. मैदानी लढाईत अफझलखान निश्चितच वरचढ ठरला असता. पण महाराज लष्करीदृष्टया अत्यंत चाणाक्ष आणि वैयक्तिक पातळीवर अत्यंत विवेकी असल्याने अफझलखानाला अपेक्षित असा कोणताही आततायीपणा त्यांनी केला नाही. अफझलखानाला अनपेक्षित अशीच गोष्ट त्यांनी केली. राजगड सोडून त्याहूनही अवघड अशा प्रतापगडावर ते जाऊन बसले! त्याचप्रमाणे आपल्या लष्करी व मुलकी व्यवस्था बळकट करण्यावरच त्यांनी भर दिला. त्यामुळे जनतेचे नीतिधैर्य फारसे ढासळले नाही आणि लष्करी पूर्वतयारीवर पुरेसे लक्ष दिल्याने अंतिम लढाईच्या वेळी त्याचा उपयोग झाला.

या मोहिमेत शेवटी अफझलखानाच्या प्रत्यक्ष भेटीला जाताना त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी, ''महाराज तिथे खूप धोका आहे, आम्हालासुध्दा बरोबर घ्या'' अशी गळ घातली. पण त्या वेळीही विचलित न होता महाराज एवढेच म्हणाले, ''दादांनो, नेमून दिलेले आपापले काम चोख करा. एकदिलाने वागा. जर मी मारला गेलो, तर नेताजी पालकरांच्या हुकमाखाली झुंजत राहा. हे राज्य सांभाळा, हा ध्वज सांभाळा. आम्ही येतो. जय भवानी!'' अत्यंत धोक्याच्या आणि जीवन-मरणाच्या प्रसंगीही महाराज 'राज्य आणि ध्वज सांभाळा' असेच म्हणाले, पण 'मला सांभाळा' असे काही म्हणाले नाहीत!

अफझलभेटीला निघण्यापूर्वी महाराजांनी सगळी व्यवस्था आधी तपासली आणि मगच ते भेटीसाठी निघाले. मुत्सद्दयांनाही त्यांनी सांगितले, ''जर अफझलखानाला मारून जय मिळाला, तर माझा मीच आहे. एखादे समयी युध्दी प्राणनाश जाहला तरी संभाजी राजे आहेत. त्यास राज्य देऊन, त्यांच्या आज्ञेत तुम्ही राहणे.''

मध्ययुगीन काळातच नव्हे, तर आताही इतका 'व्यवस्थाकेंद्रित प्रशासक' कुठे दिसतो?

आग्रा भेट

आग््रयाला जाण्याआधी महाराजांनी सर्व कारभार जिजाऊसाहेबांच्या हातात सोपवला. मोरोपंत पिंगळे, निळो सोनदेव मुजुमदार, प्रतापराव गुजर यांना त्यांच्या दिमतीस दिले. आरमाराची व्यवस्था दौलतखान आणि मायनाक भंडारीकडे दिली. त्यांनी कारभाऱ्यांच्या आणि जिजाऊसाहेबांच्या आज्ञेत राहायचे होते. कोणत्याही प्रसंगाने व बातमीने कोणीही गडबडून जायचे नाही अशी सक्त सूचना होती. आग््रयाला निघण्यापूर्वी अचानक भेटी देऊन महाराजांनी आपल्या अनेक किल्ल्यांची पाहणी स्वतः केली. ती समाधानकारक आहे असे पाहून मगच आग्य्राकडे प्रयाण केले. संपूर्ण आग्रा मोहीम सुमारे 7 महिने चालली होती. (प्रवासाचा वेळ लक्षात घेऊन) महाराज स्वराज्यापासून खूप लांब होते. त्या काळची वाहतूक/प्रवास व्यवस्था बघता अशक्यप्राय लांब होते. काही काळ तर त्यांच्या जीविताविषयीच मोठी काळजीची परिस्थिती होती. तरीही ह्या काळात स्वराज्याची सर्व व्यवस्था सुरळीत होत्या. स्वराज्य कुठेही कमी झाले नव्हते. उलट रावजी/राहूजी सोमनाथांनी रांगणा हा किल्ला जिंकून ते थोडेसे वाढवलेच होते. सर्व जण नेमून दिलेले आपापले काम चोख करीत होते आणि जिजाऊसाहेबांच्या आज्ञेत चोखपणे राहात होते.

हे महाराजांचे व्यवस्थाकेंद्रित अथवा संस्थाकेंद्रित पध्दतीचे (Systems Oriented Approachचे) यश होते.