ग्रामसंस्थांचे महत्त्व वाढवले

स्रोत: विवेक मराठी    दिनांक18-Feb-2020   

**शिवायन***

राज्यला सुराज्य करायचे असेल तर राज्यातील लोकांचा सहभाग वाढविला पाहिजे, ही दूरदृष्टी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे होती. म्हणूनच त्यांनी ग्राामसंस्थांचे महत्त्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. काही परंपरागत पध्दतींना एकदम कालबाह्य करता येत नव्हते, परंतु महाराजांनी त्यांच्या दृष्टीकोनात बदल करुन ग्रामसंस्थेचे महत्त्व वाढविले.

 
shivayan_1  H x

महाराजांनी प्राचीन काळापासून कार्यरत असणाऱ्या ह्या ग्राामसंस्थांचे महत्त्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, उदा. त्यांच्या न्याय-निवाडयात कसलाही हस्तक्षेप न करणे, एखादा वतनदार गावकऱ्यांना नको असेल तर तो बदलणे, जमीन मोजणीच्या कामात गावातील प्रतिष्ठित लोकांना सहभागी करून घेणे इ. उदा. - अण्णाजी दत्तोंनी 'मुलखाची बटाई' केली. त्यासाठी प्रत्येक गावाकरता सात जणांची समिती केली. त्यामध्ये देशमुख, देशपांडे, गावपाटील व गावातील चार प्रतिष्ठित लोक घेण्याची तरतूद केली. गावातील लोकांचा सहभाग आणि तोही बहुमताने! लोकसहभागाचे हे उत्तम उदाहरण आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 

 

त्याचप्रमाणे पाटील, कुलकर्णी हे गावपातळीवरील वतनदार गावाला नको असल्यास महाराज ते बदलत असत, लादत नसत. गोतसभा ही प्राचीन कुल, पुग यांप्रमाणे सशक्त व्हावी हाच महाराजांचा प्रयत्न असे.

 

गोतसभा आणि देशक अशा दोन ग्राामसंस्था त्याकाळी होत्या. गोतसभा ही एका गावापुरतीच असे. पाटील, कुलकर्णी, शेटये, महाजन, बलुतेदार, चौगुला मिळून गोतसभा होत असे. तसेच एका देशमुखाच्या सत्तेखालच्या सर्व गावांचे म्हणजे 'देशा'तील पाटील, शेटये, महाजन शिवाय देशमुख, देशपांडे, देशकुलकर्णी यांची मोठी सभा ती 'देशक'होय. या सभांना पुन्हा पहिले अधिकार देऊन आणि त्यांच्यावर आपले सुभेदार व इतर अधिकाऱ्यांमार्फत लक्ष ठेवून महाराजांनी सर्व प्रांतांचे पुनर्वसन घडवून आणले. ह्याचा मूलाधार जो शेतकरी त्याला नवजीवन दिले. शेती आणि शेतकरी हाच तत्कालीन अर्थव्यवस्थेचा कणा असल्यामुळे महाराजांचे हे धोरण महत्त्वाचे ठरते. त्यामुळेच महाराजांची जी दोनशेहून अधिक पत्रे उपलब्ध आहेत. त्यात जमीन व शेतकरी, शेती मालकीचे तंटे, जमीन महसूल इ. बाबतीतील म्हणजे मुलकी व्यवस्थेबाबतची पत्रेच सर्वाधिक आहेत.

दुहेरी काळजी - शिवकालीन पत्रसारसंग्राह, शिवचरित्रसाहित्य यातून त्याकाळची अनेक पत्रे प्रसिध्द झाली आहेत. त्यावरून हे स्पष्ट होते की, देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांची सर्व काळजी वाहिली पाहिजे आणि जमिनीचे उत्पन्न सर्व प्रकारे वाढवून त्यायोगे सरकारचा महसूल वाढवला पाहिजे असा सक्त दंडक महाराजांनी घालून दिला होता. देशमुख, देशपांडे ह्यांना वतने दिली, इनामे दिली, ती लढाईत पराक्रम करण्यासाठी आहेतच, पण शेतकऱ्यांचे रक्षण करणे, त्याला सांभाळणे, त्याला सर्व साह्य करणे आणि जमिनीचे उत्पन्न वाढवून परगण्यात समृध्दी निर्माण करणे हेही वतनदारांचे कर्तव्य आहे, ही नवी दृष्टी महाराजांनी या वतनदारांना दिली. वतनदारांनी ही जबाबदारी नीट पार पाडावी यासाठी त्यांना महाराजांनी दोन्हीकडून दाबात ठेवले. वरून सरकारी अधिकारी (पगारी) त्यांच्यावर सक्त नजर ठेवत आणि रयतेकडून गोतसभा जागरूक असे. त्यासाठीच तिचे पुनरूज्जीवन महाराजांनी केले होते.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

पाटबंधारे बांधणे, विहिरी खोदणे, पडीक जमिनी लागवडीखाली आणणे या कामात अनेक कटकटी हितसंबंधी मंडळी निर्माण करत. पण त्या संदर्भात गोतसभेचे निर्णय महाराज उचलून धरत. त्यामुळेच मावळात व कोकणात अल्पकाळातच जमिनी फुलू लागल्या. आबादानी निर्माण होऊ लागली. स्वराज्याचा महसूल वाढला. फ्रेंच प्रवासी बे कॅरे याने कोकणातील अशा पध्दतीने फुललेल्या जमिनींची अनेक उदाहरणे नोंदली आहेत.

महाराजांनी घडवलेल्या आर्थिक क्रांतीचे रूप हे असे होते. शेतकऱ्याला पिळून, लूबाडून बादशाही खजिना भरणे ही जुनी रीत होती. पण शेतकऱ्याला व रयतेला साह्य करून, तिचे उत्पन्न वाढवून सरकारी महसूल वाढवणे ही खास महाराजांची नवी पध्दत होती.

आर्थिक क्रांतीची व्यवहार्य बाजू - ही सर्व क्रांती घडवून आणताना ज्या वतनदार, सरंजामदार वर्गाचा महाराजांना विरोध झाला, त्यांनाही महाराजांनी आपल्या जरबेत ठेवले पण नष्ट केले नाही, किंवा तसा निकराचा प्रयत्न केला नाही. कारण ते व्यवहार्य झाले नसते. तो काळ धामधुमीचा होता. लढाई झाली नाही, सुलतानी धाड आली नाही असे एक वर्षही जात नसे. अशा स्वाऱ्या आल्या की गावेच्या गावे बेचिराख होत. ओसाड पडत . माणसे गाव सोडून परागंदा होत. जमिनीची लागवड वर्षानुवर्षे होत नसे. शेतकऱ्यांची घरे-दारे, बी-बियाणे, बैल-जनावरे, अवजारे अशी शेतीपूरक साधने नष्ट होऊन जात. अशा स्थितीत या गावांची किंवा परगण्यांची पुनर्रचना कोणी करायची? हे काम गोतसभेचे आणि देशकाचे म्हणजे देशमुख आणि देशपांडे, देसाई, देशकुलकर्णी, पाटील, शेटये, महाजन, जमीनदार यांचे असे. समस्त लोक जमा करून जीवनाची, गावगाडयाची घडी नीट बसवणे. ही कामे वतनदार मंडळीच करू शकत होती. कोणत्याही राज्यसत्तेच्या थेट आवाक्यात ही गोष्ट नव्हती. दळणवळणाची साधने नसणे आणि अपुरे मनुष्यबळ ही त्याची मुख्य कारणे होती. गावातील हितसंबंधी यांकडूनच ही कामे करून घेणे भाग होते. लढाया, अराजके एकवेळ सोडा, पण गावावर, शेतीवर इतरही अनेक आपत्ती येत असतातच. उदा - दुष्काळ, टोळधाडी, नैसर्गिक आपत्ती, दरोडेखोरी, लुटमार, चोऱ्या-माऱ्या ह्याही नेहमी होत. यावर मात करण्यासाठी प्राचीन काळापासून पुग, श्रेणी, कुल या ग्राामसभाच काम करीत. मुसलमान राजवटीतही त्या नष्ट झाल्या नव्हत्याच, पण वतनदारांच्या शिरजोरीमुळे त्या निष्प्रभ झाल्या होत्या. त्या तशा कमकुवत राहण्यातच वतनदारांना स्वारस्य होते आणि तशी व्यवस्था मुस्लीम राजवटीमध्ये असल्यामुळे त्या राजवटी परकीयांच्या असल्या तरी वतनदारांना प्रिय होत्या. स्वराज्यात ह्याच्या उलट परिस्थिती असल्याने स्वराज्य 'आपले' असले तरी वतनदारांना (अपवाद वगळून) ते प्रिय नव्हते. थोडक्यात रूढ 'वतनदारी' पध्दती ही अल्पजनवादी होती, तर महाराजांची नवी 'वेतनदारी ' पध्दत बहुजनवादी होती.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 यासाठीच महाराजांना वतनदारांवर हत्यार धरावे लागले. हत्याराच्या साह्याने त्यांच्यावर सत्ता प्रस्थापित करताच त्यांचे वाडे-हुडे-कोट पाडून महाराजांनी त्यांना नरम केले आणि कर्तव्याची जाणीव कठोरपणे करून देऊन पुन्हा त्यांच्या जागेवर बसवले. ही लवचिकता हीच महाराजांनी पाळलेली व्यवहार्यता होती. कारण त्याकाळची भौगोलिक राजकीय परिस्थिती पाहता त्याला पर्याय नव्हता. अशाप्रकारे महाराजांनी स्वराज्याची आर्थिक घडण व व्यवस्था नव्याने केली.


सेवेला प्राधान्य - महाराजांचे वतनदारीसंबंधीचे विचार हे पूर्वसुरींपेक्षा किंवा तत्कालीन प्रचलित व्यवस्थेपेक्षा वेगळे होते. वतन ही पूर्वी केलेल्या पराक्रमापोटी दिलेली कायमची, वंशपरंपरागत बक्षिस असे ते मानतच नव्हते, तर वर नमूद केल्याप्रमाणे आपला गाव, परगणा इ. सांभाळण्याची जी कायमची सेवा, त्याचा तो मोबदला होता. वतनदारी अधिकार गाजवण्याची जागा नसून सेवा करायची संधी आहे, असे ते मानत. त्यामुळे वतनदारी जरी त्यांना पसंत नसली तरी एकदम ती संपवताही येणार नाही, ह्याचे त्यांना जागरूक भान होते. त्यामुळे त्यांनी वतनदारांचा दृष्टिकोन सुधारण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याच अंशी तो यशस्वीही झाला.

महाराज आणि वतनदारी या संबंधात अधिक माहिती पुढील लेखांत.

 

"The only worthwhile achievements of man are those which are socially useful."

- Alfred Adler

लेख क्रमांक - 18