उध्दवजी, इतके थंड पडलात..?

स्रोत: विवेक मराठी    दिनांक20-Feb-2020   

 
udhavji_1  H x
 
माझ्या वडिलांना दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन, असं ठरवलं होतं आणि त्यानुसार मी केलं असं महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे सध्या सगळीकडे सांगत आहेत. मुलाखत असो वा भाषणं असोत, भारतीय जनता पक्षासोबतची युती तोडून काँग्रेस - राष्ट्रवादीशी आघाडी करण्याचा मुद्दा आला रे आला की, मुख्यमंत्रीमहोदय आपल्या वडिलांना दिलेलं वचन - शिवसेनेचा मुख्यमंत्री (की मीच मुख्यमंत्री?) आणि त्याच्या पूर्ततेसाठी कोणत्याही थराला जाण्याची कॅसेट सुरू करतात. परंतु, राज्यातील सध्याची परिस्थिती आणि शिवसेनेचे मित्रपक्ष काँग्रेस - राष्ट्रवादी यांनी घातलेला हैदोस पाहता स्व. बाळासाहेब ठाकरेंना दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी इतक्या खालच्या थराला जाईन, त्यासाठी हिंदुत्व-राष्ट्रवादाला तिलांजली देईन, राष्ट्रीय अस्मिता - प्रतीकांची खुलेआम विटंबना करण्याची स्पर्धा काँग्रेससारख्या पक्षाने लावलेली असतानाही मूग गिळून गप्प बसेन, चकार शब्द काढणार नाही, असंही वचन उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेबांना दिलं होतं का, दिलं असल्यास बाळासाहेबांना ते मान्य होतं का, असा प्रश्न आता राज्यातील तमाम हिंदुत्ववादी, राष्ट्रभक्त जनतेला पडू लागला आहे. कारण, मणिशंकर अय्यरसारख्या विकृताने स्वा. सावरकरांचा अवमान करताच स्वतः रस्त्यावर उतरून त्या अय्यरच्या पुतळयाला जाहीरपणे जोडे मारणारे बाळासाहेब आणि त्यांची शिवसेना महाराष्ट्राने पाहिली आहे. हीच शिवसेना आणि बाळासाहेबांचेच पुत्र उध्दवजी आज काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांसारख्या एका राष्ट्रपुरुषाची अत्यंत हीन पातळीवर जाऊन विटंबना - अवमान होत असतानाही काहीच न घडल्यासारखे शांत बसून आहेत. त्यामुळेच, उध्दवजींनी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी हिंदुत्वाशी प्रतारणा करून इतक्या खालच्या थराला जाण्याचंही वचन दिलं होतं का, याबाबत एकदा स्पष्टीकरण द्यावं. म्हणजे कोणी उगाच तुमच्याकडून काही कृती होण्याची आशा ठेवणार नाही, तुमचं मुख्यमंत्रीपद नुसतं नावाला आहे, हे आम्ही समजून जाऊ.

काँग्रेसबद्दल काय बोलणार? बोलूनचालून शेवटी तो नेहरू - गांधी घराण्याची खासगी मालमत्ता बनलेला पक्ष. त्यांचे विद्यमान मालक सोनिया व राहुल गांधी. त्यांना या देशाच्या राष्ट्रीय अस्मितेशी, सांस्कृतिक प्रतीकांशी आणि त्यातून जोडल्या जाणाऱ्या राष्ट्रभावनेशी काही घेणं ना देणं. त्यामुळे अशा पक्षाकडून सावरकरांचा आदर होण्याची अपेक्षा बाळगणं व्यर्थच. राहुल गांधीच जिथे जाहीर सभांत एक-दोनदा नव्हे तर सातत्याने सावरकरांच्या अवमानाची मोहीम चालवतात, तिथे त्यांचे महाराष्ट्रातील चेले त्याचं अनुकरण करणारच. राष्ट्रवादी काँग्रेस हेसुध्दा या काँग्रेसचंच अपत्य, काँग्रेसच्याच शरद पवारांनी मुख्यतः काँग्रेसच्याच स्थानिक सरंजामदारांची फोडफोडी करून बांधलेला पक्ष. राज्यातील महापुरुषांबाबत वेगवेगळे वाद उकरून काढून, त्यांना जातीय लेबलं लावून समाजात जातीय तेढ कायम ठेवणं आणि त्यातून आपली राजकीय पोळी भाजून घेणं हा या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांच्या चेल्यांचा आवडता उद्योग. अलीकडेच पवारांनी समर्थ रामदासांवर काही टिप्पणी करून नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. असं दर हंगामात ते काही ना काही करत असतातच. त्यामुळे राष्ट्रवादीसारख्यांकडूनही अपेक्षा नाहीतच, असल्यास धोकाच जास्त. उरतो भाजप जो सर्वांत मोठा पक्ष ठरूनही विरोधी पक्षात बसलाय. जिथे अशी सांस्कृतिक मोडतोड, विटंबना होते तिथे भाजप सर्वशक्तिनिशी आवाज उठवतो, विरोध करताना दिसतो. वाईट याचंच वाटतं की, ज्या शिवसेनेला 'कडवट हिंदुत्ववादी पक्ष' म्हणून राज्यातील एक फार मोठा वर्ग भुलला, त्या सर्वांचा विश्वासघात आज शिवसेना खलेआम करते आहे. निवडणुका होत राहतात, सत्ता येते - जाते. कुणाशी आघाडी करावी, युती करावी, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वा भाजपच्या अन्य कुणा नेत्यावर सेनेने काय टीका करावी, हा त्यांचा प्रश्न. त्यांचं राजकारण ते बघून घेतील. परंतु म्हणून सावरकरांनी लंडनमध्ये बलात्कार केला, सावरकरांचे वंशज हे सावरकरांचे नव्हेतच इतक्या हीन दर्जाचा मजकूर छापण्याची 'शिदोरी'सारख्या काँग्रेसी मुखपत्राची हिंमत व्हावी आणि आज शिवसेना सत्तेत असतानाही हा नंगानाच खपवून घेतला जावा? वर काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी 'ते लिखाण वस्तुस्थितीला धरूनच आहे. त्यामुळे मासिक मागे घेण्याचा प्रश्नच नाही,' अशी बेधडक वक्तव्ये द्यावीत? तिकडे राजस्थानात याच काँग्रेसच्या अशोक गेहलोत सरकारने सरकारी शाळांतून स्वा. सावरकर व पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमा हटवण्याचे आदेश दिलेत. शेजारी मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसच्या कमलनाथ सरकारच्या राजवटीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला बुलडोझर लावून पाडलं गेलं. आणि इथे महाराष्ट्रात ही अशी विषारी 'शिदोरी' आपल्या सर्वोच्च नेत्यांना खुश करण्यासाठी काही हलकट मंडळी प्रसिध्द करताहेत.

आणि, आमच्या एकेकाळच्या कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेचे सर्वेसर्वा सन्माननीय मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे काय करत आहेत? तर आपल्या वडिलांना दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यात व्यस्त आहेत. सेनेच्या एकाही वरिष्ठ नेत्याने काँग्रेसच्या या घाणेरडया कृत्यांचा समाचार घेतलेला नाही. 'फायरब्रँड' संपादक - खासदार राऊतसाहेब इंदिरा गांधींबाबतच्या वक्तव्यादरम्यान तोंड पोळल्यामुळे गप्प झालेत. काय उपयोग मग यांच्या सत्तेचा? वचनपूर्तीचा? मा. उध्दवजी, खरंच जर तुम्ही आपले तीर्थरूप स्व. बाळासाहेबांच्या स्वप्नातील शिवसेना घडवण्यासाठी कटिबध्द असाल तर या 'शिदोरी'सारख्या सटरफटर मासिकांवर बंदी घालून ते छापणाऱ्या महाराष्ट्र काँग्रेसमधील हलकटांना नाक घासून माफी मागायला लावाच. तरच, मुख्यमंत्री उध्दव 'बाळासाहेब' ठाकरे यांनी आपल्या वडिलांची वचनपूर्ती केली, असं महाराष्ट्राच्या जनतेला वाटेल.