सात्त्विक कर्ता - बाळासाहेब दीक्षित

स्रोत: विवेक मराठी    दिनांक25-Feb-2020   

वनवासी बांधवांचा विकास हाच त्यांचा ध्यास झाला आणि पुढचे सर्व जीवन या ध्यासपथावरून गेले. अखिल भारतीय जबाबदारी आली. वनवासी वस्तिगृहांच्या उत्तम बांधणीची जबाबदारी आली आणि या निमित्ताने त्यांचे देशभर प्रवास सुरू झाले. मुंबईत वाढलेला हा युवक संघकामामुळे जंगल, पाडे, दऱ्या, खोरे यात फिरू लागला. ही संघकामाची अद्भुतता आहे. जी जबाबदारी आली, त्या जबाबदारीला लायक अशी आपली जडणघडण ज्याची त्याने करून घ्यायची असते. बाळासाहेब या बाबतीत आदर्श होते.
 
balasaheb Dikshit passes
मुक्तङ्गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वित:

सिध्दयसिध्दयोर्निर्विकार: कर्ता सासत्त्वि उच्यते॥

(गीता अध्याय 18, श्लोक 26)

गीताईत या श्लोकाचा मराठी अनुवाद असा आहे -

नि:संग, निरहंकार, उत्साही, धैर्य-मंडित

फळो, जळो, चळे ना तो कर्ता सात्त्वि बोलिला।

ही सात्त्वि कर्त्याची व्याख्या आहे. या श्लोकाचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे बाळासाहेब दीक्षित. वयाच्या 93व्या वर्षी नाशिक येथे 25 फेब्र्रुवारी रोजी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांचे निधन आकस्मिक, अकाली असे काही नसल्यामुळे त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून मोठा धक्का बसला अशी निदान माझी तरी स्थिती झाली नाही.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

गेल्याच महिन्यात मी त्यांना नाशिकच्या वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यालयात भेटून आलो होतो, त्यांच्याशी गप्पा मारून आलो होतो. तेव्हा बाळासाहेब फार बोलण्याच्या स्थितीत नव्हते. दिवसेंदिवस ते थकत चालले होते. तरीही मला असे वाटले की ते वयाची शंभरी गाठतील. शंभरीला सात वर्षे असतानाच ते आपल्या सर्वांना सोडून गेले आहेत.

 

जाताना खूप मोठा वारसा ते मागे ठेवून गेलेले आहेत. त्यांचा वारसा निरपेक्ष भावाने, नि:स्वार्थी भावाने, सर्वस्व समर्पण करून मातृभूमीच्या सेवेचा आहे. जवळजवळ 65 वर्षे संघाचे प्रचारक म्हणून त्यांचे जीवन गेले. संघाचा प्रचारक कसा असतो, तर 'पानी तेरा रंग कैसा, जिस में मिलावे वैसा।' ही वृत्ती सिध्द करणारे त्याचे जीवन असते. बाळासाहेब जेव्हा प्रचारक निघाले, तेव्हा त्यांच्याकडे दैनंदिन संघकामाची जबाबदारी आली. तालुका प्रचारक, जिल्हा प्रचारक ही कामे त्यांच्याकडे आली. दैनंदिन संघाचे काम म्हणजे संघाच्या कार्यपध्दतीचे काम असते. वेगवेगळया गावी चालणाऱ्या शाखांना भेटी देणे, कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवणे, त्यांच्या घरीच मुक्काम करणे, त्यांच्या घरीच भोजन करणे आणि आपल्या क्षेत्रातील संघ स्वयंसेवकांच्या जीवनाशी समरस होणे. प्रत्येक प्रचारकाला हे काम करावे लागते.

 

तेथे व्यक्तिगत आवडीनिवडी, आहाराच्या घरी लागलेल्या सवयी, शहरातील पोषाखी जीवन अशा सर्व गोष्टींना मुरड घालून कार्याला अनुकूल अशा प्रकारचे परिवर्तन आपल्यामध्ये करून घ्यावे लागते. ही एका महिन्यात किंवा एका वर्षात पूर्ण होणारी प्रक्रिया नसते, त्याला वेळ लागतो. आणि हे काम फार अवघड असते. बाळासाहेबांनी आपले सर्व व्यक्तित्व संघात अर्पण करून टाकले. श्रीकृष्णाच्या शब्दात सांगायचे तर,

अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम्।

आचार्याेपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रह: ॥

नम्रता, दंभ-शून्यत्व, अहिंसा, ॠजुता, क्षमा,

पावित्र्य, गुरू-शुश्रुषा, स्थिरता, आत्म-संयम। (गीताई)

संघ काम करता करता बाळासाहेबांची स्थिती या श्लोकात वर्णन केलेल्या साधकाप्रमाणे झाली. अमानित्व आले, दिखाऊपणा गेला, क्षमा, सरलता, अंतर्बाह्य शुचिता निर्माण झाली.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

यामुळे बाळासाहेबांचा सहवास म्हणजे सात्त्वि माणसाचा सहवास असे. विवेकच्या आणि समरसतेच्या कामानिमित्त वर्षातून किमान दोन-तीनदा तरी नाशिकला जावे लागते. प्रत्येक वेळी मी नाशिकच्या वनवासी कल्याण आश्रमातच मुक्काम करीत असे. कार्यालय तसे फार भव्य नसले, तरी निवासाची तिथे चांगली व्यवस्था आहे आणि माझ्यासारख्या एकांतप्रिय माणसाला कार्यालयात राहूनही एकांताचा अनुभव तेथे घेता येत असे. बाळासाहेबांचा आग्रह असे की, मी जेव्हा कधी नाशिकला येई, तेव्हा मुक्कामाला इथेच यायला पाहिजे.

त्यांच्या आग्रहाचे कारणही तसेच होते. मी त्यांच्याबरोबर आणीबाणीच्या कालखंडात ठाणे कारागृहात राहिलो. 14 महिने मला त्यांचा सहवास लाभला. या काळात मी पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र वाचून काढले. तेव्हा मला अस्पृश्यता म्हणजे काय? याचा बोध झाला आणि मनात प्रश्न असा निर्माण झाला की, अशा प्रकारची अस्पृश्यता समाजात अजूनही पाळली जाते का?

मी बाळासाहेबांना त्यासंबंधी विचारले. तेव्हा ते धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा प्रचारक होते. त्यांनी मला खेडोपाडी आजही अस्पृश्यता कशी असते, हे समजावून सांगितले. छोटया हॉटेलमध्ये दांडी तुटलेले कप वेगळे ठेवलेले असतात, त्या कपातूनच त्यांना चहा घ्यावा लागतो. सवर्ण वस्तीत आपले हे बांधव मोकळेपणाने जाऊ शकत नाहीत. समाजाच्या मनःस्थितीत फार मोठा बदल झालेला आहे असे नाही. ही स्थिती 70-75 सालातली होती. त्यांनी केलेले हे वर्णन ऐकून तेव्हा मी फार अस्वस्थ झालो होतो. मी मुंबईत वाढलो. मुंबईत जातिनिहाय वस्त्या नसतात. आणि संघातही वाढलो, संघातही जाती नसतात. त्यामुळे अस्पृश्यता काय भानगड आहे, याचा अनुभव मला नव्हता. बाळासाहेबांनी तो मोजक्या शब्दात मला करून दिला.


आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 
 

नंतर आमचे कार्यक्षेत्र बदलले. मी काही वर्षे दैनंदिन संघकामात राहिलो, नंतर माझ्याकडे सामाजिक समरसता मंचाची आणि विवेकची जबाबदारी आली. बाळासाहेबांकडे वनवासी कल्याण आश्रमाचे काम आले. वर जे म्हटले की, पानी तेरा रंग कैसा.... बाळासाहेबांनी संघाच्या नित्य कामातून आपले मन काढून वनवासी कल्याण आश्रमाच्या कामात ते गुंतवले. वनवासी बांधवांचा विकास हाच त्यांचा ध्यास झाला आणि पुढचे सर्व जीवन या ध्यासपथावरून गेले. अखिल भारतीय जबाबदारी आली. वनवासी वस्तिगृहांच्या उत्तम बांधणीची जबाबदारी आली आणि या निमित्ताने त्यांचे देशभर प्रवास सुरू झाले. मुंबईत वाढलेला हा युवक संघकामामुळे जंगल, पाडे, दऱ्या, खोरे यात फिरू लागला. ही संघकामाची अद्भुतता आहे. जी जबाबदारी आली, त्या जबाबदारीला लायक अशी आपली जडणघडण ज्याची त्याने करून घ्यायची असते. बाळासाहेब या बाबतीत आदर्श होते.

त्यांचे वाचन अफाट होते. प्रवासी कार्यकर्ता प्रवासात मग्न असतो, त्याच्या कामाची निरंतर चिंता करतो, कार्यकर्ते, काम, त्याची आखणी, त्याचा विस्तार असे असंख्य विषय त्याच्या मनात सातत्याने घोळत राहातात. वाचन करायला वेळ राहत नाही. बाळासाहेब त्याला अपवाद होते. अखंड प्रवासातही त्यांचे अखंड वाचन चालू राही. वाचन एकांगी नसे. अनेकांचा असा गैरसमज असतो की, संघकार्यकर्ता काय वाचणार? तर तो अध्यात्मिक ग्रंथ वाचणार. हा हास्यास्पद गैरसमज आहे. माझ्यासमोरच्या पुस्तकांची कपाटे पाहिली, तर त्यात सिनेमापासून ते जागतिक विद्वानांच्या अद्ययावत कृती सापडतील.

नाशिकला ज्या खोलीत बाळासाहेबांचा मुक्काम असे, ती कपाटाने भरलेली असे आणि त्यात विविध प्रकारची पुस्तके असत. मी येणार आहे हे त्यांना माहीत असे. त्या वेळी ते पुस्तके काढून ठेवत. काही लेखांची कात्रणे काढून ठेवत. एका भेटीत त्यांनी मला विचारले, ''चिकन सूप' ही पुस्तकांची मालिका तू पाहिली आहेस का?'' मी त्यांना म्हणालो, ''हो, त्यातील अनेक पुस्तके माझ्याकडे आहेत.'' चिकन सूप म्हणजे कोंबडीचा रस्सा नव्हे, सामान्य माणसाच्या जीवनातील अनुभवांचे लोकविलक्षण किस्से या पुस्तक मालिकेत आहेत. मुलगी, मुलगा, पती, पत्नी, अशा एकेका विषयावर एकेक पुस्तक आहे. त्या पुस्तक मालिकेचे नाव 'चिकन सूप' आहे. नंतर यावर आमच्या गप्पागोष्टी झाल्या.

 

प्रकाशित झालेली चांगली पुस्तके बाळासाहेबांकडे असत. त्यांचे वाचन हेतुप्रधान असे. भेटायला आलेला कार्यकर्त्याला कोणते पुस्तक दिले असता ते त्याच्या उपयोगाचे होई, हे त्यांना उत्तम समजे. माझा अनुभव असा आहे की, मी जितके दिवस कार्यालयात त्यांच्या बरोबर काढले, त्यात प्रत्येक वेळी माझ्या माहितीत आणि ज्ञानात भरच पडत गेली. आपल्याकडे जे आहे, ते मुक्तहस्ताने दुसऱ्याला देऊन टाकायचे, हा बाळासाहेबांचा स्वभाव होता. म्हणून त्यांचा सहवास मन प्रसन्न करणारा आणि कार्याची नवी उभारी देणारा ठरत असे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

आताही मी जेव्हा कधी नाशिक कार्यालयात जाईन, तेव्हा त्यांची उणीव मला जबरदस्तपणे भासल्याशिवाय राहणार नाही. 'रमेश, चहाला खाली येतोस ना?... दुपारी भोजनाला इथेच थांब, बाहेर कुठे जाऊ नकोस.' असा प्रेमळपणे आग्रह करणारा एका पितृतुल्य, सात्त्वि कार्यकर्ता आज तेथे नसणार, ही जाणीव सतत होत राहील. बाळासाहेबांना माझे कोटी कोटी प्रणाम!