टीम इंडियाचा न्यूझीलंडला नॉकआउट पंच

03 Feb 2020 16:21:03

**ऋजुता लुकतुके***

क्रिकेटमध्ये नॉक आउट पंच नसतो. तो असतो बॉक्सिंगमध्ये. आणि क्रिकेट हा कसा सांघिक खेळ आहे. पण, भारत आणि न्यूझीलंड दरम्यानची टी-20 मालिका ज्यांनी जवळून पाहिली असेल, त्यांना ही उपमा यथार्थच वाटेल. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सगळया क्षेत्रांत वरचढ ठरलेली टीम इंडिया आपल्याला दिसली. आणि बरोबरच मनाने कणखर टीमचं दर्शन झालं.

india vs new zealand 2020

लागोपाठ दोन सामने सुपर ओव्हरवर जिंकणं हा नशिबाचा भाग असूच शकत नाही. न्यूझीलंडनेही कडवी लढत दिली, म्हणून हे सामने रंगतदार आणि रोमांचक झाले. क्रिकेटचा आनंद लोकांना लुटता आला. पाच सामन्यांच्या या मालिकेत निकाल भारताच्या बाजूने 5-0 असा लागला. टी-20 प्रकारात पाच सामन्यांची मालिका अलीकडेच सुरू झाली. यापूर्वी 2 आणि मग 3 सामन्यांची मालिकाच खेळवता येत असे. पण ही सुरुवात झाल्यानंतर इतक्या मोठया फरकाने व्हाइटवॉश देणारी भारतीय टीम पहिली टीम आहे आणि न्यूझीलंडला घरच्या मैदानावर मालिकेत हरवणारीही भारतीय टीम पहिली आहे. विराट ब्रिगेडने हे करून दाखवलंय ते मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावून आणि मनाचा कणखरपणा दाखवत. शिखर धवन, के.एल. राहुल, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यामुळे आपली फलंदाजी मजबूत आहेच. आणि या मालिकेत जसप्रीत बुमरा, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर यांनी सातत्याने गोलंदाजी करत मालिका विजय शक्य केला.

 

मालिकेतील अंतिम सामना माउंट माउंगनुई इथे होता. मैदानावरील विकेट पाटा आहे. फलंदाजांनी इथे भरपूर धावा कुटलेल्या आहेत. अशा मैदानावर 3 बाद 164 ही धावसंख्या भारतीय टीम राखू शकली ती बुमराने 12 धावांत घेतलेल्या 3 बळींमुळे आणि त्याला नवदीप आणि शार्दुल यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवून दिलेल्या साथीमुळे. अखेर सात धावांनी टीमने हा सामना जिंकला.

 

विजयाचा सोपस्कार पूर्ण झाल्यावर संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी जोरजोरात टाळया वाजवत आणि धावत थेट मैदान गाठलं. विजयाचं महत्त्व त्यांना कळत होतं. शेवटचे तीन सामने कसोटी बघणारे होते. यातील दोन तर सुपरओव्हरपर्यंत रंगले. कोण जिंकेल हे शेवटपर्यंत सांगणं कठीण. भारतीय संघ मागच्या तेरा वर्षांत आपली पहिली सुपर ओव्हर खेळला आणि पहिल्या सामन्यात रोहित शर्माने शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकार लगावत विजय खेचून आणला. तर पुढच्या सामन्यात विराट कोहलीने अनुभवाच्या जोरावर फलंदाजी करत विजय मिळवला.

 

म्हणूनच रवी शास्त्री यांनी सामन्यानंतर ट्वीट केलं - 'अनन्यसाधारण असे शेवटचे तीन सामने. भारतीय संघाची सरस कामगिरी.' फक्त रवी शास्त्रीच नाही, तर सगळयाच आजी-माजी खेळाडूंनी भारतीय टीमवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. वीरेंद्र सेहवागने आपल्या ट्वीटमध्ये भारी गोष्ट लिहिलीय. किवी संघाला शेवटच्या तीन सामन्यांत विजयासाठी अनुक्रमे 4 धावांत 2, 18 चेंडूत 18 आणि 9 षटकांत 54 धावा हव्या होत्या. असं असताना भारतीय गोलंदाजांनी विजय खेचून आणला, हे संघाच्या यशाचं गमक आहे. गोलंदाजांचं यश. जसप्रीत बुमरा, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, रवी जाडेजा आणि महम्मद शामी यांच्यावर गोलंदाजीची मदार होती. पैकी जसप्रीत बुमराने यापूर्वीच स्वत:ला एकदिवसीय आणि टी-20 प्रकारात सर्वोत्तम असल्याचं सिध्द केलं आहे. महम्मद शामीही आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभवी आणि कसलेला आहे. त्यांच्यानंतर शार्दुल आणि शिवम हे तसे आंतरराष्ट्रीय स्तरावर नवखे, तर चहल, जाडेजा यांची फिरकी न्यूझीलंडमध्ये यशस्वी ठरणं कठीण. पण शार्दुल आणि बुमरा यांनी गोलंदाजीचा सगळा भार वाहून आपलं कसब सिध्द केलं. पाच सामन्यांत शार्दुलने बाराच्या स्ट्राइक रेटने 8 विकेट घेतल्या, तर बुमराचा स्ट्राइक रेट होता वीसचा आणि त्याने सहा बळी मिळवले. त्याने सरासरी षटकामागे साडेसहा धावा देत प्रतिसर््पध्यांवर दडपण आणण्याचं काम पुरेपूर केलं.

 
india vs new zealand 2020

दुसरीकडे, फलंदाजांची कामगिरीचं कौतुक खुद्द कर्णधार विराट कोहलीने कोणत्या शब्दात केलंय बघा - 'दोन सुपर ओव्हरचे सामने जिंकून ही मालिका जिंकली, याचा संघाला कायम अभिमान वाटत राहील. सुपर ओव्हरचं एकमेव षटक खेळण्यासाठी कुणाला पाठवायचं यावर संघात जोरदार चर्चा झाली. जोरकस फटके मारणारा म्हणून संजू सॅमसनला पाठवायचं जवळजवळ ठरलं होतं. पण अखेर अनुभवाला महत्त्व देऊन मी स्वत: जाण्याचा निर्णय घेतला आणि रोहितलाही तेच सांगितलं.'

 

पुढे जाऊन युवा खेळाडूंना घेऊन मिळवलेल्या विजयाबद्दल आणि हरलेले सामने जिंकण्याबद्दल विराट म्हणतो, 'संघामध्ये फक्त एकाच गोष्टीवर चर्चा होत होती. सामना कसा जिंकता येईल, त्यासाठी काय करता येईल? आम्ही कुठल्याही परिस्थितीत जिंकण्यासाठीच विचार करत होतो. आणि त्या आमच्या प्रयत्नांना यश मिळाल्यामुळे संघातील युवा खेळाडूंना मोठा आधार मिळेल. ही मालिका अशा विजयांसाठीच लक्षात राहील.'

 

फलंदाजीत के.एल. राहुलने या मालिकेत मोठी जबाबदारी बजावली. 140च्या स्ट्राइक रेटने पाच सामन्यांत त्याने 224 धावा कुटल्या आणि शेवटच्या सामन्यात रोहित जायबंदी झाल्यावर संघाचं नेतृत्वही केलं. त्याच्यासाठी ही मालिका खास म्हणावी लागेल. तर रोहित शर्माने 140, विराट कोहलीने 105 धावा केल्या. श्रेयस अय्यरला या मालिकेत निवड समितीने संधी दिली आणि त्यानेही मोलाची कामगिरी करत 140 धावा केल्या.

 

सर्वांगसुंदर विजयाची ही मालिका येणारे काही दिवस क्रिकेट रसिकांच्या नक्कीच लक्षात राहील. त्याचबरोबर भारतीय संघ विचार करत असेल तो आगामी एकदिवसीय मालिकेचा. पाच तारखेला पहिला सामना हॅमिल्टनमध्ये होणार आहे. हे वर्षं टी-20 विश्वचषकाचं आहे आणि त्या दृष्टीने भारतीय संघाने वर्षाची सुरुवात दणक्यात केली आहे.

 


Powered By Sangraha 9.0