त्वचा आणि योग

स्रोत: विवेक मराठी    दिनांक04-Feb-2020
|

त्वचा ही पंचमहाभूतामधील वायूचे प्रतिनिधित्व करत. योगशास्त्रात शरीरातील आंतरिक आणि बाह्यअशा दोन्ही भागांवर काम केले जाते. म्हणूनच योगसाधना शारीरिक तंदुरुस्तीसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी एक परिपूर्ण शास्त्र आहे. आसनांद्वारे रक्ताभिसरण वाढवले जाते. आणि योग्य रक्तभिसरण प्रक्रियेमुळे रक्तसंचलन चांगल्या प्रकारे होऊन त्वचेच्या Dermis layerमार्फत सर्व भागात शुध्द रक्त पुरवले जाते. त्यामुळे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडची देवाणघेवाण (सूक्ष्म श्वसन) योग्य होऊन त्वचेचे आरोग्य सुधारते.

yog_1  H x W: 0

त्वचा - शरीरातील सर्वात सुंदर आणि सर्वात मोठा अवयव! त्वचेशिवाय आपण आपल्या शरीराची कल्पनाच करू शकत नाहीत. ते खूप विद्रूप दिसेल. शरीरातील स्नायू, अवयव, इंद्रिय यांना झाकून त्यांचे संरक्षण करण्याचे अतिमहत्त्वाचे काम त्वचा करते.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/


त्वचा म्हणजे नाजूक, तलम, विविधरंगी - गोरी, सावळी, काळी तरीही तुकतुकीत, कांतिमान आणि तेजस्वी! इतकी नाजूक असूनही शरीराची जबरदस्ती संरक्षक भिंत म्हणूनही त्वचा महत्त्वाचे कार्य करते.

शरीराला 'घटावकाश' असे म्हणतात. आकाशतत्त्वाचा एक भाग जो आकाशापासून वेगळा केला आहे, त्यामुळे आकाशात म्हणजेच बाह्य वातावरणात जे काही बदल होतात, त्यांचा प्रत्यक्ष परिणाम त्वचेवर होतो. वातावरणात गारवा वाढला - त्वचा कोरडी पडते. गरमी वाढली की घाम येतो. त्वचेद्वारे बाह्य विजातीय, जंतू, धूलिकण, बाष्प, विषाणू यांना रोखले जाते.

दररोज स्नानादी दिनचर्या करून आपण आपल्या त्वचेची काळजी घेतो. बाह्य उपचाराप्रमाणे आंतरिक उपचार जर केले, तर त्वचा आरोग्यपूर्ण चिरतरुण राहील.

योग आणि योगातील विविध क्रिया या त्वचेच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

सर्वप्रथम आपण योग जाणून घेऊ या. योगास 'अष्टांगयोग' असेही म्हणतात. योगाचे आठ भाग आहेत - यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. योगशास्त्राची सुरुवात 'अय योगानु:शासनम्। या श्लोकाने होते. योगशास्त्र शिकण्यासाठी अंगी अनुशासन - शिस्त असणे गरजेचे आहे. नियमांचे पालन केल्याशिवाय मनुष्य अंतर्बाह्य बदलू शकत नाही, असे योगशास्त्र सांगते.

यम - सामाजिक शिस्त, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये समाजात वागताना अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे) ब्रह्मचर्य, अपरिग्रह (संग्रह न करणे) हे गुण असावे. हे गुण मनुष्यातील नैतिकतेचे दर्शन घडवतात. आपल्या विषयाला अनुसरून यामधील ब्रह्मचर्य या गुणाचे पालन व्यवस्थित झाले, तर कुठल्याही प्रकारचे चर्मरोग, गुप्तरोग, एड्स इ. व्याधी होणार नाहीत. बालपणापासून ब्रह्मचर्याचे पालन करायला शिकवले पाहिजे. त्यासाठी जे मनोबल हवे आहे, ते उपासना व दैनंदिन साधना (प्रार्थना, ॐकार, मैदानी खेळ, सूर्यनमस्कार, सायंकाळी शुभं करोति म्हणणे किंवा डोळे बंद करून मनन करणे) याद्वारे मिळते.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/


साधारण आठव्या वर्षीपासून व्यवस्थित योगाभ्यासाला सुरुवात करावी. नवीन गोष्टी लवकर आत्मसात करण्याचे हे वय आहे. इथे शरीर तंदुरुस्त आणि मनात आत्मविश्वास निर्माण झाला, तर आपण तारुण्याच्या उंबरठयावर येणाऱ्या कामविषयक नैसर्गिक-अनैसर्गिक प्रलोभनांच्या आहारी जाणार नाहीत. योगसाधना शारीरिक तंदुरुस्तीसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी एक परिपूर्ण शास्त्र आहे, यात शंका नाही.

नियम - वैयक्तिक शिस्त. समाजामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे गुण व्यक्त करण्यासाठी जो आत्मविश्वास लागतो, तो 'नियमांमधून' मिळतो. हिंसेला विरोध करताना, सत्य बोलण्यासाठी एक धारिष्टय लागते, जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अवलंबून आहे. नियमामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान हे गुण येतात.

 

आपल्या विषयाला अनुसरून शौच, स्वच्छता हा गुण महत्त्वाचा आहे. शौच म्हणजे शरीरातील मलभाग साफ करणे. मल म्हणजे 'मलमूत्र' एवढाच मर्यादित मलभाग नव्हे. प्रदूषणामुळे डोळयात किंवा नाकात जमलेली घाण, घामामुळे त्वचेवर जमलेला स्तर, कानात किंवा डोक्यातील कोंडा इ. बाह्यमल होय. तसेच रक्त तपासण्यामध्ये आपण Uric acid वाढले आहे, Creatinine, Cholesterol, blood sugar वाढली आहे असे पाहतो, हेसुध्दा आंतरिक मलाची उदाहरणे आहेत. दररोज पोट साफ न होणे, Constipation ज्यातून जास्त acidची निर्मिती होते, त्याचेच रूपांतर मूळव्याध, भगंदर या रोगात होऊ शकते. आरोग्यासंदर्भातील हा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. 'सर्व रोग प्रजायंते जायन्ते मल संचयात्।' त्यामुळे मलसंचय होणार नाही याची काळजी योगात घेतलेली आहे. त्यासाठी उपाय म्हणून शौच हा विशेष गुण सांगितला आहे. बाह्ममल शुध्दीसाठी स्नान हा एक नित्यनैमित्तिक उपचार सांगितला आहे. त्याचप्रमाणे विविध योगासने आणि प्राणायाम याद्वारे आंतरिक इंद्रिय आणि ग्रंथी (Hormones) जागृत (Stimulate) करण्याचे कार्य होते.


याव्यतिरिक्त योगामध्ये
'षटक्रिया' नावाने काही Water therapy सांगितलेल्या आहेत. त्या सर्व त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.

yog_1  H x W: 0

शंखप्रक्षालन - दररोज सकाळी उठल्यावर 2 ग्लास कोमट पाणी पिऊन खाली दिलेली आसने 2 वेळेस करावी. या क्रियेने शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवले जाते. ज्याद्वारे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी केली जाते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले की त्वचा Dehydrate होते. झाडांची पाने जशी कमी पाण्याने सुकतात, तशी त्वचा काळवंडलेली, निस्तेज दिसायला लागते. शंखप्रक्षालन नियमितपणे केल्याने त्वचा सतेज, टवटवीत दिसते.

 

नेत्रस्नान - तोंडात भरपूर पाणी भरावे. (गाल पूर्ण फुगेपर्यंत) डोळे उघडे ठेवून गार पाण्याचा हबका डोळयांवर व चेहऱ्यावर मारावा. याने डोळयांचे सौंदर्य व आरोग्य अबाधित राहते. त्याचप्रमाणे गाल फुगवून चेहऱ्यावर गार पाण्याचा शिडकाव केल्याने चेहऱ्याची त्वचा निरोगी बनते. सुरकुत्या येण्याचे प्रमाण घटते. गालाचे स्नायू ताणल्या गेल्याने त्यातील तन्यता (elasticity) वाढते.

जलधौती - आकंठ (कंठापर्यंत) भरपूर कोमट पाणी पिऊन तोंडावाटे ते पाणी 'उलटी' स्वरूपात काढणे. जलधौतीमुळे शरीरातील अतिरिक्त आम्ल आणि कफ बाहेर काढला जातो. पित्तामुळे त्वचेला अनेकदा रॅश, चट्टे येणे, खाजणे, त्वचा लाल होणे तसेच शीतपित्तामुळे कंड, गांधी येणे, त्वचा सुजणे इ. तक्रारी उद्भवतात. अशा वेळी योग्य मार्गदर्शकासमोर जलधौती केल्याने त्वचाविकारात खूप फायदा होतो.

आसन - ध्यानोपासनाय, बलोपासनाय, शिथिलीकरणाय स्वास्थ्यसंरक्षणाय, स्वास्थ्यसंवर्धनाय असे आसनांचे विविध प्रकार आहेत.

आसनांमध्ये ताण (stretching), दाब (Pressure), वक्रता (twisting) रूपांतील क्रिया आहेत. स्नायू ताणले, दाबले किंवा वळवले जातात, त्यामुळे त्वचेची लवचीकता वाढते.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/


आसनांमध्ये सिंहमुद्रा, चेहऱ्याचे व्यायाम, त्राटक, टालूबंध, नेत्रस्नान या क्रिया चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवतात. जलधौती, शंखप्रक्षालन यासारख्या क्रियांनी शरीरातील उष्णता कमी करून त्वचेवर तारुण्यपिटीका येण्याचे प्रमाण कमी होते. योगनिद्रा, शवासन, मकरासन या शिथिलीकरण योगाद्वारे डोळयाखालची काळी वर्तुळे, निस्तेजता कमी होते. सर्वांगासन, शीर्षासन, मत्स्यासन, चक्रासन, कंधरासन या आसनांनी चेहऱ्याकडे रक्तपुरवठा वाढतो. त्यामुळे त्वचा कांतिमान बनते.

पश्चिमोत्तनासन, गोमुखासन, नमनमुद्रा, अर्धमत्स्येंद्रासन यासारख्या आसनांद्वारे हाताची, दंडाची सैल पडलेली त्वचा घट्ट होते. वज्रासन, पद्मासन, उत्थिदपादासन, प्रसारीतपादासन, पांदांगुष्ठासन इ. झोपून करावयाच्या आसनांद्वारे पायावरील त्वचेचा सैलपणा कमी होतो.

व्हिटॅमिन डी हे फक्त सूर्यप्रकाशाद्वारे मिळू शकते, हे जगजाहीर आहे. योगामध्ये ब्राह्ममुहूर्तावर योगसाधना करावयास सांगितली आहे. तसेच पूर्वेकडे तोंड करून सूर्योदयाच्या वेळी सूर्यनमस्कार घालण्याचा प्रघात आहे. यामुळे भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी त्वचेद्वारे शरीरात शोषले जाते. सूर्यनमस्कारात पूरक रेचक विशिष्ट पध्दतीने असल्याने प्राणवायूसुध्दा योग्य प्रमाणात मिळतो. त्यामुळे नियमित योगसाधना सूर्यउपासना करणाऱ्या साधकांना डी-थ्रीची कमतरता कधीच होणार नाही. योगी-योग उपासना करणारा चिरतरुण दिसतो तो याच कारणामुळे!

आसनांद्वारे रक्ताभिसरण वाढवले जाते. सूक्ष्मातिसूक्ष्म कोषिकांपर्यंत रक्तसंचलन चांगल्या प्रकारे झाल्याने त्वचेच्या Dermis layerमार्फत सर्व भागात शुध्द रक्त पुरवले जाते. त्यामुळे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडची देवाणघेवाण (सूक्ष्म श्वसन) योग्य होऊन त्वचेचे आरोग्य सुधारते. आसनांमधील स्थिरता आणि श्वसन, तसेच प्राणायामाद्वारे आंतरकुंभक आणि बाह्यकुंभक याद्वारे प्राणवायूचे सर्व नसनाडयांमधून रक्तासोबत होणारे संचलन त्वचेला कांतिवान, तेजस्वी बनवते. नियमित केलेला प्राणायाम शरीरातील वायुरूप विजातीय, प्रदूषणामुळे निर्माण झालेले विजातीय बाहेर काढण्यास मदत करतो.

प्राणायाम फक्त श्वसनावरच काम करीत नाही, तर मनावर खूप चांगला प्रभाव पाडतो.

चले वाते चलं चित्तं निश्चले निश्चलं भवेत्।

योगी स्थाणूत्वमाप्नोति ततो वायुं निरोधयेत्॥

चित्ताची स्थिरता हवी असेल, तर शरीरातील वायू-श्वास स्थिर झाला पाहिजे. त्वचा ही पंचमहाभूतामधील वायूचे प्रतिनिधित्व करते. स्पर्श हा वायूचा गुण आहे, जो त्वचेचाही गुण आहे. त्यामुळे वायू, वात स्थिर असेल तर त्वचाही निरोगी राहील. श्वास हे अतिउत्तम माध्यम आहे वायू, पर्यायाने त्वचा आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/


सर्व रोगांचे मूळ हे मनोकायिक अस्वस्थतेत दडलेले आहे. जेव्हा ताण निर्माण होतो, तेव्हा शरीरात खूप बदल होतात. ताणाचा परिणाम म्हणून त्वचेकडील रक्तपुरवठा कमी होतो. उदा. 'भीतीने तो अगदी पांढराफटक पडला' किंवा 'स्टेजवरून एवढया लोकांना पाहून माझे हातपाय गार पडले.' त्यामुळे सततच्या ताणामुळे त्वचेला रक्तपुरवठा कमी होतो. प्राणवायू कमी मिळतो. परिणामी त्वचा कोरडी पडते. त्यातूनच पुढे सोरायसिससारख्या व्याधी निर्माण होतात. कुठल्याही प्रकारच्या त्वचाविकारात डॉक्टर्स योग-प्राणायाम करण्याचा सल्ला देतात.

योगाद्वारे मन शांत होते. स्थिर होते. स्थिर मनात अस्वस्थता नसते, उलट आत्मविश्वास असतो. शांत मन, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षङ्रिपूंना (भावनांना) नियंत्रणात ठेवते. ताणाबरोबर मन वाहत जात नाही. मनातील तामसिक आणि राजसिक विचारावर नियंत्रण मिळवून सात्त्वि गुणांची वाढ होते. खूप नकारात्मक विचार, न्यूनगंड त्यातून निर्माण होणारी चिडचिड किंवा राग हा योग प्राणायामाने नियंत्रित होतो. मनुष्याची स्वत:ची स्वत:च्या रूपाशी-स्वरूपाशी ओळख होते. स्वरूप हे शारीरिक, मानसिक, बौध्दिक आणि आध्यात्मिक अशा चढत्या क्रमाने मानवास उत्क्रांत बनवते. समृध्द बनवते. त्यामुळे योगाची कास कधी सोडू नका. आपल्या आयुष्यातील व योगाचा योग लवकरच येऊ द्या.

- योग थेरपिस्ट प्रांजली प्रसेनजीत फडणवीस

संचालिका - स्वरूप योगसाधना केंद्र

7387268419